नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे.. आणि आजकाल खाते ते पिकल...बरेच म्हणजे अगदी बरेच... हे प्रकार तोडिसतोड चवदार असतात हे महत्त्वाचे.
पंजाबी लोणच्यात कचालूचे लोणचे म्हणजे अप्रतिम. हा कचालू नक्की काय प्रकार असतो ते मला आजर्यंत समजले नाही. याची चव कैरी सारखी दिसते ही कैरी सारखे.. पण कचालू.. तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि. राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. आंध्रा कडचे लोणचे म्हणजे हिंगाचा उग्र वास नाकात भरलाच पाहिजे. मोठ्या कैरीच्या फोडी, मेथीचे दाणे, मोहरीची पावडर, रंग थोडासा काळपट लाल आणि हिंगाचा दमदार वास... साधारण दक्षिण भारतीय लोणच्याचं असं वर्णन करता येईल. टोमॅटोचं लोणचं , चिंचेचं लोणचं हे ही प्रकार खासच. आंध्राकडे लाल आंबाडीचं लोणचं मिळतं . लैच झ्याक...! लाल आंबाडीची भाजी उन्हात सुकवून, त्यात बरेच मसाले घालून ते लोणचं बनवतात. आईची सख्खी मैत्रिण (बेस्ट फ्रेंन्ड हो..)आंध्राची असल्याने हे लोणचं बर्याचदा खाण्यास मिळायचे. गुजराथी लोणच्यांमध्ये भोकराचं लोणचं. हा भोकरं प्रकार इतका मजेदार असतो, दिसताना ते मोठ्या कच्च्या करवंदाप्रमाणे आणि आतून आंब्यासारखी कडक बाठ असते. चवीला एकदम फन्डू. तसेच कैरीचा छुंदा.. कैर्या खिसून केलेला प्रकार मस्तच. काश्मिरी ड्रायफ्रुट्सचं लोणचं... त्याला येणारा केसराचा सुगंध.. काश्मिरी पुलावसोबत मस्त लागतं. महाराष्ट्रीयन लोणच्यांमध्ये कैरी चे तिखट, गोडाचे, लिंबू- ते ही तिखट आणि गोडाचे, मिरची-लिंबू, कैरी-मिरची,नुसती मिरची, सिझनमध्ये फ्लॉवर, मटार, गाजर असे मिक्स भाज्यांचं लोणचं,कच्च्या करवंदाचं लोणचं..
माझी आजी (आइची आई) इतक्या प्रकारची लोणची घालायची की, काही विचारू नका. कच्ची पपई, शेन्न्या(हे फक्त मी एकदाच खाल्लं), तिला जमत होते तो पर्यंत इतक्या प्रकारची लोणची खाल्ली तिच्या हातची की त्याला मोजदादच नाही. नेहमीची लोणची तर होतंच होती पण, शिवाय (छोट्या छोट्या कैर्यांचं) बाळ कैरीचं लोणचं, तसेच कैर्या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. माझी आईसुद्धा दर सिझन ला नवं लोणचं घालते. आणि मग तिने केलेल्या लोणच्यावर डल्ला मारून मी बाटलीभर लोणचं इकडे पळवून आणते. एकदा मी बेडेकर की केप्रचा मसाला घालून कैरीचं लोणचं केलं. ते मी सोडून कोणालाही आवडलं नाही हा भाग वेगळा.. पण मी एकदा लोणचं करायचा प्रयत्न केला. आजीला सांगताना ती म्हणाली," कसले, ते मेले बाजारचे मसाले, त्याला ना स्वाद ना रंग.. मिक्सरसारखी उपकरणं आहेत हाताशी.. दळा ना घरी लोणच्याचा मसाला." जातीवंत रेडिओ जॉकी असल्याने बोलण्यात हारणे मंजूर नाही.. मी तिला म्हणाले,"घरी आपल्याला हवा तश्या रंगाचा, हव्या तश्या चवीचा मसाला बनवून कोणीही लोणचं सुंदरच बनवेल.. खरं कौशल्य दुसर्यांनी बनवलेला मसाला वापरून उत्तम लोणचं बनवण्यातच आहे. ....... आणि आजी, हा मसालाही घरीच बनवलेला आहे. हां, आता माझ्या घरी नाही पण केप्र / बेडेकरांच्या तरी घरी बनवलाच असेल ना!!" माझा अवखळपणा समजून आजीने "शहाणी आहेस फार!!!" इतकीच टिप्पणी केली..
