माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात -
अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.
शेवटी एकदाचा तो सुदिन उगवला आणि अस्मादिकांच्या हाती इकडे अमेरीकेचा व्हिसा पडला आणि तिकडे जीव भांड्यात.
मग काय सामान सुमानाची बांधाबांध, मुलगा-मुलगी, सून-जावई, नाती यांच्याकरता खाऊ, कपडे, पुस्तकं, सीडीज घेणं यात दिवस कसे गेले ते कळलच नाही. उत्साहाला अफाट उधाण असे त्या दिवसात कारण कित्येक वर्षांनी लेक (मुलगा आणि मुलगी) भेटणार होते परत नातींना बघायची ओढ मनाला व्याकुळ करत होती.
हल्ली विमान प्रवास कमीत कमी तासांचा झाला आहे म्हणजे एअर इंडीयाच्या विमानाने तुम्ही लवकरात लवकर म्हणजे साधारण वीस एक तासात पोचता.
आणि अशाच एका संध्याकाळी मी अमेरीकेच्या डेलावेअर स्टेटच्या "नेवार्क" विमानतळावर पोचले. डेलावेअर हे फर्स्ट स्टेट म्हणून ओळखलं जातं जसं त्याच्या लगतचं न्यू जर्सी हे "गार्डन स्टेट" म्हणून ओळखलं जातं.अशी इथे पद्धत आहे. विमानतळावर मुलगा, मुलगी, जावई, सून, नाती स्वागतास हजर होते. माझ्या नातींना पाहून भरून आलं, त्या लांब प्रवासाचं चीज झाल्यासारखं वाटलं. पुढचे काही दिवस जेट लॅग आणि नव्हाळी कौतुकण्यात गेले. सरावायला काही दिवस म्हणा महीने लागलेच.
पण एकदा सरावल्यानंतर हळूहळू इथली जीवनपद्धती लक्षात येऊ लागली. इथे रेसिडेन्शिअल एरीआ मधे स्वतंत्र लहान घरं, मोठी घरं, रो हाऊसेस व अपार्ट्मेंट्स असे प्रकार दिसतात. घर लाकडी असतं व पूर्ण कार्पेटेड असतं. काही स्वतंत्र घरात मात्र सुबक , पॉलीशड लाकडी फ्लोरींग दिसतं. प्रत्येक डेव्हलपमेंटमधे मोकळी जागा किंवा छोटा पार्क असतो तर अपार्टमेट काँप्लेक्स मधे पोहोण्याचा तलाव आणि जिम. प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा ऊंच झाडांच्या रांगा असतात. प्रत्येक एरीयात लहानसे का होईना शॉपींग सेंटर असतेच जेथे तुम्हाला औषधविक्रेते, भाज्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने, टपाल खाते याशिवाय "बेस्ट बाय", "होम डेपो" सारखी मोठी दुकाने दिसतात. मोठे मॉल जसे कॉस्को, वॉलमार्ट, बी जे हे देखील असतात.
इथले निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. फक्त हिरव्या रंगाने झाडे भरलेली नसतात तर विविध रंगांची उधळण असते त्यांच्या पानांवर. पीवळी, नारींगी, लाल, जांभळी अशी ही उधळण पाहून डोळे दीपून जातात. लोकं खूप फुलवेडी. जिकडेतिकडे फुलांचे ताटवे लावलेले आढळतात. ठरावीक ऋतूतील पक्षांचे स्थलांतर अणि त्यांची आकाशातील माळ पाहून मन थक्क होते. रॉबीन, कार्डीनल, ब्लू जे कितीतरी मोहक पक्षी आपल्या अगदी अंगणात बागडतात. ससे, हरणं, खारी अंगणात येतात.
टीपीकल अमेरीकन माणूस कसा दिसतो विचरलं तर मला सांगता येणार नाही कारण जगभरातील लोकांनी या भूमीली आपलं घर मानलं आहे. मग तो ब्राऊन कातडीचा भारतीय असो वा पिवळा चीनी असो, गोरा ब्रीटीश असो वा काळा आफ्रीकन असो त्यामुळेच की काय इथे अन्नपदार्थांचे खूप वैविध्य दिसून येते. अमेरीकन, चायनीज, कोरीयन, कॉन्टीनेंटल, जॅपनीज, इटॅलीअन इतकेच काय तुर्कीश, पेरुव्हीअन, आयर्लंड्चे वगैरे रेस्टॉरंट्स दिसतात. याखेरीज खास अमेरीकन कुप्रसिद्ध जंक फूड मिळणारी "मॅकडोनाल्ड, टाको बेल, डंकीन डोनट्स" आदि रेस्टॉरंटस आहेतच. भारतीय लोकंही उद्योजकतेत मागे नाहीत बरंका. इथे अपना बझार आहे, भारतीय रेस्टॉरंट्स आहेत.
