ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
6 Apr 2008 - 9:45 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..८
आवाजी बेटं आणि फुकुरा पोर्ट

कागीयामासान,हा आमचा जपानी मित्र सुमा गावात राहतो.तो आमच्या अनेक दिवस मागे लागला होता आवाजी आयलंडला जाऊ या. एका अशाच निवांत शनिवारी आवाजी बेटांना भेट देण्याचे ठरले.तेथे जाताना एका 'सस्पेंडेड ब्रिज'वरून जावे लागते.कोबे आणि आवाजी बेटांना जोडणारा हा 'आकाशी कायकोयो ब्रिज'. जगातील सर्वात लांब,उंच आणि महागड्या अशा साधारण ४ किमी लांबीच्या ह्या पुलाचे बांधकाम वीस एक वर्षे चालले होते.१९९८ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला.याचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्याला खालून आधार न देता वरून मजबूत वायर्सनी आधार दिला आहे.खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे.
हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा.

जपानमध्ये फिरायला जाताना आमची 'डबाबाटली' कायम सोबत असायचीच.त्यातून कागीयामासानची भारतीय जेवणाची फर्माइश होती.त्यामुळे इथे थांबून पुरीभाजीला न्याय द्यायला हवाच होता.पुळणीवरून उठावसं वाटत नव्हतं पण आवाजी बेटं पहाण्याची उत्सुकता तर होतीच. तिथे पोहोचल्यावर रेलिंगच्या दिशेने सारे धावलो.लांबवर पसरलेला पॅसिफिक पाहत होतो.कागियामाने तेथून सुमाबीचही दाखवला आणि विंग स्टेडियम सुध्दा!फूटबॉलज्वराने तेव्हा सार्‍या जपानला वेढलं होतं, कारणच तसं होतं.त्यावेळच्या फूटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद जपान-कोरियाकडे होते ना!(त्याचा एक फायदा म्हणजे इंग्रजी पाट्या दिसू लागल्या होत्या!)
ह्या आवाजी बेटावर लोकं शनिवार,रविवारी डबाबाटली घेऊन येतात,चटया पसरून हिरवळीवर पहुडतात,फोटो काढण्यात रमतात. लहानथोर,तरुणांचे ताटवे,आजीआजोबांचे थवे सारेच येतात;पण इतरांना त्रास होईल असे कोणीच वागत नाही.तरुणींची छेड कोणी काढत नाही,सार्वजनिक संपत्तीचा अपव्यय तर कोणी नाहीच करत पण डबे खाऊन कचरा करून ठेवला आहे.शीतपेयांच्या बाटल्या,चॉकलेटांचे कागद असा कचराही कोणी करत नाहीत.उलट आवर्जून आपण बसलेली जागा आपण तशीच स्वच्छ ठेवून जातो आहोत ना,याची काळजी घेतात.(स्वयंशिस्तीच्या बाबतीत जपान्यांसारखे कोणीच नाही.)
आवाजी बेटांवर फुलांचा एक सुंदर,रंगीत ताटवा मुद्दाम तयार केला आहे.तिथे जाण्याचा कागीयामाचा अगदी आग्रह चालला होता.तसे फुलांचे ताटवे इथे जागोजागी आहेत तर हा काय वेगळा आहे? दिसतो आहे की इथून छान..अशा आमच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याने आम्हाला जवळपास ओढतच तेथे नेले. तो ताटवा म्हणजे चक्क घड्याळ आहे,चालू स्थितीत असलेले!
हे जपानी कुठे,कशी टेक्नॉलॉजी वापरतील.. नेम नाही.त्यांच्या रसिकतेला दाद देत आम्ही तेथून निघालो फुकुरा पोर्टकडे.'नरुटो वर्लपूल्स',समुद्राच्या भरती ओहोटीमुळे दिवसात दोनदा बदलणारे पाण्याचे प्रवाह हे फुकुरा पोर्टला जाण्याचे मुख्य आकर्षण! भरतीमुळे पॅसिफिक मधले पाणी प्रचंड प्रमाणात नरुटो कालव्यातून १३ ते १५ किमी/तास वेगाने इनलँड सी मध्ये घुसते आणि वसंतातील भरतीत तर हा वेग २० किमी/तास इथपर्यंत वाढतो.इनलॅंड सी आणि पॅसिफिक महासागराला जोडणार्‍या ह्या १.६ किमी लांबीच्या अधांतरी पूलाला नरुटो कालव्याचेच नाव दिले आहे.

