रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता. आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती. काय काय कुठे कुठे आहे……..कुठे कुठे ठेवायचं….काय काय सोयी आहेत….काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं. मी आणि अभिजीत दुपारी पोचलो. सगळं नीट बघून पक्कं केलं. तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले. तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो. मनासारखं ते ही काम झालं. तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता.
बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो. कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं…… कसं असावं…..त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली. आता मन थोडं शांत झालं होतं. बरीचशी कामं आटोपली होती. शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं…. तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली. ह्यात प्रणेश जाधव होता. ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात. त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं. कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली. सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले. झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं. वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं. त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं. सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.
१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला. सोबत माझ्या काव्यरचना. सगळं सुबक रचून सजवलं. संपूर्ण दुपार त्यातच गेली. ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या….. मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं. आज वैशाली सामंत भेटणार होत्या. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली. तिथे सत्यजीत भेटले. पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही खरंच खूप मज्जा केली होती. सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते. त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले……. खूप छान वाटलं.
तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला. त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती. त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता मस्त वेळ गेला. घड्याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.
१८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले. त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत होते. दुस-या दिवशी सगळी नागपूरची मंडळी पोचणार होती. माझी लेक अदिती, माझ्या दोघी नणंदा, त्यांचे नवरे, मुलं……. २० ला भाऊ आणि वहिनी. अगदी लग्नघर वाटत होतं अर्चना-प्रकाशचं घर. आम्ही बाकीही सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, मधलं खाणं……… सगळं आंग्रे बाईंना करायला सांगितलं होतं. त्यामुळे किचन मधे जायची कुणालाच गरज नव्हती. सगळे मिळून फ़क्त मज्जा करायची होती.
१९ ला सगळी मंडळी पोचली……. हास्यकल्लोळात फ़क्त छप्पर उडायचं राहिलं. जेवणं झाल्यावर आम्ही हॉलवर जायला निघालो…. थोडीशी कामं पण बाकी होती. हॉलच्या तयारीवर शेवटला हात फ़िरवला. आमचं बॅनर अगदी दिमाखात झळकत होतं दादर-माटुंगा कल्चरल सेंटरवर. आता खरंच खूप समाधान वाटत होतं.
घरी आल्यावर पुन्हा एकदा चेक लिस्टवर नजर फ़िरवली. सगळ्यांना कामं वाटून दिली. प्रत्येकाला सगळं सामान दाखवून दिलं. रात्री मात्र अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही.
२० तारीख. The D’Day पटापटा सगळं आटोपलं. नाश्ता, आंघोळी, जेवणं…. दुपारी साडे-तीनला घरातून सगळे निघालो. हॉलवर बरीचशी तयारी झालेली दिसत होती. होता होता स्टेज सजलं. आमचीही सजावट सुरु होती. एकीकडे गणपतीचा फ़ोटो, समई, तेल , वाती, मेणबत्ती…….. दुसरीकडे पुष्पगुच्छ, गिफ़्ट्स, ट्रे, पाणी ही तयारी. सभागृहात आमचे फ़ोटो, पोस्टर, सीडी विक्रीचा स्टॉल, चहा, पाणी. मग आमची तयारी.
हळुहळु लोक यायला सुरवात झाली. सगळ्यात पहिले प्रसन्न शेंबेकर येऊन भेटून गेला. नागपूरला जायच्या आधी तो अगदी आवर्जून भेटून गेला. सुरवात तर छान झाली होती. माझा सगळा मित्रपरिवार, अभिजीत, त्याचे आई-बाबा…. सगळ्यांचा उत्साह अगदी ऊतू जात होता. साऊंड वाले, फ़ोटो, व्हिडिओ शूटिंगवाले आपापली जागा घेऊन सज्ज होते. वैशाली सामंत सगळ्यात पहिले आल्या. मग पाठोपाठ देवकी ताई पंडित, अशोक पत्की आणि स्वप्निल बांदोडकर आणि त्यांच्या पत्नी. फ़ाऊंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओस्वाल अविनाश खर्शीकरांसोबत आले. प्रशांत लळीत आमच्या विनंतीवरुन अशोक पत्कींना आणायला प्रकाश सोबत गेला होता. संदेश, अभिजीत, प्रशांत आपापल्या पत्नीसोबत आले होते. मनिष कुळकर्णी आमच्या अल्बमचा मुख्य वादक, सत्यजीत, सौरभ… ह्यांची उपस्थिती मनाला खूप आनंद देत होती. सगळा गोतावळा बघून अगदी भरुन येत होतं.