मला लोणच्याचं वेड इतकं आहे की, कुठे फिरायला म्हणून गेले तरी त्या भागात प्रसिद्ध असलेल्या दुकानात मी पहिल्यांदा नवं लोणचं आहे का कुठलं हेच बघते. सांगलीला कोठल्याशा दुकानातून मी लसणीचं लोणचं आणलं होतं. ते मात्र मला विशेष आवडलं नव्हतं. दिल्लीला गेले होते तेव्हा, रूपक या जगप्रसिद्ध लोणच्याच्या दुकानातून मी ते कचालूचं आणि त्या अननसासारख्या दिसणार्या प्रकारचं लोणचं मी आणलं होतं. माझ्या या वेडापायी इथे अमेरिकेत आल्यावरही दुकानातल्या आइल्समधून फिरताना पिकल्स असे लिहिलेल्या बाटलीत व्हिनेगर मध्ये उभ्या ठेवलेल्या छोट्या काकड्या, वेगेवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, ऍलॅपिनोज.. बघून हे नक्की कसं लागतं हे पाहण्यासाठी मी तेही घेऊन आले. आणि पोळी बरोबर खाताना पदरी जी निराशा पडली ती पचवणे कितीतरी दिवस शक्य नाही झाले. मग समजले की ही पिकल्स सँडविच मध्ये घालतात.. पण आधी पोळीसोबत खाताना, या अमेरिकनांची किव आली. या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? भारतीय पिकल खाल्लं तर यांची वाटच लागेल. नवर्याच्या ऑफिसमध्ये एकदा तो आम्ही भारतातून आणलेली चितळेंची बाकरवडी घेऊन गेला. त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित).
लोणचं घालणे हा प्रकार तसा जिकरीचाच. मला स्वतःला ती मसाल्यांची भाजा-भाजी, परता-परती.... मग दळणे... चाळणे.. हे असले प्रकार अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे केप्र्/बेडेकरांनी कष्टाने केलेली लोणचीच आणलेली बरी. त्यात आता मदर्स रेसिपी आली... मग काय (कोणाच्या तरी)आईच्या हातची लोणची. लोणचं घालणे "त्या" अनुभवावरून मी बंद केले ते बंदच.. लोणचं घालणे हा वाक्प्रचार म्हणूनच जास्ती वापरला जातो. लहान असताना एकदा मी आजोबांच्या बरोबर नदिवर गेले होते तेव्हा तिथुन बरेच पेबल्स (सागर गोटे की गारगोटे.. तेच ते) घेऊन आले होते. तेव्हा आजी म्हणाली होती, "इतकी कशाला दगडं आणलीस ही.. आत याचं काय मी लोणचं घालू?" तेव्हा पहिल्यांदा मी हा वाक्प्रचार ऐकला, आणि तो जाम आवडून गेला अगदी लोणच्या इतकाचं. त्यानंतर.. मी स्वतः लोणचं घालत नसले तरी याचा प्रयोग मात्र बोलण्यात सर्रास करू लागले. आणि कॉलेजमध्ये तरी..कोणत्याही विषयावर चर्चा करणे म्हणजे लोणचं घालणे असा प्रचलित झाला. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, " सध्या विद्या आणि कुसुम कॉलेजच्या एलेक्शनचं लोणचं घालत बसल्या आहेत" ...
आता लोणचं या विषयावर लोणचं घालतानाही मी आज संध्याकाळी पटेल फुड्स मधून कोणतं नवं लोणचं आणावं याचं लोणचं माझ्या डोक्यात घालते आहे...:))))
का हो डोक्याचं लोणचं नाही ना घातलं मी तुमच्या????
- प्राजु
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 12:30 am | llपुण्याचे पेशवेll
भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे.
त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही.
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 12:32 am | प्राजु
म्हणा हो.. लोणचं हे लोणचंच...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2008 - 12:49 am | विसोबा खेचर
राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे.
येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात!
त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित).
हा हा हा! :)
वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :)
माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं!
माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :)
आपला,
(मिरची-लोणच्यातला) तात्या.
8 Apr 2008 - 12:51 am | केशवसुमार
या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते..
मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल..
उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली..
(कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार
8 Apr 2008 - 1:17 am | चतुरंग
कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच.
राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;)
चतुरंग
8 Apr 2008 - 8:46 am | सहज
लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!!
चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!
8 Apr 2008 - 11:05 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
8 Apr 2008 - 9:42 am | मदनबाण
प्राजुजी एकदम मस्त लेख आहे.....
कैर्या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा.
हे मात्र अगदी खरे,,,,,
या हंगामाच आईचा हातच कैर्या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय.....
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!!
(लोणचे प्रेमी)
मदनबाण
8 Apr 2008 - 10:11 am | विसोबा खेचर
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!!
अगदी सहमत आहे! :)
8 Apr 2008 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll
फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :)
(समाधिस्थ)
डॅनी.....
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 10:37 am | मदनबाण
ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :)
खरय.....
(मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी)
मदनबाण
8 Apr 2008 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll
मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे.
आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त....
प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात....
आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना...
अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही.
(पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन)
डॅनी......
पुण्याचे पेशवे
8 Apr 2008 - 10:53 am | स्वाती दिनेश
प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते.
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-)
स्वाती
8 Apr 2008 - 11:00 am | रामदास
काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.
8 Apr 2008 - 11:03 am | धमाल मुलगा
फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-)
मस्त. बर्याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते.
दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!
8 Apr 2008 - 12:08 pm | नंदन
छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.)
बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास.
बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्हेतर्हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील.
[एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Apr 2008 - 12:46 pm | स्वाती दिनेश
त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.)
नंदन हे मस्तच ...आवडले.
स्वाती
8 Apr 2008 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर
लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही.
कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.
8 Apr 2008 - 1:05 pm | ॐकार
टकू खाल्ले आहे काय? कैर्या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल!
आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.
8 Apr 2008 - 8:34 pm | चतुरंग
मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;)
चतुरंग
8 Apr 2008 - 2:24 pm | स्वाती राजेश
प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या...
माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात.
पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे....
तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))
8 Apr 2008 - 5:40 pm | प्रशांतकवळे
जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले...
प्रशांत
8 Apr 2008 - 6:58 pm | प्राजु
लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,,
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2008 - 7:05 pm | वरदा
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-)
अगदी हेच म्हणते...
8 Apr 2008 - 7:14 pm | विजुभाऊ
हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात.
आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त
आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात.
हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.
8 Apr 2008 - 8:25 pm | पुष्कर
लेख खूपच आवडला. सुंदर आहे.
9 Apr 2008 - 12:39 am | ब्रिटिश टिंग्या
लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ..........
तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार.....
हॅट्....निषेध! निषेध! निषेध!
- टिंग्या :(
9 Apr 2008 - 12:41 am | प्राजु
उगी उगी....
तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं...
मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2008 - 12:51 am | ब्रिटिश टिंग्या
मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :))
चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :(
असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ....
- (लोणचंप्रेमी) टिंग्या :)
9 Apr 2008 - 1:01 am | चतुरंग
चतुरंग
9 Apr 2008 - 1:28 am | विसोबा खेचर
इतकी लाळ बघून 'छोटी टिंगी' नाव अगदी सार्थ केलंस असं वाटतंयः))
हा हा हा! :)
तात्या.
11 Apr 2008 - 2:54 am | राजेन्द्र
"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि."
कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)
11 Apr 2008 - 5:18 pm | मनापासुन
आहाहाहाहा मस्तच्....इतके चाखतमाखत वाचायल बर्याच दिवसानी मिळाले
20 Jun 2014 - 2:28 am | सुहास..
व्वा!!
20 Jun 2014 - 7:31 pm | एस
लोणच्यासारखाच चविष्ट.
21 Jun 2014 - 11:59 am | माधुरी विनायक
चविष्ट लेख. तोंडाला पाणी सुटलं. जेवणात भाजीइतकं लोणचं मिटक्या मारत खाणाऱ्या एका चुलत भावाची आठवण झाली.