१२ ऑगस्ट २०१०
दुपारचे ४ वाजले होते...दवाखान्याची O.P.D. सुरु होती...अचानक लोक बिरादरी प्रकल्पाच्या गेट मधून काही आदिवासी बांधव एका माणसाला खाटेवर उचलून आणतांना दवाखान्यात काम करणाऱ्या माणसाने पाहिले....आणि धावपळ सुरु झाली....लोक बिरादरी प्रकल्पा पासुन सुमारे २५ किलो मीटर अंतरावर असलेल्या हितापाडीच्या जंगलात घराला कुंपण करण्यासाठी बांबू आणावयास व कंद-मुळे गोळा करण्यास गेलेल्या एका आदिवासी बांधवावर जंगलातील मादी अस्वलाने हल्ला चढविला....शरीराच्या अनेक भागावर अस्वलाने चावून अक्षरशः लचके तोडले होते...जंगलात एकटाच गेला असल्या मुळे त्या आदिवासी बांधवाला शोधून काढण्यास इतरांना उशीर लागला....सकाळी सुमारे ८ वाजता त्याच्या वर हल्ला झाला...हे गाव जंगलात आहे....रस्ते अतिशय वाईट...गाडी जाण्याचा प्रश्नच नाही...चालत आणि उचलून असेच आणावे लागते आजही.......आणि पुढे किती वर्षे कोण जाणे.....चालत उचलून आणे पर्यंत संध्याकाळचे ४ वाजले होते..... डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी यांनी प्राथमिक तपासणी केली....डॉ.दिगंत आणि डॉ.अनघा व इतर सहकाऱ्यांनी त्या जखमी बांधवाच्या जखमा स्वच्छ करून आणि अनेक टाके देऊन पट्टी बांधून बंद केल्या....या सर्व प्रकाराला तब्बल २ तास लागले....एवढ्या मोठ्या जखमा होत्या सर्वांगावर....पण त्या आदिवासी बांधवाची सहन शक्ती प्रचंड होती....तो पूर्ण पणे शुद्धीत होता...त्याने स्वतः ओढवलेला प्रसंग आम्हास सांगितला....फोटो पाठविण्याचा एकच उद्देश आहे....तो म्हणजे लोकांना परिस्थितीची जाण व्हावी....
१४ ऑगस्ट २०१०
रात्रीचे ८ वाजले होते...छत्तीसगड च्या डोक्के गावातील एका आदिवासी बांधवाला अश्याच प्रकारे दवाखान्यात आणले आहे...हा माणूस तब्बल ३ दिवसांनी लोकांना सापडला...त्याच्या जखमांना प्रचंड दुर्गंधी येत होती....या माणसाचा एक डोळा अस्वलाच्या हल्ल्यात निकामी झाला होता....त्याच्यावरही वरील प्रमाणेच उपचार केल्या गेले....लोक बिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश च्या सीमेवर आहे....२००-२५० किलोमीटर अंतरावरून आदिवासी आणि इतरही गरीब बांधव या दवाखान्यात नेहमीच येत असतात.....राज्ये बदलली तरी परिस्थिती सारखीच आहे....छत्तीसगड मध्ये तर परिस्थिती अजून जास्त वाईट आहे.....कोण तारणार या सर्व गरीब-निरपराध बांधवांना? स्वातंत्र्य मिळाल्या पासुन किंचितही सुधारणा होत नाही...याला कोण आहे जबाबदार? या सर्व गरीब आदिवासी बांधवांसाठी गेली अनेक वर्षे करोडो रुपयांची Packages जाहीर होतात...मग परिस्थिती का बदलत नाही? संवेदना कधी होणार जाग्या? माणुसकी आणि लाज कुठे गहाण टाकली माणसाने? हा भ्रष्टाचार कधी होणार नष्ट? कोण करणार नष्ट? अनेक प्रश्न आहेत मनात पण मार्ग काय?
