सारे तुझ्यात आहे.....एक स्वप्नवत् प्रवास !! १

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
17 Apr 2008 - 5:26 pm

२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम “सारे तुझ्यात आहे” हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झाला. ह्याचे संगीतकार आहेत आभिजीत राणे आणि गायक आहेत सुप्रसिद्ध देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर.

माझ्या या स्वप्नवत वाटणा-या प्रवासात मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची प्रचंड मदत झाली. त्यांच्याच आग्रहास्तव माझा हा प्रवास मी पुन्हा एकदा जगणार आहे... तुमच्यासोबत !

अभिजीत राणे कडे माझी कवितांची फ़ाईल अगदी सहज घेऊन गेले. राजेश (माझ्या बहिणीचा नवरा) होता सोबत. माझ्या मीटरमधे लिहिलेल्या कविता त्याच्या आईकडे दिल्यात. अभिजीतशी तर भेट सुद्धा झाली नाही. दुपारी साधारण ४ वाजले असतील आणि मग त्याबद्दल विसरुन मी भारत भेटीत जे सगळ्यात महत्वाचं कार्य असतं.......शॉपिंगचं त्यात बुडून गेले. दुस-या दिवशी काकू म्हणजे अभिजीतच्या आईचा फ़ोन आला.......तेव्हाही मी साड्‍यांच्या दुकानातच होते. काकू म्हणाल्या......अगं तू आज जाते आहेस ना नागपूरला....... जायच्या आधी येऊन जाशील का थोडा वेळ? अभिजीतने चाली दिल्या आहेत तुझ्या चार कवितांना...... आई गं........मी तर चाटच पडले. फ़क्त चोवीस तासात या अभिजीतनं चक्क माझ्या चार कवितांचं गाण्यात रुपांतर केलं होतं. मी तर हरखलेच. लग्गेच राजेश ला फोन केला आणि त्याच्याकडे जायची वेळ ठरवली.

मनातलं कुतूहल आतच ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होते. शेवटी अभिजीतकडे पोचलो. उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. अभिजीतने त्याच्या गोड आवाजात एका पाठोपाठ एक अशी गाणी म्हणून दाखवलीत. प्रत्येक गाण्यानंतर त्याला काय प्रतिक्रिया द्यावी कळेचना. इतक्या सुरेख चाली होत्या.....!! आता हे सगळं ऐकायला माझे पती अविनाश नव्हते त्यामुळे पुढे काय हे पण काही ठरवता येत नव्हतं. शिवाय अदितीच्या ऍडमिशनची पण धावपळ होती. अभिजीतला शेवटी सांगितलं...... की आपण काहीतरी नक्की करुयात पण काय आणि केव्हा हे मात्र ठरवायला तू आम्हाला वेळ दे. त्यालाही काहीच घाई नव्हती. रात्रीच्याच विमानाने नागपूरला जायचं होतं. मनात एक गोड हुरहुर सुरु झाली होती.

नागपूरला पोचल्यावर मात्र आम्हाला दुसरा काही विचार करायला वेळच नव्हता. ऍडमिशन चं महत्वाचं मिशन डोळ्यापुढे होतं. असाच एक आठवडा गेला. पुन्हा एकदा फ़ोन वाजला.....अभिजीतचा :) काहीशा कुतूहलानेच उचलला. "जयश्री..... अगं, अजून ४ गाणी झालीयेत" मी तर वेडीच व्हायची बाकी होते. त्याने फ़ोनवरच चाली ऐकवल्या. अगदी मनापासून आवडल्या होत्या. पुन्हा मुंबईत येईन तेव्हा तुला भेटते असं बोलून फ़ोन ठेवला. कशीबशी दाबून ठेवलेली हुरहुर पुन्हा जागी झाली. अवी सोबत नसल्यामुळे काहीच ठरवता येत नव्हतं. तगमग सुरु होती नुसती.