इथे पेट्रोलला गॅस म्हणतात व गॅस स्टेशनवर पैसे भरून स्वतःच गॅस गाडीत भरावा लागतो. पण त्यातही वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे नियम. न्यू जर्सी मधे गॅस आपला आपण भरणं बेकायदेशीर आहे जे की इतर स्टेटमधे कायदेशीर आहे. इथे रोख पैशापेक्षा प्लास्टीक मनी ला चलती जास्त. प्रत्येक घरात जितकी मोठी माणसं तितक्या कार असतात. बससेवा उपलब्ध असते पण ठरावीक वेळेत आणि ठरावीक भागातच. साधारणतः पती-पत्नी दोघेही नोकरदार असतात. त्यामुळे लहान मुलं डेकेअर्स मधे जातात, "आफ्टर्स्कूल अवर्स" ची सोयदेखील असते . मुलांना शाळेतून नेण्या-आणण्याचं काम शाळा किंवा डेकेअर करते. शाळांमधेही "पब्लीक" व "प्रायव्हेट" शाळा असतात. पब्लीक शाळांना फी नसते तर प्रायव्हेट शाळांना भरमसाठ फी असते.
नोकरदार वर्ग ८ ते ५ कामावर असतो. शनिवार, रवीवार सुट्टी. इथला वीकेंड खूप छान असतो. सगळेच लोक मनमुराद आनंद लुटतात. बाराही महीने अधून मधून केव्हाही पाऊस पडतो. हिवाळ्यात गुडघा गुडघा बर्फ त्यामुळे उन्हाळ्यात लोक मजा करून घेतात, समुद्रकिनार्यावर, दूर दूर सहलीला जातात, बारबेक्यू करतात. एकंदर चंगळ असते. हिवाळ्यात जाड जाड जॅकेट घालून कंटाळलेली प्रजा उन्हाळ्यात लहान लहान कपड्यात शिरते.
यांचा मोठा सण ख्रिसमस फारच धामधूमीत साजरा होतो. घरांना रोषणाई, घारांसमोर देखावे, महीनाभर खरेदीला गर्दी.
ब्लॅक फ्रायडे हा मोठा सेल असतो तसेच ईस्टर, हालोवीन हे सणही धामधूमीत साजरे होतात.
बहुतेक कुटुंबे मोठी असतात. किमान २ अपत्ये असतातच. कुमारी माता, विभक्त पती पत्नी यांचे प्रमाण जास्त आहे. पण तरीही मी म्हणेन एकत्र कुटुंबेच जास्त दिसतात. बायका पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात. स्त्रियांबद्दल औपचारीक आदर पाळला जातो.
एकदा मी मॉलमधून बाहेर पडत असताना एक वृद्ध जोडपंही बाहेर पडलं.आजी गाडीत बसतेवेळी , आजोबांनी पुढे होऊन गाडीचा दरवाजा उघडला. आजी गाडीत बसल्यावर आजोबांनी दरवाजा बंद केला व ते फिरून आपल्या बाजूच्या सीटवर येऊन स्थानापन्न झाले. त्यांना चालताना त्रास होत होता. मला हे पाहून खूप कौतुक वाटलं. दुकानात आत जातानाही मागून येणार्या व्याक्तीसाठी दरवाजा उघडा धरण्याची पद्धत आहे. कुठेही कितीही मोठी रांग असली तरी लोक शिस्तीत, शांत उभे असतात. स्वच्छतागृहे स्वच्छ असतात.
एकंदर मला अमेरीका भावली आहे . तडजोड जरूरआहे पण सकारात्मक दृष्टी ठेवली तर खूप काही आनंद मिळवण्यासारखं आहे इथे.
प्रतिक्रिया
29 Jul 2010 - 6:36 am | पक्या
छान लेख,
आपल्या सासू बाईनी पाल्हाळ न लावता अमेरीकावारीचा थोडक्यात चांगला आढावा घेतलाय.
28 Jul 2010 - 11:21 pm | रेवती
शुचितै, सासूबाईंनी त्यांच्या नजरेतून पाहिलेली अमेरिका लेखनात चांगली उतरवली आहे.
इथले निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे
माझ्या सा. बा. आल्या होत्या तेंव्हा त्यांनी इथल्या निसर्गसौदर्याची बरीच पेंटींग्ज तयार केली होती.
तडजोड जरूरआहे पण सकारात्मक दृष्टी ठेवली तर खूप काही आनंद मिळवण्यासारखं आहे इथे.
हे छान आणि खरं लिहिलय.
28 Jul 2010 - 11:30 pm | शुचि
रेवती तरी मी व्हरमाँट ला होते तेव्हा त्या फक्त १ दिवसाकरता आल्या होत्या. रात्रच म्हण ना. तुला माहीतच आहे न्यू इंग्लंड, व्हरमाँट भागातला फॉल कसा विलोभनीय असतो ते. मला त्यांना गोंडोला वर घेऊन जायचं होतं फॉलमधे पण जमलं नाही. पण आता डेलावेअर मधे आम्ही बीचवर वगैरे मजा करतोय खूप.
तुझ्या सासूबाई पेंटींग करतात? :) छान ग.
28 Jul 2010 - 11:38 pm | रेवती
हो. सासूबाई पेंटींग, गायन, बॅडमिंटन यामध्ये निपुण आहेत.
पूर्वी त्यांचे काही लेख सकाळमध्ये आले होते.
आता लेखन थांबवलय कि काय विचारायला पाहिजे.
इकडे फॉलमध्ये झाडांचे रंग सुंदर असतात.
ते बघायला माझे आईबाबा आले होते. थंडीनं गारठून गेले.
