आठवणी पावसाळ्याच्या

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
11 Jul 2009 - 3:15 pm

पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती.

आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा. विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे, त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी-रिकामी वाटायची.

पावसात विहीरीत पोहायची मजा भारीच असते. आम्ही पोहायचो म्हणजे नुसत्या उड्या मारायचो. मग उड्यांचे बरेच प्रकार... डुब्बा (हात-पाय पोटाच्या जवळ घेवुन)... सूर (हात, पाय आणि पोट एका सरळ रेषेत ठेवुन)... मांडी (मांडी घालुन)... कोलांटी उडी आणि अश्या बय्राच विचीत्र उड्या. कोणाच्या उडी मुळं जास्त पाणी उडतय, ह्यासाठी जाम धडपड असायची. एकमेकांना बुडवायची धडपड, विहीरीचा तळ काढायच्या पैजा, कोणाची चड्डीच ओढ तर कोणाच्या बापाच्या नावा वरुन चिडवा-चिडवी हे सगळ चालुच असायच. आम्ही तासं तास पोहायचो आणि मग दमलो की घरी जावुन जेवायचो. जेवण झाल की कोणाच्या तरी घरी जमुन गोट्या, कँरम किंवा पत्ते खेळण्यात दिवस जायचा.

पावसात बरच पाणी माडांच्या शेंड्यात साठुन राहत आणि मग पाऊस थांबला तरी ते एक एक थेंब करुन ठिपकत राहत. पाऊस थांबला की ते थेंब तोंडात झेलण्या साठी मी तोंड आ करुन माडा खाली उभा राहायचो. हा प्रकार करताना मान जाम दुखायची, मग थोडा वेळ इकड-तिकडं बघायच आणि परत आ करुन माडाच्या शेंड्या कड. गोट्या खेळायला मित्र जमुसपर्यंत माझा हा उद्योग चालु असायचा.

आमच्या घराला पडवी नव्हती. पावसाची झड लागु नये म्हणुन, आम्ही दर पावसाळ्यात अंगणात पडवी बांधायचो. पोफळीच्या लाकडाचा उतरत्या छपराचा सांगाडा आणि त्यावर झावळ्या (पोफळीच्या फांद्या) घातल्या की पडवी तयार व्हायची. मग, पावसाचं पाणी झावळ्यांच्या टोकां मधुन पडताना बघायला मजा यायची. जोराचा पाऊस पडत असताना, पडवीत उभं राहुन मी तो पाऊस बघायचो आणि ऐकायचो (सोबतीला कोंबड्या, मांजरं, कुत्री आणि गोगलगाया असायच्या).

पावसात स्लीपर घालुन गावात भटकुन घरी आल की कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडलेले असायचे (सकाळी दात घासुन झाल्यावर, ब्रश झटकल्या वर भींतीवर पाण्याचे शिंतोडे उडतात तसच..). बऱ्याचदा रस्त्यावरुन जाताना मागच्या पायातली स्लीपर चिखलात रुतुन बसायची आणि मग जर स्लीपर ओढायचा प्रयत्न केला तर... एकतर ती नीघायची आणि रस्त्यावरचा सगळा चिखल मागच्याच्या अंगा-खांद्यावर (आणि मग मागचा.... ये वाय. जेड. दिसत नाही का तुला?..असलं काही तरी ऐकवायचा)... नाहीतर स्लीपरचे मागचे दोन्ही बंध निघायचे आणि स्लीपर चिखलात रुतुन बसायची (आता एका पाया वर कसरत करत ती स्लीपर चिखलातुन काढुन तीचे मागचे दोन्ही बंध परत लावायचे म्हणजे एक वेगळच रामायण असायच). तर हा सगळा व्याप वाचावा म्हणुन आम्ही एक उपद्व्याप करायचो. पावसात रेवदंड्यातल्या दुकानात दोन बोट लांब आणि जरा जाड असं रब्बर मिळायच, ते आम्ही आणायचो. मग स्लीपरचे मागचे दोन्ही बंध काढायचे, रब्बर दोन्ही बंधात अडकवायच आणि बंध परत लावायचे. आता पायात स्लीपर घालायची आणि रब्बर टाचे वर चढवायच, झाली की मग सँडल तयार. आता पावसात पण मोकाट हींडता यायच.