आम्ही एका आठवड्‍यासाठी पुन्हा एकदा कुवेतला जाणार होतो आणि परत येताना अवी सोबत असणार होते. जायच्या आधी आभिजीतला भेटायला गेले तर त्याची अजून ४ गाणी तयार होती. स्वारी एकदम फ़ार्मात होती :) त्याला अक्षरश: साष्टांग दंडवत घालावासा वाटला. कुवेतला गेल्यावर ह्यांच्याकडे विषय काढला. सध्या अदितीची धावपळ असल्याने हे बघूया असं बोललेत. मुंबईत गेल्यावर नागपूरला जायच्या आधी पुन्हा एकदा अभिजीतच्या घरी ह्यांना घेऊन गेले. आता सगळी मिळून चक्क १४ गाणी झाली होती. आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. नागपूरचं काम आटोपून मग काय ते ठरवू असं बोलून आम्ही नागपूरला गेलो. अदितीची मनासारखी व्यवस्था करुन पुन्हा मुंबईत आलो.

आता निवांतपणा होता. शेवटी अल्बम काढूयात असं ठरलं. पण केव्हा....... हा एक मोठा प्रश्न होता. त्याला म्हटलं साधारण दिवाळी नाहीतर डिसेंबरमधे मी येण्याचा प्रयत्न करते. प्रशांत लळीत हा आभिजीतचा नेहेमीचा संगीत संयोजक. त्याला फ़ोन करुन विचारलं की तुला चाली करायला किती वेळ लागेल.... तो बोलला साधारण एका महिन्यात सगळं तयार होईल.

आता एक दिशा मिळाली होती एका मोठ्‍या प्रोजेक्टला आणि माझ्या स्वप्नाळू मनाला :)

कुवेतला परत आल्यावर मनात सगळे हेच विचार सुरु होते. अभिजीतने प्रशांत लळीतशी ओळख करुन दिली. ऑर्कुटवर प्रशांतशी मस्त गट्टी झाली. बोलता बोलता असं लक्षात आलं की ही सगळी फ़ार ग्रेट मुलं आहेत. एकदम जबरदस्त कलाकार मंडळी. इतके उच्च कलाकार असूनही खूप साधे. डिसेंबर पर्यंत आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्र झालो. आता ह्या कामात मज्जा वाटायला लागली.

सगळ्यात मोठं काम होतं ते गाणी निवडण्याचं. १४ सुंदर चालींमधून ८ गाणी निवडणं सोपं नव्हतं. आम्ही त्यावर खूप चर्चा केली. अभिजीतला आवडणारी आठ गाणी, प्रशांतला आवडलेली आणि मला आवडलेली अशा याद्या केल्यात. त्यातली कॉमन गाणी निवडलीत. देवकी पंडित, वैशाली सामंत ह्या दोन गायिका आधीच निश्चित केल्या होत्या. पण अल्बम मधे फ़क्त गायिकाच असणं कदाचित एकसुरी वाटू शकतं म्हणून एक पुरुष गायक हवा होता. पहिला आमचा चॉईस अभिजीतच होता आणि त्यानंतर स्वप्निल बांदोडकर. पण अभिजीतला ह्यावेळी फ़क्त संगीतकाराच्याच भूमिकेत बागडायचं होतं......त्यामुळे स्वप्निल बांदोडकर हे नाव निश्चित झालं. आता अजून एक प्रश्न होता. निवडलेल्या गाण्यांमधे फ़क्त एकच गाणं पुरुषाचं होतं. मग एक युगल गीत का असू नये...... असा विचार मनात आला. तो प्रशांत आणि आभिजीतला पटला सुद्धा. ओला वारा हे गाणं आधी फ़क्त वैशाली साठी ठरवलं होतं.... त्याच गाण्याचं युगलगीत केलं.

आता आठही गाणी नक्की झाली होती. चार गाणी देवकीताईंची, एक सोलो स्वप्निल चं, दोन सोलो वैशालीची आणि एक युगल गीत वैशाली आणि स्वप्निलचं. माझी भारतात जायची तारीख सुद्धा ठरली. इकडे आभिजीत आणि प्रशांत ने देवकीताई, स्वप्निल आणि वैशाली शी बोलून त्यांचा होकार मिळवला होता आणि तारखाही निश्चित झाल्या. अंधेरीचा बझ-इन स्टुडियो निवडला होता ध्वनिमुद्रणासाठी. मी २० दिवसांसाठी भारतात जाणार होते. सगळं रेकॉर्डिंग वगैरे आटोपून जमलंच तर काही म्युझिक कंपनींना भेट देणार होते. जर छानशी ऑफ़र मिळाली तर कॉन्ट्रॅक्ट साईन करुनच येणार होते. नाहीतर मग पुन्हा जूनमधल्या भारत भेटीत नव्या जोमाने कंपन्यांकडे जाणार होते. माझा मुलगा अद्वैत कुवेतला पप्पांसोबत एकटा रहायला एका अटीवर तयार होता आणि ती म्हणजे त्याच्या वाढदिवशी म्हणजे २७ जानेवारीला मी परत कुवेतला यायला हवी. त्यावेळी त्याला "हो" म्हणताना मला पूर्ण कल्पना होती...... मी त्याला फ़ार दुखावणार होते.

