आदल्या दिवशी मी माझे दोन्ही कॅमेरे तिथेच ठेवून गेले होते कारण दुस-या दिवशी पुन्हा सकाळीच यायचं होतं. ती माझी मोठ्ठी चूक होती हे दुस-या दिवशी कळलं. दुस-या दिवशी सगळ्यात पहिले प्रसिद्ध संतूर वादक पं. उल्हास बापट येणार होते. म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो. त्या दिवशी नेमका ट्रॅफिक जॅम. आम्ही साडे नऊच्या ऐवजी ११ ला पोचलो. तोपर्यंत उल्हासजींचं बरचंसं रेकॉर्डींग आटोपलं होतं. आम्हाला जेमतेम १५-२० मिनिट त्यांचं वाजवणं बघायला मिळालं. इतकी चिडचिड झाली ना.....! मधे थोडा वेळ ब्रेक झाला तेव्हा मी माझे कॅमेरे कुठे आहे म्हणून विचारलं तर ते कुणालाच माहीत नव्हतं. माझं तर धाबंच दणाणलं. कालचं संपूर्ण रेकॉर्डींग आणि यापुढे होणारं सगळं....... कसं करणार मी.........मला तर रडूच यायला लागलं. माझी ती अवस्था बघून उल्हासजी म्हणाले..... "अगं, तू नंतर माझ्या घरी ये वाटल्यास.....आपण पुन्हा करुयात रेकॉर्ड". माझं मनच लागेना. इथे सगळं घडत असताना रेकॉर्डींग करणं आणि नंतर बळेबळे केलेलं ह्यात खूपच फ़रक होता. उल्हासजींचे संतूर वाजवताना होणारे आविर्भाव, आमच्या सगळ्यांचं ते साठवून घेणं..... हे नंतर कसं अनुभवणार? मी माझ्यावरच चिडले. शेवटी प्रशांतकडून कळलं की काल तालवाद्यांसोबत माझी कॅमेरा असलेली स्ट्रॉलर सुद्धा अभिजीतच्या माहीमच्या रुमवर गेली होती. म्हणजे तिकडे जाऊन आम्ही ती आणेपर्यंत उल्हासजी निघून जाणार होते....मी अगदीच रडवेली झाले होते. शेवटी उल्हासजी म्हणाले," तुझ्या मोबाईल मधे करुयात रेकॉर्डींग" त्यांनी पुन्हा बैठक घेतली आणि आमच्यासाठी पुन्हा एकदा सूरांची सफ़र घडवली. ते गेल्यावर मात्र मी आणि अभिजीत लग्गेच माहीमला जाऊन कॅमेरे घेऊन आलोत.
आज निरनिराळे वादक येणार होते त्यामुळे खूप उत्सुकता होती. सुरवातीला आले संदीप कुळकर्णी, प्रसिद्ध बासरी वादक. आपल्या सूरांच्या भात्यामधून त्यांची स्वरनिर्मिती ऐकताना, बघताना....... एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं. प्रत्येक गाण्यावर एक वेगळाच रंग चढत गेला.
त्यानंतर आले शुक्लाजी. त्यांची सतार सगळ्यांवर कळस होती. संदीपजी आणि शुक्लाजी ह्यांची जुगलबंदी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती. त्यांनी वाजवलेली हार्प तर अविस्मरणीय ! एकेका वाद्याच्या दालनात एकेक अद्भूत सफ़र घडत होती...... त्याची साक्षीदार होण्याचा मला सन्मान मिळाला होता. हे सगळं माझ्या शब्दांसाठी घडत होतं...... ही जाणीवच फ़ार सुखद होती.
त्यानंतर आले मंचेकर. क्लॅरिनेट वादक. हे वाद्य मी पहिल्यांदाच वाजवताना बघत होते. लावणीच्या सूरात सूर मिसळून त्यांनी अगदी डोलायला लावलं. संदीपजींसोबतचे त्यांचे लावणीतले पीसेस ऐकताना जाम धम्माल आली.
सगळ्यात शेवटी आलेत महेश खानोलकर. हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध व्हायोलीन आणि स्वरलीन वादक आहेत. "हुंदका साधा तुझा" आणि "तुझा हळवा पाऊस" ह्या दोन गाण्यांमधे त्यांनी अक्षरश: बहार आणली. अतिशय संवेदनशील अशा ह्या दोन वाद्यांनी एकाचवेळी डोळ्यात आसू आणि हसू आणले.
