एकदा भाऊबिजेसाठी आईसह आम्ही पुण्याला मामाकडे आलो होतो. त्यावेळी आम्हांला पुणेरी दिवाळी अनुभवण्याचं सौख्य लाभणार म्हणून कोण आनंदात होतो आम्ही!
'पुन्याची मान्सं आन् पॉरं कश्शे कश्शे किती किती मॉठ्ठालं फटाकडं उडवत असत्याल नै?' याची चर्चा पुणं येईपर्यँत चालली होती.
'नुसते फटाकेच उडवत नाहीत, आकाशात बाणही सोडतात, त्याचा मोठा फुलोरा होऊन चांदण्याच चांदण्या पडतात.'
'अग्गो बाबौ. लै मज्जा येत आसल न्हाई?' माझी उत्सुकता ताणली गेली.
आम्ही मामाकडे पोचलो. माझे कशातच लक्ष नव्हते. कधी एकदा संध्याकाळ होतेय अन् मामा कॉटखाली लपवलेले किंवा कपाटात ठेवलेले पोतंभर फटाके काढून देतोय असं झालं होतं. अखेर आईने मामाला औक्षण करून झाल्यावर आम्हांला फटाके वाजवायला परवानगी मिळाली. हुर्यो करीत आम्ही अंगणात आलो. मामानं एका छोट्या पिशवीत हात घालून प्रत्येकाला एकेक लवंगी फटाक्यांची लड दिली. नंतर तिचा धागा व्यवस्थित सोडवून सारे फटाके अलग केले, वर 'एकेकच उडवायचा' अशी तंबीही दिली. मी नाराज झालो होतो. मला तो चांदण्यांचा फुलोरा उडवायचा होता. मी जरा बाजूलाच उभारलो.
फटाके उडवायला फूटभर लांबीची उदबत्ती दिली होती. मामेभाऊ एकफूटी उदबत्ती हातभर लांब धरून तो इवलासा फटाका चेतविण्याचा प्रयत्न करायचा. हात थरथरत असल्याने ते त्याला नीटसं जमत नसावं. वात पेटायच्या आधीच त्याची पळायची घाई. तीन चार प्रयत्नांनंतर वात सुर्रकन् पेटली की हा थेट घरात पळून जायचा...
त्याचा पळपुटेपणा मला काही पटलाच नाही. गावाकडे बिडीने अॅटमबॉम्ब पेटवून हातातच धरणारे व योग्य वेळीच वर फेकणारे महाभाग मी जवळून अनुभवले होते. त्यापुढे हे हातभर लांब राहून वात शिलगावणं निव्वळ पोरखेळ होता. मामेभाऊ मोठ्ठा असूनही एवढा घाबरट का? याचं मला खूप आश्चर्य. त्याउलट तो फटाका पेटवून कानात बोटे घालतोय याचं मामा मामी आभाळभर कौतुक!
एक फटाका पेटवून तो पळाला. त्यासरशी मीही धावलो. झटकन त्या पेटलेल्या लवंगी तोट्याचं बूड चिमटीत पकडलं. ते पाहून मामा मामीच्या गोटात मी हातबॉम्ब हातात धरल्याइतकी गडबड उडाली. माझा हा आततायीपणा बहिणींना तर नवा नव्हताच, आईलाही नव्हता. त्यामुळे त्या निश्चिँत होत्या. इकडे मामाची धांदल उडाली.
'अरे, टाक. टाक. खाली टाक. हातातच फुटेल. सोड, सोड म्हणतो ना' मामा मला ओरडत होता. पण मी धीट होतो. माझं सगळं लक्ष सुरसुरणाऱ्या वातीकडे होतं. अपेक्षित क्षण आला अन् मी तो फटाका वर फेकला. अगदी वर पोचताच फाटकन् आवाज झाला. ही आतषबाजी पाहून पुणेकर बालबच्चांनी आश्चर्याने टाळ्या पिटल्या. मला हुरूप आला. मामा मामीच्या विरोधाला न जुमानता मी माझी आतषबाजी जोमाने सुरु ठेवली. डाव्या हातात उदबत्ती घेऊन उजव्या चिमटीतला फटाका पेटवणे व योग्यवेळी उंच फेकणे, दोन्ही हातात पेटते फटाके धरून वेळीच वर फेकून फोडणे, फटाक्याच्या अगदी शेपटीला नखांनी धरून खाली किँवा वर न फेकता हातातच फुटू देणे इ. इ. कसरती पहायला चाळकरी जमा झाले होते. अनेकांनी मला मोठ मोठे फटाके अशा हवाई कसरतीच्या नजराण्यासाठी आणून दिले होते. कावळे, लाल फटाके, लक्ष्मी तोटे मी लिलया आसमानात उडवून दाखवल्यावर सगळे खुष झाले. त्या दिवशीचा मी हिरो ठरलो...
