तात्यांच्य्या गांधाराच्या लेखावरून काही इतर, विषेशतः लताबाईंच्या हिंदी चित्रपटगीतांमधील विशेष स्थानांची आठवण झाली. ती त्यातील 'हाय..' ह्या शब्दाच्या अत्यंत परिणामकारक उच्चारावरून. लताबाईंचे गाणे अगदी अंडरप्लेईंगचा उत्तम नमुना आहे. कोठेच भाव उतू चालले आहेत असे दिसत नाही. पण अगदी अचूक, जेव्हढ्यास तेव्हढे, असे परिणामकारक शब्दोच्चार, विशीष्ठ जागांवरील किंचीत आघात, ह्यांतून त्या किती जीवघेणे गातात त्याचे प्रत्यय ह्या काही गाण्यांतून दिसते.
त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या 'बरसात' मधील अत्यंत गाजलेल्या 'बरसात मे..' च्या अंतर्याच्या शेवटी जो ' हाय ' आहे, तो प्रेमाची पहिली चाहूल लागलेल्या तरूणीच्या मनाचा हुंकार आहे. १९५१ साली आलेल्या 'आह' मधील 'राजा की आयेगी बरात' मधील 'हाय' मात्र प्रेमभंग झालेल्या नायिकेचा आहे.
शंकर जयकिशनसाठीच गायिलेल्या 'काली घटा' तील 'उनके सितम ने लूट लिया' तील 'हाय क्या करे?' दु:खी नायिकेची अगतिकता दर्शवतो, तर १९५७ साली शंकरच्या निदर्शनाखाली म्हटलेल्या 'हाय, तू ही गया मोहे भूल रे' ह्या नृत्यगीताची मझा काही औरच.
पं. रविशंकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी 'अनुराधा'तील शैलेंद्रची गीते गायलीत, त्यातील 'हाये रे वो दिन क्यू ना आये' ची गोडी अवीट आहे.
आणि हंसराज बहेलच्या 'हाय, जिया रोये' ची सुरूवातच अंगावर काटा आणते. त्याच हंसराज बहेलने मुकेश व लताकडून गाऊन घेतलेल्या 'नैन द्वार से मन मे वो आके, तन मे आग लगाये' मधे लताबाई 'हाय रे कोई छलिया छल के जाये..' असे म्हणतच येतात.
अजून एक जीवघेणे 'हाय' चे गाणे ,चित्रगुप्तांसाठी गायलेले 'हाय रे तेरे चंचल नैनवा, कुछ बात करे, रूक जायें'
एल. पींसाठी गायलेल्या 'भोर भयी पनघट पे' मधील 'हाय' हा दोन वाक्यांतील गॅप भरण्यासाठी आहे, खरे तर.
दत्तारामांच्या 'टारझन कम्स तो दिल्ली"मध्ये 'हुस्न इकरार करे' ह्या अत्यंत शृंगारिक गाण्यात अंतर्याच्या शेवटी जो एक थोडा पॉझ आहे, त्याला बाईंच्या 'हाय..'ने कसे विलक्षण तोलून धरले आहे ! कल्याणजी आनंदजीसाठी 'ऱोटी कपडा और मकान' मधील 'हाय हाय ये मजबूरी'ची सुरूवातच ह्या 'हाय' ने आहे.
'तेरे घर के सामने' तील बर्मनदांसाठी बाईंनी गायलेले 'ये तनहाई, हाये रे हाये, जाने फिर आये न आये' अवखळ तारुण्याचा सुंदर आविषकार सादर करते. तर आर. डी. साठी 'बरसात की एक रात'मधे गायलेले पहाडी ढंगाचे गाणेही 'हाय' पासूनच सुरू होते...' हाय वो परदेसी ' .
प्रतिक्रिया
24 Jul 2009 - 10:27 pm | बिपिन कार्यकर्ते
एवढी सगळी सुंदर सुंदर गाणी एकदम एकत्र एका धाग्यात!!! मेजवानी. ऐकतो सगळी एकएक करून...
