परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे. खूप वर्षांनी एवढा सुंदर मराठी सिनेमा बघितल्याचे सूख लाभले ....
सिनेमाची पटकथा [ अथवा थीम ] = गावातल्या ग्रामदेवतेला वाहिलेला व आता मोकाट सुटलेला आणि डोईजड झालेला एक "बैल" पकडून त्याचा बंदोबस्त करणे. आता येवढी एका ओळीची स्टोरी असलेल्या सिनेमात हे दाखवणार काय हा प्रश्न पडू शकतो. पण बघाच ....
आता प्रथम मी जनरली आपण मराठी "अशा सिनेमाला का जात नाही ?" यासंमंधी थोडे स्पष्टीकरण देतो. काय आहे, मुळात सिनेमा आहे एका "वळू" वर, आजकालच्या "सो कॉल्ड सोफॅस्टीकेटेड मी मराठी" लोकांना "वळू" म्हणजे नक्की कोण हे माहित नसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि समजा माहित असले तरी आजकालच्या "डायनॉसॉर, ड्रॅगन, ऍनाकोंडा, गॉडझीला" सारख्या महाअतिकाय व ग्लोबल जनावरांच्या जगात तुम्ही "वळू" सारख्या "गावठी व पुचाट प्राण्यावर [ सॉरी जनावरावर] कसला पिक्चर काढता ही शंका येणे रास्त आहे. दुसरे म्हणजे जर "वळू" दाखवायचा म्हणला तर तो तुम्हाला "लंडन, लॉस एंजलीस, पॅरीस, स्विर्त्झलँड" सारख्या मनमोहक ठिकाणी दाखवता येणार नाही तो तुम्हाला एखाद्या "मागास खेडेगावातच" दाखवावा लागेल मग असे मागास खेडेगाव व ते जनावर बघण्यासाठी आम्ही कशाला पैसे घालवू असे पण वातण्याची शक्यता आहे. अजून सांगायचे म्हटल्यास पिक्चरमध्ये कुणी बडा स्टार म्हणजे हॄतीक, सलमान, शाहरूख [ आता हा आला की त्यामागोमाग अख्खे बॉलीवूड व जमल्यास काही क्रिकेटपट्टू आलेच] नसल्यामुळे पिक्चरला "फेसव्यॅल्यु" नाही. बरं, पाहायला गेले तर त्याचा दिग्दर्शक कोणी "रामू, भंसाळी, फराह खान, बडज्यात्या वा घाई" मंडळीपैकी कोणी नसल्यामुळे पिक्चरला तेवढे "ग्लॅमर" पण नाही. आता हे सर्व नसतील तर ऑबविअसली मसाला , आयटेम साँग, मनोसोक्त हाणामारी , २-४ बेड सीन्स, काही टाळ्या मिळवणारे डायलॉक, जबरदस्त लोकेशन्स नाहित. आता या सर्व गोष्टी नसतील तर कशाला आम्ही खिशाला चाट लावून थेटरात पिक्चर बघण्याचा नतद्रष्टपणा दाखवू ?
आता तुम्हाला सांगतो "वळू" का बघायचा ते ...
पिक्चरमध्ये आहे एक "सरकारी वनअधिकारी [ अतुल कुलकर्णी ] " जो महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात एका खेड्यात इमानदारीने आपली ड्युटी करत असतो. त्याच्या अखत्यारीतल्या भागात असलेल्या एका खेड्यात एका मोकाट सुटलेल्या "वळू" ला पकडायची जबाबदारी त्याच्यावर येते. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक कर्तबगारीची कामे केलेया स्वानंदला [ बाय द वे, स्वानंद हे त्याचे नाव ] हे असले फालतू काम म्हणजे त्याचा अपमान वाटतो पण "बॉस इज ऑलवेज राईट" या ब्रिदाला स्मरून तो या " कामगिरीवर" निघतो. निघताना त्याच्या लहान भावाच्या हट्टामुळे त्यालापण बरोबर घेतो. हा भाऊ म्हणजे "हौशी माहितीपट बनवणारा" असल्याने तो "वळू कसा पकडला ?" याचा माहितीपट [ पिक्चरच्या भाषेत डॉक्युमेंट्री ] बनवायचे सर्व साहित्य बरोबर घेतो. आता ही सर्व टीम निघाली आहे एका खेड्यात आणि ते तेथे पोहचून तिथल्या ग्रामस्थांची मदत घेऊन शेवटी एकदाचे त्या "वळूला पकडण्यात" यशस्वी होतात. अशी साधारणता थीम आहे पिक्चरची.