'तू तर खूप धाडसी आहेस बाबा' मामेभावाने प्रशंसा केली.
'आरं ह्ये तं काईच न्हाई. तुला भपका कसा करायचा म्हाईतीय का? न्हाय ना, उद्याच्यालाच दावतो.' त्याचं कुतूहल चाळवून उद्या कोण कोणते खेळ दाखवायचे याची उजळणी करीत मी निवांत झोपी गेलो...
सकाळी फराळपाणी आवरल्यावर माझ्याभोवती पुणेकर सवंगड्यांचा गराडा पडला. कालच्या अविश्वसनीय खेळीने सगळेच प्रभावीत झालेले. त्या घोळक्यातला सत्कारमूर्ती मीच होतो.
'तुमाला टिकलीचा धूर नाकातून काढता येतो का?' मी विचारलं. जो तो एकमेकांकडे पाहू लागला. ते टिकल्या वाजवायचे पण बंदुक किँवा पिस्तुलाने. टिकलीचा धूर नाकातून काढणे हा त्यांच्यालेखी जादुई प्रकारच होता.
'ए काढ ना, काढ ना, नाकातून धूर काढ ना' अशी आर्जवे सुरु झाली.
'आरं पर टिकल्या कुटं हायती?' मी अडचण मांडली. तोच कोणीतरी टिकल्यांचा बॉक्सच माझ्या हवाली केला.
'एवढाल्या कशापायी? मी एकदाच धूर काढून दावणार हाये' मीही मग जरा भाव खाऊन घेतला. सगळे मन लावून माझ्या कृतीचे अवलोकन करीत होते...
डबीतली एक टिकली मी काढली. ती बरोब्बर गुलावर दुमडली. तिचा अर्धचंद्र झाला. मधोमध गुलाची दारू उघडी पडली. डाव्या चिमटीत ती टिकली पकडून सरळ मी माझ्या जास्तीत जास्त आ वासलेल्या तोँडात कोठेही स्पर्श होणार नाही अशा प्रकारे धरली व उजव्या तर्जनीच्या नखाने गुलाला जोरात घर्षण केले. टचकन् आवाज आला पोरं अवाक् झाली. तोंडात टिकली उडवणे म्हणजे भयंकरच! असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
मी पटकन उडलेली टिकली बाहेर घेऊन तोंड मिटले. हळूहळू नाकातून धूर बाहेर पडू लागला. फार मोठी जादू पाहिल्याचा आनंद सवंगड्यांच्या डोळ्यांत मावत नव्हता.
'आणखी एकदा, आणखी एकदा.' एक चिमुरडी टाळ्या पिटत नाचू लागली. तिच्या इच्छेखातर ही कृती एकाचवेळी दोन टिकल्या वाजवून केल्यावर पहिल्यापेक्षा जास्त धूर नाकांतून आला. आणखी फर्माईश झाल्याने डबी संपेपर्यँत मी नाकाने धूर सोडीत होतो. तोंड व नाक आतून हुळहुळायला लागलं होतं पण सांगता कोणाला? शहरावर गावठीची छाप पाडायची होती ना!
'अरे ऐका रे सर्वांनी. आज हा गावकरी आपल्याला भपका नावाचा फटाका बनवून दाखवणार आहे.' धूम्रपानविधी पार पडल्यावर मामेभावाने मुद्द्याला हात घातला. सभेने चित्कारत टाळ्या पिटल्या.
'पर त्यासाठी ह्ये येवढी फुसकी फटाकडी लागत्याल.' मी पुन्हा अडचण मांडली.
'फुसकी म्हणजे?' कोणीतरी शंका बोलून दाखवली.
'फुसकं फटाकडं म्हाईती न्हाई? म्हंजी जी उडालं न्हाईत असलं तोटं, जी वाजलं न्हाईत ती फटाकडं. आलं का ध्यानात? आणा, आणा, हितंच घावत्याल.' मी इकडे तिकडे शोधू लागलो. न उडालेले फटाके सापडायला वेळ लागलाच नाही. पोरं अर्ध्यात विझलेला फटाका पुन्हा पेटविण्याचं धारिष्ट्य दाखवित नसत. त्यामुळे अर्ध्या वाती असलेले भरपूर फटाके सर्वांनी एका दमात गोळा केले.
