नुकतीच खरडवहीत डानरावांशी 'आधुनिक पुरुषांच्या केसांची निगा' या विषयावर चर्चा झडली. आपला केशसंभार कसा सांभाळावा, त्यासाठी कुठची उत्पादनं वापरावीत वगैरे खास पौरुषिण (स्त्रैण प्रमाणे) विषयांवर भाबडं हितगुज झालं. सध्याच्या पुरुषमनाची सुकुमार स्पंदनं त्यात प्रतीत झाली - कवितेला यापेक्षा अधिक राजस विषय तो कोणता मिळणार? मग आम्ही डॉनराव आपल्या केशकर्तन केंद्रात (जवळच्याच एखाद्या सायबर कॅफेमध्ये मेगाबायटी खरडी टाकून) गेले आहेत ही कल्पना केली. त्यांच्या न्हाव्याशी (कोणी केशकर्तनतज्ञ, तंतूकर्तनविशारद, स्टायलिस्ट, रचनाकार, किंवा नुसतंच कर्तक वगैरे म्हणेल...) जिव्हाळ्याच्या विषयावर होणाऱ्या चर्चेची झपूर्झा अवस्था पकडण्याचा हा क्षीण प्रयत्न. डॉनराव न्हाव्याला म्हणतात, अरे, माझ्या बटांना तसंच ठेव. त्यांना रंगवू नकोस - माझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनेत रंगीत बटांना पुरेशी जागा नाही. जर कोणी अशा रंगलेल्या बटांचा फोटो काढला तर मी माझं तोंड आणि बट दोन्ही कुठे लपवू? आणि बट डोईजड होता कामा नये, शेवटी डोक्याने मी विचार करतो ना... बटांचा हव्यासही व त्यांना न रंगवण्याचा ध्यासही - ही खास पुरुषमनाची कुतरओढ चित्रित करणारी ही कविता. (घट डोईवर, घट कमरेवर या मूळ सुंदर कवितेला थोडी झुल्फं चढवून. [दुवा दिसत नसला तरी कवितेच्या नावावर क्लिक करा, तिथे तो आहे.])
बट डोईवरि बट झुलते तरि
सोडी बटांना, न्हावीलाला, न्हावीलाला रे
मुळी नको त्यां हायलायटी
नको चांदण्या ना रंगोटी
कसा पॅक् करू केसाला, न्हावीलाला रे
कुणितरी येईल फोटो काढिल
कलादालनी अवचित चढविल
कसा राखू मग लाजेला, न्हावीलाला रे
अभिव्यक्तीहून महान होते
बट तीमध्ये नाही बसते
हेच बरे वाटे मजला, न्हावीलाला रे
त्याने करतो विचार मी, बट*
डोईहुनही बट मम उत्कट
ठेव काहि मज शोभेला, न्हावीलाला रे
केले कर्तन, पुरे एवढे
घाव बटांवर दिले केवढे
दे राहू काही बटांना, न्हावीलाला रे
* इथे but या इंग्रजी शब्दाप्रमाणे, परंतु, पण या अर्थाने आलेला आहे. त्याच उच्चाराचा दुसरा इंग्रजी शब्द butt - नितंब, ढुंगण, पार्श्वभाग या अर्थाचा आहे. योग्य अर्थ वापरला जावा म्हणून ही तळटीप.
प्रतिक्रिया
28 Jul 2010 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डान्याच्या बटा कविताचा विषय झाल्याचा पाहून आनंद झाला. :)
केले कर्तन, पुरे एवढे
घाव बटांवर दिले केवढे
दे राहू काही बटांना, न्हावीलाला रे
हे तर भारीच आहे. :)
अवांतर : ’न्हावीलाला रे ला न्हावीलाल” वाचल्यावर ’नंदलाला रे नंदलाला” असे वाचतोय असे वाटले.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2010 - 8:00 am | राजेश घासकडवी
लिहायची राहून गेली. खेळीमेळीत, थोडी गंमतजंमत करण्याच्या उद्देशानेच लेखन केलेलं आहे. स्वसंपादनाची सोय नसल्यामुळे 'डानरावांना आवडली नाही तर उडवीन' म्हणण्याची सोय नाही. परंतु त्यांनी एका अक्षराने देखील तसं कळवलं तर 'संपादक मंडळ'ला उडवण्याची विनंती करीन.
28 Jul 2010 - 4:33 pm | विजुभाऊ
त्याच उच्चाराचा दुसरा इंग्रजी शब्द butt - नितंब, ढुंगण, पार्श्वभाग या अर्थाचा आहे. योग्य अर्थ वापरला जावा म्हणून ही तळटीप
हा अर्थ लावून सर्व कविता वाचू नये अशीही एक तळटीप द्यावी म्हाराज =))
'संपादक मंडळ'ला उडवण्याची विनंती करीन.
या वाक्यात "ला " वाचलाच नाही :D .....वाचून मी बसल्या जागी उडालो
28 Jul 2010 - 8:14 am | Nile
=)) =)) लै भारी गुर्जी. प्रस्तावनेच फुटलो.;-)
बट ह्या शब्दाचे इतर अर्थ लावुनही कविता अर्थपुर्ण झाली आहे. =))
म्हणजे बट, पण परंतु वगैरे. ;-)
बाकी आख्ख्या मराठी आंतरजालावर प्रसिद्ध अश्या बट बद्दल कविता निर्माण होणे क्रमप्राप्तच होते. आज ते झालेले पाहुन डोळे पाणावले. ;)
28 Jul 2010 - 8:22 am | अडगळ
कर्तनकाव्य आवडले.
