अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच.
* पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला?
- 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच. त्यातच त्याला तीन ''झी गौरव पुरस्कार'' मिळाले ,त्यामुळे हा चित्रपट बघायचा हे मनाशी ठरवले होतेच. याशिवाय 'सचिन कुंडलकर' विषयी एक कुतहुल होतेच.आणि सर्वात शेवतए कारण म्हणजे या चित्रपटाचा कलादिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक माझे खास मित्र आहेत. या सर्वाचा परिपाक म्हणून 'गंध' पाहिला.
* 'गंध' या चित्रपटामागची मूळ संकल्पना काय आहे?
- 'गंध', 'वास' - आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षीत घटक.अतिपरिचयात अवज्ञा झालेला. आपल्याला दररोजच्या जीवनात आपल्याला क्षणोक्षणी अनेक वासांना सामोरे जावे लागते. पण आपण त्याची विशेष दखल घेत नाही,त्याला वेगळे वास म्हणुन ट्रीट करत नाही,तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला असतो.त्याची दखल घेतो तो फक्त आपला सबकाँशस मेंदु ,आपल्या जाणिवा आपल्या नकळत त्यावर रीअॅक्ट होतात. आणि म्हणुनच आजतागायत चित्रपटांनी 'गंधाचा आभास' आपल्याला करून दिला नव्हता. साधारणत: समाजातील घटकांवर चित्रपट बनवला जातो. पण त्यात 'गंध' नेहमीच दुर्लक्षित राहिला. म्हणूनच, वातावरण निर्मितीच्या, संवादाच्या आणि संगीताच्या माध्यमातून हा आभास लोकापर्यंत पोहोचविणे,एखाद्या वासाची अनुभुती करुन देणे ही या चित्रपटाची मुळ संकल्पना आहे.
* ही संकल्पना पडद्यावर कशी साकारली गेली आहे?
- 'गंधाला केंद्रस्थानी ठेवून तीन वेगवेगळया कथातून ही संकल्पना साकार घेत जाते. या तीनही कथा अतिशय भिन्न अशा तीन पार्श्वभुमीवर घडतात, पण या कथेच्या सगळ्या प्रसंगातून वासाला महत्वाचे स्थान आहे. वासाशिवाय या तिन्ही कथा अपुर्ण आहेत. या कथा घडत असतात वास एक कॅरॅक्टर म्हणून काम करतो आणि, मध्येच कधीतरी समोरच्या प्रेक्षकालादेखील अचानक तो वास आल्याचा भास होतो,आपणच त्याठिकाणी असल्याचे वाटते, इथेच चित्रपटाचा हेतु साध्य होतो.
* ही झाली आऊटलाईन, पण प्रत्यक्षात कथा कशी घडत जाते?
- पहिली कथा म्हणजे अमृता सुभाष. व गिरिष कुलकर्णीची लग्नाच्या वयाची मुलगी( A Bride to be.). जुन्या पुण्याच्या पार्श्वभुमीवर घडणारी ही खेळकर प्रेमकथा. लग्नाला आलेली व अनेकांनी नकार दिलेली अमृता सुभाष म्हणजेच वीणा ती ज्या संस्थेत क्लार्क असते, तिथल्या एका चित्रकाराच्या प्रेमात पडते. हा चित्रकार रात्री अगरबत्ती वळण्याचे काम करत असतो. त्यांच्यातले प्रेम, काही विनोदी तर काही भावनिक प्रसंगातून, ही कथा खुलत जाते. Thetrical Style ने ही कथा पुढे जात जाते. आणि एकेदिवशी अचानकपणे ती आपले प्रेम घरी जाहीर करते.या अनोख्या प्रेमाची ही कथा .
दुसरी कथा एका फॅशन फोटोग्राफरची. ''औषध घेणारा माणूस'' ( A Man on Medicines.),सारंग त्याचे नाव,त्याला एडस् झालेला आहे. त्यामुळे तो एकाकी पडलेला असतो ,बायकोसकट घरातले सगळे त्याला सोडून गेलेले असतात,अशातच त्याला दोन वर्षांनी भेटायला त्याची बायको येते. एव्हाना मधल्या काळात या रोगामुळे तो वासाची जाणीवच विसरलेला असतो. आणि मग त्या दोन तासात घडणारे प्रसंग ,त्यातुन उलघडत जाणारे त्यांचे नाते दुसरी कथा दाखवते.