'आता पेपर पायजेल एकांदा.' कोणीतरी तो लागलीच तोही हजर केला. मग काडेपेटीही आली. मी काय करतोय हे सगळे निरखीत होते. फटाके अर्ध्यात तोडून त्यातली दारू मी पेपरवर ओतू लागलो. दोघा तिघांनी माझं अनुकरण केलं अन् काही क्षणात सर्व फटाके सोलून झाले. मुठभर चकाकणारी दारू मिळाली होती.
'बाजूला सर्का, बाजूला सर्का.' मी ओरडलो. 'हं, आता बगा ह्यो भपका.' असं म्हणत मी पेपरला काडी लावली व बाजूला झालो. कागद पेटत दारूजवळ पोचला. पुढे काहीवेळ काहीच घडेना. मलाही संशय आला. मी झटकन खाली वाकून फुंकर मारली. अन् काही कळायच्या आतच भपकन सर्व दारूचा भला मोठ्ठा जाळ झाला. पोरं टाळ्या वाजवीत उड्या मारू लागली. मी मात्र धाय मोकलून रडत होतो! कारण सारी वाफ माझ्या चेहऱ्यावर येऊन आगडोंब उसळला होता. तो तुपे चाळीतला भपका चांगलाच माझ्या अंगलट आला होता...
पुन्हा म्हणून मी कधी भपकेबाजी केली नाही.
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 6:19 pm | मीनल
मस्त आहे लेख.
मजा आली वाचताना.
लहानपणीचे काही उद्योग आठवले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
4 Jul 2010 - 7:07 pm | टारझन
वा वा वा वा वा !! "उंद्याबी पवाया जायचं" एवढीच मज्जा आली !!
आणि शेवटी तोंडावर सगळा भपकारा आला :)
चियर्स !!
4 Jul 2010 - 7:31 pm | शिल्पा ब
मजा आली वाचून...नेहमीप्रमाणेच आमची फुटकळ शंका, तुमची आई शुध्द मराठी बोलून तुम्हीच कसे काय हेल काढत गावंढळ बोलायचे ?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
4 Jul 2010 - 8:11 pm | रामदास
मजा आली.
'पुन्याची मान्सं आन् पॉरं कश्शे कश्शे किती किती मॉठ्ठालं फटाकडं उडवत असत्याल नै?'
आणि नंतरचा अपेक्षाभंग वाचून हसत राहीलो.
4 Jul 2010 - 8:36 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त...
बिपिन कार्यकर्ते
5 Jul 2010 - 5:54 am | डॉ.श्रीराम दिवटे
आम्ही भावंडं गावंढळ बोलायचो कारण आमचं बालपण खेड्याच्या येड्यांत गेलं याउलट आई पुण्यात शिकलेली, वावरलेली. एकेकाचं नशीब, दुसरं काय?
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
5 Jul 2010 - 6:35 am | सहज
न उडलेल्या/ फुसका बार किंवा वात निघाल्याने कुचकामी, राहीलेल्या फटाक्यातील दारु एकत्र करुन पेटवुन जाळ उडवून अगदी भाजुन नाहीतरी झळकरी होण्याचे पुण्य काम बहुतेक सगळ्यांनी केले असतेच.
5 Jul 2010 - 8:18 am | II विकास II
न उडलेल्या/ फुसका बार किंवा वात निघाल्याने कुचकामी, राहीलेल्या फटाक्यातील दारु एकत्र करुन पेटवुन जाळ उडवून अगदी भाजुन नाहीतरी झळकरी होण्याचे पुण्य काम बहुतेक सगळ्यांनी केले असतेच.
>> पेठेत काही ठिकाणी वातीपण लावुन मिळतात.
5 Jul 2010 - 6:59 am | स्पंदना
आवडल.
आता मागच आजोळ शोधुन काढाव लागेल.
तुमच भाषेच स्पष्टीकरण ही पटल, पण त्यात नशिब एकेकाच म्हणन्या पेक्षा ती भाषा पण तुम्हाला जमते हे नशीब!! अस म्हणा ना.
शहरी भाषा काय प्रत्येक पुस्तकात सापडते पण हा अस्सल वाण फक्त ह्रदयातच वास करतो.
5 Jul 2010 - 7:24 am | सुनील
सुरेख. मस्त लिखाण.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Jul 2010 - 6:45 pm | प्रभो
मस्त!! आवडला.
6 Jul 2010 - 8:35 pm | अरुंधती
आवडलं पुणेरी आजोळ! आम्हीही लहानपणी असेच कानात बोटे घालून, थरथरत्या हातांनी एकेक लवंगी फटाका कसाबसा फोडायचो त्याची आठवण झाली!! :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/