वेळेकडे कोणाचंच भान नव्हतं. एकेक सुरांचा जादूगार येत होता आणि जादूची छडी फ़िरवून जात होता.... आम्ही त्या सूरांमधे नखशिखान्त न्हाऊन निघत होतो. अतिशय तॄप्त दिवस संपला होता.
दोन दिवसांमधे जवळजवळ सगळे ट्रॅक्स तयार झाले होते. फ़क्त मनिषचं मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचं काम बाकी होतं. आता वेध लागले होते वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर ह्यांच्या रेकॉर्डींगचे. ह्यावेळचं रेकॉर्डींग बझ-इनच्याच दुस-या स्टुडिओत होतं. इथला रेकॉर्डीस्ट होता सौरभ काजरेकर. अतिशय हसतमुख मुलगा.
स्वप्निल सकाळी साडे नऊला पोचलेत. आम्हाला प्रचंड कुतूहल होतं की स्वप्निल कसे गातात. सगळ्यात पहिले अभिजीतने त्यांना गाणं ऐकवलं. त्यांनी अगदी मनापासून दाद दिली.....शब्दांना आणि सुरावटीला. गाण्याचं रेकॉर्डींग करताना त्यांचे असे काही आविर्भाव होत होते ना......... की मला रेकॉर्ड करु की त्यांना बघू की त्यांना ऐकू.........काही सुचेनाच. सगळे म्हणत होते, अगं जरा दमानं.... जरा बस आता...." पण मला दुसरं काहीच सुचणार नव्हतं. समोर इतकं काही घडत असताना..... कोणाला कसं स्वस्थ बसवेल ? स्वप्निलजींना ऐकणं जेवढं सुखद आहे त्यापेक्षाही जास्त ते गातांना बघणं हा एक जबरदस्त अनुभव आहे. ते समोर गात असताना तुमची दृष्टी त्यांच्यावरुन हलूच शकत नाहीत. आधी "ओला वारा" गाणं झालं. त्याचे सूर मनात साठवून घेतो आहोत तोच दुस-या गाण्याची वेळ आली. हे शिर्षक गीत " सारे तुझ्यात आहे" ह्या गाण्याबद्दल काय लिहू मी.....इतकं अप्रतिम गायलेत ना स्वप्निलजी....... की माझे शब्द अगदी धन्य धन्य झालेत. गाण्यात पूर्णपणे बुडून......स्वत:ला हरवून...... आई गं.... मी तर पारच हरवून गेले होते. हसत खेळत रेकॉर्डींग करुन आम्हाला त्यांच्या सूरांवर रेंगाळत ठेवून ते निघूनही गेलेत.
वैशाली १ वाजता येणार होती. तोपर्यंत आम्ही आमचं जेवण आटोपलं. आपल्या आवाजाची मोहिनी जनमानसावर गाजवणारी वैशाली सामंत खूपच गोड आणि हसरं व्यक्तिमत्व आहे. आल्यापासूनच तिने वातावरण अगदी हलकं-फुलकं केलं होतं. हिची रेकॉर्डींगची पद्धत स्वप्निल पेक्षा वेगळी होती. ही संपूर्ण गाणं शिकून मग एकाच टेकमधे गायली आणि नंतर करेक्शन्स केलेत. पूर्ण गाणं ऐकून त्या गाण्याच्या मूडमधे जाऊन ती ते गात होती. अतिशय तयार आवाज आणि लाघवी व्यक्तिमत्व :)
वैशालीची एकेक गाणी होत होती आणि सोबतच तिच्या अतिशय साध्या स्वभावाचं आम्हाला अगदी जवळून दर्शन होत होतं. रेकॉर्डिंग झाल्यावर तिने इतक्या सहज पणे मला विचारलं की आता आपल्या अल्बम बद्दल तुझा काय प्लॅन आहे पुढचा....? तिचं ते "आपला अल्बम" असा उल्लेख करणं मनाला अगदी स्पर्शून गेलं. ही इतकी मोठी गायिका इतक्या साधेपणाने विचारत होती पुढचे प्लॅन. मग मी तिलाच विचारलं की काय करायला हवंय. तिने खूप चांगलं मार्गदर्शन केलं. पुढे फ़ाऊंटन म्युझिक कंपनीच्या कांतिभाईंशी तिनेच माझी भेट घडवून आणली. वैशालीसारख्या इतक्या मोठ्या पण अतिशय साध्या आणि गोड कलाकाराला भेटून खूप खूप आनंद झाला.
