सारे तुझ्यात आहे..... (५)

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
19 Apr 2008 - 12:16 pm

आता फ़क्त देवकीताईंचं रेकॉर्डींग राहिलं होतं आणि मग मिक्सिंग. देवकीताईंचं रेकॉर्डिंग रविवारी होतं. देवकीताई यायच्या आधी आम्ही माझं काव्यवाचन रेकॉर्ड केलं. लग्नाआधी केलेल्या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमानंतर इतक्या दिवसांनी प्रथमच स्टुडिओत उभी होते. मनासारखं झालं हे ही काम

पप्पा म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे सुद्धा मुद्दाम आले होते रेकॉर्डिंग बघायला. देवकीताईंचं गाणं ऐकायला मिळणं हिच फ़ार मोठी गोष्ट होती. आम्ही सगळेच उत्सुक होतो. अभिजीत तर फ़ारच उत्साहात होता….. त्याने कंपोझ केलेली गाणी आज देवकी पंडित गाणार होत्या.

बारा वाजता त्या आल्यात. त्या आल्यावर वातावरण थोडंसं गंभीर होतं…..पण त्यांनीच तो तणाव दूर केला. त्यांचं गाणं ऐकून अक्षरश: अंगावर काटा येत होता. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. माझ्या आयुष्यातला एक अतिशय मोलाचा क्षण होता हा. इतकी मोठी गानसम्राज्ञी…….. आज आमच्यासमोर साक्षात गात होती…. माझे शब्द !! या क्षणी आयुष्यात अजून काहीही नको असं वाटून गेलं….. देवाने माझी इच्छा इतक्या सुंदर त-हेने पुरी केली होती. मी अवींना प्रचंड मिस करत होते. आजचा हा क्षण मला फ़क्त अवीमुळेच जगायला मिळाला होता.

आम्हाला आपल्या स्वरमोहिनीत गुंतवून देवकीताई जेव्हा गेल्या तेव्हा आम्ही भानावर आलोत.

आता मिक्सिंग. आम्ही ३० जानेवारीला स्टुडिओ घेतला होता मिक्सिंग साठी.

मला त्याच संध्याकाळच्या विमानानं नागपूरला जायचं होतं. माझ्या नणंदेच्या नव-याचा वाढदिवस होता पन्नासाव्वा. मी सकाळी घरातून माझी पेटी घेऊनच निघाले. स्टुडिओत मिक्सिंग झाल्यावर तिकडूनच मी एयरपोर्ट वर जाणार होते. सत्यजीतनं एकेक गाणं करायला घेतलं. प्रत्येक गाण्यासोबत त्या त्या वेळच्या आठवणी जाग्या होत होत्या. आमची सगळी गाणी तयार झाली. थरथरत्या हाताने मी तो अनमोल ठेवा हातात घेतला. जे काही झालं होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. अतिशय तृप्त मनाने मी नागपूरकडे जाणा-या विमानात चढले.

सीडीचं काम तर अगदी मनासारखं झालं होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम होतं पुढे. कंपन्यांना भेटणं. वैशाली सामंतांना पुन्हा फोन केला. त्यांनी कबूल केल्याप्रमाणे फ़ाऊंटन म्युझिकच्या कांतिभाई ओस्वालांशी बोलून अपॉईंटमेंट ठरवली होती. मी दुस-याच दिवशी पुण्याला निघाले.

पुण्याला सकाळी ११ ला पोचले भावाकडे. कांतिभाईंना फ़ोन केला तेव्हा ते म्हणाले संध्याकाळी चार वाजता भेटूयात. मनातून आनंद तर झाला होता पण प्रचंड धडधड होत होती. पहिल्यांदाच असं काही काम करायला निघाले होते. जाताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि धडधडत्या अंत:करणाने फ़ाऊंटनच्या ऑफ़ीसमधे प्रवेश केला. अतिशय हसतमुख असलेल्या कांतिभाईंनी आमचं स्वागत केलं. छातीतली धडधड जरा कमी झाली होती. त्यांना मी माझी डेमो सीडी दिली. त्यांनी ती त्यांच्या ऑफ़ीसच्या म्युझिक सिस्टीमवर वाजवऊन बघितली. त्यांच्या चेहे-यावरुन काहीच कळत नव्हतं. पण सीडी संपल्यावर अगदी लग्गेच ते बोलले…..(माझे प्राण अगदी कंठाशी आलेले) " मला तुमची सीडी आवडली. आपण काढूयात तुमची सीडी" हे त्यांचे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना. सोबत माझा भाऊ प्रसाद होता. तो मला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. मी अगदी जीवाच्या आकांताने चेहेरा शांत ठेवायचा प्रयत्न करत होते. त्यांनी दिलेली ऑफ़र ऐकून "तुम्हाला फ़ोन करते" असं सांगून बाहेर पडले.

बाहेर पडल्यावर लग्गेच अवी आणि अभिजीतला फ़ोन केला…..वैशाली सामंतला फ़ोन केला….ह्यांनी तिकडे विवेकला फ़ोन केला…… सगळ्यांचं म्हणणं हेच होतं….. कसलाच विचार करु नका. कॉन्ट्रॅक्ट साईन करा. त्यादिवशी शुक्रवार होता. भरपूर विचार करुन सोमवारी पेढे घेऊन कांतिभाईच्या ऑफ़ीसमधे गेले. कॉन्ट्रॅक्ट साईन केला…….तोंड आधीच गोड झालं होतं…. अतिशय समाधानाने परत मुंबईला निघाले. एका महिन्याच्या आत आपण अल्बम काढूयात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Apr 2008 - 12:30 pm | विसोबा खेचर

क्या बात है.. जयू!

" मला तुमची सीडी आवडली. आपण काढूयात तुमची सीडी" हे त्यांचे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना.
एका महिन्याच्या आत आपण अल्बम काढूयात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं.

तुम्हा सर्वांचं अभिनंदन..संगीतक्षेत्रात तुझ्या हातून यापुढेही असंच चांगलं काम होऊ दे, हीच शुभेच्छा!

सवडीने केव्हातरी निवांतपणे तुझी सीडी नक्की ऐकली पाहिजे...

तात्या.

सुधीर कांदळकर's picture

20 Apr 2008 - 10:57 am | सुधीर कांदळकर

उत्कृष्ट. जमले. फोटोमुळे तर जिवंतपणा आलाय.

सीडीमधील काव्यवाचनात 'एको' दिलेला आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिति सुरेख होते पण शब्द नीट लक्ष देऊन जास्त एकाग्रतेने ऐकावे लागतात. दाढी आंघोळ, न्याहारी, चहा जेवण इत्यादि नित्यकर्मे करतांना संगीत ऐकणे ही मुंबईच्या लोकांची पद्धत आहे. अशा वेळी श्रोता काव्यवाचनाच्या सुखाला वंचित होतो. पुढील सीडीत काव्यवाचनात काँप्रेशन वाढविले तर बहार येईल. जशी गारवा मध्ये येते.

धावपळीमुळे प्रतिक्रियेस उशीर झाला. क्षमस्व.

पुढील भागांची तसेच सीडीची वाट पाहात आहे. शुभेच्छा.

सुधीर कांदळकर.

जयवी's picture

20 Apr 2008 - 2:02 pm | जयवी

तात्या....सीडी नक्की ऐका...... मला तुमच्या प्रतिक्रियांची उत्सुकता आहे.

सुधीरजी..... मनापासून आभार !! तुमच्या ह्या सूचनेचा नक्की पुढच्या सीडी साठी फायदा होईल. असंच प्रेम असू द्या. पुढचे भाग टाकते आता :)