मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)
प्रथम भाग - मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! वरून पुढे सुरू...
हो साहेब, यापुढे लक्षात ठेवीन!" (पण आत्ता सोडता का?)
कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;)
थोड्याच वेळात आमची गाडी शासकीय रुग्णालयात पोहोचली!
तिथे पोहोचल्यावर आम्हाला गाडीतनं उतरवलं आणि रुग्णालयाच्या ओ पी डी विभागत पोलिस घेऊन गेले. तिथे पाहतो तर काय, मंडळींची ही भाऊगर्दी! काही लोकांना आनंदनगर चेकनाक्यावर पकडलेले, काही लोकांना कापुरबावडीजवळ पकडलेले! एकंदरीत तिथे तीनशे-साडेतीनशे लोकांचा जमाव जमला होता. सगळे कलम १८५ चे आरोपी! "चला! म्हणजे आपण एकटेच नाही आहोत!" या भावनेने मला आणखी जरासं हायसं वाटलं आणि आता मी तो ओ पी डी मधला नजारा एन्जॉय करू लागलो! :)
जरा वेळाने आमचा नंबर आला. दोन पोरसवदा निवासी डाक्टर लोकं तिथे एका टेबलापाशी बसले होते. "च्यामायला, साले हे लोक दारू पितात आणि आमच्या डोक्याला मात्र यांचं रक्त तपासायचा फुक्कटचा ताप! नसती कामं वाढवून ठेवतात साले!" असे भाव होते. त्यांचंही खरंच होतं म्हणा! वास्तविक मी आजतागायत कधी मद्य पिऊन गाडी चालवली नव्हती, कधी चालवतही नसे/नाही! पण साला या मोर्यामुळे नेमका फुक्कटचा अडकलो होतो!
रुग्णालयात डॉक्टरांच्या समक्ष, एका सरकारी कागदावर माझं नांव, पत्ता, कुठे राहतो, काय करतो, कुठून कुठे चालला होता, वाहन क्रमांक, इत्यादीची जबानी नोंदवण्यात आली. त्यानंतर मला एका एकदम यंग डॉक्टरसमोर उभं करण्यात आलं. डॉक्टर एकदम पोरसवदा होता, नुकताच एम बी बी एस होऊन बहुधा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात इंटर्नशीप करण्याकरता आला असावा. त्याच्या शेजारीच शिंदेसाहेबही उभे होते!
आता डॉक्टरांनी आपले सवाल सुरू केले.
"हम्म! बोला, कुठली दारू प्यायलात? देशी, विदेशी की हातभट्टी? किती प्यायलात?"
"रॉयल चायलेन्ज. ६० ml!" मी माहिती पुरवली!
नशीब, त्या दिवशी सिंगल माल्टची प्यायलो नव्हतो! :)
"तुम्ही स्वत:हून हे कबूल करताय? ठीक आहे, मग इथे तसा लेखी कबुलीजबाब द्या आणि सही करा, म्हणजे तुमची रक्तचाचणी करायला नको!" डॉक्टरसाहेब वदले!
मंडळी, आयुष्यात मला दोन नंबरवाले, दारूवाले, पोलिस, गुंड, रांडा, ही मंडळी खूप जवळून बघायला मिळाली. फार पूर्वी फोरासरोडवरच्या एका बारमध्ये नौकरी करत असताना ह्याच लोकात माझी उठबस असायची. पोलिसांशीही माझा खूप जवळून संबंध आला होता. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची मेन्टॅलिटी, या गोष्टी मला माहीत होत्या. त्याच नजरेतून मी शिंदेसाहेबांनाही बघत होतो. माणूस मोठा रफ ऍन्ड टफ वाटत होता. आणि खरं तर मला त्यांचा राग यायचंही काही कारण नव्हतं. त्यांची ड्युटी ते अगदी चोखपणे करत होते. पण एव्हाना हा प्राणी मला आवडू लागला होता. कर्तव्यकठोर होता, परंतु तेवढाच मिश्किलही होता. साला, आपण पडलो माणसांचा प्रेमी. त्या भाऊगर्दीतही त्यांची आणि माझी वेव्हलेन्थ कुठेतरी जुळू लागली होती! त्यांच्या वर्दीमधला 'माणूस' मला हळूहळू दिसायला लागला होता. आणि माझा अंदाज खरा ठरला. डॉक्टरकडची जबानी संपल्यावर शिंदेसाहेब मला हळूच म्हणाले,
