मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Apr 2008 - 2:42 pm

प्रथम भाग - मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! वरून पुढे सुरू...

हो साहेब, यापुढे लक्षात ठेवीन!" (पण आत्ता सोडता का?)
कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;)
थोड्याच वेळात आमची गाडी शासकीय रुग्णालयात पोहोचली!

तिथे पोहोचल्यावर आम्हाला गाडीतनं उतरवलं आणि रुग्णालयाच्या ओ पी डी विभागत पोलिस घेऊन गेले. तिथे पाहतो तर काय, मंडळींची ही भाऊगर्दी! काही लोकांना आनंदनगर चेकनाक्यावर पकडलेले, काही लोकांना कापुरबावडीजवळ पकडलेले! एकंदरीत तिथे तीनशे-साडेतीनशे लोकांचा जमाव जमला होता. सगळे कलम १८५ चे आरोपी! "चला! म्हणजे आपण एकटेच नाही आहोत!" या भावनेने मला आणखी जरासं हायसं वाटलं आणि आता मी तो ओ पी डी मधला नजारा एन्जॉय करू लागलो! :)

जरा वेळाने आमचा नंबर आला. दोन पोरसवदा निवासी डाक्टर लोकं तिथे एका टेबलापाशी बसले होते. "च्यामायला, साले हे लोक दारू पितात आणि आमच्या डोक्याला मात्र यांचं रक्त तपासायचा फुक्कटचा ताप! नसती कामं वाढवून ठेवतात साले!" असे भाव होते. त्यांचंही खरंच होतं म्हणा! वास्तविक मी आजतागायत कधी मद्य पिऊन गाडी चालवली नव्हती, कधी चालवतही नसे/नाही! पण साला या मोर्‍यामुळे नेमका फुक्कटचा अडकलो होतो!

रुग्णालयात डॉक्टरांच्या समक्ष, एका सरकारी कागदावर माझं नांव, पत्ता, कुठे राहतो, काय करतो, कुठून कुठे चालला होता, वाहन क्रमांक, इत्यादीची जबानी नोंदवण्यात आली. त्यानंतर मला एका एकदम यंग डॉक्टरसमोर उभं करण्यात आलं. डॉक्टर एकदम पोरसवदा होता, नुकताच एम बी बी एस होऊन बहुधा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात इंटर्नशीप करण्याकरता आला असावा. त्याच्या शेजारीच शिंदेसाहेबही उभे होते!

आता डॉक्टरांनी आपले सवाल सुरू केले.

"हम्म! बोला, कुठली दारू प्यायलात? देशी, विदेशी की हातभट्टी? किती प्यायलात?"

"रॉयल चायलेन्ज. ६० ml!" मी माहिती पुरवली!
नशीब, त्या दिवशी सिंगल माल्टची प्यायलो नव्हतो! :)

"तुम्ही स्वत:हून हे कबूल करताय? ठीक आहे, मग इथे तसा लेखी कबुलीजबाब द्या आणि सही करा, म्हणजे तुमची रक्तचाचणी करायला नको!" डॉक्टरसाहेब वदले!

मंडळी, आयुष्यात मला दोन नंबरवाले, दारूवाले, पोलिस, गुंड, रांडा, ही मंडळी खूप जवळून बघायला मिळाली. फार पूर्वी फोरासरोडवरच्या एका बारमध्ये नौकरी करत असताना ह्याच लोकात माझी उठबस असायची. पोलिसांशीही माझा खूप जवळून संबंध आला होता. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची मेन्टॅलिटी, या गोष्टी मला माहीत होत्या. त्याच नजरेतून मी शिंदेसाहेबांनाही बघत होतो. माणूस मोठा रफ ऍन्ड टफ वाटत होता. आणि खरं तर मला त्यांचा राग यायचंही काही कारण नव्हतं. त्यांची ड्युटी ते अगदी चोखपणे करत होते. पण एव्हाना हा प्राणी मला आवडू लागला होता. कर्तव्यकठोर होता, परंतु तेवढाच मिश्किलही होता. साला, आपण पडलो माणसांचा प्रेमी. त्या भाऊगर्दीतही त्यांची आणि माझी वेव्हलेन्थ कुठेतरी जुळू लागली होती! त्यांच्या वर्दीमधला 'माणूस' मला हळूहळू दिसायला लागला होता. आणि माझा अंदाज खरा ठरला. डॉक्टरकडची जबानी संपल्यावर शिंदेसाहेब मला हळूच म्हणाले,

