ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली. त्याचे उट्टे म्हणून त्या विषयावर मीच एक लेख मराठीतून लिहिला व मनात म्हटले, ''आता कोणी या विषयावर आंतरजालावर मराठीत काही तपशील मिळतो का हे शोधू गेले तर माझ्या ह्या लेखाची त्यांना नक्की मदत होईल!''
त्या लेखावर बरेच चांगले प्रतिसाद आले. पण एका प्रतिसादाने माझे लक्ष वेधले. एका संपादक महाशयांना त्यांच्या मराठी मासिकासाठी तो लेख हवा होता. त्यांनी तशी विनंती लेखावरील आपल्या प्रतिसादातून केली होती. माझ्या मनात विचार डोकावला, जर संकेतस्थळ प्रशासकांची हरकत नसेल आणि त्या निमित्ताने हा माहितीपूर्ण लेख मुद्रित माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार असेल तर काय वाईट आहे? संपादक महाशयांनी ज्या मासिकाचा उल्लेख केला होता ते माझ्या अजिबातच परिचयाचे नव्हते. पण 'माझ्या परिचयाचे नसले म्हणून काय झाले? त्याचा अर्थ लोक ते मासिक वाचतच नाहीत असा थोडाच आहे?' असे मी मनाला समजावले. लगेच संकेतस्थळ प्रशासकांनाही त्याविषयी विचारले. त्यांची काहीच हरकत नव्हती. त्यांनी त्या प्रतिसाद देणाऱ्या संपादकाचा ईमेल आयडी मला पुढची पत्रापत्री करण्यासाठी धाडून दिला! झाले! मी त्या मासिकाच्या संपादकांना सविस्तर ईमेल करून त्यातून सर्व तपशील कळवले. अपेक्षा होती की ईमेल मिळाल्याचा का होईना, प्रतिसाद येईल! पण अपेक्षा फोल ठरली. कालांतराने आपण असे एक ईमेल पाठवले होते हेही मी विसरून गेले!
अचानक दोन आठवड्यापूर्वी सकाळी सकाळी घरी एका जाडजूड ब्राऊन पाकिटाचे कुरियर आले. माझ्या आईने ते ताब्यात घेतले. पाकिटावर माझे नाव, पत्ता इत्यादी व्यवस्थित लिहिले होते. मी काहीतरी कामात असल्याने (वर्तमानपत्रवाचन! ;-) ) तिलाच ते कुरियरचे पाकीट उघडायला सांगितले. आतून एक गुळगुळीत मुखपृष्ठाचे मासिक निघाले. त्याचे नाव व रंगीबेरंगी मुख्यपृष्ठ पाहताच मला कधी काळी धाडलेल्या त्या अनुत्तरित ईमेलची आठवण झाली! मोठ्या कुतूहलाने मी अनुक्रमणिका चाळू लागले. आणि तिथेच माझ्या भ्रमनिरासाला सुरुवात झाली.... हाय रे दैवा! अनुक्रमणिकेतच मला माझ्या लेखाचे अंधारे भवितव्य ठळकपणे दिसू लागले होते! कारण पानानुक्रम ऐवजी ''पानुक्रम'' छापले होते, माझ्या नावाऐवजी ''अंरुंधंती'' असे नाव दिसत होते आणि मला अपेक्षित असलेल्या लेखाऐवजी माझ्या ब्लॉगवरील भलत्याच एका वेगळ्या लेखाचे शीर्षक..... :S
मनातल्या मनात मी हजारदा चरफडले..... घे, घे, कोणते मासिक, कोणते प्रकाशन याची नीट शहानिशा करून न घेता तशीच परवानगी दिल्याचे परिणाम घे! भोग आता आपल्या कर्माची फळे! ज्या मासिकाच्या अनुक्रमणिकेतच एवढे गोंधळ आहेत, इतक्या चुका आहेत, ते मासिक तुझा लेख काय धड छापणार! आता बस शोधत मुद्राराक्षसाचे विनोद नाहीतर उपसंपादकांच्या डुलक्या!!
पुढे काय वाढून ठेवले आहे ह्या कल्पनेनेच मी एक आवंढा गिळला. माझा सोन्यासारखा गोजिरा लेख टायपासुराच्या हल्ल्यात शंभर शकले होऊन माझ्याच पायाशी लोळण घेताना मला दिसू लागला! >:) त्या लेखातील सारी अक्षरे अक्राळविक्राळ रूप धारण करून माझ्याच अंगावर हल्ला तर करणार नाहीत ना अशी भयप्रद कविकल्पना मनास चाटून जाताच मी एखादी पाल झटकावी तसा तो अंक झटकला व माझ्या मातेच्या हातात कोंबला. ती बिचारी प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागली. ''बघ, बघ जरा, माझा कोणता लेख छापलाय तो! '' असे म्हणत मी शेंदाड शिपायासारखी हातातल्या वर्तमानपत्रात दडी मारली. लक्ष अर्थातच आईच्या हातातील मासिकाकडे होते.
