स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.
सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:
तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी||
माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||
आभाळाने सावरकरांना हिणवले, "तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास."
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||
पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||
अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||
मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||
पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||
यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच.
--------------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
कवी मनमोहन नातू यांनी ही कविता "सुनित" (SONET) या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत आवडत्या काव्यप्रकारात बांधली आहे. सुनित हे १४ ओळींचे काव्य असते. कवितेच्या पहिल्या भागात एक कल्पना विस्तार असतो व पुढच्या भागात त्या कल्पनेला एकदम कलाटणी देवून शेवट केलेला असतो. याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात ही मांडणी ८ + ६ अशी असते तर दुसर्या प्रकारात १२ + २. सदर काव्य १२ + २ या प्रकारातील आहे.
वाचकांच्या सोईसाठी संपूर्ण कविता सलग परत देत आहे.
मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||
-- लोककवी मनमोहन नातू.
--------------------------------------------------------------------------------
टीपः ही कविता आम्हाला इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये अभ्यासाला होती. कविता मला खूपच आवडली म्हणून मी ती लिहून ठेवली. पण त्यात कडवे क्रमांक ६ नव्हते. अनेक वर्षांनंतर एका वर्तमानपत्रात ठाणे येथील श्री. भागवत यांच्यावर एक लेख आला होता (त्या लेखात त्यांचा दूरध्वनी क्रमांकही होता. पण आज माझ्याकडे नाही. मला मिळाला की लगेच मि. पा. वर देईन.). त्यांनी अंदमानातील सावरकरांच्या कोठडीत ही कविता कायमस्वरूपी लिहिण्याबाबत केंद्रसरकारशी बराच पत्रव्यवहार केला होता व त्याचे फलित म्हणजे आज ही कविता त्या कोठडीत लिहिली आहे. सदर लेखात ही सर्व कविता दिलेली होती. मी माझ्याकडील कवितेत नसलेले कडवे लिहून घेतले. कदाचित या ओळी वेगळ्या असू शकतील. जाणकारांनी सुधारणा करावी. या कवितेचे मूळ शीर्षक "ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली" असे आहे.
मनमोहन नातू यांची इतर काव्यसंपदा येथे वाचायला मिळेल. पण यात वरील कविता नाही. मनमोहन नातू हे त्यांच्या 'ती पहा बापूजींची प्राणज्योत', 'हळू हळू बोल कृष्णा' व 'राधे तुझा सैल अंबाडा' या कवितांच्यामुळे प्रसिध्द आहेत. ही कविता काहिशी अप्रसिध्द आहे.
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
नितीन
प्रतिक्रिया
25 Feb 2010 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर कविता....
बिपिन कार्यकर्ते
25 Feb 2010 - 7:10 pm | चतुरंग
वाचताना काटा येतो अंगावर. इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
(सहावे कडवे काहीतरी निराळे शब्द असावेत कारण वरती दिलेले शब्द हे मूळ काव्याच्या तालात बसत नाहीयेत.)
चतुरंग
26 Feb 2010 - 1:48 pm | नंदू
खरोखर अप्रतिम कविता. पुन्हा या कवितेची आठवण करून दिल्या बद्दल नितीन महाजनांचे आभार मनावे तितके थोडेच आहेत.
चतुरंगांशी सहमत, अंगावर सर्रकन काटा येतो.
सावरकरांना आदरांजली. _/\_
नंदू
26 Feb 2010 - 6:09 pm | स्मिता श्रीपाद
सहावे कडवे कदाचित
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
च्या ऐवाजी,
की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।
असे असावे...
आज एक सुंदर ब्लॉग सापडला....त्यात हे वरील कडवे मिळाले...
ते बरोबरच असेलच असे नाही पण चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे हे कडवे मूळ काव्याच्या तालात बसते आहे...
हाच तो ब्लॉग
http://sureshshirodkar.blogspot.com/2010/01/blog-post_3396.html
25 Feb 2010 - 7:13 pm | विटेकर
एका वेगळ्या विषयावर लिहल्याबद्दल !
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
25 Feb 2010 - 7:15 pm | मदनबाण
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
असेच म्हणतो...
आपला या मौल्यवान धाग्यासाठी आभारी आहे.
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
25 Feb 2010 - 8:14 pm | Manish Mohile
अप्रतिम कविता. ह्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कवितेचे शीर्षक देखील समर्पक आहे.
स्वातन्त्र्यवीर सावरकराना सादर प्रणाम.