वळणावळणांचा रस्ता,पूर्णपणे समुद्राला लगटून आम्ही जात होतो.एका बाजूला सतत पॅसिफिकची गाज तर दुसर्‍या बाजूला कुठे फुलांचे ताटवे तर भाताची इवली रोपं,कोबीचे गड्डे..थोड्या वेळाने मात्र फुलं,भाताची रोपं यातलं काहीच दिसेना ,फक्त कांदेच कांदे दिसायला लागले.मुसुंब्याएवढे किवा त्याहूनही मोठ्ठाले कांदे आणि त्यांच्या जम्बो पाती!सगळ्या वाफ्यांतून पातींची पाती लवलवत होती.कुठे पोतीच्या पोती रचून ठेवलेली, कुठे टेंपोत ती पोती भरणं चाललं होतं,ह्याच ठि़काणाहून पूर्ण जपानभर कांदा पुरवला जातो.
फुकुरा पोर्टहून भरतीच्या वेळानुसार फेरीबोटी सुटतात. त्या बोटीने पॅसिफिक सागरात अशा ठिकाणी नेतात जिथे पाण्याचे प्रवाह बदलतात.सगळ्यात वरच्या डेकवर जाऊन आम्ही राहिलो.भन्नाट वारा सुटला होता.समुद्राचे तुषार उडवत आमची बोट निघाली. प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. त्या समुद्राच्या अजून पोटात शिरलो.आता मात्र पाणीच पाणी चोहीकडे!

जमिनीशी नातं सांगणारा नरुटोपूल फक्त अधांतरी तरंगत होता,बाकी सगळीकडे फक्त पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं अथांग,विशाल!जहाजाच्या कंट्रोल केबिनमधून जपानीत सूचना दिल्या जाऊ लागल्या बरोबर कागीयामाने आम्हाला कठड्याला धरुन उभं रहा अथवा तिथल्या बाकांवर बसा अशी भाषांतरित सूचना केली.

प्रवाह जेथे बदलतात तेथे आम्ही पोहोचत होतो.वार्‍यात हेलकावणारे आमचे जहाज आपला वेग जवळजवळ शून्य करत थांबले.इथे समुद्र अजिबात शांत नसतो.भन्नाट वारा आणि उसळणार्‍या,प्रवाह बदलत जाणार्‍या त्या लाटा आणि त्यांनी तयार होणारे मोठे भोवरे..निसर्गाचं एक वेगळंच रुप भान हरपून पाहताना एकीकडे आपला तोलही सांभाळावा लागत होताच.त्याच तंद्रीत असताना आमच्या जहाजाने परतीची वाट कधी पकडली ते कळलेच नाही.
आम्हाला सोडायला तो घरापर्यंत आल्यावर आपल्या पध्दतीप्रमाणे ,"चल की वर,अर्धा कप चहा तरी घेऊन जा.." असे म्हटले.खरं तर जपानी आयत्या वेळचं आमंत्रण स्वीकारायला उत्सुक नसतात.पण तो झाला बाबा लगेच तयार.आत येऊन चहापाणी होईपर्यंत लता,किशोरची गाणी ऐकत त्या जादूभर्‍या आवाजात अडकून पडला. चहा पितापिता एकदम कॅमेरा सरसावला त्याने आणि कचोर्‍या,बाकरवड्या आणि चिवड्याचेच फोटो काढत बसला.
तो आणि त्याची गाडी आम्हाला केव्हाही,कुठेही नेण्यासाठी तयार आहे असे निघताना सांगून मैत्रीची गाठ त्याने आणखी पक्की केली.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

गोट्या's picture

6 Apr 2008 - 10:43 pm | गोट्या (not verified)

वा !
तर जपानला एक भेट द्यावी लागेलच असे वाटत आहे तुमचे प्रवास वर्णन पाहून / वाचून !!!!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2008 - 8:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतर भागांप्रमाणे हाही भाग सुंदर झाला आहे. जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले.
शिर्षकावरुन मला त्या बेटावर काही गुढ आवाज येतो की काय असे वाटले होते असो,
चित्रेही तितकीच सुंदर, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा.

वा! क्या बात है!

संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर ..

सुंदर वर्णन...!

फोटूही नेहमीप्रमाणेच क्लास!

तात्या.

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 8:34 am | मदनबाण

सुंदर लेखन आणि छान चित्रे,वाचायला मजा आली.
कान्साई एअरपोर्ट बद्दल बरेच ऐकले आहे त्या बद्दल जर काही माहिती देऊ शकलात तर फार आनंद वाटेल.

जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले.
खरयं.....

(सुमो कुस्ती प्रेमी)
मदनबाण

प्रमोद देव's picture

7 Apr 2008 - 8:36 am | प्रमोद देव

कागीयामासान सारख्या वाटाड्या बरोबर सहल कशी मस्त झालेय. त्यातून सहलीचे आणि परिसराचे रोचक वर्णन करणारे स्वातीचे सिद्धहस्त लेखन, त्याच जोडीला दिनेशने काढलेली उत्कृष्ट छायाचित्रे असा मस्त योग ह्यावेळीही जूळून आलाय. त्यामुळे हा लेखही वाचनीय आणि प्रेक्षणीय झालाय.