आमच्या मातृदैवतालाही ना, नको तिथे चेष्टा सुचते! माझी घालमेल (!) पाहून तिने अगदी गोगलगायीच्या संथ गतीने मासिकाच्या अनुक्रमणिकेत माझ्या लेखाचा पृष्ठ क्रमांक तपासला व हळूहळू पाने उलटायला सुरुवात केली. एव्हाना माझ्या धीराचा कोणत्याही क्षणी ''दी एंड'' होईल अशी परिस्थिती होती. :SS ''अगं, जरा लवकर... '' अशी घाई मी करू जाताच मातृदैवताने डोळे वटारले! तिची ही ट्रिक इतकी वर्षे झाली, तिच्या भाषेत मी ''घोडी झाले'' तरीही मला आजही चूप करते. काय करणार! सवयीचा परिणाम! :P असो. तर कूर्मगतीने मासिक चाळणाऱ्या माझ्या मातेने मला धीर व संयमाचा नवा धडा द्यायचा विडाच उचलला होता जणू! शेवटी ती प्रतीक्षा असह्य होऊन मी तिच्या हातातील ते मासिक हिसकावले व घाईघाईने मला हवे ते पान उलगडू लागले. पृष्ठ क्रमांक ४६ व ४७! मला पृष्ठ क्रमांक ४८ व ४९ हवे होते. कारण त्या पानांवरच माझ्या लेखाची नक्षी उमटली असणार होती. एकमेकांना चिकटणाऱ्या पानांना दूषणे देत अखेरीस मी ते ४८ क्रमांकाचे पान उलगडले..... आणि.... बघतच राहिले!!!! :O
कारण पृष्ठ क्रमांक ४८ व ४९ चक्क कोरी करकरीत होती!!! @) पांढरीफट्ट कोरी.... त्यांवर कसला म्हणजे कसलाच मजकूर नव्हता! मी डोळे विस्फारून त्या पानांकडे बघत असतानाच मला घसा खाकरून हसू दाबल्याचा आवाज आला.... वर पाहिले तर माझ्या मातृदैवतानेही झालेला घोळ ताडला होता आणि मोठ्या कष्टाने ती आपले हसू आवरायचा प्रयत्न करत होती. आमच्या दोघींची नजरानजर झाली मात्र आणि आम्ही दोघीही ज्या हसत सुटलो त्या लोळायच्याच शिल्लक राहिलो! हसण्याचा अॅटॅक जरा ओसरल्यावर आम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी त्या मासिकाची ती पाने पाहिली. को री च! =))
आमच्या हास्यकल्लोळाचे दरम्यान जर त्या पानांवर जादूने अक्षरे उमटावीत अशी योजना होती तर ती सपशेल नापास झाली होती! मुद्रितराक्षसाच्या त्या भुताकडे अचंबित नजरेने पाहताना मला अचानक काहीतरी जाणवले.... मी पुन्हा ते मासिक झरझर चाळू लागले. आणि संपादकीयाच्या पानांशी येऊन थबकले! कारण ती पानेही को री च होती!! बिचारे संपादक महाशयही त्या घोर अत्याचारातून सुटले नव्हते तर! :( कदाचित त्यानंतर मला जरा सहानुभूती, अनुकंपा, करुणा वगैरे वाटायला हवी होती. पण दिवसभर माझ्या नजरेसमोर वारंवार ती कोरी पाने येत आणि माझी पुन्हा एकदा हसून हसून, स्वतःच्या मूर्खपणाचे नवल करीत पुरेवाट होई.
मग जणू स्वतःची पूर्ण बदनामी करण्याचा चंग बांधून मी ते मासिक आप्तांमध्ये फिरवले. मासिकातील छपाईच्या घनघोर घोटाळ्यांना पाहून त्यांनी तर ते प्रकरण फारच खिलाडू वृत्तीने घेतले व मला ''अगं, व्हायच्याच अश्या गोष्टी अधून मधून!'' असे म्हणत चक्क सांत्वना द्यायला सुरुवात केली. माझ्या बहिणीने झाल्या प्रकारावर खो खो हसत तिला उगाचच चांगदेव व ज्ञानेश्वर, काहीही कारण नसताना आठवल्याची प्रांजळ कबुली दिली. झाले! मी ते मासिक आता पुस्तकांच्या कप्प्यात अगदी तळाशी, आत खोलवर गाडून ठेवले आहे. अजून काही तपांनी 'अंगं गलितं पलितं मुंडं' अवस्था प्राप्त झाल्यावर त्या मासिकाच्या पुनर्वाचनाचा सोहळा आयोजित करण्याचा विचार आहे. तोवर ते जर धूळ, कसर, वाळवी इत्यादींनी पीडित झाले नसेल तरच हो! :P
मुद्राराक्षसाच्या त्या ''अदृश्य'' वाकुल्यांनी घरच्या लोकांना व मलाही हसायला एक निमित्त मिळाले व त्याचा पुरेपूर वापर करून मी स्वतःला भरपूर हसून घेतले. आणि मनातल्या मनात त्या दिव्य मासिकात माझा 'माहितीपूर्ण' लेख खरोखरीच विनोदी अवस्थेत प्रकाशित - मुद्रित झाला नाही म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानले!