देशात सुधारणा प्रचंड झाली आहे....पण नेमके कुठे-कुठे?......Multiplex, Big Bazaar, मोठाल्ले MOLLS, हॉटेल्स, कोर्पोरेट सेक्टर्स, मोबाईल, इंटरनेट आणि I.T. या सर्व क्षेत्रातील प्रगती हे सगळे आजही फक्त्त शहरा पुरतेच मर्यादित आहेत.....अपवाद-काही ठीकाणी ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचली आहे. ती पण क्रांती आहे.....पण आदिवासी बांधव आणि शहरातील झोपडपट्टीत राहणारी गरीब जनता यांच्या साठी जी काही कोट्यावधींची PACKAGES दरवर्षी जाहीर होतात त्याने नेमका विकास होतो तरी कोणाचा? खेड्यातील-पाड्यातील शाळांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.....रेशन वेळेवर मिळाले नाही म्हणून अनेक आश्रम शाळा या वर्षी तब्बल २०-२५ दिवस उशिराने सुरु झाल्यात.....त्या शाळांचे परीक्षण करणार कोण? परीक्षण करणाराही भ्रष्टाचारी निघाला की झाले.....अशा अनेक शाळा या महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात आहेत जिथे शिक्षक फक्त्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि पगाराच्या दिवशी जातात....१० वी - १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के कॉपी सर्रास चालते....खेड्या पाड्यातील ९० % शिक्षक दारूच्या आणि गुटका च्या आहारी गेले आहेत....अनेक शाळांच्या समोरच पानठेला आढळतो(हे कायद्याने गुन्हा आहे तरी पण...) .....हेच शिक्षक मुलांचे आदर्श ठरतात...आणि मग मुलं पण त्याच मार्गी लागतात...तसेच हाल खेड्या-पाड्यातील दवाखान्यांचे आहेत...कोणीही डॉक्टर तयार नसतो खेड्यात जाऊन राहायला....या भागातील एका तालुक्याचा तहसीलदार आदिवासींच्या खिशात हात घालून पैसे काढायचा, सर्रास दारू पिऊन ऑफिस मध्ये बसायचा, कित्येकदा दारू पिऊन गटारात पडलेला आम्ही स्वतः त्याला बघितले आहे......सहावा वेतन आयोग लागला म्हणून काय ही परिस्थिती सुधरणार थोडी आहे.....मग हे लक्षात घ्यायला हवे की योग्य अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, या मुलभूत सुविधा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे तसा तो आदिवासी आणि गरीब जनतेचा पण हक्क आहे... कारण तो ही भारतीयच नागरिक आहे....मुळ मुद्दा असा की स्वातंत्र्या नंतर जी काही PACKAGES जाहीर झालीत त्यातील एक किंवा दोन PACKAGES नीट आणि पूर्णपणे गरीब जनतेसाठी वापरली गेली असती तर देशाचे व गरिबांचे सोने झाले असते.....यागरीब जनतेला काम द्या, शिक्षणात संधी द्या....निवडणुकीत मत मिळविण्यासाठी आयते काहीही देऊ नका..... त्यांना लायक बनवा.... स्वतःच्या पायावर त्यांनी उभे राहावे असे शिक्षण द्या....अशा योजना राबवा.....योग्य अधिकाऱ्याची निवड करा...चांगले निर्व्यसनी शिक्षक व डॉक्टर नेमा.....जो चांगले काम करेल त्यालाच पगार द्या....जो काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करा....त्या भ्रष्टाचारी माणसाला कायमचे निलंबित करा.....देश कुठलाच वाईट नसतो....पण त्या देशाला बळकटी देण्याचे काम आपण करायला हवे....भ्रष्टाचाराच्या घाणेरड्या विळख्यातून देशाला मुक्त करायचा आपापल्या परीने प्रयत्न करायला हवा... नुसते हवेत बोलून चालणार नाही....प्रत्येकाने कृती करायला हवी....प्रत्येक माणसाच्या मर्यादा असतात....सर्वांचे काम सारखे असू शकत नाही...प्रत्येक माणसाची काम करण्याची वेगळी पध्दत असते.....स्वतःला पडताळून प्रत्येकाने आपल्या कुवती प्रमाणे देशाला बळकटी देण्याचे काम करावे....सर्व भ्रष्टाचारी लोकांना विरोध करून व त्यांना धडा शिकवून काम केले पाहिजे...समाजाप्रती संवेदना, माणुसकी, प्रेम जागृती झाल्या शिवाय हे शक्य नाही.....म्हणून सुरवात स्वतः पासुन करावी....