सहज's picture

7 Apr 2008 - 9:19 am | सहज

अतिशय सुंदर वर्णन, जोडीला ती पुरक छायाचित्रे!!

'कायकोयो ब्रिज' म्हणजे खरच "काय्-आहे-हो पुल'!!!! म्हणावेसे वाटते.

लेख अत्यंत आवडला...

बेसनलाडू's picture

7 Apr 2008 - 11:02 am | बेसनलाडू

सुरेख वर्णन नि चित्रे
(वाचक)बेसनलाडू

सुधीर कांदळकर's picture

7 Apr 2008 - 8:45 pm | सुधीर कांदळकर

प्रकाशचित्रेदेखील.

स्वयंशिस्त उल्लेखनीय. मुम्बईत देखील हिरवळीचे घड्याळ आहे हो. हँगिंग गार्डनच्या समोरच्या फूटपाथवर पिकनिक नूक आहे तेथे. याल तेव्हा जरूर पाहा.

खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे.

हे गद्य आहे की काव्य? झकास.

सुधीर कांदळकर.

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2008 - 7:12 pm | स्वाती दिनेश

मुंबई मध्येही असे घड्याळ आहे ही नवीच माहिती मला मिळाली,पुढच्या ट्रीपमध्ये ते पाहण्याचा जरुर बेत करेन,
धन्यवाद,स्वाती

प्राजु's picture

8 Apr 2008 - 8:40 am | प्राजु

प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर ..

स्वाती, किती सुंदर वर्णन केलं आहेस गं. मी समुद्रासाठी वेडी आहे. हे तुझं लेखन मला वारंवार जाणवून देत आहे की, जपानला आयुष्यात एकदा तरी नक्कीच जायला हवं.. किमान या प्रशांत सागरासाठी तरी.... :))
सुंदर चित्रे... वर्णन नेहमीप्रमाणेच शब्दांच्या पलिकडचे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

8 Apr 2008 - 12:42 pm | नंदन

अर्थात धन्यवाद :). सुरेख चित्रं आणि ओघवत्या वर्णनातून आम्हांलाही जपानची सफर घडवून आणल्याबद्दल. फुलांच्या अंथरलेल्या ताटव्याचा फोटो तर अप्रतिम!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती राजेश's picture

8 Apr 2008 - 12:58 pm | स्वाती राजेश

धन्यवाद,
सांगितल्यावर लवकरच लेख वाचायला दिल्याबद्दल...
नेहमीप्रमाणे छान लेखनशैली आहे. फोटो पण छान आहेत.
तुझ्या वर्णनावरून तो पर्ल पुल(तुझ्या कल्पनेप्रमाणे) पाहायची खूप इच्छा होत आहे. जर योग आला तर नक्की पाहीन्..किती छान दिसत असेल ना?
समुद्राजवळून रोड ची तर मजाच और असते.
तुझ्या या जपान च्या प्रवास वर्णनामुळे वाटते कि एकदा तरी तिथे जाऊन यावे...

चतुरंग's picture

8 Apr 2008 - 10:34 pm | चतुरंग

खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे.
हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा.

वा वा, बंदिस्त विचारांवरचा 'रुफटॉप' सरकवून वाचतच गेलो!

दुसर्‍या चित्रजोडीमधली भातखाचरे आणि फुलांच्या ताटव्यांमागचा निळाशार 'प्रशांत' महासागर बघून डोळे निवले!
जपानला भेट द्यायलाच हवी!

चतुरंग

ऋषिकेश's picture

12 Apr 2008 - 12:04 pm | ऋषिकेश

प्रथम उशीरा प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व! सध्या मुंबईत आल्यापासून जालावर येणं कमी झालंय :(

बाकी सगळीकडे फक्त पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं अथांग,विशाल!

वा! हे वाक्य बॉ फारच आवड्लं . वर्णन नेहेमीप्रमाणे छान. कागीयामासानची मैत्रीही भावली :)
मला चित्रांमधे शेवटचं चित्र फारच आवडलं... विशाल लाटांना धैर्यानं सामोरं जाणारं चिमुकल जहाज मनात घर करून गेलं...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2008 - 7:13 pm | स्वाती दिनेश

राजे,डॉ.साहेब,तात्या,मदनबाण,प्रमोदकाका,सहजराव,बेला,सुधीरजी,प्राजु,नंदन,स्वाती,चतुरंग,ऋषिकेश
सर्वांनी आवाजी बेटं आणि फुकुरा बंदर आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
स्वाती