"तुम्हाला आता एक आतली गोष्ट सांगतो. बरं झालं तुम्ही कबूल केलंत! नसतं केलंत तर नियमांनुसार तुमच्या रक्ताचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवावा लागला असता आणि प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत कायद्यानुसार तुम्हाला अटक करून आजची रात्र आणि उद्या जामिन मिळेस्तोवर कंपलसरी लॉकपमध्ये ठेवावं लागलं असतं! तुम्ही डॉक्टरसमोर कबूल केलं नसतंत तर तुम्हाला मी हे सांगणारच होतो! "

आयला! बरं झालं मी सत्य बोललो ते! ते संस्कृतमध्ये 'सत्यमेव जयते' का कायसं म्हणतात ते खरंच होतं की राव! :)

असो, एकंदरीत शासकीय रुग्णालयातलं आमचं कामकाज आता आटपलं होतं. हे सगळं होता होईतो पहाटेचे तीन वाजत आले होते. आमच्या बॅचमधल्या सर्वांचे कबुलीजबाब झाले. दोघा-तिघांनी दारू प्यायल्याचे नाकबूल केले, त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले व त्यांना वेगळ्या गाडीत बसवून दोन हवालदार घेऊन गेले. (बहुधा, लॉकपमध्ये टाकण्याकरता घेऊन गेले असावेत!) आम्हा बाकीच्या मंडळींना आता पुन्हा त्या निळ्या बसवजा जाळीदार गाडीत बसवण्यात आले व आमची यात्रा ठाणे पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात आली. तिथे आम्हा सर्वांकडून दोन दोन हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली व 'उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात न्यायचं आहे, बरोब्बर अकरा वाजता इथे हजर व्हा. हजर न झाल्यास तुमच्यावर कोर्टाचं समन्स बजावण्यात येईल', असं सुनावण्यात आलं!

आयला! 'तात्या अभ्यंकरावर कोर्टाचं समन्स? नको रे बाब्बा!' असा विचार करून उद्या नक्की कोर्टात हजर व्हायचं' हे मनाशी ठरवून मी घरी येऊन झोपून गेलो.

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी अकरा वाजता वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचलो. तिकडनं आम्हाला पुन्हा त्या निळ्या जाळीदार गाडीत बसवून कोर्टात आणलं गेलं. कोकणातला असल्यामुळे कोर्टकचेर्‍या अनेकदा पाहिल्या होत्या. परंतु ते सर्व जमिनविषयक दिवाणी दावे होते. फौजदारी दाव्यात साला प्रथमच अडकलो होतो! कोर्टाचं आवार नेहमीप्रमाणेच गजबजलेलं होतं. काळा कोटवाली वकील मंडळी, पोलिस, आरोपी, यांची येजा सुरू होती. आम्हा कलम १८५ लागू केलेल्या तीनशे-साडेतीनशे लोकांना कोर्टाच्या आवारातच एका बाजूला उभं करण्यात आलं. त्या भाऊगर्दीत, "आयला तात्या, तू पण का?" असं म्हणणारे एकदोन ओळखीचे चेहेरेही भेटले! :)

जरा वेळाने तिथे कडक वर्दीमधले शिंदेसाहेब हजर झाले. त्यांनी 'साला काल कसे मस्तपैकी पकडले सगळ्यांना!' या विजयीमुद्रेने एकवार आमच्यावर नजर फिरवली. आमच्या सुनावणीला अजून थोडा अवधी होता. 'जा रे, कुणाला काही चायपाणी नाष्टा वगैरे करायचा असेल तर करून या रे!' असा शिंदेसाहेबांनी हुकूम सोडला. मी पुन्हा शिंदेसाहेबांच्या आसपासच घुटमळत होतो. पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली आणि शिंदेसाहेबांनी स्वत:हूनच स्माईल दिला! साला, नाही म्हटलं तरी तात्या अभ्यंकराच्या व्यक्तिमत्वाने त्यांच्यावरही थोडी छाप पाडली होतीच! :)

"काय मग? जामीन वगैरे तयार आहे ना?" शिंदेसाहेबांनी सहजच मला सवाल केला.

"जामीन? तो कशाकरता? फक्त दंडच भरायला लागतो ना?" मी.