माझा प्रवास अगदी राजमार्गावरुन होत होता. वाटेत भेटणारी सगळीच माणसं अगदी मनापासून मदत करत होती माझ्या पुढच्या प्रवासाला...... !
वैशालीचं रेकॉर्डिंग झाल्यावर प्रशांत म्हणाला की आपण कोरसचंही रेकॉर्डिंग आजच करुयात. दीपा बर्वे आणि भाग्यश्री महाजन ह्या दोघी बहिणी कोरस गायला आल्या. सोबत अभिजीत, प्रशांत आणि मी. आम्ही पाच जणांनी मिळून कोरस गायला. धम्माल आली अगदी.....!! कोरस का होईना.....मला स्टुडिओत गायला मिळालं........ह्याचाच जास्त आनंद झाला.
दिवसभराचा शीण ते सगळं रेकॉर्डिंग ऐकताना कुठल्या कुठे पळाला.
प्रतिक्रिया
17 Apr 2008 - 6:03 pm | मनस्वी
छानच वाटलं तुझा स्वप्नवत प्रवास वाचून.
तुझ्या अल्बमला अनेक शुभेच्छा :)
17 Apr 2008 - 6:04 pm | शितल
हे सर्व ३ ही भाग एकदम मस्तच, एक भाग वाचुन झाल्यावर पुढचा वाचायची ओढ, आणि प्रस्॑ग डोळ्यासमोरच उभे राहतात, तुमच्या आन॑दात सहभागी करून आम्हालाही आन॑द दिलात. तुम्हाला पुढील लेखनासाठी ही शुभेच्छा !
18 Apr 2008 - 10:13 am | सहज
तुमचे अनुभव वाचायला छान वाटले.
पुढील गीतसंचासाठी अनेक शुभेच्छा!!
18 Apr 2008 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला राजमार्गावरील प्रवास वाचला. अगदी सहजपणे आमच्यासमोर सर्व प्रसंग तरळले. आपल्या कवितेच्या प्रवासाचे एका संगीत अल्बम मधे रुपांतर झाले, तो झालेला आनंद आम्हाला शब्दा-शब्दात दिसला. त्याच बरोबर मोठ्या संगीतकारांच्या , गायकांच्या गराड्यात आपली अस्वस्थता सुंदर व्यक्त झालीय. पुढील गीतसंचासाठी आणि अनुभव असेच शब्दबद्ध व्हावेत यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Apr 2008 - 12:39 pm | स्वाती दिनेश
प्रवास खरच स्वप्नवत् आहे,
अभिनंदन आणि पुढील अल्बम करिता शुभकामना!
स्वाती
18 Apr 2008 - 1:23 pm | प्राजु
जयूताई,
प्रवास खरोखरच स्वप्नवत आहे. असेच तुझे आणखीही अल्बम येऊदेत्... हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना. आणि तुला शुभेच्छा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Apr 2008 - 10:14 pm | जयवी
मित्रांनो....... तुमच्या भरभरुन देलेल्या शुभेच्छा पोचल्यात....... मनापासून आभार !!
अजून पुढे बरंच काही आहे...वाचायचा कंटाळा तर येणार नाही ना.... ;)
19 Apr 2008 - 5:48 pm | जयवी
तात्या, देवकाका...... तहे दिलसे शुक्रिया :)
22 Apr 2008 - 9:43 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय वाचनिय अनुभव, हेवा वाटावा असा. छायाचित्रेही मस्त आहेत. अनेक शुभेच्छा.......!
वैशाली सामंत ह्या डेडिकेटेड गायिकेला मस्कतच्या कार्यक्रमाच्या तालिमींमध्ये पाहिले होत. अंगात भयंकर ताप असतानाही त्या तालिमीला आल्या होत्या आणि मन लावून गायिल्या. हॅट्स ऑफ टू हर...!