बिपिन कार्यकर्ते
24 Jul 2009 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>एवढी सगळी सुंदर सुंदर गाणी एकदम एकत्र एका धाग्यात!!! मेजवानी. ऐकतो सगळी एकएक करून...
'भोर भयी पनघट पे' मधील ’हायराम हाय,हाय, ऐकले..एकदम मस्त..!
गाण्यांमधील ’हाय’ च्या लकबी शोधणे आवडले. अजून येऊ द्या !
-दिलीप बिरुटे
24 Jul 2009 - 10:42 pm | पिवळा डांबिस
रसिक बलमा...हाये....
हा विसरू नका राव!!
24 Jul 2009 - 11:20 pm | विकास
एकदम मस्त लेख आणि उदाहरणे... प्रत्येक हाय चे केलेले विशेष वर्णन आवडले.
पवन दिवानी मधे सुरवातीचे आणि मधे असेच हाय असलेले आठवले.
अवांतरः
असे अनेक गाण्यात नाही पण लताच्या दोन गाण्यात आलेले संदर्भ आठवले. (ज्यात सांगितले तो त्या व्यतिरीक्त डोके बाहेर ठेवून पहायचा चित्रपट : भेजा फ्राय). लताने आयेगा आयेगा (२०+ वेळा वेगवेगळ्या ठेक्यात) आणि चलते चलते (४०+ वेळा वेगवेगळ्या प्रकारे) हे किती वेगवेगळ्या पद्धतीने म्हणलेले आहे सांगितले आहे.
अतिअवांतरः
वरील दुवे शोधताना, लताच्या मुलाखतीत समजले की आयेगा आयेगा च्या वेळेस गायकांची नावे रेकॉर्डवर नसायची तर चित्रपटातील भुमिकांची नावे असायची. बरसातपासून ती स्क्रीन वर येऊ लागली...
24 Jul 2009 - 11:46 pm | विसोबा खेचर
छोटेखानी लेख सुंदरच!
धन्यवाद प्रदीपराव, सगळे दुवे ऐकतो आहे..
आपला,
(लताप्रेमी, लताभक्त) तात्या.
25 Jul 2009 - 12:29 am | डॉ.प्रसाद दाढे
पवन दीवानीच्या अगोदरचा 'हाय' अगदी किलींग आहे. लताचा 'हायच' काय पण मधूमतीतल्या 'दय्या रे दय्या' गाण्यातला सुरूवातीचं 'उई उई उई..' पण काळजाचं पाणी पाणी करतं!
मस्त धागा व मस्त लेख प्रदीपशेठ.. अजून येऊ द्या
25 Jul 2009 - 12:32 am | विजुभाऊ
दिलका खीलौना हाये टूट गया.........विसरलात का
25 Jul 2009 - 12:55 am | बहुगुणी
'हाय रे हाय, नींद नही आय' (हमजोली) आणि 'हाय हाय ये मजबूरी' (रोटी, कपडा और मकान)
25 Jul 2009 - 2:08 am | अनामिक
चांद फिर निकला या गाण्यात धृवपदाकडे परत येण्यापुर्वी येणार्या ओळीत (...मै क्या करु हाये... के तुम याद आये) आलेला दर्दभरा हाय!
-अनामिक
25 Jul 2009 - 3:13 am | नाटक्या
हाये... कैसे दिन बिते मधला हाये पण अतिशय जिवघेणा आहे...
हा ऐका: http://www.youtube.com/watch?v=Cyutrpsiqm4
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
25 Jul 2009 - 3:24 am | केशवराव
प्रदिप,
खास मेजवानी दिलीस रे बाबा. समाधानाचा ढेकर आला; आणि भुक ही वाढली .
लता बाईंचा पंखा केशवराव.