तसे पाहायला गेले तर स्टोरीत काहिच दम नाही पण खरी कमाल आहे ती "दिग्दर्शकाची" ...
कशी ? सांगतो ...
आता आधीच सांगितल्याप्रमाणे स्वानंदच्या भावाला "डोक्युमेंट्री" बनवाय्ची असल्याने तो "स्वानंद" तिथल्या ग्रामस्थांकडून वळूबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेत असतानाच्या प्रसंगाची "डॉक्युमेंट्री" बनवायचे हा भाऊ ठरवतो. पिक्चरची सुरवात होते या प्रसंगातूनच ... यातून दिग्दर्शकाने त्या डॉक्युमेंत्रीवाल्याचा समजूतदारपणा व उत्साह, ग्रामस्थांचा उत्साह;गडबड्;अज्ञान्;चौकसपणा, त्यांचे मानसन्मान; इगो; निरागसता हे सर्व गूण अगदी चपलखपणे दाखवले आहेत. "डॉक्युमेंट्री शूट" करताना दिलेल्या सूचना "माझ्याकडे बघा, लाजू नका, फक्त डूरक्याबद्दल बोला [ बाय द वे, "डूरक्या" हा पिक्चरचा हिरो पक्षी वळू ], असे वळून बघून बोला" केवळ अप्रतिम. यावर कडी म्हणजे ही "डॉक्युमेंट्री" आपल्या टीव्ही वर दिसणार या कल्पनेने प्रत्येकाचा त्यात चमकण्याचा प्रयत्न, दूसर्यावर कडी करण्यासाठी खेळलेल्या चाली, ही डॉक्युमेंट्री म्हणजे आपल्या समस्या सरकारला कळवण्यासाठीचे व्यासपिठ समजून भाबडेपणाने लोकांचे "विहरीतला गाळ काढा, रस्ते सुधारा, लायटीची व्यवस्था करा, शेताबद्दलच्या समस्या" मांडणे , समजा आपली लहान पोरगी ह्यात नाचलेली दिसली तर मोठेपणी तिच्यासाठी उघडणारी फिल्मसॄष्टीची दारे असा समज , त्यावर स्वानंदने फक्त "डूरक्याबद्दल बोला" असा दिलेला दम .... सारेच उत्तम, लाजबाब ... सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे लोकांचा निरागसपणा ....
वळू पकडण्यासारख्या शूल्लक घटनेतून त्या छोट्या गावात जे "राजकारण घडते" व ते दिग्दर्शक्शाने ज्या ताकतीने दाखवले आहे त्याला तोड नाही. गावात २ मुख्य राजकीय फळ्या , १ म्हणजे सध्या "सरपंच" असलेया वयोवॄद्ध आण्णांची [ मोहन आगाशे ] व दुसरी म्हणजे गावातले "असंतुष्ट तरूण धडाडीचे नेतॄत्व" आबा. या दोघांचीही रोल जबरदस्त, त्यांची ऍक्टींग जबरदस्त, टायमिंग जबरदस्त. त्याचबरोबर या दोघांचे के कार्यकर्ते दाखवले आहेत ते तर अजूनच "अवली आणि भाबडे" त्याला जबाब नाही ....
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिक्चरमध्ये दाखवलेला वनअधिकार्याचा उत्साह, इंप्रेशन मारायचे त्याचे प्रयत्न, प्रत्येक गोष्ट एकदम सिस्टिमॅटीक पद्धतीने करण्याकडे त्याच असलेला कल, सरपंचांची प्रत्येकाला सांभाळून घेण्याची सवय, गावठी माधुरी दिक्षीत [ अमॄता सुभाषने या रोलमध्ये जान ओतली आहे ] व तिची प्रेमकहाणी , आण्णांचा विरोधक असलेल्या आबाचे त्यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न , गावातील अतिउत्साही कार्यकर्त्यांचे वळूला पकडसाठीचे प्रयत्न, त्यांची दिरंगाई व ढीली कार्यपद्धती, त्यांचा निरागस भाबडेपणा व अज्ञान आणि त्यांचे एकमेकावर असलेले प्रेम व आत्मियता यांचे चित्रण या सर्व गोष्टींचे उत्तम रसायन जमून एक मस्त पिक्चर बघितल्याचे सुख आपल्याला लाभते ...