29 Jul 2010 - 12:33 am | वाहीदा
हो. सासूबाई पेंटींग, गायन, बॅडमिंटन यामध्ये निपुण आहेत.
पूर्वी त्यांचे काही लेख सकाळमध्ये आले होते.
मला असे प्रसन्न चुणचुणित म्हातारी लोक्स खुप आवडतात
आयुष्य कित्ती सुंदर आहे ते यांच्या कडून शिकावे
त्यांचा ही एखादा लेख यावा मिपावर
29 Jul 2010 - 12:01 am | माझीही शॅम्पेन
छान आटोपशीर लेख लिहिलाय , माझ्या आईच्या दोन अमेरिका भेटी आठवल्या !
29 Jul 2010 - 12:34 am | वाहीदा
शुची, लेख आवडला !
29 Jul 2010 - 1:35 am | मीनल
मी पण माझ्या सासूबाइंचे सांगते.
त्या इथे ६ महिने होत्या. खूप आवडली अमेरिका. पुन्हा ही येणार आहेत.
त्या म्हणतात " प्रत्येका ने एकदा तरी अमेरिका ही कशी आहे ते पाहायला यायलाच हवे. मात्र कायमचे रहायला आपापला भारत बरा!"
त्या विरूध्द जगातले बरेच देश फिरून आलेले माझे आई बाबा म्हणतात " चल ग. आम्ही नाही येत परत. काय ठेवलयं तिथे अमेरिकेत? झालं एक दोनदा बघुन."
आमच्या स्वतःचे म्हणाले तर भारतापेक्षा जगलो त्यापेक्षा खूपच आरामदायी जिवन आहे. म्हणजे कसं? मोठे घर, शांतता, ट्रेनचा प्रवास नाही. छानसे हवामान. वगैरे वगैरे.
अमेरिका छान आहेच. पण त्यात खूप तडजोडी आहेत. स्वर्ग वगैरे तर नक्कीच नाही.
29 Jul 2010 - 2:53 am | बेसनलाडू
वरील प्रतिसादातील 'आपापला' भारत हे फार आवडले. वास्तविक ते 'आपला' भारत असे लिहायचे असावे; मात्र 'आपापला' मुळे त्याला एक वेगळाच पैलू प्राप्त झाला आहे. प्रत्येक भारतीयाची भारताकडे तसेच अमेरिकेकडे बघण्याची दृष्टी वेगळी. बहुदा तीच 'आपापला' भारत मधून व्यक्त होत असावी :) असो.
(आपापला)बेसनलाडू
29 Jul 2010 - 3:43 am | मीनल
भारत आपला तर आहेच . पण `आपापला` हा आहे कारण प्रत्येकाचे विश्व वेगळे असते. पुणेकरांना पुण्यात आवडेल तर नागपूर वाल्यांना तिथे बरे वाटेल. वृंध्दांना त्यांच्या भजनी मंडळात तर मध्यम वयस्करांना त्यांची मित्र मंडळात आवडले.
शेवटी भारत म्हणजे काय हो? तिथेल आपापले विश्व!
31 Jul 2010 - 4:58 am | चित्रा
सहमत.
मीनल नेहमी मोजके आणि अर्थवाही लिहीतात.
29 Jul 2010 - 8:50 am | चिरोटा
मस्त अनुभव.कामात सदैव 'बिझी' असणार्यांना अमेरिका आवडते तर आयुष्याच्या उत्तरार्धात अमेरिका बघायला येणार्यांना 'सोशल लाईफ' नसल्याने कंटाळा येतो असा सर्वसाधारण अनुभव आहे. आधीपासून काही छंद्/आवडी जोपासल्या असतील तर वेळ निश्चित चांगला जातो.
------
29 Jul 2010 - 9:14 am | आनंद घारे
शुचीताईंनी त्यांच्या सासूबाईंना आलेले अनुभव थोडक्यात पण छान मांडले आहेत. मजा आली.
कोणीतरी अभावितपणे 'आपापला भारत' म्हंटले आहे त्यावरून मला आठवले. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो असतांना मी जास्तच मराठी झालो होतो. याचे कारण तिथले वेगवेगळे लोक आपापल्या गुहेत किंवा बेटावर राहतात. इतर समाजात मिसळायला फारसा वाव नसतो. या अनुभवावर 'अमेरिकेत मराठी बाणा ' हा लेख मी लिहिला होता. तो******या लिंक वर वाचता येईल
31 Jul 2010 - 5:04 am | मिसळभोक्ता
लेख आवडला. वृद्ध नागरीकांच्या अमेरिकावारीचे लेख मला नेहमीच आवडतात. खूपच उद्बोधक असतात. कधी कधी, हे लोक ज्या देशाविषयी लिहितात, त्याच देशात आपण राहतो का? अशी शंका येते.
31 Jul 2010 - 11:49 am | पंगा
अमेरिका आणि भारतीय ज्येष्ठ नागरिक ही एक अफलातून जोडी आहे. या जोडीची महती अशी, की अमेरिकन भूमीवर पदार्पण केल्या क्षणापासून अनेक भारतीय ज्येष्ठ नागरिक हे इन्स्टंट अमेरिका-एक्स्पर्ट बनू लागतात. हा गुण अमेरिकन भूमीचा, की भारतीय ज्येष्ठ नागरिकांचा, काही कळत नाही.