25 Jul 2009 - 3:32 am | नाटक्या
१. तुने हाये मेरे जख्मे जिगर को छू लिया -
२. हाय.. चंदा गये परदेस..
३. हाये.. झिलमिल झिलमिल ये शाम के साये..
४. खनक गयो हाय बैरी कंगना..
५. नही लगता हाय दिल तेरे बिना...
६. मचल गया हाये मेरा दिल...
आठवतील तशी आणखी सांगेन...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
25 Jul 2009 - 8:04 am | क्रान्ति
श्रावणी संगीत महोत्सव आवडला. सगळीच गाणी एकापेक्षा एक आहेत. [फक्त हाय हाय ये मजबूरी हे एक मला न आवडणारं गाणं आहे.] दुव्यांमुळे दिवसाची सुरुवात खूपच मस्त झाली. अजून अशाच मेजवान्या मिळत राहो!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
25 Jul 2009 - 8:16 am | नंदा
लताबाईंच्या गाण्याचा हाही उपयोग! तात्यांनी हे गाणे उगाच नाही मुखपृष्ठावर टाकले:
सकाळ (http://beta.esakal.com/2009/07/25003058/pune-balaji-tambe.html) मधून साभारः
""ओ सजना बरखा बहार आयी' हे "परख' चित्रपटातील गीत रानडे यांनी गायले. त्यावर भाष्य करताना डॉ. श्री. तांबे म्हणाले, ""या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.''
;)
25 Jul 2009 - 8:24 am | क्रान्ति
मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.''
कचरा केला रे देवा इतक्या चांगल्या गाण्याचा! :( आळस दूर करण्यासाठी एवढंच सांगितलं असतं, तर काय बिघडलं असतं? :?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
3 Aug 2009 - 10:19 am | भडकमकर मास्तर
आळस दूर करण्यासाठी एवढंच सांगितलं असतं, तर काय बिघडलं असतं?
>>>>>
हम्म्म... म्हणजे आळस दूर करायला गाणे उपयुक्त आहे तर....!!!!
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
25 Jul 2009 - 5:54 pm | स्वाती२
श्या! कायच्याकाही लिहीतात हे तांबे.
27 Jul 2009 - 6:04 pm | भडकमकर मास्तर
श्या! कायच्याकाही लिहीतात हे तांबे.
ती वरची लिन्क फ़ार भन्नाट आहे.. प्रत्येक गाण्याचा शरीरावर होणारा परिणाम लिहिलाय...
उदा: हवा में उडता जाये हे गाणं नसा मोकळ्या करतं म्हणे..... ~X( ~X(
हसून हसून पुरेवाट होईल...
या लिन्कबद्दल धन्यवाद...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
25 Jul 2009 - 7:23 pm | विकास
मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.
स्वतःच्या आडनावाला उपयुक्त विचार त्यांनी व्यक्त केलेले दिसताहेत...
वास्तवीक मला असले टाँट मारायला आवडत नाहीत पण जर कोणी चांगल्या कलेचा (गाणे, गायन, संगीत सर्वच) असल्या काँमेंट्स ने विचका करत असेल तर त्याला साजेसे प्रतिसादच सुचणार.
25 Jul 2009 - 8:33 am | मुक्तसुनीत
धाग्यातली सर्व उदाहरणे आणि अनेकांच्या प्रतिसादातली गाणी : सुरेख ! फारच सुंदर धागा. सायंकाळ आनंदात गेली. मनःपूर्वक आभार.
25 Jul 2009 - 5:39 pm | सहज
हेच म्हणतो.
25 Jul 2009 - 6:07 pm | विनायक प्रभू
असेच बोलतो
27 Jul 2009 - 6:23 pm | डॉ.प्रसाद दाढे
सायंकाळ आनंदात गेली. मनःपूर्वक आभार.
'ओ सजना' ऐकल्यावर सकाळ कशी गेली असं विचारायला हवं आता.. बिच्चारा सलिल चौधरी!