सर्वात शेवटी एका माणसाचा उल्लेख केला नाही तर त्याच्यावर अन्याय होईल , तो म्हणजे गावातील एक खंदा कार्यकर्ता "जगन्या ". त्याची एकूण पळापळ, उत्साह, कार्यक्षमता या सर्व गोष्ती उत्तम रितीने त्याच्या रोलमधून दिसून येतात ...
"प्रत्येक मराठी माणसाने मरण्याच्या आधी हा पिक्चर बघावा" असा आदेश देणार्या व परमेश्वरावर विश्वास नसणार्या "श्रीराम लागूंवर" आमचा विश्वास नाही तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ....".
प्रतिक्रिया
3 Apr 2008 - 1:07 pm | छोटा डॉन
तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ...."
हे असे वाचावे ...
तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर थेटरातच जरूर बघा ....".
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
3 Apr 2008 - 1:21 pm | मनोज
एक नविन वाकप्रचार आइकायला मिळाला ...
वाळूत मूतनं फेस ना पाणी...
खूप हासलो..
आपलाच,
मन्या
3 Apr 2008 - 2:16 pm | ठणठणपाळ
चांगला आहे लेख. या सिनेमाबद्दल पूर्वी ऐकलं होतं. पण बघणं झालं नाही.
हा सिनेमा इंटरनेट्वर बघता येईल का?
3 Apr 2008 - 2:28 pm | धमाल मुलगा
चिमटे..चिमटे..चिमटे !!!
पुन्हा एकदा, चिमटे..चिमटे...चिमटे !!!!
काय रे, तुला पण लागली का सवय उठसुठ खवचटपणा करायची?
आता काय स्वाक्षरी करताना क॑सात >>(समिक्षक)<< अस॑ टाकणार का? :-))))))
मस्त लिहिल॑य! बढिया...और भी लिख्खो मेरे शेर-ए-ब॑गळूरु
- (खवचट) ध मा ल.
3 Apr 2008 - 7:06 pm | व्यंकट
मिळत नाहीये अजून.
व्यंकट
3 Apr 2008 - 8:10 pm | इनोबा म्हणे
डॉन्या भौ सही रे!
साला आपून तर 'फस डे फस शो' बघुन आलो.जाम आवडला. तबीयत खूश झाली.
दिलीपराव आणि निर्मीती सावंतांची जोडी तर लय आवडली बॉ. नवर्याबरोबर तांब्या घेऊन पळणारी बायको! :) याला म्हणत्यात भारतीय नारी.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
3 Apr 2008 - 8:17 pm | llपुण्याचे पेशवेll
वर्णनावरून तर एकदम बघावासा वाटत आहे हा वळू.
पुण्याचे पेशवे
3 Apr 2008 - 9:49 pm | सर्किट (not verified)
कला ह्या संस्थेने वळूचा शो २६ एप्रिल ला ठेवला आहे.
- सर्किट
3 Apr 2008 - 10:36 pm | अविनाश ओगले
सॅन होजेचे लोकही वळू बघतील... आम्ही बेळगावकर केव्हा बघणार की! पाप!
3 Apr 2008 - 10:45 pm | एक
शाळेतल्या मित्राचा (उमेश कुलकर्णी) आहे..
माझ्या वर्गातले सचिन कुंडलकर आणि उमेश दोघेही या क्षेत्रात मस्त यशस्वी झाले आहेत्..जाम अभिमान वाटतो आपल्याला.
बाकी सगळे सिनेमे मी नेटवर किंवा डिव्हीडी आणून बघेन पण हा मात्र थेटरात जावूनच बघणार.. कलाच्या साईटला जायला पाहिजे..
15 Apr 2008 - 12:28 am | भडकमकर मास्तर
भावे स्कूल झिन्दाबाद....१९९२ बॅच ना??