"तुम्हाला आता एक आतली गोष्ट सांगतो. बरं झालं तुम्ही कबूल केलंत! नसतं केलंत तर नियमांनुसार तुमच्या रक्ताचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवावा लागला असता आणि प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत कायद्यानुसार तुम्हाला अटक करून आजची रात्र आणि उद्या जामिन मिळेस्तोवर कंपलसरी लॉकपमध्ये ठेवावं लागलं असतं! तुम्ही डॉक्टरसमोर कबूल केलं नसतंत तर तुम्हाला मी हे सांगणारच होतो! "
आयला! बरं झालं मी सत्य बोललो ते! ते संस्कृतमध्ये 'सत्यमेव जयते' का कायसं म्हणतात ते खरंच होतं की राव! :)
असो, एकंदरीत शासकीय रुग्णालयातलं आमचं कामकाज आता आटपलं होतं. हे सगळं होता होईतो पहाटेचे तीन वाजत आले होते. आमच्या बॅचमधल्या सर्वांचे कबुलीजबाब झाले. दोघा-तिघांनी दारू प्यायल्याचे नाकबूल केले, त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले व त्यांना वेगळ्या गाडीत बसवून दोन हवालदार घेऊन गेले. (बहुधा, लॉकपमध्ये टाकण्याकरता घेऊन गेले असावेत!) आम्हा बाकीच्या मंडळींना आता पुन्हा त्या निळ्या बसवजा जाळीदार गाडीत बसवण्यात आले व आमची यात्रा ठाणे पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात आली. तिथे आम्हा सर्वांकडून दोन दोन हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली व 'उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात न्यायचं आहे, बरोब्बर अकरा वाजता इथे हजर व्हा. हजर न झाल्यास तुमच्यावर कोर्टाचं समन्स बजावण्यात येईल', असं सुनावण्यात आलं!
आयला! 'तात्या अभ्यंकरावर कोर्टाचं समन्स? नको रे बाब्बा!' असा विचार करून उद्या नक्की कोर्टात हजर व्हायचं' हे मनाशी ठरवून मी घरी येऊन झोपून गेलो.
ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजता वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचलो. तिकडनं आम्हाला पुन्हा त्या निळ्या जाळीदार गाडीत बसवून कोर्टात आणलं गेलं. कोकणातला असल्यामुळे कोर्टकचेर्या अनेकदा पाहिल्या होत्या. परंतु ते सर्व जमिनविषयक दिवाणी दावे होते. फौजदारी दाव्यात साला प्रथमच अडकलो होतो! कोर्टाचं आवार नेहमीप्रमाणेच गजबजलेलं होतं. काळा कोटवाली वकील मंडळी, पोलिस, आरोपी, यांची येजा सुरू होती. आम्हा कलम १८५ लागू केलेल्या तीनशे-साडेतीनशे लोकांना कोर्टाच्या आवारातच एका बाजूला उभं करण्यात आलं. त्या भाऊगर्दीत, "आयला तात्या, तू पण का?" असं म्हणणारे एकदोन ओळखीचे चेहेरेही भेटले! :)
जरा वेळाने तिथे कडक वर्दीमधले शिंदेसाहेब हजर झाले. त्यांनी 'साला काल कसे मस्तपैकी पकडले सगळ्यांना!' या विजयीमुद्रेने एकवार आमच्यावर नजर फिरवली. आमच्या सुनावणीला अजून थोडा अवधी होता. 'जा रे, कुणाला काही चायपाणी नाष्टा वगैरे करायचा असेल तर करून या रे!' असा शिंदेसाहेबांनी हुकूम सोडला. मी पुन्हा शिंदेसाहेबांच्या आसपासच घुटमळत होतो. पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली आणि शिंदेसाहेबांनी स्वत:हूनच स्माईल दिला! साला, नाही म्हटलं तरी तात्या अभ्यंकराच्या व्यक्तिमत्वाने त्यांच्यावरही थोडी छाप पाडली होतीच! :)
"काय मग? जामीन वगैरे तयार आहे ना?" शिंदेसाहेबांनी सहजच मला सवाल केला.
"जामीन? तो कशाकरता? फक्त दंडच भरायला लागतो ना?" मी.
"हो, शक्यतोवर दंडच भरायला लागतो परंतु ते जजसाहेबांच्या मर्जीवर आहे. कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर? मग आम्हाला लगेच तुम्हाला इकडनं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातच न्यायला लागेल! म्हणून म्हटलं, जामीनाची वगैरे तयार ठेवा!"
शिंदेसाहेबांनी आपुलकीने माहिती पुरवली!