तिसरी आणि शेवटची कथा कोकणातील,"बाजुला बसलेली बाई"( A Woman sitting aside.) या नावाची. जानकी (नीना कुलकर्णी) नावाच्या बाईची ही कथा. या संपुर्ण कथेला पावसाची बॅकग्राऊंड आहे. ही कथा एक जुने रूढी परंपरा मानणारे कोकणी घर दाखवते. या वेळी काही कारणामुळे घरातल्याच स्त्रीला चार दिवस घरातले जन्मलेले बाळ कसे बघता येत नाही. त्यामुळे कशी तडफड होते, याची चित्रण केलेले आहे. पण हे वरवरचे कथाकथन झाले. पण प्रत्यक्षात छोटया मोठया प्रसंगातून या कथा कशा रंगविल्या आहेत. यातुन गंधाची अनुभुती कशी मिळते हे पडद्यावर पाहणेच उचित ठरेल.
* चित्रपटातील कलाकार, पार्श्वसंगीत, दिग्दर्शन इत्यादी कामे कशी झालेली आहेत?
- तीन कथामध्ये विभागलेला हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. सोनाली कुलकर्णी, गिरिष कुलकर्णी, मिलिंद सोमण, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष यांना आपआपली कामे चोख केली आहेत. ठराविक प्रसंगात अमृता सुभाषमध्ये 'अवघाचि संसार' डोकावलेला दिसतो. ते होणारच म्हणा. तरीही सर्वांचे काम उत्तम झालेले आहे. मिलिंद सोमण म्हणल्यावर मर्यादा येणारच. पण तरीही त्याने बर्यापैकी काम केले आहे,असे म्हणायला हरकत नाही,पण नेहमीप्रमाणेच नीना कुलकर्णी भाव खाऊन जाते,हे वेगळे सांगायला नकोच. विशेषतः व्यक्तीरेखा आणि कलाकार सुट झालेले आहेत.
पण,खरे सांगायचे तर या सर्वाहुन उत्तम काम पडद्यामागील कलाकारांनी केले आहे. एखाद्या गोष्टीचा, त्यातही वासाचा आभास निर्माण करणे ही काही खायची गोष्ट नाही. पण कला दिग्दर्शकांनी त्या तिन्ही सिच्युएशन्स अशा काही उभ्या केल्या आहेत की निम्मी लढाई मारली जाते,उत्क्रुष्ट डीटेलींग कसे असावे याचा हा चित्रपट उत्तम नमुना आहे . याशिवाय छायाचित्रण आणि काहीशा वेगळया संगीतामुळे हा प्रभाव अधिक गडद झाला आहे. संपुर्ण चित्रपटात एकही गाणे नसताना साध्याशा कथा असताना चित्रपट एक-दोन प्रसंग वगळल्यास रटाळ वाटत नाही. यातच त्यांचे खरे यश आहे व त्याची पावती त्यांना 'झी - गौरव' आणि 'व्ही. शांताराम' पुरस्कारातून मिळालेली आहे, हे नक्की.
* या चित्रपटाकडुन आणि विशेषत: सचिन कुंडलकरकडून असणार्या अपेक्षा हा चित्रपट पुर्ण करतो का?
- बेशक . या चित्रपटाची गेल्या काही दिवसात जी प्रसिद्धी झाली ती योग्यच होती असे चित्रपट पाहताना जाणवते. आणि सचिन कुंडलकरांबद्दल बोलायचे तर,गेल्या काही वर्षात ''छोटयाशा सुट्टीत'' सारखी नाटके, 'रेस्टॉरंट', 'निरोप' सारखे काही चित्रपट यामुळे सचिन कुंडलकरांची एक इमेज तयार झाली आहे. आशयघन नाटके आणि चित्रपटे देण्यात ते माहिर आहेत. विशेषत: आपल्या कलाकृतीत विविध प्रयोग करूनही ते त्यावर 'प्रायोगिक' चा शिक्का बसू देत नाहीत. हे सगळे निकष हा चित्रपटदेखील पुर्ण करतो. मात्र अध्येमध्ये 'कुंडलकरी स्टाईल' डोकावत राहते,विषेशतः दुसर्या कथेत. कदाचित, कथा, पटकथा, संवाद तीनही त्यांचेच असल्याने असे झाले असावे. बाकी उत्तम.
* मग या चित्रपटात काही दोष आहेत का नाहीत?
- आहेत,काही वेळा कथेचा वेग कमी जास्त होतो, त्यामुळे आलेला टेंपो निघुन जातो,तर पहिल्या कथेला पकड घ्यायला वेळ लागतो ,दुसर्या कथेत एडस झालेल्या माणसाला वास येत नाही असे दाखवले आहे, पण ते सत्य आहे का नाही का ते चित्रपटासाठीचे Assumption आहे ते समजणे महत्वाचे आहे, असे काही डो बळ दोष आहेत, पण ते चालुन जातात.
* महत्वाची गोष्ट अशी की फक्त वासाची अनुभुती या एकाच मुद्दयावर अडीच तासाचा चित्रपट बनू शकतो का?