|| इति मम (अदृश्य)लेखनपुराणं समाप्तम् ||
--- अरुंधती
प्रतिक्रिया
22 Jun 2010 - 11:19 am | मदनबाण
अदृश्य मुद्राराक्षसा वरील "माहितीपूर्ण" लेख फार आवडला... ;)
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson
22 Jun 2010 - 1:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
22 Jun 2010 - 5:23 pm | मुक्तसुनीत
अदिती यांच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे ! ;-)
22 Jun 2010 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमती आणि खुलाशाबद्दल धन्यवाद! :p
अदिती
22 Jun 2010 - 11:12 pm | चतुरंग
विषय संपला! ;)
चतुरंग
22 Jun 2010 - 2:16 pm | राजेश घासकडवी
अनुल्लेखाने मारणे यालाच म्हणत असावेत. किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला सर्वात वाईट शिव्या (संदर्भ - बिपिन कार्यकर्ते) दिल्या असाव्यात....
कोरी चुनरिया आतमा मोरी, मैल है मायाजाल.. असं काहीसं वाटलं :)
22 Jun 2010 - 8:57 pm | अरुंधती
=)) =)) =)) =))
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
22 Jun 2010 - 2:38 pm | मस्त कलंदर
=)) =)) =)) =)) =)) =))
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 Jun 2010 - 2:56 pm | Dipankar
.
22 Jun 2010 - 2:56 pm | Dipankar
.
22 Jun 2010 - 2:58 pm | सहज
हे मासीक जर तुमच्याकडे असेल तर त्याचे नाव व त्यातला पानुक्रम व कोरी पाने याचे फोटू टाका मग खरा लुत्फ लुटू आम्ही!
22 Jun 2010 - 4:01 pm | ज्ञानेश...
अंरुंधंती यांचे न छापलेल्या लेखाबद्दल अभिनंदन !
22 Jun 2010 - 4:58 pm | पुष्करिणी
मस्तच अंरुंधंती! :)
पुष्करिणी
22 Jun 2010 - 6:09 pm | शुचि
वाचलीस ग बाई!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
22 Jun 2010 - 6:42 pm | प्रभो
हाहाहा.. :)
22 Jun 2010 - 7:51 pm | रेवती
काय रे देवा!
अनुक्रमणिकेतच चुका होत्या तर एका परिने बरच झालं छापलं गेलं नाही ते! अजून अत्याचार डोळ्यांवर व्हायचे ते टळले.
रेवती
22 Jun 2010 - 8:56 pm | अरुंधती
रेवती, माझ्या लेखाच्या बाबतीत नाही, पण त्या मासिकातील इतर लेखांवर पण खूप घोर अत्याचार झालेत! प्रुफ-रीडिंग केले होते की नाही असा प्रश्न पडावा इतपत! अगदी सीरियस लेख वाचतानाही कित्येकदा त्याचा अर्थ तरी लागत नाही किंवा सक्तीचे मनोरंजन होते अशुध्द लिखाणामुळे! अर्थाचा अनर्थ तर विचारूच नये! :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
22 Jun 2010 - 8:54 pm | अरुंधती
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स! :-)
सहजसाहेब, कोर्या पानांचा फोटू? :P
मासिकाचे नाव, मुखपृष्ठ वगैरे माहिती देणे मी मुद्दाम टाळले कारण मला त्यांची बदनामी करायची नाहीए. शिवाय त्यांच्या मासिकाचा दर्जा कायम असाच असतो का हेही माहीत नाही! असो. संपादकीयच कोरे राहिल्यामुळे का होईना, संपादक व वाचकांनी त्याची ''गंभीर'' नोंद घेतली तर बरेच होईल! पुढच्या खेपेस कोण्या अज्ञात लेखकाची माझ्यासारखी ''फजिती'' होण्याचे टळेल! :D
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
23 Jun 2010 - 1:07 am | मुक्तसुनीत
बहुतेकाना दिसणारा कोरा मजकूर केवळ पुण्यात्म्यांनाच दिसत असावा.
- जय बाबा फेलुनाथ !
22 Jun 2010 - 11:16 pm | चतुरंग
तुमचा लेख त्यात छापला गेला नाही ही इष्टापत्तीच म्हणायची!
(संपादक)चतुरंग
23 Jun 2010 - 8:24 am | विंजिनेर
हॅ हॅ हॅ...
किंवा कदाचित त्या मासिकाची मालकी नुकतीच बदलली असल्यामुळे संपादक 'कोरी पाटी' घेऊन नव्याने सुरूवात करत असतील ;)
(स्वप्नाळू) विंजिनेर
23 Jun 2010 - 8:33 am | II विकास II
शुध्दलेखनामुळे झालेल्या त्रासाचे वर्णन करणारा लेख आणि प्रतिसाद मिपावर वाचायला लागेल असे काही दिवस आधी कोणी सांगितले असते तर पटले नसते.
शुध्दलेखन हे महत्वाचे आहेतच, पण उगाच स्तोम माजवु नये.