आता मात्र मी पुन्हा एकदा किंचित गांगरलो! च्यायला आता करायचं काय? जजसाहेबांनी नुसता दंड ठोकून सोडलं तर ठीक आहे, परंतु नेमका त्यांचा मूडबिड ठीक नसला तर लेखणीच्या एका फराट्यानिशी मला साध्या कैदेची शिक्षा सुनावून मोकळे व्हायचे!
गोविंदा साठे!
मला तात्कळ हे नांव आठवलं! हा प्राणी माझा कॉलेजातला अगदी चांगला मित्र. सध्या अंधेरीला असतो. आमचा गोंद्या मोठा कर्तबगार वकील आहे. अधनंमधनं आम्ही गाण्याच्या वगैरे मैफलींना भेटत असतो. मी ताबडतोब त्याला फोन लावला. माझा आवाज ऐकताच गोंद्या आनंदला.
"अरे तात्या, बोल बोल. काय, कुठे गाण्याची मैफल वगैरे आहे का? एकदा घरी ये निवांतपणे. मस्तपैकी मैफल जमवू!" हे सगळं गोंद्या एका दमात बोलून गेला.
"अरे गोंद्या, गाण्याच्या मैफली कसल्या जमवतोस? इथे मी एका वेगळ्याच मैफलीत अडकलो आहे" असं म्हणून मी अथपासून इतिपर्यंत त्याला सगळी ष्टोरी कथन केली.
"च्यामारी! अशी भानगड आहे होय! बरं, मला एक सांग, तुझ्याकडे अनामत रक्कम भरल्याची जी पावती आहे, त्यात कलम १८५ चा उल्लेख आहे का?" गोविंदा.
"हो, आहे ना!"
"हम्म! मग तुला कैदही होऊ शकते! पण घाबरू नकोस. मी सांगतो तसं कर."
आता गोंद्यामहाराज पुढे कोणती गीता सांगणार आहेत हे मी अर्जुनासारखा ऐकू लागलो!
"आत गेल्यावर जजसाहेब तुला 'गुन्हा कबूल आहे का?' असं विचारतील. त्यावर इतर कोणताही वाद न घालता फक्त 'हो!' एवढंच उत्तर दे. त्यानंतर जजसाहेब 'अमूक अमूक दंड भरा!' अशी सजा सुनावतील. त्यालाही 'हो' म्हण. पण जर जजसाहेबांनी 'अमूक अमूक दिवसांची साधी कैद' अशी सजा सुनावली तर त्यांना,
"माफ करा जजसाहेब, परंतु मला साध्या कैदेत कारागृहात जायचं नाही. मी जामीन देतो आहे, तसंच व्यक्तिगत बॉन्डही देतो आहे. माझा जामिन मंजूर व्हावा!"
असं न घाबरता सांग! तो तुझा अधिकार आहे कारण तुझा गुन्हा हा जामिनपात्र गुन्हा आहे. आनंद महाजनी म्हणून माझा एक असिस्टंट आहे, तो ठाण्यालाच राहतो. त्याला मी तुझ्या केसबद्दल आत्ताच सांगून ठेवतो, तो तुझ्या जामिनाची आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवेल. जर जजसाहेबांनी कैदेची शिक्षा सुनावलीच तर तुला जामिन मिळवून द्यायचं काम आनंद करेल. तुझ्या कुठल्यातरी मित्राला तीन ते चार हजार रुपये सोबत घेऊन बाहेर थांबायला सांग. अर्थात, तो मित्र तुझ्याकरता जामीन राहायला तयार असायला हवा! एकदा तुला जामीन मिळाला की पुढचं सगळं मी पाहतो!"
गोंद्याने आपली गीता पूर्ण केली. च्यामारी, एकंदरीत बरीच भानगड होती म्हणायची! मग मी ताबडतोब शेयर बाजारात आमच्या मारवाडी ब्रोकरला फोन लावला व त्याला झाला प्रकार सांगितला! ते ऐकल्यावर "अरे तात्याको पकडा रे....!" असं म्हणून तिथे एकच हशा/धमाल उडाली! :)
"अरे लेको हसताय काय? किसोको पैसा लेकर यहा भेज दो! साला मुझे छुडाना है की नही?"
थोड्याच वेळात शेयरबाजारातले माझे एक दोन सहकारी व एक दोन सब ब्रोकर अशी ५-६ मंडळी तिथे हजर झाली आणि मला एकदम हायसं वाटलं! साला, हा तात्या अभ्यंकर म्हणजे काही कुणी फालतू माणूस होता का? ठाण्याच्या संगीतक्षेत्रातला दिग्गज, शेयरबाजारातला धुरंधर, एका संकेतस्थळाचा मालक! वगैरे वगैरे वगैरे.... :)
पुढल्या काही वेळातच माझा मोबाईल वाजला.