काही लोकांचे म्हणणे असते की दर वर्षी स्वातंत्र्यदिनी भ्रष्टाचार, सरकार आणि राजकीय नेते याच विषयी चर्चा होते...चांगले काय घडले मागील वर्षात हे कोणीही बोलत नाही....याचाच अर्थ असा की भ्रष्टाचाराने चांगल्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर दरवर्षी मात केली आहे.....म्हणजेच भ्रष्टाचाराचेच पारडे जड झाले...मग या माणसांवर आणि त्यांच्या देशद्रोही कारभारावर जास्त आणि नेहमीच चर्चा होणे अगदी नैसर्गिक आहे.....आपण लिहिणारे आणि वाचणारे थोडीफार शिकलेली लोक आहोत....त्यामुळे आपले कुठल्याही प्रकारे शोषण झाले की आपण त्याची चर्चा करू शकतो.....आपणही या मध्ये भरडले जातोय.....पण जो अतिशय गरीब आहे...अशिक्षित आहे अशा माणसाचे जेव्हा शोषण होते...तो जेव्हा भरडला जातो....तेव्हा त्याला काय करावे ते काहीही कळत नाही ....ज्याच्या कडे धड अंग झाकायला कपडे नाहीत, दोन वेळेसचे पोट भरण्याची मारामार असते अशा बांधवांना सुद्धा भ्रष्टाचारी लोक सोडत नाहीत...जो आधीच नागवा आहे त्याला अजून नागवे करायचे हे आपल्या देशात सर्रास चालते...कारण त्याला आवाज नाही...त्याच्या आई-बहिणीवर बलात्कार केला तरी तो आवाज काढू शकत नाही....त्याच्या कडे पैसा नाही....कोणीही त्याची हाक ऐकत नाही....आदिवासी-गरीब लोकांनाही मन असत, भावना असतात आणि जीव पण असतो...हे सगळे जाणीव पूर्वक विसरले जाते...आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो..... हेच चित्र कायम ठेवायचे आहे या भ्रष्टाचारी लोकांना.....असेच दिसते....म्हणजेच गरीब-आदिवासींच्या नावे दरवर्षी कोट्यावधींची PACKAGES जाहीर करता येतील.....आरोग्य खात्याचे वेगळे, शिक्षण खात्याचे वेगळे, कृषी खात्याचे वेगळे.....राज्य सरकारचे वेगळे.....केंद्र सरकारचे वेगळे.....असे कितीतरी PACKAGES ....पण त्यातील जास्तीत जास्त मदत ही मधल्या मधेच लंपास होते....देशात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या धरणान मुळे लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले....विस्थापित व्हावे लागले...त्यांना कधीच योग्य मोबदला मिळाला नाही....आणि त्यांचे पुनर्वसन पण नीट झाले नाही....ही गरीब अशिक्षित जनता भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या भूल-थापांना नेहमीच बळी पडत असते.....आणि आपले सर्वस्व गमावून बसते.....काय हाल होत असतील या लोकांचे याची आपण कल्पना पण करू शकत नाही....अशा अनेक प्रगतीशील योजना सरकार आखत असते (अर्थात यात जास्त फायदा सरकारी लोकांचा असतो)....पण त्या मध्ये जे लोक भरडले जातात त्यांचे नीट पुनर्वसन केल्यावरच या योजना राबविल्या गेल्या पाहिजेत....पुनर्वसित लोकांना घर, जमीन, आरोग्य सुविधा आणि मुलांना चांगले शिक्षण हे सर्व नीट पुरवल्या गेले पाहिजे....