माझे संत्रापुराण

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
4 Mar 2010 - 7:31 pm

परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते.

काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते! ना त्या संत्र्याला तो चिरपरिचित सुवास, ना साल काढताना अंगावर - डोळ्यांत हमखास उडणारा व चुरचुरणारा रस....आणि एरवी पटकन सोलून होणारे संत्रे सालीला अंगाभोवती घट्टमुट्ट लपेटून बसलेले. एका झटक्यात साहेबजादे सोलले जाण्याचे नावच घेत नव्हते!

कशीबशी दात ओठ खाऊन ती संत्री सोलण्यात मी यशस्वी झाले मात्र, पण खरी कसोटी तर आता पुढेच होती. एरवी संत्रे सोलले की त्याच्या पाकळ्या आपोआप विलग होत. इथेही त्यांनी असहकार धोरण स्वीकारलेले. पुन्हा एकदा शक्ती देवतेला पाचारण करून मी त्या पाकळ्यांची फारकत केली.
एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....
कोणीतरी माझी घोर म्हणजे घोर चेष्टा केली होती. मी जे संत्रे म्हणून खात होते ते संत्रे नव्हतेच मुळी! त्याला ना धड संत्र्याची चव होती, ना मोसंब्याची! ना ते माधुर्य, तजेला, आंबटगोड स्वाद, ना तोंडात रेंगाळणारा ताजेपणा.... हे कसले तरी संत्र्याच्या नावाखाली खपवलेले बेचव फळ होते.
म्हणायला बिया कमी म्हणजे अगदीच क्षुल्लक होत्या आणि आंबटपणा नावालाही नव्हता. प्रत्येक फळाची खास अशी चव ठरलेली असते. संत्रे म्हटले की ते आंबटगोड हे ठरलेले! पण अहो, त्याचा आंबटपणा अपेक्षितच असतो हो! ही तर संत्रे नावाखाली केलेली शुद्ध बेचव फसवणूक होती.

आज सकाळी बाजारात मला नेहमीचा फळ विक्रेता दिसल्यावर मी मुद्दाम मोर्चा तिकडेच वळवला.
"ही स्टिकर्स वाली संत्री म्हणजे काय भानगड आहे रे भाऊ?" माझा सवाल.
समोर हारीने रंग, रूपाने गोमटी दिसणारी स्टिकर्सवाली संत्री मांडून ठेवली होती.
"घ्या ना, ताई, एकदम मस्त, नवा माल आहे. जरा महाग आहे, पण चवीची ग्यारंटी! एकपण संत्रं आंबट निघालं तर पैसे परत!"
अर्थात कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी त्याच्या भुरळथापांना बळी पडणारी नव्हते.
"काय रे, खूप खपत असेल नै हा माल?" माझा निरागस प्रश्न.
"कसचं काय ताई, तुमच्यासारखी लोकं घेऊन जात्याती ह्ये असलं फळ. बाकी लोक आपला देशी, गावरान मालच पसंत करतात. परवडत न्हाय ना त्यास्नी! "
" आमच्यासारखी??"
"म्हन्जे गाड्यांमधून फिरनारी हो ताई! तेच लोक अशी स्टिकरवाली फळं नेतात. गरीबांना परवडत न्हाय असला माल. त्यांना देशी फळपण बघा, गोड लागतंय!"
"बरं बरं, मला त्या देशी संत्र्यातली अर्धा डझन चांगली संत्री दे निवडून लवकर! बघ, आंबट निघता कामा नयेत," माझी दमदाटी.
एव्हाना फळ विक्रेता माझ्याकडे "ह्या बाईला काय येड बिड लागलंय की काय" अशा मुद्रेने पाहत असलेला. एवढा वेळ त्याने स्टिकरयुक्त फळांची केलेली भलावण फुकट जाताना बघून त्यालाही कष्ट होणारच की हो! पण 'ग्राहक देवो भव' उक्तीला जागून त्याने मुंडी हालवत, फारसे सवाल न करता मी निवडून दिलेली संत्री एका कागदी पिशवीत कोंबली आणि पैसे खिशात घालून तो इतर ग्राहकांकडे लक्ष देऊ लागला.