बाकी अश्या 'सुपडा साफ गाण्यांची यादी ' असा एक नवीन धागा सुरू करायला हरकत नाही
27 Jul 2009 - 8:21 pm | प्रदीप
डॉक्टर साहेब,
लताबाईंचे कुठचेही गाणे रेचकासारखे असेल, तर हिमेश रेशमियाच्या गाण्यांना हे वैद्यबुवा काय म्हणणार? एरंडेल तेलाची बस्ति?
25 Jul 2009 - 5:37 pm | स्वाती२
वा! मस्त धागा आणि प्रतिसाद. आता सगळी गाणी ऐकत सकाळ छान जाईल.
25 Jul 2009 - 5:55 pm | तिमा
चांगला लेख आणि त्यामुळे चांगल्या आठवणी!
धन्यवाद! लतादिदी या मर्त्य माणसांत जमा नाहीत. त्या देवाने आपल्यासाठी (भारतातल्या गरीब बिचार्या प्रजेसाठी)स्वर्गातून पाठवल्या आहेत. त्यांच्या जवळपासही कोणाला पोचणे शक्य नाही हे आत्तापर्यंत सगळ्या कलाकारांना कळलेच असेल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
25 Jul 2009 - 8:45 pm | क्रान्ति
हे लताबाईंचे अजून काही घायाळ करणारे 'हाय'
घडी घडी मोरा दिल धडके
मोसे छल किये जाय
कारी बदरिया मारे लहरिया
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
26 Jul 2009 - 2:43 am | नंदन
सुरेख लेख. लेख आणि प्रतिसादातले गाण्यांचे दुवेही उत्तम. 'आयेगा आनेवाला' आणि बरसातच्या गाण्यांना या वर्षी साठ वर्षं होतील. खुद्द लताबाईही दोनेक महिन्यांत ऐंशी वर्षं पूर्ण करतील. या निमित्तानं तात्या, प्रदीप, डॉ. दाढे यांच्यासारख्या जाणकारांनी त्यांच्या गाण्यातल्या जागा, शब्दांचे परिणामकारक उच्चार याबद्दल अजून लिहिले तर बहार येईल.
माझ्या अल्पमतीप्रमाणे वानगीदाखल काही विषयांना तोंड फोडण्याचे धाडस करतो -
१. 'सांवरे सांवरे' मधल्या अखेरच्या तीस सेकंदातल्या अशक्यप्राय ताना; 'घनु वाजे घुणघुणा'मधल्या बागेश्रीतल्या आलापापासून ते सुनियो जी अरज म्हारी पर्यंत निरनिराळे आलाप. याच्या अगदी विरूद्ध टोकाचं उदाहरण द्यायचं तर सलील चौधरींच्या 'वो एक निगाह क्या मिली' मधल्या आवाजातली बॅलेरिनासारखी मॉड्युलेशन्स.
२. र/रा व ख/ख्व/नुक्तावाला ख सारख्या कठीण व्यंजनांचा स्वच्छ उच्चार - उदा. 'रात भी है कुछ भीगी भीगी' (या गाण्याबद्दल खरं तर स्वतंत्र लेखच होऊ शकेल. पाऽयल वरची जागा, 'चैनभी है कुछ हलका हलका' मधला खरंच पिसाइतका हलका उच्चार, पुढच्या कडव्यातल्या 'बेहोषी'चा धुंद उच्चार इ.); 'जब रात नहीं कटती' मधले विलंबित 'रा'चे सौम्य उच्चार जे एखाद्या सामान्य गायिकेने हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला असता तर बहुधा कानाला रूचले नसते [श्रेयअव्हेर : प्रदीप]; 'हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू' मधले रिश्तों, रुह, रेहने मधले 'र'चे स्पष्ट; इतरांप्रमाणे ल आणि र च्या मध्ये कुठेतरी न होणारे उच्चार.