आजपर्यंतचा आमचा अनुभव असला लिरिकल वगैरे नाही .
म्हणजे पुरुषमनाची कुतरओढ (की कातरओढ )चित्रित करणे वगैरे.
थेट,
कट कानावर , कट मानेवर,
मारी रंधा , न्हावीदादा , न्हावीदादा रे .
उजळुन दे बा माझी कवटी,
परज तुझी वस्तारा वाटी,
सोडू नको एकाला ,न्हावीदादा , न्हावीदादा रे .
28 Jul 2010 - 8:24 am | मुक्तसुनीत
हाहाहा
डॉन्या तुझ्या बटांना म्हणती "मुजोर" मामा
वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा !
आरशापुढे सदैव , करिशी बटेची नक्षी
वरडून बोंब येई, "फूटबॉल खेळ आक्षी !"
कार्ट्यांस नाही झोपा , मीपावरी हमामा
वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा !
;-)
28 Jul 2010 - 8:31 am | छोटा डॉन
धन्य ते गुर्जी आणि धन्य ती गुर्जींची अभिव्यक्ती ...
कविता पाहुन अंमळ थोडे केस गळाले. :(
( काय म्हणता, पुण्यात युनिव्हर्सिटी चौकात मिठाई वाटण्याच कार्यक्रम चालु आहे ? )
बाकी चालु द्यात, आज आम्ही किंचित बिझी आहोत ...
दुपारनंतर येऊ आरामात, आज केसाने एकेकाचा गळाच कापतो ;)
अवांतर : आक्षेप असायचे कारणच नाही, खेळीमेळीतच घेतले आहे, चालु द्यात.
28 Jul 2010 - 9:15 am | क्रेमर
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बटबटीत आविष्कार आवडला.
_____
Sticking feathers up your बट does not make you a chicken.
- (बटकेस) Chuck Palahniuk
28 Jul 2010 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जींकडून भयानक विडंबन, वर अडगळ आणि मुसुमास्तरांकडून त्याला भीषण विडंबनरूपी पाठींबा! बरं गुर्जी, ते कवितकाच्या धड्यांचं पुढे कुठवर आलंय?
=)) =)) =))
डान्रावांच्या बटा येवढ्या प्रसिद्ध झालेल्या पाहून आम्हाला व्यक्तिशः अतिशय आनंद झाला. अर्थातच त्यांचे जुने दु:खद अनुभव (लिंक आहे) आठवून तेवढेच किंबहून केसभर जास्त दु:खही झाले
-- राको. अदितीताई अवखळकर पाटील.
हे मात्र तद्दन चुकीच्या माहितीवर आधारलेले अतिशय बेसलेस विधान आहे याची कृपया डान्रावांनी नोंद घ्यावी. डान्रावांनी आपले 'चारों तरफ फैले हुए आदमी' नीट पारखून मगच त्यांची निवड करावी ही नम्र विनंती!
प्राडॉ, तुम्हाला "नंदलाला" आठवलं आम्हाला "डिंगूलाला"! तुमचा अभ्यास कविता, गाण्यांचा, आमचा खरडवह्यांचा!! शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास .... हेच खरं नाही का? ;-)
28 Jul 2010 - 1:17 pm | श्रावण मोडक
मास्तर बिघडेल आहे हा ठार! ;) बंटास लिवलंय.
28 Jul 2010 - 2:09 pm | बिपिन कार्यकर्ते
आजवर केवळ पुरूषांच्या मंगळागौरीतच अडकून पडलेला पण समस्त पुरूषवर्गाच्या जिव्हाळ्याचा असलेला हा विषय तुम्ही असा जाहिर पणे चर्चिला आणि ऐरणीवर आणल्यामुळे तुमचे अभिनंदन. आम्ही लवकरच 'बटीफटीच्या गुजगोष्टी' हे नवीन मुक्तनाट्य बघायला जाणार आहोत. त्यात म्हणे प्रेक्षकांना पण 'बट!!! बट!!!' असे जोरात ओरडावे लागते. आता आम्हाला तसे चारचौघात बोलताना अजिबात लाज वाटणार नाही. आपण एक महान काम केले आहेत. धन्यवाद.
अवांतर:
आणि बट डोईजड होता कामा नये, शेवटी डोक्याने मी विचार करतो ना...
डान्रावांना प्रेमाचा सल्ला... विचार शेवटी करण्यापेक्षा आधीच केला तर आयुष्य बरेच सुखकर होईल. ;)
28 Jul 2010 - 4:17 pm | llपुण्याचे पेशवेll
'बटीफटीच्या गुजगोष्टी'
बटीतोटीच्या जुजगोष्टी कशे वाटते?
28 Jul 2010 - 2:15 pm | नंदन
विडंबन. अशा प्रसंगी न्हाव्याला मात्र या 'कातर'वेळी हे गाणंच बहुतेक सुचत असेल ;)
28 Jul 2010 - 4:35 pm | मराठमोळा
कवितेपेक्षा शेवटचे डिस्क्लेमर वाचुन फुटलो... (वाचकांना मुद्दाम प्रोत्साहन दिल्यासारखे वाटले.. )
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
28 Jul 2010 - 5:47 pm | चतुरंग
खंप्लीट वंटास लिखाण! ;)
बटरंग
28 Jul 2010 - 7:59 pm | केशवसुमार
राजेशशेठ,
मस्त विडंबन..
बट डोईवरि बट झुलते तरि हे आम्ही बट डोईवर बट डोळ्यावर असे वाचले
आमच्या घट पोटावर घट कमरेवर विडंबनाची आठवण झाली
मुसुशेठ,
वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा ! ज ब रा आहे..