मीही हातातल्या पिशव्या सांभाळत, समाधानी मनाने घराचा मार्ग धरला.
कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!

अरुंधती

--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

वावरजीवनमानप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

4 Mar 2010 - 7:36 pm | शुचि

खरच "सगळं चकाकतं ते सोनं नसतं" या उक्तीला खरी करणारी काही संत्री मीही खाल्ली आहेत. दिसयला गोमटी आणि असायला बेचव :W

लेख मस्त जमलाय.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विसोबा खेचर's picture

4 Mar 2010 - 7:36 pm | विसोबा खेचर

कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!

वा!

छान लेख..:)

अजूनही लिहा..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2010 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!

क्या बात है ...! लेख आवडला.
और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

4 Mar 2010 - 7:55 pm | रेवती

झकास वर्णन! अगदी माझ्या हातात संत्रं असल्यासारखा भास झाला.
संत्री खाऊन झाल्यावर केला जाणारा हमखास उद्योग म्हणजे एकमेकांच्या डोळ्यात त्याचा रस उडवणे आणि बाकिच्यांनी तो चुकवण्यासाठी पळत सुटणे. आई आणि आज्जी त्या साली उन्हात वाळवून शिकेकाई दळायला देताना त्यात घालत असत. मग रविवारी ती शिकेकाई उकळून त्याने केस धुवायला लावत. त्यावेळेस यायचा तो संत्राचा सुपरिचीत फ्रेश करणारा सुगंध!

रेवती

डावखुरा's picture

4 Mar 2010 - 8:04 pm | डावखुरा

सन्त्र हे फळच मुळात नागपुरचे.......
मागाच्या आठवड्यात आमच्या ओळखिच्यानी नागपुरहुन सन्त्रे आणले होते........
गावराणी ,अस्सल, रसाळ....आहाहा$$$

"राजे!"

मेघवेडा's picture

4 Mar 2010 - 8:06 pm | मेघवेडा

उत्तम लिखाण.. आपल्या देशी फळांची चव न्यारीच हो.. मीपण कित्येकदा फसलोय .. मस्त लालचुटूक दिसणारी बारकी बारकी 'स्पेशल ब्रिटिश अ‍ॅपल्स' पाहून अगदी "लालच लपलप" झालं.. लगेच घेतली २ किलो विकत.. सगळीच्या सगळी आंबटढाण निघाली! तेव्हापासून कानाला खडा!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मदनबाण's picture

4 Mar 2010 - 10:15 pm | मदनबाण

छान लेख...

(संत्राबर्फी प्रेमी)
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Mar 2010 - 11:17 pm | अक्षय पुर्णपात्रे

मस्त लेख

सुधीर१३७'s picture

5 Mar 2010 - 12:12 am | सुधीर१३७

अप्रतिम .....

राजेश घासकडवी's picture

5 Mar 2010 - 4:43 am | राजेश घासकडवी

तुम्ही अमेरिकेत मिळणारे मेक्सिकन आंबे खाऊन पाहायला हवेत. कैरी थोडी मऊ करून तिला माझा, फ्रूटी वगैरेचं इंजेक्शन दिलं तर कसं लागेल, तसं लागतं. मी ते एक वेगळंच फळ म्हणून खातो - कच्चट असताना लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या थोड्या गोडसर कैऱ्यांच्या चकत्यांची आठवण येते. पण त्यांना आंबा म्हणण्याचं धाडस करत नाही.