३. लताबाईंच्या गाण्यातील अंडरप्लेबद्दल, गाण्यातला मूक आक्रोश संयतपणे जिवंत करण्याबद्दल वर लेखात उल्लेख आहेच. त्यांच्या काही गाण्यांतले शब्दही जणू त्यासाठीच लिहिले गेले आहेत असं वाटत राहतं. पटकन आठवणारी काही उदाहरणं अशी -
(उनको ये शिकायत है के हम) कहने को बहुत कुछ था अगर कहने पे आते, दुनिया की इनायत है के हम कुछ नहीं कहते; (कळा ज्या लागल्या जिवा) कुणाला काय हो त्यांचे, कुणाला काय सांगाव्या; (जाये तो जाये कहाँ) समझेगा कौन यहाँ, दर्दभरे दिलकी जबाँ; (यूं हसरतों के दाग) खुद दिलसे दिल की बात कही/होटों को सी चुके तो जमाने ने ये कहा, ये चुप सी क्यो लगी है अजी कुछ तो बोलिये; (कुछ दिल ने कहा) जीवन तो सूना ही रहा, सब समझें आयी है बहार; कलियोंसे कोई पूंछता, हँसती हैं वो या रोती हैं.
अर्थात ह्यात लताबाईंच्या गाण्यातला एक टक्काही अंतर्भूत होत नसावा; पण या निमित्ताने इतर कोणी अजून यावर लिहिले तर फारच उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Jul 2009 - 2:59 am | विकास
या निमित्तानं तात्या, प्रदीप, डॉ. दाढे यांच्यासारख्या जाणकारांनी त्यांच्या गाण्यातल्या जागा, शब्दांचे परिणामकारक उच्चार याबद्दल अजून लिहिले तर बहार येईल.
एकदम सहमत! अजून येऊंद्यात...
26 Jul 2009 - 10:39 am | विसोबा खेचर
नंदनसायबा,
तू तर छुपा रुस्तुम निघालास.. सुरेख प्रतिसाद लिहिला आहेस..
'तुम्ही गातसा सुस्वरे' हे प्रतिसादाचं शीर्षक अतिशय आवडलं. हे फक्त तुझ्यासारखा साहित्यप्रेमी व्यासंगीच देऊ शकतो..
तात्या.
26 Jul 2009 - 10:23 pm | डॉ.प्रसाद दाढे
वाहवा नंदनशेट खासच लिहिले आहेत तुम्ही! तुम्हीच आणखी लिहा अशी विनंती!
अवांतरः मला उगीचंच तात्या आणि प्रदीपसारख्या खर्या जाणकारांच्या ओळीत बसवताय.. मी पायरी ओळखून आहे :) मी फक्त कानसेन आहे
27 Jul 2009 - 12:17 pm | प्रदीप
"वाहवा नंदनशेट खासच लिहिले आहेत तुम्ही! तुम्हीच आणखी लिहा अशी विनंती!" अगदी सहमत.
"अवांतरः मला उगीचंच तात्या आणि प्रदीपसारख्या खर्या जाणकारांच्या ओळीत बसवताय.. मी पायरी ओळखून आहे मी फक्त कानसेन आहे" मीही .
17 Jul 2016 - 10:40 am | देशपांडे विनायक
असं दिसतंय
This video is unavailable.
Sorry about that.
26 Jul 2009 - 10:08 am | मनीषा
गाईड मधील -- "पिया तोसे नैना लागे रे...."
http://www.youtube.com/watch?v=3koQIDoNGMU&feature=related
26 Jul 2009 - 2:40 pm | प्रदीप
ह्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करणार्या, आणि माझ्या नजरेतून निसटलेली अनेक उदाहरणे दर्शवणार्या सर्वांचे आभार. अनेकांनी त्यातील जागा अधोरेखित केलेल्या आहेत, आणि नंदनने तर खास सविस्तर टिप्पणी केली आहे, हे सर्वच आवडले.