नाही नाही,....मी तर दूर गावचा आहे हो....( मी आपलं सचिन कुंडलकराच्या लेखात वाचलं होतं )....
16 Apr 2008 - 4:39 am | एक
१९९२ बॅच..
आमच्या आधीच्या बॅचची मुलं बोर्डात वगैरे यायची.. आम्ही ती रूढी मोडीत काढली :-)
17 Apr 2008 - 2:58 am | llपुण्याचे पेशवेll
भावेस्कूल ला तर मी ही होतो. ५वी आणि ६वी मधे.
पुण्याचे पेशवे
4 Apr 2008 - 12:05 am | ब्रिटिश टिंग्या
पण साला कुठे बघणार? छ्या.....
बाकी डॉन्या परिक्षण एकदम फस्क्लास हां! चिमटेच चिमटे ;)
- टिंग्या
4 Apr 2008 - 12:32 am | प्राजु
अजेंड्यावर आहे वळू. भारतात गेल्यावर काय काय करायचे ते ठरवले आहे. त्यात अजेंड्यावर आहेच वळू आणि कदाचित सुद्धा...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
4 Apr 2008 - 1:26 am | विसोबा खेचर
सह्ही रे डोन्या..!
बाकी, अतुल कुलकर्णी आपला एकदम फेवरेट नट आहे...
तात्या.
4 Apr 2008 - 2:53 am | चतुरंग
तुझं झक्कास परीक्षण आलं डॉन भाऊ आणि तो इथे ईष्ट कोष्टला कसा मिळवायचा याचे वेध लागले.
अतुल कुलकर्णी तर काम फोडतोच! सध्याचा एकदम जोरात असलेला नट आहे.
(अवांतर - परवाच सुमित्रा भावेचा 'देवराई' बघितला. कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. अतुलने स्किझोफ्रेनिक जीनियसचे काम केले आहे. फक्त बघणे, बघणे आणि बघणे!)
चतुरंग
5 Apr 2008 - 12:06 pm | भाग्यश्री
अफाट काम करतो तो! देवराईत तर खरच बघत रहावं! .. नितांत सुंदर पिक्चर!!
तिकडे नमोगतावर संजोप रावांनी देवराईवर फार सही लिहीलय.. इथे बहुधा टाकलेलं दिसत नाहीय.. पण अप्रतिम परिक्षण!
वळू अजुन नाही पाहीला.. आणि इकडे ऑनलाईनच पाहावा लागेल असं दिसतय.. काय माहीत कधी योग येतो...
4 Apr 2008 - 8:14 am | प्राजु
मी ही आपली मराठी वर पाहिला देवराई..
अतुल कुलकर्णीं चा अतिशय सकस अभिनय..खूपच छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
17 Apr 2008 - 4:12 pm | वडापाव
मीही देवराई, वळू आणि वास्तुपुरुष हे अतुल कुलकर्णीने काम केलेले चित्रपट पाहिले आहेत.
तिन्ही चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे आहेत.
आपला नम्र,
वडापाव
4 Apr 2008 - 4:30 pm | सुवर्णमयी
धन्यवाद , इथे माहिती दिल्याबद्दल आता बघायलाच हवा वळू. त्याविषयी खूप चांगल्या कॉमेंटस ऐकल्या आहेत.
सोनाली
4 Apr 2008 - 11:22 pm | वरदा
इस्ट कोस्ट वर कुठे आलेला कळला तर सांगा बरं का...घरी सगळ्यांनी सांगितलय मस्त आहे म्हणून आणि त्यावर डॉन भाऊंनी एवढं मस्त वर्णन केलय..पाहीलाच पाहिजे...
16 Apr 2008 - 5:02 pm | गु॑ड्याभाऊ
एवढ॑ वाचल्यावर आम्ही सुद्धा थेटरात बघायला जाऊ वळू.
गु॑ड्याभाऊ
16 Apr 2008 - 11:40 pm | शितल
आम्ही भारतात येई पर्य्॑त वळु वाळुन जाईल, नेटवर कोठे पाहता येईल.
17 Apr 2008 - 4:13 pm | आनंदयात्री
>> वळु वाळुन जाईल
:)))))))))