किती वर्षे लोक हे सहन करणार....या अत्याचारातून नक्कीच पुढे मोठा उठाव होईल....करायला काम नाही, खायला अन्न नाही म्हणून ही जनता नाईलाजेस्तव भुरट्या चोऱ्या, लुट मार किवा भिक मागतील....मग परत आपला त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल....सहानुभूती दूर होऊन त्यांच्या बद्दल चीड निर्माण होईल....पण या मागची कारणे आपण कधी तपासून पाहणार.....जन जागृती ही केलीच पाहिजे....गावा-गावात जाऊन, झोपडपट्टी मध्ये जाऊन, आदिवासी पाड्यात जाऊन...लोकांना शिक्षण घ्यायला भाग पडावे लागेल....म्हणजेच तो आयुष्यात चांगला मार्ग स्वीकारेल...अन्यायाला वाचा फोडू शकेल....हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाने एकत्र येऊन करण्याचे काम आहे.....ही कामे निस्वार्थ पणे व्हायला हवीत...आपापल्या परीने प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने तुम्ही राहता तेथील आसपासच्या खरच गरजू लोकांना मदत करावी....बदल नक्की होईल....वेळ लागेल पण नक्की होईल.....आपल्या पुढच्या पिढ्या आनंदाने जगू शकतील.....
.....म्हणूनच या विषयावर चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे....मग ही चर्चा फक्त्त घरापुरतीच मर्यादित नको....चांगल्या शाळांमध्ये जाऊन, कॉलेज मध्ये जाऊन भ्रष्टाचार विरोधी शिक्षण देण्याचे काम करायला हवे...पुढील पिढी मधील सरकार तरी कमी भ्रष्टाचारी होईल....कारण पुढील राजकारण्यांची पिढीही याच अशाच शाळांन मधून शिकून बाहेर पडणार आहे....(अर्थात राजकारण्यांना शिक्षण सक्तीचे केले तर बदल शक्य आहे)....शाळेतच चांगले संस्कार मुलांवर झालेत तर नक्कीच त्याचा फायदा पुढील पिढीला होईल......माणसाने नेहमीच आशावादी असावे....
अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org
Email: aniketamte@gmail.com
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 8:53 pm | प्रभो
अनिकेतराव , मिसळ पाव वर स्वागत. :)
लोकबिरादरी प्रकल्पाला शुभेच्छा.
24 Aug 2010 - 6:55 am | विकास
मिपावर स्वागत! अजून वाचायला, समजून घेण्यास आणि चर्चा करण्यास उत्सुक आहे. लोकबिरादरी प्रकल्पाला शुभेच्छा!
24 Aug 2010 - 7:28 am | सहज
मिपावर स्वागत! अजून वाचायला, समजून घेण्यास आणि चर्चा करण्यास उत्सुक आहे. लोकबिरादरी प्रकल्पाला शुभेच्छा!
या विषयावर कृपया अजुन लेख येउ द्या.
23 Aug 2010 - 8:56 pm | चिंतामणी
आत्तापर्यन्त वरवरची माहिती होती "लोक बिरादरी प्रकल्पाची".
आता सवीस्तर आणि अधिकृत माहिती मिळेल.
लिहीत रहा.
23 Aug 2010 - 9:06 pm | रामदास
मिसळपाववर स्वागत.
चर्चा विषय फार मोठा आहे.
मिपावरचे चर्चील सभासद या चर्चा विषयात भाग घेतीलच .
23 Aug 2010 - 9:32 pm | रेवती
मिसळपावर स्वागत!