"हो, शक्यतोवर दंडच भरायला लागतो परंतु ते जजसाहेबांच्या मर्जीवर आहे. कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर? मग आम्हाला लगेच तुम्हाला इकडनं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातच न्यायला लागेल! म्हणून म्हटलं, जामीनाची वगैरे तयार ठेवा!"

शिंदेसाहेबांनी आपुलकीने माहिती पुरवली!

आता मात्र मी पुन्हा एकदा किंचित गांगरलो! च्यायला आता करायचं काय? जजसाहेबांनी नुसता दंड ठोकून सोडलं तर ठीक आहे, परंतु नेमका त्यांचा मूडबिड ठीक नसला तर लेखणीच्या एका फराट्यानिशी मला साध्या कैदेची शिक्षा सुनावून मोकळे व्हायचे!

गोविंदा साठे!

मला तात्कळ हे नांव आठवलं! हा प्राणी माझा कॉलेजातला अगदी चांगला मित्र. सध्या अंधेरीला असतो. आमचा गोंद्या मोठा कर्तबगार वकील आहे. अधनंमधनं आम्ही गाण्याच्या वगैरे मैफलींना भेटत असतो. मी ताबडतोब त्याला फोन लावला. माझा आवाज ऐकताच गोंद्या आनंदला.

"अरे तात्या, बोल बोल. काय, कुठे गाण्याची मैफल वगैरे आहे का? एकदा घरी ये निवांतपणे. मस्तपैकी मैफल जमवू!" हे सगळं गोंद्या एका दमात बोलून गेला.

"अरे गोंद्या, गाण्याच्या मैफली कसल्या जमवतोस? इथे मी एका वेगळ्याच मैफलीत अडकलो आहे" असं म्हणून मी अथपासून इतिपर्यंत त्याला सगळी ष्टोरी कथन केली.

"च्यामारी! अशी भानगड आहे होय! बरं, मला एक सांग, तुझ्याकडे अनामत रक्कम भरल्याची जी पावती आहे, त्यात कलम १८५ चा उल्लेख आहे का?" गोविंदा.

"हो, आहे ना!"

"हम्म! मग तुला कैदही होऊ शकते! पण घाबरू नकोस. मी सांगतो तसं कर."

आता गोंद्यामहाराज पुढे कोणती गीता सांगणार आहेत हे मी अर्जुनासारखा ऐकू लागलो!

"आत गेल्यावर जजसाहेब तुला 'गुन्हा कबूल आहे का?' असं विचारतील. त्यावर इतर कोणताही वाद न घालता फक्त 'हो!' एवढंच उत्तर दे. त्यानंतर जजसाहेब 'अमूक अमूक दंड भरा!' अशी सजा सुनावतील. त्यालाही 'हो' म्हण. पण जर जजसाहेबांनी 'अमूक अमूक दिवसांची साधी कैद' अशी सजा सुनावली तर त्यांना,

"माफ करा जजसाहेब, परंतु मला साध्या कैदेत कारागृहात जायचं नाही. मी जामीन देतो आहे, तसंच व्यक्तिगत बॉन्डही देतो आहे. माझा जामिन मंजूर व्हावा!"

असं न घाबरता सांग! तो तुझा अधिकार आहे कारण तुझा गुन्हा हा जामिनपात्र गुन्हा आहे. आनंद महाजनी म्हणून माझा एक असिस्टंट आहे, तो ठाण्यालाच राहतो. त्याला मी तुझ्या केसबद्दल आत्ताच सांगून ठेवतो, तो तुझ्या जामिनाची आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवेल. जर जजसाहेबांनी कैदेची शिक्षा सुनावलीच तर तुला जामिन मिळवून द्यायचं काम आनंद करेल. तुझ्या कुठल्यातरी मित्राला तीन ते चार हजार रुपये सोबत घेऊन बाहेर थांबायला सांग. अर्थात, तो मित्र तुझ्याकरता जामीन राहायला तयार असायला हवा! एकदा तुला जामीन मिळाला की पुढचं सगळं मी पाहतो!"

गोंद्याने आपली गीता पूर्ण केली. च्यामारी, एकंदरीत बरीच भानगड होती म्हणायची! मग मी ताबडतोब शेयर बाजारात आमच्या मारवाडी ब्रोकरला फोन लावला व त्याला झाला प्रकार सांगितला! ते ऐकल्यावर "अरे तात्याको पकडा रे....!" असं म्हणून तिथे एकच हशा/धमाल उडाली! :)

"अरे लेको हसताय काय? किसोको पैसा लेकर यहा भेज दो! साला मुझे छुडाना है की नही?"