- नाही.व्यावसायीक गणिताच्या दृष्टीने तर नाहीच नाही. म्हणूनच हा एक चित्रपट नसुन तीन शॉर्ट फिल्म आहेत ज्या एकत्र केल्या आहेत. आणि वास हा त्यांचा लसावि आहे. याहुन सर्वात महत्वाचे म्हणजे हा फक्त चित्रपट फक्त वासावर आधारीत नाही.तसे असते तर हा चित्रपट उथळ आणि बटबटीत वाटला असता. या चित्रपटातून विविध मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, त्याचे होणारे परिणाम,भारतीय रुढी ,परंपरा अतिशय परिणामकारकरित्या दाखविले आहेत. त्यामुळेच अनेक प्रेक्षक चित्रपट संपल्यानंतर भावूक होतात. त्यामुळे साहजीकच चित्रपटाला एक बैठक प्राप्त झालेली आहे, जी चित्रपटाला वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवते.
* 'गंध', 'गाभ्रीचा पाऊस','जोगवा' असे चित्रपट हे बदलणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचे दाखले आहेत का?
- खरे सांगायचे तरं एखाद्या बाबतीत बदल हा सतत होत असतो. बदल काय झाला हे पाहणे महत्वाचे असते. त्यामुळे, या चित्रपटांना फारतर आपण चांगले बदल असे म्हणू शकतो. विशेषत: 'श्वास' आल्यानंतर मराठी चित्रपट सृष्टी बदलली. मराठी चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञान, भरपूर पैसा आणि व्यावसायिकता आली. पण अशा बदलांना फारसे महत्व देण्याची गरज नाही. कारण कधीना कधीते घडणारच होते. या चित्रपटांमुळे झालेला खरा बदल म्हणजे मराठी चित्रपटांना आशयघनता आली. तमाशापट, टुक्कार विनोदीपट यातुन मराठी सिनेमा बाहेर पडला. थोडक्यात क्लास आणि मास दोघांना सामावणारे चित्रपट निघु लागले.
हा! सर्वात महत्वाचा बदल झालाय तो प्रेक्षकांच्या अभिरूचीत. आजकालचा प्रेक्षक दिवसभराच्या कामकाजात, टेन्शनमध्ये इतका गुंतला आहे की, त्याला नवीन कोणती स्टोरी ऐकायला वेळच मिळत नाही. त्यामुळेच, 'गंध', 'वळू' असे आपल्या जीवनातले चित्रपट त्याला आवडायला लागले आहेत. त्या चित्रपटातील पात्रात तो स्वत:ला पाहतो. म्हणूनच त्याला ते आवडतात. मग साहजिकच तो विचारही करू लागतो. माध्यमकृपेमुळे बरेवाईट ऐकुन 'गाभ्रीचा पाऊस' मुंबईतही हाऊसफुल असतो. हा खरा बदल! आणि हो, त्याचवेळी ''शिवाजीराजे'' ही जोरात चालतो. याचा अर्थ, आजच्या घडीला आशय आणि मनोरंजन हातात हात घालून चालत आहेत. याला आपण काहीही म्हणू, काळाचा महिमा वगैरे. पण हा बदल सुखावह आहे आणि तो टिकणे गरजेचे आहे.
थोडक्यात काय, तर 'गंध' हा या बदलत्या प्रवाहाचा प्रतिनिधी आहे. तो नेहमीचेच सांगतो पण वेगळया भाषेत, वेगळया शैलीत....त्यामुळे सगळयात असून वेगळा असणारा हा चित्रपट पाहून एकदा तरी गंधीत होऊन याच....
विशेष आभार- सन्माननीय मिपाकर छोटा डॉन
प्रतिक्रिया
15 Aug 2009 - 8:49 pm | भडकमकर मास्तर
मध्येच कधीतरी समोरच्या प्रेक्षकालादेखील अचानक तो वास आल्याचा भास होतो,आपणच त्याठिकाणी असल्याचे वाटते, इथेच चित्रपटाचा हेतु साध्य होतो.
हे फार इन्ट्रेष्टिंग वाटले.. :)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
15 Aug 2009 - 10:14 pm | छोटा डॉन
सिनेमाच्या बहुतेक सर्व अंगांचा व्यवस्थित उहापोह केल्याने परिक्षण आवडले.
साध्या सोप्या सरळ शैलीत लिहले असले असल्याने वाचन सुलभ झाले.
"गंध" ची थिम वेगळीच वाटत आहे, कलाकारांची जंत्रीही खुणावते आहे. पिक्चर पहावा असे वाटते आहे.
आपल्या परिक्षणाने अजुन उत्कंठा वाठली चित्रपट पाहण्याची ...
धन्यवाद ...!!!!
------
छोटा डॉन
15 Aug 2009 - 11:13 pm | अनामिक
विनायक... परिक्षण छान लिहिलं आहेस रे. तुझं हे लिखाण वाचण्यास खूप सुलभ झालं आहे. चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे!