आपले लेखन हे जळजळीत सत्य आहे हे आतापावेतो सगळ्यांना मान्य आहे.
मानसिकता बदलणे अवघड आहे पण अशक्य नाही. माझ्या आजूबाजूला बघितले तरी सुशिक्षित, उच्चशिक्षित असलेल्या (भारतीय)महिलांना स्वत:चे निर्णय घेता येत नाहीत/ घेउ दिले जात नाहीत. चार दोन डॉलर्स खर्च करताना नवर्याची परवानगी घ्यावी लागते. असे असताना आदिवासींच्या परिस्थितीची कल्पना करवत नाही.
23 Aug 2010 - 9:43 pm | अर्धवट
पुन्हा एकदा निशब्द
23 Aug 2010 - 10:02 pm | श्रावण मोडक
लिहा!
23 Aug 2010 - 10:03 pm | विलासराव
अनिकेतजी,मिसळपावर मनपुर्वक स्वागत!
प्रकाशवाटाही नुकतेच वाचलेय.
आपले अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
23 Aug 2010 - 10:12 pm | मिसळभोक्ता
अशी भयाण परिस्थिती असताना, हे आदिवासी नक्षलवाद्यांच्या कळपात जातात, त्यांना मूक पाठिंबा देतात, ह्यात नवल ते काय ?
अनिकेत, आणखी लिही.
डॉलर/रुपये/युवान; आयटी/नॉन-आयटी, पुणे/मुंबई ह्या थिल्लर वादविवादांना कचरापेटी दाखवण्यासाठी अशा प्रकारचे लेख आवश्यक आहेत.
23 Aug 2010 - 10:24 pm | छोटा डॉन
+१, अगदी हेच म्हणतो.
असे अजुन लेख येऊद्यात, मिपावर ह्या विषयावर नक्की चर्चा घडेल.
- छोटा डॉन
23 Aug 2010 - 10:47 pm | रेवती
मिभोंशी सहमत.
फालतू चर्चांना कचरापेटी दाखवली गेली पाहिजे.
23 Aug 2010 - 11:28 pm | चतुरंग
(सफाईकामगार)चतुरंग
24 Aug 2010 - 7:00 am | विकास
अशी भयाण परिस्थिती असताना, हे आदिवासी नक्षलवाद्यांच्या कळपात जातात, त्यांना मूक पाठिंबा देतात, ह्यात नवल ते काय ?
विषयांची गल्लत होऊ नये असे वाटते. कुठल्याही हिंसेचे समर्थन हे दुधारी शस्त्र आहे.
डॉलर/रुपये/युवान; आयटी/नॉन-आयटी, पुणे/मुंबई ह्या थिल्लर वादविवादांना कचरापेटी दाखवण्यासाठी अशा प्रकारचे लेख आवश्यक आहेत.
मी पुढे जाऊन असे म्हणेन की, उद्या थिल्लरपणा पूर्ण थांबला तरी अशा लेखांची आपल्या (म्हणजे माझ्या-इतरांच्या) ज्ञानात भर पडण्यासाठी आवशक्यता आहे. बाकी, भ्रष्टाचार जसा जनसामान्यांच्या मदतीने वाढतो तसेच असले विषय हे प्रतिसाद देऊन वाढतात. ते येऊ नये असे वाटत असेल तर त्याला प्रोत्साहन देऊ नये हे सगळ्याच जाणत्या मंडळींचे काम आहे असे वाटते. असो,
24 Aug 2010 - 7:08 am | मिसळभोक्ता
विषयांची गल्लत होऊ नये असे वाटते. कुठल्याही हिंसेचे समर्थन हे दुधारी शस्त्र आहे.