अधिक विचाराअंती, हा गुण जर आगंतुक भारतीय पाहुण्यांचा (Incoming Indian Visitors अशा अर्थी) असलाच, तर तो ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित नसावा, अशी शंका येऊ लागते. अच्युत गोडबोले हा इसम तुमचा क्विंटेसेंशियल सीनियर सिटिझन नसावा. निदान मी तरी त्याला 'ज्येष्ठ नागरिक' म्हणणार नाही. ('बुढ्ढा' म्हणेनही कदाचित...)
कोणीसे (बहुधा जॉर्ज मिकॅशने) कोठेतरी (नक्की कोणते पुस्तक ते आता आठवत नाही; बहुधा "हौ टु बी इनइमिटेबल") वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांच्या पर्यटनाच्या कारणांचे सुंदर विवेचन केलेले आहे. (नीटसे आठवत नाही; जसे आठवत जाते तसे लिहीत आहे; तपशील हुबेहूब मुळाबरहुकूम नसू शकतात.) अमेरिकन माणूस हा 'मी अमूकअमूक ठिकाणी गेलो होतो' याचे पुरावे गोळा करण्यासाठी पर्यटनास जातो. (आणि म्हणून जेथे जातो तेथे जे काय ते बघायचे सोडून नुसते फोटो काढत सुटतो.) जर्मन माणूस हा आपल्याजवळील प्रवासी गाइडमधील तपशील बरोबर आहेत, की गाइड छापणार्याने आपल्याला फसवले, हे पडताळून पाहण्यासाठी प्रवासास निघतो. इंग्रजाबद्दल आता नीटसे आठवत नाही, पण जेथे जाईल तेथे (१) चहाच पिऊन, (२) इंग्रजी पद्धतीचेच जेवण जेवून (३) इतर इंग्रज पर्यटकांबरोबर घोळका करून (४) त्यांच्याशी त्याच त्या इंग्रजी संभाषणविषयांवर चर्चा करण्यासाठी, (५) स्थानिकांना आणि गेलेल्या ठिकाणी जे काही बघण्यासारखे किंवा करण्यासारखे असेल त्याला मनसोक्त टाळण्यासाठी, आणि क्वचित्प्रसंगी (६) एरवी ज्याचे तोंड दिसले असता साधी विचारपूसही करणार नाही, त्या शेजार्यास कडकडून भेटून त्याच्याबरोबर छान वेळ घालवण्यासाठी इंग्रज मनुष्य सुट्टी घेऊन देशाबाहेर पडतो, असे काहीसे वाचल्याचे आठवते.
याच धर्तीवर, काहीबाही प्रवासवर्णने लिहून भारतातल्या लोकांना पकवण्याची मनीषा उरात बाळगूनच भारतीय पर्यटक विमानाची (किंवा जहाजाची, किंवा जे काही वाहन असेल त्याची) पायरी चढत असावा, असे सुचवावेसे वाटते. (आपले भाईकाकाही याला अपवाद नसावेत.) किंवा, जरी लिहिता आले नाही, तरी कमीतकमी "तिथे ना, असेअसे" यावरून आपल्याला कळलेल्या-न कळलेल्या गोष्टींबद्दल लंब्याचौड्या अचाट बाता तिखटमीठ लावून आप्तांमध्ये (किंवा जो कोणी तावडीत सापडेल त्याच्याजवळ) मारायच्याच असतात. अनेकदा अशा बाता मारण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन आलेले असण्याचीही पूर्वअट असतेच, असे नाही; पण जाऊन आलेले असल्यास थोड्या वाढीव ('चक्षुर्वै (अ)सत्यम्'च्या) विश्वासार्हतेचा फायदा मिळू शकतो. (अमेरिकेबद्दल भारतात १. 'तिथे ना, म्हणजे अमेरिकेत, रस्ते ना, इतके स्वच्छ असतात, की (अ) भर रस्त्यात आडवे झोपता येते, किंवा (ब) रस्त्यात आपल्या चेहर्याचे लख्ख प्रतिबिंब दिसते'पासून ते २. 'म्हणजे काय, अमेरिका आहे ती! बिल्डिंग कोडप्रमाणे घरात फायरप्लेस असल्याशिवाय बांधकाम पासच होत नाही मुळी!'पर्यंत कायकाय अफाट गैरसमज पसरलेले/पसरवले गेलेले ऐकायला मिळतात, त्याची जंत्री केल्यास मनोरंजक ठरावी. आणि मग 'इतकी वर्षे अमेरिकेत राहूनसुद्धा अशी अमेरिका आजवर आपल्याच पाहण्यात कशी आली नाही?' हा प्रश्न भेडसावू लागतो. [टीप: वरीलपैकी १. (अ) हे अनेकदा अमेरिकेला भेट दिलेल्या एका व्यक्तीकडून (कर्णोपकर्णी) ऐकण्यात आलेले आहे, तर १. (ब) आणि २. हे भारताबाहेरच्या कोणत्याही प्रदेशाशी दूरान्वयानेही संबंध न आलेल्या विविध व्यक्तींकडून वेगवेगळ्या वेळी प्रत्यक्ष ऐकलेले आहे.])