कोणत्याही सुगंधी फुलांचा (पारिजातक, मोगरा गुलाब) वास आपले मन प्रसन्न करतो. तसेच आपल्याला हवी असलेली व्यक्ती, वस्तू आपल्या जवळ असेल तेव्हाही आपले मन प्रसन्न होते. चित्रपटाची थीम जरी गंध/वास असली आणि चित्रपटात किंवा प्रत्येक लघुकथेत त्याची अनुभूती येत असली तरी त्याच्याही पलीकडे जाऊन त्या त्या कथानायक/नायिकेला हवी ती व्यक्ती मिळाली किंवा दुरावली की त्यानां जीवन जगण्याचा 'गंध' गवसला/हरवला म्हणायला हरकत नाही... अर्थात माझं हे लॉजीक कितपत योग्य आहे ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
-अनामिक
16 Aug 2009 - 12:19 am | रेवती
परिक्षण वाचून शिनुमा पहावासा वाटतोय. चांगले लिहिले आहेस.
रेवती
16 Aug 2009 - 3:55 am | योगी९००
चांगले परिक्षण..
सर्वात महत्वाचा बदल झालाय तो प्रेक्षकांच्या अभिरूचीत. त्या चित्रपटातील पात्रात तो स्वत:ला पाहतो. म्हणूनच त्याला ते आवडतात. ..
हे पटलं..
आता जरूर हा चित्रपट पहाणार.
खादाडमाऊ
16 Aug 2009 - 4:52 am | प्राजु
एकदम साध्या भाषेत लिहिलेले परिक्षण खूप आवडले.
चित्रपट मिळेल तेव्हा नक्कीच बघेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Aug 2009 - 7:08 am | अवलिया
परिक्षण आवडले.
लेखनातील बदल चांगला आहे.
असेच लिहित रहा... :)
गुड !
--अवलिया
16 Aug 2009 - 8:25 am | llपुण्याचे पेशवेll
चित्रपट परिक्षणावरून छान वाटत आहे पण विषेश गोष्ट अशी की विनायकाने परिक्षण उत्तम आणि आशयघन लिहीले आहे.. विषेशतः मराठी चित्रपटाची बदलणारी कूस आणि इतर मुद्द्यांचा ऊहापोह करताना ओघवती आणि रसाळ तरीही सोपी भाषा वापरली आहे.
विनायका असेच लिहीत रहा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
16 Aug 2009 - 10:26 am | बिपिन कार्यकर्ते
असेच वाटते. विनायकाने चांगले लिहिले आहे. भाषेतला बदल अतिशय स्वागतार्ह आहे. मुद्देही छान मांडले आहेत/
बिपिन कार्यकर्ते
16 Aug 2009 - 8:56 am | मदनबाण
विनायक भाऊ परिक्षण छान लिहले आहेस.
(सोनचाफ्याच्या गंधावर फीदा असणारा)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
16 Aug 2009 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे
उत्तम परिक्षण! छोटा डॉन स्टाईल परिक्षणे ही लवकरच जालव्यापी होतील हे आम्ही भाकीत यापुर्वी वर्तवले आहेच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
16 Aug 2009 - 9:08 am | सुनील
परीक्षण चांगले लिहिले आहे. चित्रपटदेखिल चांगला वाटतो आहे. पहायला हवा.
मागे पांथस्थ यांनी पाकृ देण्याचा एक नवा पायंडा पाडला होता (प्रत्येक टप्प्यावर एक फोटो) तसाच परीक्षण देण्याचा एक नवा पायंडा छोटा डॉन यांनी घालून दिला आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Aug 2009 - 9:26 am | दशानन
असेच म्हणतो.
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
16 Aug 2009 - 11:39 am | विनायक पाचलग
आपल्या प्रतिसांदाबद्दल आपले मनापासुन आभार.
छोटा डॉन यांचे विशेष आभार.
चांगले प्रयोग प्रसिद्ध होतातच,त्यामुळे परिक्षणाची हि शैली प्रसिद्ध होणार यात शंकाच नाही.
त्यांचा लेखामुळेच खरेतर मला परिक्षण लिहायची इच्छा झाली.
खरेतर हा चित्रपट कोल्हापुरात आलेला नाही,
काही दिवसापुर्वी (१-२ महिने)झालेल्या एका विशेष प्रयोगावेळी तो पाहिला होता. त्यामुळे काही संदर्भ राहिलेले असु शकतात,ते आपण चित्रपट बघितल्यावर इथे लिहिलेत तर बरे होईल.
सध्या हा चित्रपट पुणे आणि मुंबईत प्रदर्शित झाल्याचे समजते.
शेवटी पुन्हा एकदा आभार. असेच लिहिण्याचा प्रयत्न करीन.
तुमचा
विनायक
www.wanttotalk.tk