हेमंतने सगळ्या उपस्थितांचं स्वागत केलं. अभिजीतने आपल्या गोड आवाजात गणेश वंदना म्हणून कार्यक्रमाला पवित्र सुरवात केली. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला. माझ्या एका प्रचंड मोठ्या, महत्वाकांक्षी स्वप्नाचं हे मूर्त स्वरुप होतं. गप्पागोष्टींच्या स्वरुपात कार्यक्रम पुढे सरकत होता. स्वप्निल चं “आभास चांदण्याचा” हे गाणं एक वेगळीच वातावरण निर्मिती करुन गेलं. त्यापाठोपाठ वैशाली सामंत आणि देवकीताईंचे सूरही आपापलं साम्राज्य गाजवून गेलेत. सीडी प्रकाशनाची वेळ झाली. अशोकजींनी आपल्या शुभहस्ते सीडीचं प्रकाशन केलं. त्यावेळी आईची खूप आठवण आली. ती तिच्या तब्येतीमुळे येऊ शकली नव्हती. आज तिला, बाबांना किती आनंद झाला असता….!!
सीडीचं प्रकाशन झाल्यावर सगळ्या वादक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोकजींनी सीडीबद्दल गौरवोद्गार काढले. माझ्या, अभिजीत च्या कामाची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्यात. वैशाली, देवकी ताई, स्वप्निल …सगळ्यांनीच संपूर्णं प्रोजेक्टची तारीफ़ केली….. अगदी धन्य धन्य वाटलं. कांतिभाईंचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांनीही सगळीच गाणी आवडल्यामुळे ही सीडी आपल्या बॅनरखाली प्रकाशित करायचा विचार केल्याचं सांगितलं.
शेवटी माईक माझ्या हातात आला. आभारप्रदर्शनाचं काम करायला मी उभी राहिले. माईक हातात घेतल्यावर फ़क्त त्या दोन मिनिटात मी सगळा प्रवास मनात पुन्हा एकवार करुन आले. मनात खूप आठवणी दाटल्या होत्या. ह्या प्रकल्पात मला ज्या ज्या लोकांची मदत झाली…… त्या त्या लोकांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रम संपला. एका स्वप्नाच्या परिपूर्णतेपर्यंतच्या प्रवासाची आज सांगता झाली होती.
सगळे लोक भेटायला आले. शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव आम्ही सगळे झेलत होतो……तॄप्त होत होतो. हा प्रवासाचा अंत नक्कीच नव्हता…… आता कुठे प्रवासाला सुरवात झाली होती
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सारे तुझ्यात आहे, चा आपला प्रवास आमच्यासाठीही ओघवत्या, लेखन शैलीमुळे झकास झाला !!! :)
कार्यक्रमातील वर्णनाबरोबर,छायाचित्रे पोष्टरही तितकेच मस्त !!!
आपल्या पुढील प्रवासासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
अवांतर :- गुढ माझ्या मनीचे या आपल्या कवीतेच्या अनुदिनीवरील कोणत्या कविता 'सारे तुझ्यात आहे' साठी संगीतबद्ध केल्या आहेत ? की त्यात दुस-या कविता आहेत ?
21 Apr 2008 - 3:46 pm | जयवी
डॉ.दिलीप..... धन्यवाद !! आपलं लिखाण कोणी आवर्जून वाचतंय ही जाणीव फार सुखद असते :) हो प्रवास पुन्हा एकदा केला तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी :) तुमच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार !!
माझ्या "गूढ माझ्या मनीचे" ह्या अनुदिनीवर "सारे तुझ्यात आहे" मधल्या सगळ्या कविता आहेत. पण कुठल्या ते मी सांगणार नाहीये..... तुम्हीच ओळखा आणि सीडी ऐकल्यावर बघा किती बरोबर आहे ते ;)
(इथे स्मायलीज हव्या होत्या हो :))
21 Apr 2008 - 2:48 pm | स्वाती राजेश
फोटोंबरोबर, लेख सुद्धा छान आहे.
मागील सर्व भाग वाचले , मस्त आहेत.
21 Apr 2008 - 3:48 pm | जयवी
स्वाती.... अगं हे पोस्टर प्रणव धारगळकरने बनवून दिलं आम्हाला :) तू सगळे भाग वाचलेस..... खूप छान वाटलं गं !!