पण तरीही, (काहीशा रटाळ आणि छापातल्या भाषेतले असूनसुद्धा) प्रस्तुत वर्णन हे 'तथ्याच्या त्यातल्या त्यात बर्यापैकी जवळ जाणारे' म्हणून आवर्जून दखल घेण्याजोगे वाटते. वर्णनाच्या लेखिकेस पुढील लेखनाकरिता शुभेच्छा.
2 Aug 2010 - 11:44 am | मिसळभोक्ता
आपले तुपले जुळले.
आमचे परममित्र सर्किट ह्यांनी भारतीय ज्येष्ठ नागरीकांच्या अमेरिकावारीविषयी कुत्सित लेख लिहिला होता.जालावर कुठे सापडला, तर दुवा देईन.
5 Aug 2010 - 9:02 pm | आनंद घारे
आपापल्या भारताबद्दल वर लिहिलेले आहे. अमेरिका तर जास्तच पसरलेली आहे. माझ्या लहानशा वारीमध्ये मी न्यूयॉर्क, पर्सीपेनी, सेंट सेबॅस्टियन आणि अल्फारेट्टा या चार ठिकाणी थोडा मुक्काम केला होता. ती चारही वेगवेगळी होती. त्यामुळे एका ठिकाणच्या अनुभवावरून तिकडे असंच असतं असं सांगता येत नाही.
31 Jul 2010 - 4:03 pm | अरुंधती
आटोपशीर, सुटसुटीत लिहिलंय. आवडलं! :-)
5 Aug 2010 - 10:30 pm | पिवळा डांबिस
बाराही महीने अधून मधून केव्हाही पाऊस पडतो. हिवाळ्यात गुडघा गुडघा बर्फ
हे वाचून तर डोळे पाणावले....
5 Aug 2010 - 10:34 pm | शिल्पा ब
ज्याची त्याची अमेरिका.
5 Aug 2010 - 10:59 pm | पिवळा डांबिस
गावासि हस्ति आला....
5 Aug 2010 - 11:09 pm | पंगा
...हत्ती आणि सहा आंधळे?
मला एक कळत नाही, भारताबद्दल बोलताना जर 'विविधतेत एकता' वगैरे आपण म्हणू शकतो, तर अमेरिकेकडेच बघताना तेवढे एक मोठा, एकसंध ठोकळा, एक मोनोलिथ म्हणून का बघितले जाते? किंवा, फॉर द्याट म्याटर, चीन, रशिया, कॅनडासारख्या देशांकडे?
भारतातसुद्धा फक्त मुंबई बघून कलकत्ता, चेन्नई किंवा देहरादूनबद्दलच काय, पुण्याबद्दल किंवा नागपूरबद्दलसुद्धा काढलेले निष्कर्ष तथ्यास धरून होणार नाहीत. एवढ्याशा ब्रिटनमध्येसुद्धा भौगोलिक, सांस्कृतिक, कदाचित भाषिकसुद्धा वैविध्य सापडेल. फार कशाला, पेडर रोड किंवा भेंडीबाजार बघून दादर किंवा विलेपार्ल्याबद्दल निष्कर्ष काढता येणार नाहीत, आणि सदाशिव पेठ बघून क्यांपाबद्दल किंवा येरवडा बघून कोथरूडबद्दल किंवा डेक्कन जिमखान्याबद्दल निष्कर्ष काढता येणार नाहीत. (अप्पा बळवंत चौकावरून - किंवा सदाशिव पेठेवरून - आख्ख्या पुण्याबद्दल निष्कर्ष काढता येणार तर नाहीतच नाहीत.)
मग अमेरिका तर केवढी मोठी! अमेरिकेनेच काय घोडे मारलेय?
5 Aug 2010 - 11:18 pm | शिल्पा ब
आता त्या आजींना वाटलं ते त्यांनी लिहिलं....त्या कुठे सारी अमेरिका पाहत फिरणार? जेवढी पहिली त्यावरून निष्कर्ष काढला झालं...
आणि अमेरिकेतली विविधता म्हणाल तर निसर्गात आहे बाकी भाषा सारखीच...फक्त दक्षिणेतील बोली वेगळी...साधारण जीवनपद्धत सारखीच आहे... कपड्यांची फ्याशन सारखीच... शहरी भागाची रूपरेखा सारखीच... म्हणजे साखळी दुकानं, मॉल, पार्क वगैरे...
हे त्या आजीनी नोटीस केलं आणि लिहिलं...तुम्हाला का एवढा राग आला त्याचा.
5 Aug 2010 - 11:26 pm | पंगा
'साखळी दुकाने, मॉल आणि पार्क' एवढा भाग वगळता उर्वरित प्रतिसादाशी बराचसा असहमत.
तूर्तास एवढेच.
व्यक्तिगत राग नाही. पण दीर्घकालीन निरीक्षणातून यात एक पॅटर्न दिसल्यासारखे राहूनराहून वाटते, एवढेच. (पॅटर्न व्यक्तिसापेक्ष नाही, किंवा अमेरिका-स्पेसिफिकही नाही.)
5 Aug 2010 - 10:37 pm | पंगा
आपल्या दु:खात सहभागी आहे.
असो.
5 Aug 2010 - 11:03 pm | रेवती
पिडा, लिहू द्या की आजींना!