"हॅलो कोण तात्या अभ्यंकर का? मी आनंद महाजनी बोलतोय. मला साठ्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं. मी पोहोचतोच आहे कोर्टात. तसं काही विशेष काळजीचं कारण नाही! दारू पिऊन वाहन चालवून रस्त्यावरच्या कुणाला उडवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर तुम्ही केलेला नाही ना? मग बिनधास्त रहा!"
आयला! हा आनंद महाजनी तर पारच पोहोचलेला इसम वाटत होता! अर्थात, तो पोहोचलेलाच असणार म्हणा! एका मिनिटात या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार्या गोंद्या साठेचा तो शिष्य होता! :)
जळ्ळं कधी नव्हे ते एक पेग घेऊन नुसती स्कूटरला किक मारत होतो तर अटक काय, नी सदोष मनुष्यवध काय! छ्या....!
पण मंडळी, मनात सहजच एक विचार आला की वास्तविक काल रात्री मी पूर्ण नॉर्मल होतो, स्कूटरवरून व्यवस्थित घरीही जाऊ शकत होतो हा भाग वेगळा! पण बापरे! खरंच जर मद्य प्यायल्याच्या अवस्थेत स्कूटर चालवत असताना माझ्याकडून कुणाचा सदोष मनुष्यषवध झाला असता तर?? पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
"तुम्ही पुन्हा असं करू नये म्हणूनच तर तुम्हाला पकडलं आहे!"
काल रात्रीचे शिंदेसाहेबांचे शब्द मला आठवले. त्याक्षणी मला ते रुचले नव्हते! त्यांनी दोनपाचशे रुपये खाऊन मला सोडून दिलं असतं तर? मी अजूनच निर्ढावलो नसतो कशावरून? जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ते खरंच होतं! असो...!
शेवटी हो, ना करता करता दुपारी ४ च्या सुमारास माझं नांव पुकारलं गेलं. आता जजसाहेबांसमोर उभं राहायचं होतं. वाहनविषयक कायदा कलम १८५ चा आरोपी म्हणून! बाहेर अजय पसेचिया हा माझा मारवाडी जामिनदार, शेयर बाजारातले इतर सहकारी मित्र ही सगळी मंडळी उभी होती. जजच्या खोलीच्या दाराबाहेरच आनंद महाजनी सर्व पेपर्स घेऊन तयारीत उभा होता. साला, काहीही झालं तरी तात्याला जेल होता कामा नये या काळजीत आता माझ्यासकट सगळी मंडळी पडली होती! :)
आणि आणि आणि...
मी जजसाहेबांच्या खोलीत प्रवेशलो. तिथे हिंदी शिणेमा टाईप फुल्टू कटघरा वगैरे होता! मला अचानक कोर्टशिनचे सगळे उर्दूतले फिल्मी शब्द आठवायला लागले. 'दफा़', 'मुजरिम को मुलजिम करार देते हुए ताजी राते हीन' (म्हणजे काय देव जावे), तात्या अभ्यंकर वल्द रामचंद्र अभ्यंकर, 'अदालत जी कारवाई मुल्तबी की जाती है', 'बाईज्जत बरी' वगैरे वगैरे! (जऴळं, हिंदी शिणेमावाल्यंना कोर्टाच्या शिनमध्ये एवढं ऊर्दू का बोलावं लागतं देव जाणे!) :)
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर!
"तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं! :)
आता मी जजसाहेबांसमोर कटघर्यात उभा होतो. चेहेर्याने किंचित समिक्षक माधव मनोहरांसारखे दिसणारे जज्जसाहेब समोर बसले होते. कोर्टात शांतता होती. माझं आरोपपत्र जजसाहेब नजरेखालून घालू लागले! आणि एकदम त्यांनी मान वर करून आश्चर्यकारक मुद्रेने मला विचारलं.
"अभ्यंकर?"
कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! :)
"हो!"
"गुन्हा कबूल आहे?"
"हो!"
"२२०० रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत कोर्टाच्या आवारात साधी कैद. कबूल आहे?"
मी हळूच आनंद महाजनीकडे बघितलं. त्याने थोड्याश्या मिश्किल चेहेर्यानेच होकार भरला!
आणि आणि आणि...
हुश्श!!