शेवटी मी ६ जानेवारीला कुवेतहून डोळ्यात खूप सारी स्वप्नं आणि प्रचंड कुतूहल घेऊन निघाले. माझ्या आयुष्यातल्या एका सुरेल प्रवासाला निघाले होते. ७ ला सकाळी पोचले. आता माझा मुक्काम होता माझ्या नणंदेकडे…..चेंबूरला. माझ्या ह्या प्रोजेक्ट मधे माझी नणंद अर्चना आणि तिचा नवरा प्रकाश माझ्याइतकेच उत्सुक होते. कारण सगळ्यांसाठीच हा एक वेगळाच अनुभव असणार होता.

थोडा आराम केला…… अभिजीतचा फ़ोन आलाच. ८ पासून स्टुडिओ बुक केला होता. आम्ही ८ आणि ९ तारखेला सगळे ट्रॅक्स तयार करणार होतो. प्रशांतने सगळी अगदी चोख तयारी करुन ठेवली होती. ७ ला रात्री माझी पण तयारी सुरु होती. माझा डिजीटल कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा दोन्ही चार्ज करुन ठेवलेत. पूजेसाठी नारळ, हार, पेढे…… !! सकाळी साडे दहाला स्टुडिओत पोचायचं होतं. मी नणंदेच्या सासूबाईंना नमस्कार करुन, त्यांचे आशीर्वाद घेऊन सकाळी साडे आठला निघाले. आभिजीतकडे ९ ला पोचले. तिकडून सरळ पार्ला…..बझ-इन !

छातीत धडधड होत होती…..कसा असेल स्टुडिओ….. कसं करत असतील काम….. एकीकडे खूप खूप आनंद आणि तितकीच उत्सुकता. ११ वाजेपर्यंत सगळे जमले. सगळ्यात पहिले प्रशांत आपले दोन कीबोर्ड्स घेऊन आला. त्याच्या पाठोपाठ अभिजीत नार्वेकर, विजय शिवलकर आणि भीमराव मोहिते ही ताल वाद्यांमधली दादा मंडळी आपापली आयुधं घेऊन पोचलीत. सगळ्यांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत सगळे मनापासून आवडलेत. आत गेल्यावर भेटले रेकॉर्डीस्ट सत्यजीत चिखले. त्यांनीही छान स्वागत केलं सगळ्यांचं. ह्या सगळ्या लोकांमधे फ़क्त मीच नवखी होते. फ़क्त अभिजीत ओळखीचा होता आणि प्रशांतशी ऑर्कुटवर जी काय थोडीफ़ार ओळख होती तीच. पण ह्या सगळ्या कलाकारांनी मला अजिबातच नवखेपणा जाणवू दिला नाही.

आल्या-आल्याच माझे शब्द त्यांना खूप आवडले आणि चालीही छान आहेत हे त्यांनी अगदी मनापासून सांगितलं त्यामुळे माझी भीड जरा कमी झाली. तशी मी बडबडीच म्हणायला हवी. कोणाशीही मी मस्तपैकी गप्पा हाणू शकते. पण इथे ही मंडळी फ़ारच वेगळी होती. पण फ़ार फ़ार तर १५-२० मिनिटांचंच होतं हे अवघडलेपण. मग मस्तपैकी हा हा-ही ही ….. खिदळणं सुरु झालं.

विजय शिवलकरांनी नारळ फ़ोडून मुहूर्त केला. मग पूजा करुन, सगळ्यांना पेढे वाटले. सुरवात तर गोड झाली

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

जयवी's picture

19 Apr 2008 - 5:51 pm | जयवी

इथेही फोटो टाकलेत........ आता सारखे आभार कसे मानायचे....... ;)