माणसाने जर म्हणून लेखणी उचलायची नाही काय?
त्यांना हे सगळं नवीन असेल.
अश्याच तर्हेने प्रतिक्रिया देवून काही सदस्यांनी सामंत आजोबांना मिपावरून जाण्यास भाग पाडले.
सुरुवातही अशी साधीच झाली होती.
त्याबद्दल त्यांचा व्य. नि. वाचला आणि वाईट वाटले.
कृपया अश्या काही चुका काढू नका.
पाउस/बर्फ जेंव्हा पडायचाय तेंव्हाच आणि तितकाच पडणार आहे.
5 Aug 2010 - 11:09 pm | मुक्तसुनीत
मला वाटते, ओपन फोरमवर आलेल्यानी आपल्या लेखनावर टीका होणार , त्यात कधीकधी व्यंगात्मक ताशेरेही असणार हे गृहित धरायला हवे.
जोवर प्रतिसादांचे स्वरूप वैयक्तिक टीका, शिवीगाळ, अपमान या पातळीवर येत नाही तोवर कुठलीही टीका वर्ज्य समजणे बरोबर नाही.
डांबिस यांच्या (सामान्य भाषेत ज्याला खवचट म्हणतात तशा) विधानामागे, आपण ज्याबद्दल लिहितो आहोत त्याबद्दल सरसकट काही चुकीचे लिहू नये, निदान ज्या गोष्टी माहितीवजा आहेत त्यांची अचूकता तपासावी हे उद्दिष्ट आहे असे मी मानतो. आता , डांबिस माणसाने असे सुतासारखे सरळ लिहिले तर त्याला मुक्तसुनीत नाही का म्हणणार ! ;-)
5 Aug 2010 - 11:12 pm | Nile
अरेच्च्य्या! आडवळणी वाक्य!!! यांचा आयडी हॅक तर नाही ना झाला?? ;-)
(पळा बुवा, लैच जेष्ठ गोळा झालेत इथे)
5 Aug 2010 - 11:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुक्तसुनीत यांचे विचार पटले.
पण मुक्तसुनीत या आयडीतून आज अचानक विचित्र प्रतिसाद का गळत आहेत (आणि त्याच प्रमाणे श्रावण मोडक या आयडीतून चित्रविचित्र खरडी)?
5 Aug 2010 - 11:23 pm | Nile
इथे अवांतर नको म्हणुन खवत लिहतो. ;-)
5 Aug 2010 - 11:49 pm | मुक्तसुनीत
१. मुक्तसुनीत यांचे विचार पटले.
२. पण मुक्तसुनीत या आयडीतून आज अचानक विचित्र प्रतिसाद का गळत आहेत ?
- इति ३_१४ विक्षिप्त अदिती
- यामध्ये काही कार्यकारणभाव असावा काय ?;-)
5 Aug 2010 - 11:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे प्रतिसाद देण्यात अर्थ नाही ... उद्या सकाळी मिपा उघडेपर्यंत त्याचं तेरावं घातलेलं असेल!
(मिपा स्कूलची विद्यार्थिनी) अदिती
5 Aug 2010 - 11:22 pm | चतुरंग
>>>>जोवर प्रतिसादांचे स्वरूप वैयक्तिक टीका, शिवीगाळ, अपमान या पातळीवर येत नाही तोवर कुठलीही टीका वर्ज्य समजणे बरोबर नाही.
हीच तर गोम असते. तशी स्थिती येत नाहीच एकदम. असे प्रतिसाद वारंवार यायला लागले की हळूहळू इतर लोक ताळतंत्र सोडायला लागतात आणि प्रतिक्रिया त्या दिशेने सरकू लागतात. (ह्याचा विदा द्या वगैरे म्हणू नका आता! ;))
लोक त्यांच्या त्यांच्या अनुभवातून लिहिणार, थोडे उन्नीसबीस असेलही, दरवेळी चूक बरोबर असे तोलून होत नाही. अशाने लोक लिहायचेच कमी होतात आणि मग नाही ते धागे उसवणार्यांचे फावते ते आपण बघितलेच!
टीका नकोच असे नाही म्हणत मी पण डांबीसासारख्या मुरलेल्या आयडीला असा "मऊ लेखच" सापडावा का टीकेला, ही माझ्यादृष्टीने विचार करण्याची गोष्ट आहे (पिडाकाका नो ऑफेन्स प्लीज! :))
चतुरंग
5 Aug 2010 - 11:28 pm | पंगा
लिहायला नको कोणी म्हटलेय?
पण 'तुम्हाला दिसते याहून मोठे/वेगळेही काही आहे' हे दाखवले, तर कोठे बिघडते?
त्यातून त्यांचेच पिक्चर क्लियर होऊन, स्कोप वाइडन होऊन अंडरस्टँडिंग सुधारणार नाही का?
(हेच जर मराठीत 'त्यांच्याच डोळ्यांसमोरील चित्र अधिक सुस्पष्ट होऊन, दृष्टिक्षेप विशाल होऊन समज सुधारेल' असे लिहिले असते, तर विनाकारण अपमानास्पद वाटले असते, या भीतीने अर्ध्या इंग्रजीत लिहिले.)