शुचि's picture

5 Mar 2010 - 7:06 am | शुचि

संत्र्यावरून "लिंबवरचं" हे सुंदर गाणं आठवलं-
http://www.youtube.com/watch?v=FAD6hQ3XllM

व्हेन आय वॉज जस्ट अ लॅड ऑफ टेन माय फादर सेड टू मी
कम हिअर अँड टेक अ लेसन फ्रॉम द लव्हली लेमन ट्री
डोंट पुट युर फेथ इन लव्ह माय बॉय माय फादर सेड टू मी
आय फिअर दॅट यु विल फाईंड दॅट लव्ह इ़ज लाइक द लव्हली लेमन ट्री

लेमन ट्री इज व्हेरी प्रिटी अँड लेमन फ्लॉवेर इस स्वीट
बट द फ्रुट ऑफ द पुअर लेमन इज इम्पॉसीबल टू ईट
लेमन ट्री इज व्हेरी प्रिटी अँड लेमन फ्लॉवेर इस स्वीट
बट द फ्रुट ऑफ द पुअर लेमन इज इम्पॉसीबल टू ईट

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वैशाली हसमनीस's picture

5 Mar 2010 - 7:30 am | वैशाली हसमनीस

संत्रापुराण आवडले.इथे मलेशियात फेब्रुवारीत चायनीज न्यु इयरच्या वेळी "हनी मेंडेरीन" नाव असलेली सुंदर्,रसाळ्,गोड,अप्रतिम चवीची संत्री मिळतात्.चायनीज लोक ती सोने समजून एकमेकांना भेट देतात्.तो सण संपल्यावर मात्र ती अचानक गायब होतात मग मात्र आपण वर्णन केल्याप्रमाणे बेचव्,नीरस.

मंगेशपावसकर's picture

5 Mar 2010 - 9:10 am | मंगेशपावसकर

मलाही संत्री खूप आवडतात- आंबटशौकीन

अरुंधती's picture

5 Mar 2010 - 10:22 am | अरुंधती

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. लेख आवडल्याचं आवर्जून कळवलंत त्याबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

समंजस's picture

5 Mar 2010 - 10:26 am | समंजस

मस्त लिहीलयं संत्रा पुराण!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Mar 2010 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख मस्तच!

पण ही संत्री नाहीत. हे राजस्थानातनं येणारं फळ आहे, दिसायला संत्र्यासारखंच पण तुम्ही म्हणता तसं, एकदम बेक्कार! नाव मात्र आता आठवत नाही आहे, दोन अक्षरी, म वरून सुरू होणारा शब्द आहे. आमच्या राज्याच्या सीमांच्या बाहेर गेले की लगेच नाव कळेल, तेव्हा कळवते.

अदिती

अस्मी's picture

5 Mar 2010 - 2:25 pm | अस्मी

एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....

ह्म्म्म्म माझं पण अगदी असंच झाल होत एकदा....

लेख खूपच आवडला..एकदम मस्त लिहिलाय.

- मधुमती

अन्या दातार's picture

5 Mar 2010 - 3:33 pm | अन्या दातार

संत्रा पुराण म्हणल्यावर मला एकदम गाळीव मालाबद्दल काही लिहिलय काय असेच वाटले. 8} माफी असावी.
बाकी लेख उत्तमच..... =D>

शैलेन्द्र's picture

5 Mar 2010 - 7:41 pm | शैलेन्द्र

हो ना... संत्रीला "संत्रा" म्हटलं की आम्हाला गाळीव मालच आठवतो. पहील्या एक दोन प्रतिसादातच धागा योग्य मार्गावर न्यायचा विचार होता पण लेखीकेच्या भावनांची सच्चाई बघुन तो सोडुन दीला...

अरुंधती's picture

5 Mar 2010 - 7:03 pm | अरुंधती

प्रतिसादाबद्दल व कौतुकाबद्दल सर्वांचे आभार! :-)

अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

अश्विनीका's picture

6 Mar 2010 - 3:17 am | अश्विनीका

छान लेख.
हल्ली सर्वत्रच हायब्रीड फळे मिळू लागली आहेत.
- अश्विनी

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Mar 2010 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते

अरुंधती... तुम्ही छान लिहिता. नियमितपणे लिहित रहा.

बिपिन कार्यकर्ते