विकासः "लताने आयेगा आयेगा (२०+ वेळा वेगवेगळ्या ठेक्यात) आणि चलते चलते (४०+ वेळा वेगवेगळ्या प्रकारे) हे किती वेगवेगळ्या पद्धतीने म्हणलेले आहे सांगितले आहे. "
मला वाटते इथे मूळ घटना एकाकडून दुसर्याकडे वर्णित केली जात असता तिचा विपर्यास झाला असावा. एकतर पूर्वीच्या काळी गाणी बरीच रिहर्स केली जात व मगच टेक होई. बरेचदा एखाद्या गाण्याचे 'क्ष' टेक्स झाले असे विधान केले जाते, तेव्हा ते सर्व टेक्स संपूर्ण असतात असे नसते. कधीकधी दोन, फारतर फार तीन वर्शन्स केली जात असावीत, पण बहुधा टेक मधेच्य तोडले जात. त्याला कारणे अनेक-- गायक, गायिकांच्या चुका, वादकांच्या चुका किंवा संगीत दिग्दर्शकाला एकाद्या विशीष्ट जागी हवा तसा परिणाम न येणे. तसेच अगदी पूर्वी एकच गाणे दोनदा रेकॉर्ड केले जाई- एक, ऑप्टिकलसाठी (म्हणजे फिल्ममध्ये समाविष्ट करण्यासाठी फिल्मच्या (स्वतंत्र) निगेटिव्हवर आणि दुसरे ग्रामोफोन रेकॉर्डवर वितरीत करण्यासाठी मॅग्नेटिक टेपवर. ही प्रथा म्हणे सुमारे १९५७- ५८ सालापर्यंत सुरू होती. अशी दोनदा रेकॉर्ड केलेली काही गाणी दोन वेगळी व्हर्शन्स असावयाची.
26 Jul 2009 - 11:52 pm | ऋषिकेश
हाय हाय प्रदीपराव! तुमच्या या धाग्यात मस्त गाण्याची मैफील होऊन गेलेली दिसतेय..
मस्त लेख आणि प्रतिक्रीया.. हाय! मजा आ गया!
(हाय बाय पंथातील) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
16 Jul 2016 - 7:37 pm | नूतन सावंत
हाय!हाय! हा लेख कुठे लपला होता बरं!सुरेख लेख.
16 Jul 2016 - 7:43 pm | बोका-ए-आझम
वय वय वय मेरी जां मेरी जां
प्यार किसीसे हो ही गया है
हम क्या करे
हे यहुदी मधलं अफाट गाणं आहे.
16 Jul 2016 - 8:50 pm | मितभाषी
.
16 Jul 2016 - 11:07 pm | भक्त प्रल्हाद
Hay,
Bugadi mazi sandali ga.
He gana rahila ki.
16 Jul 2016 - 11:38 pm | नूतन सावंत
हा हाय लताबाईंचा नसून आशाताईंचा आहे.
17 Jul 2016 - 12:29 am | भक्त प्रल्हाद
Ata matra haay khaayachi paali amachyawar aali aahe.
17 Jul 2016 - 12:43 am | चंपाबाई
ओ रामजी ... बडा दुख दीना
हाय राम कुडियो को डाले दाना
17 Jul 2016 - 6:31 pm | नूतन सावंत
हाय राम,रामा रामा गजब हुई गँवा रे.-नया जमाना.हे पण आहे.एकटा हाय रामाच्या जोडीने आला की त्याचा अर्थच बदलून जातो,असे वाटते.
17 Jul 2016 - 10:28 am | पद्मावति
सुरेख लेख!