मी हिंसेचे समर्थन केलेले नाही. कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
23 Aug 2010 - 10:19 pm | नावातकायआहे
मिसळ पाव वर स्वागत आणि लोकबिरादरी प्रकल्पाला शुभेच्छा
23 Aug 2010 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव मराठी संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणा-या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणा-या पिढीच्या प्रतिनिधीचे लेखन वाचतांना आपल्याला भेटण्याचा थेट आनंद झाला. आपण लेखात विचारलेले प्रश्नाबाबत नेहमीच बोलले जाते. वेगवेगळे पॅकेजेस, भ्रष्टाचार, आणि त्यावर बोलणे आता निरर्थक ठरत आहे. अर्थात लेखनाच्या शेवटी आपण व्यक्त केलेल्या आशावादाशी अनेक सहमत असतील यात शंकाच नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2010 - 10:34 pm | धनंजय
विषण्ण वाटते. पण तुमच्या लेखात आशेचा किरण आहे :
मात्र "स्वतःला पडताळून" मती कुंठित होते.
सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करावी, कधी ओळखीच्या गरजू व्यक्तीला शिक्षणासाठी/भांडवलासाठी मदत करावी, ही उदाहरणे मनात येतात.
जीव झोकून केलेल्या कार्याबद्दल ऐकले की स्फूर्ती मिळते. त्या कथा कानावर यायला हव्याच. पण शूर नसलेल्या सामान्य सुशिक्षित नागरिकांनी खारीच्या वाट्याने केलेली कार्ये अधिक कानावर आली, तर हवे आहे.
24 Aug 2010 - 12:27 am | आनंदयात्री
हेच म्हणतो. धनंजयाशी सहमत आहे.
बाकी, अनिकेत आपले मिसळपाववर हार्दिक स्वागत. लोकबिरादरी प्रकल्पात होणार्या कामाबद्दल नितांत आदर आहे. तिथे होणार्या समाजकार्यासाठी ज्यांनी आपली आयुषे झिजवली आणि जे झिजवत आहेत त्यांच्या देवपणा बद्दल शंका नाही.
24 Aug 2010 - 1:36 am | निखिल देशपांडे
वरच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत
बाकी अनिकेत मिसळपाव वर स्वागत.
23 Aug 2010 - 10:45 pm | आळश्यांचा राजा
ही जागा अजून समृद्ध झाली आहे!
24 Aug 2010 - 12:10 am | कौशी
लेख वाचला........
भयानक परिस्थितीत..
24 Aug 2010 - 12:16 am | पुष्करिणी
+१ , खरच भयानक आहे सगळं हे
24 Aug 2010 - 4:57 am | गांधीवादी
खरच चांगला उपक्रम,
तुमच्या उपक्रमाची एक यादी प्रसिद्ध करा मिपावर,
जमेल तसे सहभागी होण्याचे प्रयत्न तरी करता येईल.
मला देखील सहभागी व्हायला आवडेल.
24 Aug 2010 - 6:19 am | अरुण मनोहर
अनिकेत सारख्या कर्मयोगी व्यक्तीचे मिपामधे हार्दीक स्वागत. मिपाचा स्तर त्यांच्या आगमनाने नक्कीच उंचावला आहे. मिपाचे कित्येक सदस्य आता हेच म्हणत असतील, की अनिकेतनी त्यांच्या लोककल्याण कामातील अनुभवाचा आणखी परिचय मिपावर जरूर करून द्यावा.
आपल्यापैकी बरेच जण कुठल्याना कुठल्या स्वरुपात ह्या मानवतावादी कार्याला मदत करायला उत्सुक असतील. अनिकेतनी अशा सदस्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्या कार्यात थोडा तरी हातभार लावण्याचे समाधान मिळू शकेल.
24 Aug 2010 - 11:19 am | नितिन थत्ते
मिसळपाववर स्वागत.
मिभोकाकांशी बराचसा सहमत.
24 Aug 2010 - 6:38 pm | विसुनाना
श्री. अनिकेत प्रकाश आमटे, मिसळपाववर आणि मराठी संकेतस्थळांच्या जगात स्वागत!
लेख विवेकी जनांच्या विचारांना वाचा फोडणारा आहे.
