सारे तुझ्यात आहे.....स्वप्नवत् प्रवास (४)

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
18 Apr 2008 - 10:11 pm

आता थोडं थोडं काम बाकी होतं ट्रॅक्स चं. मनिषचे मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचे पीसेस राहिले होते. देवकीताईंची तारीख २० जानेवारी होती. आम्हाला मधे भरपूर वेळ होता. ह्या दिवसात मी आणि अभिजीत नं बाकीची कामं केलीत. म्हणजे अजून कुठल्या कंपन्या आहेत…..त्यांची नावं, फ़ोन वगैरे ची जमवाजमव केली. माहीमच्या अभिजीत नार्वेकर च्या खोलीत कमालीची निर्मिती होत असते. हे तालवाद्यातले उस्ताद लोक ह्या खोलीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्याच संदेश हाटे नावाच्या मित्राशी ओळख झाली. हा कीबोर्ड तर वाजवतोच पण स्वत: संगीत संयोजनही करतो. ह्या संदेशची आम्हाला प्रचंड मदत झाली. त्याच्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग तर झालाच पण त्याच्यातल्या माणुसकीचा पण फ़ार जवळून परिचय झाला.

एक दिवस मनिषचे मेंडोलीन आणि इलेक्ट्रीक गिटारचे पीसेस झालेत दुस-या दिवशी बेस गिटारचे व्हायचे होते. पण काहीतरी प्रॉब्लेम होत होता. कसलातरी आवाजही रेकॉर्ड होत होता. सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्या दिवशी काही जमलंच नाही. मनिषची डोंबिवली पासून माहीम पर्यंतची चक्कर वाया गेली. दुस-या दिवशी तो दुसरी गिटार घेऊन आला…… तरी तोच प्रॉब्लेम. कुणाला काहीच कळेना काय होतंय. मग बझ-इन मधे रेकॉर्ड करायचं ठरलं…. पण स्टुडिओ रिकामा नव्हता. आता काय करावं…… कारण मनिषला बाहेर कार्यक्रम होता. आजच रेकॉर्डींग व्हायला हवं होतं. तेवढ्यात संदेशचा फ़ोन आला की तो चहा आणि पोहे घेऊन येतोय आमच्यासाठी. आता काय म्हणावं अशा दोस्तांना. इतकी मनापासून काम करत होती ना ही मुलं माझ्यासाठी…..मलाच गहिवरल्यासारखं झालं. त्यावेळी संध्याकाळचे ७ वाजले होते.

प्रशांतला ऑडिओजेनिकच्या अविनाश मोनेंची आठवण झाली. त्यांना फ़ोन केला तर त्यांचा स्टुडिओ रिकामा होता. आम्ही आमचा सगळा डेटा घेऊन तिकडे पोचलो. पण तिथे गेल्यावर कळलं की आमचा डेटा न्युएंडो-३ मधे आहे आणि ते न्युएंडो-२ वापरतात. काही काही फ़ाईल्स त्यांच्याकडे उघडेचनात. आली पंचाईत. मग संदेश पुन्हा धावून आला मदतीला. त्याने खटाटोप करुन फ़ाईल्स उघडल्या. अभिजीत पुन्हा माहीमला गेला……तिकडून पुन्हा डेटा पाठवला…. शेवटी सगळ्या फ़ाईल्स एकदाच्या उघडल्या. रेकॉर्डिंग सुरु झालं तेव्हा चक्क साडे नऊ झाले होते रात्रीचे. अविनाश मोने आपला स्टुडिओ बरोब्बर साडे-दहा ला बंद करतात अशी ख्याती आहे. पण त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी साडे अकरापर्यंत काम केलं. मनिष सुद्धा अगदी न कंटाळता रेकॉर्डींग करत होता. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार मी………म्हणूनच इतकी जीव तोडून ही सगळी मंडळी माझं काम करत होती.

मुक्तकअनुभव