पुढच्याच क्षणी मी जजसाहेबांच्या खोलीतून बाहेर पडलो! :)
आता पुढचे सोपस्कार सोपे होते. कोर्टाच्या कार्यालयात २२०० रुपये दंड नव्याने भरायचा होता व संध्याकाळी वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन काल भरलेली २००० रुपये अनामत रक्कम परत आणायची होती! आमच्या बॅचमधल्या सगळ्यांशीच केवळ दंड भरून सुटका झाली, फक्त दोघांनाच तीन दिवसांची साधी कैद सुनावण्यात आली. त्यात एक तो पत्रकार होता! शिंदेसाहेबांनी बहुतेक अजून दोनचार कलमं लावली असणार त्याच्यावर! :)
कोर्टाच्या आवारातच एक कॅन्टीन आहे. "चल तात्या, साला तू छुटा. अब चाय पिला!" असं माझे मारवाडी मित्र म्हणू लागले. माझ्यावर लक्ष ठेवायला एक पोलिसही होता आमच्यासोबत! कारण कोर्ट उठायला अजून काही अवकाश होता आणि मी टेक्निकली कोर्टाच्या आवारात का होईना, परंतु साध्या कैदेत होतो!!
हे सगळं होईस्तोवर पाच वाजले होते. हळूहळू मित्रमंडळींची पांगापांग झाली. आम्हा तिघाचौघा आरोपींना मात्र साडेपाच वाजेपर्यंत कोर्ट सोडता येणार नव्हतं! पण आता मात्र काही टेन्शन नव्हतं! एकदम हलकं हलकं वाटत होतं. मी असाच टाईमपास करत इकडेतिकडे फिरत होतो. माझ्यावर नजर ठेवणारा तो पोलिसशिपाई, तोदेखील आता एका पारावर अंमळ तंबाखू चोळीत बसला होता. 'साला, या मोर्याकडून २२०० रुपये वसूल केले पाहिजेत!' असं मी मनशी म्हणत होतो तेवढ्यात समोरून कडक वर्दीमधले शिंदेसाहेब येताना दिसले. आमची पुन्हा एकदा हसतमुखाने नजरभेट झाली. आता शिंदेसाहेबांनी स्वत:हून माझ्याशी हस्तांदोलन केलं!
"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं!
"पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!"
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
"तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
"आज पुन्हा गंमत बघायची असेल तर रात्री दोनच्या सुमारास यायचं तर या चेकनाक्याजवळ!"
??
मला काही कळेचना! तेव्हा शिंदेसाहेबांनीच हसून खुलासा केला,
"नाही, काल तुम्हा टू व्हीलरवाल्यांना धरलं होतं. आज सगळे ट्रकवाले राऊंडअप करणार आहे आणि त्यांची तपासणी करणार आहे. रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!"
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
30330
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
कोर्टाच्या आवारात साधी कैद
शेवट फार छान रंगवलाय
In reply to शेवट फार छान रंगवलाय by आनंदयात्री
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हुश्श्शः.......
In reply to हुश्श्शः....... by प्रभाकर पेठकर
पेठकाकांशी
वा क्या बात है!!!!
कलम १८५
"काय मग?
फार छान
मतितार्थ
कलम १८५-
छानच
एकदम बेस्ट
वा तात्या, सुरेख शब्दबद्ध केलास अनुभव!
मस्त.....
शिंदेसाहेबांना .......
झकास!
आज पूर्ण
हुश्श..
व्वा..!!
अभिनंदन
सुरेख अनुभव! एक आयडीया आहे....
मस्त शेवट
शिंदेसाहेबांचे पटले तरीही
In reply to शिंदेसाहेबांचे पटले तरीही by धनंजय
"दारू
In reply to शिंदेसाहेबांचे पटले तरीही by धनंजय
+१
मोठी चूक केली तात्या.
येक छोटिशी शंका..............
In reply to येक छोटिशी शंका.............. by मन
प्रकाटाआ
मी जर शिंदेसाहेब असतोना
छ्या ही काय शिक्षा आहे?
झकास लेख
प्रामाणिक कथन!
तात्या
छान
रंगतदार आहे
आभार..
मस्त!
तात्यांची शिकवणूक
मुंबई
अगं
In reply to अगं by वरदा
इथे म्हणजे
उत्तम अनुभव लेखन!
In reply to उत्तम अनुभव लेखन! by ब्रिटिश टिंग्या
:)
मस्त कथन
घरी घ्यावी
मस्त लिहिलंत तात्या....
In reply to मस्त लिहिलंत तात्या.... by प्रसन्न केसकर
पुणेरीसाह
तात्या पुर
MADD -- मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग
Motor Vehicles Act 1988 Section 185
प्रामाणिक
आपल्या