यात त्यांचाच फायदा नाही का?
'चुका काढणे' की 'चुका सुधारणे' हे बघणार्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, एवढेच सुचवावेसे वाटते. (थोडक्यात, आम्हाला काही उद्योग नाहीत काय?)
6 Aug 2010 - 12:02 am | शेखर काळे
भारत तशीच आपापली अमेरिका ...
6 Aug 2010 - 12:03 am | मुक्तसुनीत
"ही आमची अमेरिका ! हिच्यावर आमचा फार जीव ! "
6 Aug 2010 - 12:02 am | पिवळा डांबिस
पिडा, लिहू द्या की आजींना!
माणसाने जर म्हणून लेखणी उचलायची नाही काय?
त्यांना हे सगळं नवीन असेल.
लिहू द्या की, नको कोण म्हणतंय!!
पण जाहीर प्रसिद्ध केलेल्या लिखाणातल्या विसंगती दर्शवल्या गेल्या तर (तुम्हाला) राग का यावा?
मी दर्शवलीये ती विसंगती आहे हे तुम्ही नाकारता का?
टीका नकोच असे नाही म्हणत मी पण डांबीसासारख्या मुरलेल्या आयडीला असा "मऊ लेखच" सापडावा का टीकेला, ही माझ्यादृष्टीने विचार करण्याची गोष्ट आहे (पिडाकाका नो ऑफेन्स प्लीज! )
म्हणजे लेख मऊ आहे हे तुम्हीही मान्य करता तर!!
ऑफेन्स नन टेकन! द पॉईंट वॉज नॉट वॅल्युएबल इनफ!!
डांबिस माणसाने असे सुतासारखे सरळ लिहिले तर त्याला मुक्तसुनीत नाही का म्हणणार !
याला मात्र दाद देतो!!!
डॉ. जेकिल अॅन्ड मि हाईड?
:)
6 Aug 2010 - 12:06 am | चतुरंग
हो लेख मऊ आहेच आणि टीका तुमच्याकडून व्हाही इतका सशक्त नाही असे मत आहे! :)
असो.
6 Aug 2010 - 12:31 am | पिवळा डांबिस
आम्ही पिवळा डांबिस म्हणूनच व्यक्तिरेखा घेतलेली होती, त्याचा पिडांकाका तुम्ही लोकांनी केलात!!!
आता भोगा आपल्या कर्माची फळं!!!!
:)
(स्वगतः लेखणीला धार जास्त झालीये का लोकांची अंगं हुळहुळी झालीयेत? मिसळीतला कच्चा माल तरी तोच राहिला असेल का?)
6 Aug 2010 - 1:53 am | रेवती
जेंव्हा ज्येष्ठ सभासदांचे लेखन येते तेंव्हा त्याला वेगळे निकष लावायला हवेत असे माझे म्हणणे आहे.
किती इंच पाउस किंवा बर्फ असे लिहून तरणे लोक कॉलर ताठ करतीलही पण कंटाळा, एकटेपणा दूर करायला किंवा मन मोकळं करायला असे लेख लिहिले जातात तेंव्हा भयंकर ग्रेट अश्या प्रतिक्रिया अपेक्षित नसतात पण त्यातून थोडाफार जालीय संवाद झाला तर 'मनाला बरे वाटणे' एवढेच अपेक्षित असते. आपणही धो धो पाउस पडतोय आणि खिडकीत बसून बघुयात गम्मत असा विचार करताना नक्की किती इंच पाउस झाला असेल हा विचार बाजूला सारतो आणि पाण्याची मजा बघतो त्याप्रमाणे आहे हे! आजींना दिलेली गुढग्याएवढ्या बर्फाची मापे किंवा पावसाचे महिने हे न बघता बाकिच्या गोष्टी वाचू शकतो.
जालावर लेख लिहिताना सगळेचजण सहमत नसतात हे मान्य पण वयस्कांना आपण पावसापाण्याचा विदा देवून किंवा त्याच्या लेखनाला आक्षेप घेवून फार मोठे तीर मारत नसतो हे नातवंडांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे. सामंत काका/आजोबांच्या बाबतीतही त्यांच्या लेखांना नावे ठेवणे झाले. ते त्यांच्या विरंगुळ्यासाठी लिहित होते. एखाद्या ७५ ८० वर्षाच्या व्यक्तीला शेवटी मिपा सोडावेसे वाटले. 'मिपावर मोकळेपणाने वावरणे' हा आपला हक्क असेल तर तसा तो ज्येष्ठांचाही आहे. आपण ज्याप्रकारे टीका टिप्पण्या हलकेपणाने घेउ शकतो तसे वयस्क लोक घेतीलच असे नाही. त्यांचे लेखन आवडले नाही तर सोडून द्या. सामंतकाकांनी ज्याप्रकारे मनाला लावून घेतले आणि ते आम्हाला व्य. नि. तून कळवले त्यामुळेच हे लिहित आहे. हे आजीआजोबा या वयात नवीन देशात जावून इंटरनेटावरून नेटाने लोकसंपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात तो मला आवडतो.