लिहीते रहा. तुमच्याकडे लोकशिक्षण आणि लोकसेवा या दोन्ही कार्यांचा फार मोठा वारसा आहे. तुम्ही स्वतःही हे कार्य करतच आहात.
वैयक्तिकरित्या मी (एक सामान्य भारतीय) काय करू शकतो?
आशावादी रहाण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आता पाणी नाकाच्या वर चढत आहे काय? अशी शंका वाटते.
24 Aug 2010 - 6:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रश्न मलाही टोचतो आहे.
25 Aug 2010 - 1:41 pm | समंजस
ही व्यथा नक्कीच व्यथीत करणारी आहे.
मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझ्या सारखी माणसे जी काही विशेष करत नाहीत समाजा करता त्यांना सुद्धा चिड येते हा परा कोटिचा भ्रष्टाचार बघून तिथे तुमच्या सारखी माणसे जी मोबदला न घेता, पदरचे खर्चून समाजकार्य करतात, आदिवासींच्या समस्या सोडवण्याकरीता कष्ट घेतात त्यांना काय वाटत असेल अश्या भ्रष्टाचाराबद्दल आणि असला भ्रष्टाचार करणार्यांबद्दल [ग्रामपंचायतीचा छोटया कारकून/सदस्यां पासून ते मंत्रालयातील कारकून/मंत्र्यां पर्यंत].
पॅकेजेस अर्थातच तळातल्या सामान्य नागरीकांपर्यंत नाही पोहोचत. असल्या पॅकेजेसमधे टाकलेल्या १०० पै. की फक्त १५ पैसेच पोहोचतात हे खुद्द आमच्याच पंतप्रधानांनी मान्य केलं आहे. त्यामुळेच ही दुर्दशा दिसून येते. तरी सुद्धा असली लोकं [ह्या पॅकेज वितरण यंत्रणेत सहभागी असलेली आणि ज्यांच्या वर ही जबाबदारी असते ती] जेव्हा देशभक्ती, भ्रष्टाचार आणि समाज उन्नती या विषयी बोलतात तेव्हा तो क्षण दांभिकतेचा आणि क्षुद्रपणाचा कळस असलेला असतो. अश्या लोकांना देशी काय आणि विदेशी काय कुठलेही राज्यकर्ते असू देत काहीच फरक नाही पडत कारण त्यांना त्यांची पोळी व्यवस्थीत भाजून घेता येते.
[कार्यसम्राट म्हणवून घेणारे ते गल्लो गल्लीतील नेते आणि त्यांचे तसलेच कार्यकर्ते ह्यांची मोठमोठाली होर्डिंग्स बघितली की त्या होर्डिंग्स खालचा रस्त्यावरचा/फुटपाथ वरचा मोठा खड्डा न चुकता दिसतोच फक्त त्या कार्यसम्राट नेत्याला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनाच तेव्हढा तो दिसत नाही]
अश्या परिस्थीत सुद्धा तुमच्या सारखी माणसे आपलं कार्य चालूच ठेवतात. इतर कोणीच काही करत नाही किंवा एवढा भ्रष्टाचारा आहे, सर्वच जण भ्रष्टाचार करतात, सर्वच जण खातात, एवढी मोठी पॅकेजेस जाहिर करून सुद्धा आदिवासींचा विकास होत नाही तर माझ्या छोटयाश्या कार्या मुळे काय होणार असला विचार न करता आपलं कार्य नेटाने करत आहात हे खुपच दिलासा देणारं आणि प्रशंसनीय आहे.
25 Nov 2012 - 5:07 pm | सासुरवाडीकर
खरच चांगला उपक्रम,
सहमत.
25 Nov 2012 - 10:57 pm | माम्लेदारचा पन्खा
तुमचे अनुभव समाजाची दृष्टी आमूलाग्र बदलणारे आहेत....
अनेक शुभेच्छा..........