थोड्याच वेळात शेयरबाजारातले माझे एक दोन सहकारी व एक दोन सब ब्रोकर अशी ५-६ मंडळी तिथे हजर झाली आणि मला एकदम हायसं वाटलं! साला, हा तात्या अभ्यंकर म्हणजे काही कुणी फालतू माणूस होता का? ठाण्याच्या संगीतक्षेत्रातला दिग्गज, शेयरबाजारातला धुरंधर, एका संकेतस्थळाचा मालक! वगैरे वगैरे वगैरे.... :)

पुढल्या काही वेळातच माझा मोबाईल वाजला.

"हॅलो कोण तात्या अभ्यंकर का? मी आनंद महाजनी बोलतोय. मला साठ्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं. मी पोहोचतोच आहे कोर्टात. तसं काही विशेष काळजीचं कारण नाही! दारू पिऊन वाहन चालवून रस्त्यावरच्या कुणाला उडवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर तुम्ही केलेला नाही ना? मग बिनधास्त रहा!"

आयला! हा आनंद महाजनी तर पारच पोहोचलेला इसम वाटत होता! अर्थात, तो पोहोचलेलाच असणार म्हणा! एका मिनिटात या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार्‍या गोंद्या साठेचा तो शिष्य होता! :)

जळ्ळं कधी नव्हे ते एक पेग घेऊन नुसती स्कूटरला किक मारत होतो तर अटक काय, नी सदोष मनुष्यवध काय! छ्या....!

पण मंडळी, मनात सहजच एक विचार आला की वास्तविक काल रात्री मी पूर्ण नॉर्मल होतो, स्कूटरवरून व्यवस्थित घरीही जाऊ शकत होतो हा भाग वेगळा! पण बापरे! खरंच जर मद्य प्यायल्याच्या अवस्थेत स्कूटर चालवत असताना माझ्याकडून कुणाचा सदोष मनुष्यषवध झाला असता तर?? पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!

"तुम्ही पुन्हा असं करू नये म्हणूनच तर तुम्हाला पकडलं आहे!"

काल रात्रीचे शिंदेसाहेबांचे शब्द मला आठवले. त्याक्षणी मला ते रुचले नव्हते! त्यांनी दोनपाचशे रुपये खाऊन मला सोडून दिलं असतं तर? मी अजूनच निर्ढावलो नसतो कशावरून? जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ते खरंच होतं! असो...!

शेवटी हो, ना करता करता दुपारी ४ च्या सुमारास माझं नांव पुकारलं गेलं. आता जजसाहेबांसमोर उभं राहायचं होतं. वाहनविषयक कायदा कलम १८५ चा आरोपी म्हणून! बाहेर अजय पसेचिया हा माझा मारवाडी जामिनदार, शेयर बाजारातले इतर सहकारी मित्र ही सगळी मंडळी उभी होती. जजच्या खोलीच्या दाराबाहेरच आनंद महाजनी सर्व पेपर्स घेऊन तयारीत उभा होता. साला, काहीही झालं तरी तात्याला जेल होता कामा नये या काळजीत आता माझ्यासकट सगळी मंडळी पडली होती! :)

आणि आणि आणि...

मी जजसाहेबांच्या खोलीत प्रवेशलो. तिथे हिंदी शिणेमा टाईप फुल्टू कटघरा वगैरे होता! मला अचानक कोर्टशिनचे सगळे उर्दूतले फिल्मी शब्द आठवायला लागले. 'दफा़', 'मुजरिम को मुलजिम करार देते हुए ताजी राते हीन' (म्हणजे काय देव जावे), तात्या अभ्यंकर वल्द रामचंद्र अभ्यंकर, 'अदालत जी कारवाई मुल्तबी की जाती है', 'बाईज्जत बरी' वगैरे वगैरे! (जऴळं, हिंदी शिणेमावाल्यंना कोर्टाच्या शिनमध्ये एवढं ऊर्दू का बोलावं लागतं देव जाणे!) :)

छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर!

"तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं! :)

आता मी जजसाहेबांसमोर कटघर्‍यात उभा होतो. चेहेर्‍याने किंचित समिक्षक माधव मनोहरांसारखे दिसणारे जज्जसाहेब समोर बसले होते. कोर्टात शांतता होती. माझं आरोपपत्र जजसाहेब नजरेखालून घालू लागले! आणि एकदम त्यांनी मान वर करून आश्चर्यकारक मुद्रेने मला विचारलं.

"अभ्यंकर?"

कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! :)

"हो!"

"गुन्हा कबूल आहे?"

"हो!"

"२२०० रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत कोर्टाच्या आवारात साधी कैद. कबूल आहे?"

मी हळूच आनंद महाजनीकडे बघितलं. त्याने थोड्याश्या मिश्किल चेहेर्‍यानेच होकार भरला!

आणि आणि आणि...

हुश्श!!

पुढच्याच क्षणी मी जजसाहेबांच्या खोलीतून बाहेर पडलो! :)

आता पुढचे सोपस्कार सोपे होते. कोर्टाच्या कार्यालयात २२०० रुपये दंड नव्याने भरायचा होता व संध्याकाळी वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन काल भरलेली २००० रुपये अनामत रक्कम परत आणायची होती! आमच्या बॅचमधल्या सगळ्यांशीच केवळ दंड भरून सुटका झाली, फक्त दोघांनाच तीन दिवसांची साधी कैद सुनावण्यात आली. त्यात एक तो पत्रकार होता! शिंदेसाहेबांनी बहुतेक अजून दोनचार कलमं लावली असणार त्याच्यावर! :)

कोर्टाच्या आवारातच एक कॅन्टीन आहे. "चल तात्या, साला तू छुटा. अब चाय पिला!" असं माझे मारवाडी मित्र म्हणू लागले. माझ्यावर लक्ष ठेवायला एक पोलिसही होता आमच्यासोबत! कारण कोर्ट उठायला अजून काही अवकाश होता आणि मी टेक्निकली कोर्टाच्या आवारात का होईना, परंतु साध्या कैदेत होतो!!

हे सगळं होईस्तोवर पाच वाजले होते. हळूहळू मित्रमंडळींची पांगापांग झाली. आम्हा तिघाचौघा आरोपींना मात्र साडेपाच वाजेपर्यंत कोर्ट सोडता येणार नव्हतं! पण आता मात्र काही टेन्शन नव्हतं! एकदम हलकं हलकं वाटत होतं. मी असाच टाईमपास करत इकडेतिकडे फिरत होतो. माझ्यावर नजर ठेवणारा तो पोलिसशिपाई, तोदेखील आता एका पारावर अंमळ तंबाखू चोळीत बसला होता. 'साला, या मोर्‍याकडून २२०० रुपये वसूल केले पाहिजेत!' असं मी मनशी म्हणत होतो तेवढ्यात समोरून कडक वर्दीमधले शिंदेसाहेब येताना दिसले. आमची पुन्हा एकदा हसतमुखाने नजरभेट झाली. आता शिंदेसाहेबांनी स्वत:हून माझ्याशी हस्तांदोलन केलं!

"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं!

"पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!"

"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"

"तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.

"आज पुन्हा गंमत बघायची असेल तर रात्री दोनच्या सुमारास यायचं तर या चेकनाक्याजवळ!"

??

मला काही कळेचना! तेव्हा शिंदेसाहेबांनीच हसून खुलासा केला,

"नाही, काल तुम्हा टू व्हीलरवाल्यांना धरलं होतं. आज सगळे ट्रकवाले राऊंडअप करणार आहे आणि त्यांची तपासणी करणार आहे. रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!"

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयसमाजजीवनमानअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!

खरंय तात्या.
तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 3:08 pm | आनंदयात्री

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!

शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !

नंदन's picture

28 Apr 2008 - 3:31 pm | नंदन

म्हणतो. शिवाय तात्याराव-माधव मनोहर-पहिला चित्तपावन हेही बेष्ट :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2008 - 3:18 pm | प्रभाकर पेठकर

तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले...

अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन.

मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.

प्राजु's picture

2 May 2008 - 5:03 pm | प्राजु

सहमत आहे. सुटलात आणि वाचलात.
लेख मात्र जाम आवडला.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धोंडोपंत's picture

28 Apr 2008 - 3:19 pm | धोंडोपंत

वा तात्या,

क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन

या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत.

अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 3:28 pm | धमाल मुलगा

कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?

आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल.

जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?

"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"

एकदम जादू? छान छान!

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!

वा वा!

वेदश्री's picture

28 Apr 2008 - 3:44 pm | वेदश्री

"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं!

"पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!"

"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"

"तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.

दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?

छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर!

"तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!

अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.

भडकमकर मास्तर's picture

28 Apr 2008 - 5:50 pm | भडकमकर मास्तर

फार छान लेख... =D> =D> =D> =D>
उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही....
((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहज's picture

28 Apr 2008 - 5:58 pm | सहज

>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">>

नेल्ड इट!

विदेश's picture

28 Apr 2008 - 6:12 pm | विदेश

एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या-
मनःपूर्वक अभिनंदन !

शितल's picture

28 Apr 2008 - 6:19 pm | शितल

तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन.
मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.

आंबोळी's picture

28 Apr 2008 - 6:40 pm | आंबोळी

फार छान लेख... =D> =D> =D> =D>
उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही....
((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))

सहमत...

तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद.
एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर)
मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल?
आपला
(आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी

पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:)
मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही.
गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो!
एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन.

चतुरंग

मदनबाण's picture

28 Apr 2008 - 7:54 pm | मदनबाण

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं!
व्वा मस्तच !!!!!

(खाकीला सलाम) असे म्हणणारा
मदनबाण

सुधीर कांदळकर's picture

28 Apr 2008 - 7:55 pm | सुधीर कांदळकर

पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात.

सुधीर कांदळकर.

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2008 - 10:05 pm | पिवळा डांबिस

सुरेख अनुभव कथन!
शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो.

कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा!
हा, हा, हा!!:))
जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!!

उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?
खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!!

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं!
तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता...

पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात.
सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो.......

-पिवळा डांबिस

देवदत्त's picture

28 Apr 2008 - 11:50 pm | देवदत्त

आज पूर्ण वाचून काढले.
तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :)

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.

स्वाती दिनेश's picture

28 Apr 2008 - 11:53 pm | स्वाती दिनेश

चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर..
नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त!
स्वाती

जयवी's picture

29 Apr 2008 - 12:12 am | जयवी

अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही.
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!

हे खासच....!!

अभिज्ञ's picture

29 Apr 2008 - 12:22 am | अभिज्ञ

कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे.
तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि.
अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन

पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा.

(तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब

अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.

आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत.

पण तात्या एक सल्ला आहे:-
यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो?
(म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.)
ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली.
(आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.)

बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन.
बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का?

आपलाच,
ऋषिकेश साठे.

स्वाती राजेश's picture

29 Apr 2008 - 12:47 am | स्वाती राजेश

छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे.
जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)

कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!).

रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते.

(सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.)

शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे.

हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला.

तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

भडकमकर मास्तर's picture

29 Apr 2008 - 1:18 am | भडकमकर मास्तर

"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही.
धनंजय साहेब, भन्नाट माहिती...
धन्यवाद...
थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो...
( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?)..
इ.इ.
पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$

चित्रा's picture

29 Apr 2008 - 4:04 am | चित्रा

दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...

+१
"रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही.

बाकी लेखन आवडले.

रामदास's picture

29 Apr 2008 - 12:59 am | रामदास

तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात.
या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण...
तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा
पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील.
ले दे के फैसला करनेका भिडू.

येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे.
दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला?
;-) :-)

सखाराम_गटणे™'s picture

20 Oct 2009 - 3:25 pm | सखाराम_गटणे™

प्रकाटाआ

वाटाड्या...'s picture

29 Apr 2008 - 2:58 am | वाटाड्या...

तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती.
ह. घ्या तात्या....:)

मुकुल

ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल.
त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-))
त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती.
(म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.)
म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती!
(शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-)

आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.

झकासराव's picture

29 Apr 2008 - 8:31 am | झकासराव

आहे. खास तात्याच्या शैलीतला.
पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात.
पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.

प्रमोद देव's picture

29 Apr 2008 - 8:38 am | प्रमोद देव

प्रामाणिक आणि प्रांजळ कथन.
आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुवर्णमयी's picture

29 Apr 2008 - 9:10 am | सुवर्णमयी

लेख मस्त आहे, आवडला,
एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Apr 2008 - 10:12 pm | डॉ.प्रसाद दाढे

छान तात्या..लेख मस्त लिहिला आहे..तेव्हढ॑ 'रोशनी' च॑ मनावर घ्या आता..