6 Aug 2010 - 3:33 am | बेसनलाडू
वरील विचार (मनाला) पटणारे (बुद्धीला कदाचित न पटणारे)(पण) कमी वस्तुनिष्ठ नि अधिक भावनिक वाटले. असो. सांगायचा उद्देश हा की अशा मऊसूत विचारांनी कातडीही तशीच राहते, गेंड्याची होत नाही. गेंड्याची कातडी हा मराठी आंतरजालावर वावरायचा प्रमुख प्रि-रेक आहे, असे येथील एका विद्वानांनी सांगितल्याचे स्मरते. चू. भू. द्या. घ्या.
(निर्लज्ज)बेसनलाडू
हे आजीआजोबा या वयात नवीन देशात जावून इंटरनेटावरून नेटाने लोकसंपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात तो मला आवडतो.
अगदी अगदी! त्यामुळे नवख्यांच्या उत्साहाला मारक ठरणारे सुरुवातीलाच लिहिले जाऊ नयेसे वाटते. नवखे यथावकाश रुळले, की सदस्य म्हणून त्यांच्या बाल्यावस्थेतून आपसूकच बाहेर पडत असावेत (कातडी आवश्यक तितकी निबर होणे हे याचेच लक्षण असावे काय?), असे वाटते.
(सहमत)बेसनलाडू
6 Aug 2010 - 3:38 am | मिसळभोक्ता
प्रतिसाद देताना सभासदाचे जालीय वयच नव्हे, तर खरे वय देखील लक्षात घ्यायला हवे.
सामंत आजोबांच्या बाबतीत म्हणाल, तर माझे प्रतिसाद अत्यंत आदरपूर्वक लिहिलेले असत. त्यांच्या सिनेमागीतांच्या भाषांतरामुळे उबळ बरेचद्या यायची, पण तरी थट्टा केली, चिमटे काढले, ते खूप आदराने.
अशा मोठ्या माणसाला, प्रेमाने का होईना, पण "म्हातारा" म्हणून संबोधावे असे मला कधीच वाटले नाही.
परंतु त्या वेळच्या मालकाने ही सूट घेतली, आणि त्या मालकांनी नियुक्त केलेल्या संपादकांनी देखील त्याला कधीच आक्षेप घेतला नाही.
अशा छोट्या छोट्या वरकरणी निष्पाप दिसणार्या बाबींनी वातावरण कलुषित होते, आणि त्याची परिणीती ज्येष्ठ सदस्यांच्या गच्छंतीत होते.
अर्थात, वामनसुत आणि सामंतकाका ह्यांच्या मिपा-कारकीर्दीत तुलना करणे झाले, तर सामंतकाका ज्येष्ठ नागरीक आहेत, ते अगदी पहिल्या लेखापासून उघड झाले होते. वामनसुतांच्या लेखनावरून ते कोण हे खूप उशीरा कळले. पण तरीही, वामनसुतांची थट्टा इथे कोणी केलेली आठवत नाही. अर्थात, त्यांनी वॉशिंग्टनच्या विठोबासारखे, अँजेला मर्केल ला दुर्गा म्हटले नाही, हे महत्त्वाचे.
6 Aug 2010 - 4:00 am | पिवळा डांबिस
जेंव्हा ज्येष्ठ सभासदांचे लेखन येते तेंव्हा त्याला वेगळे निकष लावायला हवेत असे माझे म्हणणे आहे.
बापरे!! अनेक लेव्हल्सवर असहमत!
नाही म्हणजे विषय उत्तम आहे पण मला वाटतं की या धाग्यावर ते विषयांतर होईल.
तुम्ही नवीनच स्वतंत्र धागा का काढत नाही जेणेकरून या विषयावर सांगोपांग चर्चा करता येईल?
(सिरियस) पिवळा डांबिस
6 Aug 2010 - 4:25 am | क्रेमर
श्री डांबिस यांच्याशी सहमत आहे. रेवतीतैंच्या प्रतिसादाशी असहमत आहे. त्याबद्दल येथे लिहिणे अवांतर होईल. वेगळी चर्चा सुरू केल्यास विस्ताराने मत मांडता येईल.
6 Aug 2010 - 6:36 am | सहज
मराठी आंतरजालावर गेंड्याच्या कातडीचा गुणधर्म असल्याशिवाय निभाव लागणे कठीण आहे. पब्लीक फोरमवर जेव्हा तुम्ही लिहता तेव्हा त्याची काही पथ्ये पाळावी लागणार अन्यथा लोक त्यांच्यातला सायमन कॉवेल बाहेर काढणार.
ताजे उदाहरण काही वर्षापुर्वी कदाचीत हा लेख वाहवा! घेत पास झाला असता पण आता त्यातल्या काही नेमक्या मुद्यांवर आक्षेप घेतले गेले आहेत. ते योग्यच आहेत असे मला वाटते.
मआंजावर आता वयस्कर जेष्ठ मंडळी ही मिभोकाका, पिडाकाका, पंगाकाका आहेत व त्यांच्या अनुभवाचा भावी मराठी आंजा सदस्याला फायदाच होईल.
आजही सामंत आजोबा आले तर त्यांचे मनापासुन स्वागतच होईल पण त्यांच्या विशिष्टप्रकारच्या लेखनाचा हा प्रेक्षकवर्ग नाही.
इट्स ऑल अबाउट द रायटींग!
आणि हो, आजींचा सकारात्मक दृष्टीकोन आवडला.