25 Feb 2010 - 9:46 pm | स्वाती दिनेश
अप्रतिम कविता. ह्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्वाती
25 Feb 2010 - 11:19 pm | शुचि
ऐतिहासीक संदर्भ असलेली सुरेख कविता. ओळखही आवडली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
26 Feb 2010 - 12:24 am | पक्या
कवितेची ओळख छान करून दिली आहे. धन्यवाद.
तिसर्या कडव्यातील 'पीस' शब्दाचा अर्थ नीट्सा कळला नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
26 Feb 2010 - 1:24 am | बहुगुणी
..पीस.
26 Feb 2010 - 1:48 am | विकास
आज २६ फेब्रुवारी, सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन...
माहीत नसलेल्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
सुधीर मोघ्यांच्या पक्षांचे ठसे काव्यसंग्रहात एक कविता आहे जी सावरकरांवर आहे असे वाटते आणि तशा अर्थी सुधीर गाडगीळांनी ती कार्यक्रमात वापरलेली पाहीलेली पण आहे. ती आठवणीतून खाली देत आहे. चु.भू.द्य.घ्या.
हि तक्रार नाही की गार्हाणे नाही
पश्चाताप तर अजिबात नाही
आहे फक्त वस्तुस्थिती
तुझ्यासाठी केली सार्या आयुष्याची माती ||
खुणावणारे राजरस्ते तसेच जाउन दिले
तळहातांवरचे ऋतुंचे पक्षी अलगद सोडून दिले
चालत राहीलो फक्त एका अटळ आवेगापाठी, ||तुझ्यासाठी...||
उकळलेल्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले
स्फुरणारे उत्सुक ओठ, घट्ट शिवून घेतले
पापण्यांना दिली सक्त सजा एका थेंबासाठी ||तुझ्यासाठी...||
जे झाले ते चांगले की वाईट?
खरचं काही कळत नाही,
आभाळाचे दान टाळून टळत नाही
श्रेय एकच, अपादमस्तक तुझी दाहक मिठी
तुझ्यासाठी केली सार्या आयुष्याची माती ||
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
26 Feb 2010 - 9:51 am | नितीनमहाजन
यावरून हे सावरकरांसाठी असेल असे वाटत नाही. बाकी सर्व लागू होते.
नितीन
26 Feb 2010 - 2:42 am | प्राजु
खरच एकदम काटा आला अंगावर कविता वाचताना.
धन्यवाद इथे दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
26 Feb 2010 - 6:26 am | हर्षद आनंदी
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
26 Feb 2010 - 1:36 pm | विशाल कुलकर्णी
मित्रा, तुझे उपकार कसे फेडू?
स्वातंत्र्यसुर्य वि.दा. सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
26 Feb 2010 - 1:59 pm | नितीनमहाजन
सर्व मिपा रसिकांचे धन्यवाद. एकच विनंती आहे - कडवे क्रमांक ६ चे योग्य शब्द जर कोणाला मिळाले तर या कवितेत ती सुधारणा करावी.
नितीन
26 Feb 2010 - 2:19 pm | अप्पा जोगळेकर
सावरकरांनी एक तेजस्वी कविता त्यांच्या एका स्नेह्याला म्हणून दाखवली तेंव्हा तो म्हणाला ,''तात्या, ही कविता किती तेजस्वी आहे रे! कदाचित तिच्या तेजानेच ति जळून जाईल."
त्यांच्या स्वत:च्या बाबतीतही पुढे हेच घडले. स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी प्रणाम. आणि आमच्यासारख्या वाचावीरांना कोटी कोटी शिव्या. लोककवी मनमोहन नातूंची कविता अप्रतिम.
http://thoughtfacet.blogspot.com
26 Feb 2010 - 5:55 pm | स्वतन्त्र
स्वातंत्र्यसूर्य सावरकरांचे हे नितातसुंदर काव्य आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल शतशः आभार !!!
26 Feb 2010 - 6:14 pm | कानडाऊ योगेशु
इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये
बालभारती कि कुमारभारती?
असो हा मुद्दा गौण आहे.
पण कवितेत असलेला ताल,लय,आवेश सगळेच अप्रतिम.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
27 Feb 2010 - 8:31 am | विसोबा खेचर
सुरेख...!
नितिन महाजनसाहेबांचे आभार...
तात्या.
2 Mar 2010 - 12:52 am | सुमीत भातखंडे
सुरेख