वरदा's picture

1 May 2008 - 11:13 pm | वरदा

तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत....
रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!"

मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)

विसोबा खेचर's picture

2 May 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे...

तात्या.

शशांक's picture

2 May 2008 - 3:31 pm | शशांक

खास तात्याशैलीतला लेख आवडला!

सुमीत's picture

2 May 2008 - 3:45 pm | सुमीत

तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते.
कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.

अभिता's picture

3 May 2008 - 12:07 am | अभिता

मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं
ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते.
कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का?
ये बहोत ना इन्साफि है..

वरदा's picture

3 May 2008 - 12:49 am | वरदा

म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......

अभिता's picture

3 May 2008 - 4:45 am | अभिता

इथे म्हणजे कुठे राहतेस?

ब्रिटिश टिंग्या's picture

3 May 2008 - 1:09 am | ब्रिटिश टिंग्या

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं....

बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो....
आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!"

टिंग्या ;)

विसोबा खेचर's picture

3 May 2008 - 1:15 am | विसोबा खेचर

......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!"

हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या!

आपला,
(शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या.

--
When I read the evils of drinking, I gave up reading ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2008 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
थोडक्यात निभावलं असं वाटतं !!!
आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)

अभिता's picture

4 May 2008 - 1:26 am | अभिता

घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी
किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.

प्रसन्न केसकर's picture

20 Oct 2009 - 3:53 pm | प्रसन्न केसकर

लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं.

याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.

विसोबा खेचर's picture

21 Oct 2009 - 11:07 am | विसोबा खेचर

पुणेरीसाहेब,

बरं झालं, चांगली माहिती पुरवलीत! :)

तात्या.

सन्दीप's picture

21 Oct 2009 - 3:32 pm | सन्दीप

तात्या
पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो.
आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही.

सन्दीप

ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या.
अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते.
अधिक माहितीसाठी पहा --
http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx
(Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.)

माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे !

कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल.
http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html

पाषाणभेद's picture

22 Oct 2009 - 2:24 am | पाषाणभेद

"घरी परततायला म्हणून स्कूटरला किक मारू लागलो. स्कूटर सुरू करून तेथून निघणार तेवढ्यात मागनं माझ्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. मागे वळून बघतो तर एक वर्दीतला पोलिस उभा होता!"

म्हणजे तात्या स्कुटर नुसते चालू करत होते, म्हणजेच चालवत नव्हते किंवा चालवण्याचा प्रयत्नही करत नव्हते.

185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs.

Whoever, while driving, or attempting to drive, a motor vehicle,-

1[{a} has, in his blood, alcohol exceeding 30 mg. per 100 ml. of blood detected in a test by a breath analyser, or]

{b} is under this influence of a drug to such an extent as to be incapable of exercising proper control over the vehicle,

shall be punishable for the first offence with imprisonment for a term which may extend to six months, or with fine which may extend to two thousand rupees, or with both; and for a second or subsequent offence, if committed within three years of the commission of the previous similar offence, with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to three thousand rupees, or with both.

Explanation.-For the purposes of this section, the drug or drugs specified by the Central Government in this behalf, by notification in the Official Gazette, shall be deemed to render a person incapable of exercising proper control over a motor vehicle.

1. Subs. by Act 54 of 1994, sec. 55, for clause (a) (w.e.f. 14-11-1994).

अशा वेळी तात्यांना केलेली अटक चुकीची ठरू शकत नाही का?
हा किरकोळ गुन्हा म्हणून सोडून द्या पण कायद्याच्या भाषेत मला तरी ही चुकीची अटक वाटते.

तज्ञ लोक काय म्हणतात?

बाकी एक वर्षानंतर ५० वा प्रतिसाद दिला. आता बसायचे का?
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

मीनल's picture

22 Oct 2009 - 3:30 am | मीनल

आपल्या प्रामाणिक लेखनाला सलाम.
मीनल.

भिंगरि's picture

22 Oct 2009 - 4:28 am | भिंगरि

आपल्या प्रामाणिक लेखनाला सलाम.

हेच म्हणते.