17 Jul 2016 - 10:42 am | देशपांडे विनायक
छान लेख आणि प्रतिसाद
17 Jul 2016 - 12:00 pm | चतुरंग
प्रदीपदांचा हा 'हाय' नजरेतून कसा सुटला होता कोण जाणे? धन्यवाद प्रदीप! :)
धागा सापडताच पहिल्यापासून एकेक गाण्याची लड उलगडायला सुरुवात केली. संध्याकाळ सार्थकी लागली!
यातल्या कित्येक गाण्यांना साठपेक्षा अधिक वर्षे होऊन गेली आहेत यावर विश्वास बसत नाही. अवीट गाणी ती हीच!
वरती लेखात सांगितलेलं हंसराज बहेल साठी गायलेलं 'हाय, जिया रोये' हे राग दरबारी मधलं आहे.
अनुराधातल्या राग कलावतीवर अधारित 'हाय, रे वो दिन क्यूं ना आये' या गाण्यातला लीला नायडू आणि बलराज साहनीचा अभिनय म्हणजे अशा गाण्यासाठी काम कसं करावं याचा वस्तुपाठ आहे. प्रत्येक ओळीत लताच्या जीवघेण्या आवाजाला आणि लीला नायडूच्या तितक्याच सुरेख अभिनयाला बलराजचं अधिकाधिक दुर्लक्ष करत वाचत बसणं, चेहेर्यावरली बेफिकिरी आपल्यालाच इतकी असह्य होते की शेवटी ओरडून सांगावेसे वाटते की अरे उदासीन माणसा जरा तिच्याकडे बघ!!
'हाय रे तेरे चंचल नैनवा' मधला बेकरार - या शब्दातला 'क' फक्त लताबाईंनीच उच्चारावा __/\__
हमजोली मधलं 'हाय रे हाय, नींद नहीं आये' हे देखील सुंदर म्हंटलं आहे रफी आणि लता आहेत. यातला हाय अनेक वेगवेगळ्या प्रकारे गायलाय.
(शिवाय बोनस म्हणजे जितू भैय्या आणि लीना चंदावरकर यांच्या तद्दन नाचाने गाण्याला वेगळीच खुमारी आणली आहे! ;))
दो फूल सिनेमातलं 'हाय घबराये रे बिन तेरे मेरा मन' हे वसंत देसाईंचं संगीत असलेलं गाणंही सुरेख आहे.
(या गाण्याची चाल आणि काही सुरावटी दो आंखे बारह हाथ मधल्या 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या गाण्याची आठवण करुन देतात, त्याचंही संगीत वसंत देसाईंचंच आहे! प्रत्येक संगीतकार त्याची सिग्नेचर त्याच्या गाण्यात कुठेनाकुठे सोडतो असे मला वाटते. मदनमोहनची बरीचशी गाणी लगेच ओळखू येतात त्याची सिग्नेचर असतेच असते! असो विषयांतर नको.)
धागा वाचनखूण म्हणून साठवलाय! :)
-रंगा
22 Jul 2016 - 2:53 am | महामाया
अरे उदासीन माणसा जरा तिच्याकडे बघ!!
अनुराधा मधे टीम चं काम मस्त जमलं होतं...
टीम वर्क इज बेस्ट...
लीला ताई लई म्हणजे लईच सिंपल दिसल्यात की...
चित्रपट क्षेत्रात नवख्या असून देखील त्या बलराज साहनी समोर तसूभर कमी नव्हत्या...
22 Jul 2016 - 10:32 pm | पद्मावति
......अगदी, अगदी...
प्रचंड सहमत.
सिंपल आणि timeless ब्यूटी.
17 Jul 2016 - 12:34 pm | पैसा
हाए.... म्हणून एक नि:श्वास टाकला फक्त धागा आणि त्यातली गाणी पाहून.
19 Jul 2016 - 1:12 pm | सस्नेह
लागे ना मोरा जिया
सजना नही आयी, हाये...
20 Jul 2016 - 4:02 pm | शान्तिप्रिय
छान लेख! आवडला.
उत्तम संकलन!