पावसात बय्राचदा समुद्रावर फिरायला जायचो. पुळण भिजलेली असल्यामुळ समुद्र जरा जास्तच जवळ आल्याचा भास व्हायचा. पावसात, समुद्र जाम खवळलेला असतो, पाणी गढुळ असत, जोराचा वारा असतो, मुसळ्धार पाऊस असतो, आकाश ढगांमुळ काळकुट्ट झालेल असत आणि रोजची गर्दी नसते त्यामुळ वातावरणात थोडा एकांत, थोडी भिती आणि भरपुर रोमांच असतो. समोरचा समुद्र जरी जाम खवळलेला असला तरी आपल डोक मात्र फार शांत असत.

अश्यावेळी मधुनच एखाद कुत्र आपल्या सारखच भिजत हींडताना दिसायच. त्याच्याकड बघुन त्याला थंडी वाजतीय ह्याची जाणीव व्हायची, मग मधेच ते आपल अंग झटकुन थंडी जरा दुर सारायचा प्रयत्न करायच आणि ते बघून खरच थंडी जरा कमी झाल्या सारखं मलापण वाटुन जायच. ते कुत्र येवढ्या पावसात काही खायला भेटतय का हे शोधत हींडत असायच आणि मी काही कारण नसताना हींडत असायचो.

अश्या बय्राच आठवणी दर पावसाळ्यात जिवंत होतात आणि मग, मी दर weekend ला सह्याद्रिच्या कडे-कपाऱ्यांमधे भटकून नविन आठवणींची साठवण करत असतो.

हे ठिकाणराहणीमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jul 2009 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

विमुक्त, मस्त वाटलं वाचायला. गावातले पावसाचे वातावरण अगदी डोळ्यसमोर उभे केले. विहिर, पडवी, माड, पागोळ्या... झक्कास्स्स्स!!! नेहमी नेहमी लिहित रहा. :)

बिपिन कार्यकर्ते

विमुक्त's picture

11 Jul 2009 - 9:02 pm | विमुक्त

मी प्रथमच लिहईलय काहीतरी.... आता लिहीन नेहमी... :-)

अनामिक's picture

11 Jul 2009 - 8:02 pm | अनामिक

विमुक्त, छान लिहिल्यात पावसाळ्याच्या आठवणी. मी सुद्धा इथे आठवणीतल्या पावसाबद्दल खरडलंय.... जमल्यास वाचा!

-अनामिक

मदनबाण's picture

11 Jul 2009 - 8:18 pm | मदनबाण

विहीरीतील पोहण्याचे वर्णन फार फार आवडले. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

रेवती's picture

11 Jul 2009 - 9:32 pm | रेवती

कोकणातल्या पावसाचे मस्त वर्णन!
खरच, नेहमी अश्या आठवणी लिहा.
आम्हीही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत काकांकडे कोकणात जायचो ते सगळा उन्हाळा संपून पाऊस सुरू होताहोता परतायचो. त्यावेळी जूनच्या सुरूवातीला असा एखाद् दुसरा पाऊस अनुभवायला मिळायचा त्याची आठवण आली. आपल्या लेखनाने आठवणीतला पाऊस जिवंत झाल्यासारखे वाटले.

रेवती

प्राजु's picture

11 Jul 2009 - 9:47 pm | प्राजु

अश्या बय्राच आठवणी दर पावसाळ्यात जिवंत होतात आणि मग, मी दर weekend ला सह्याद्रिच्या कडे-कपाऱ्यांमधे भटकून नविन आठवणींची साठवण करत असतो.

खास!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

11 Jul 2009 - 10:08 pm | टारझन

झकास , शैली आवडली आहे , मस्त सुरळीत पण जसं आठवलंत तसं लिहीलंत, कुठेही आपला लेख छापुन आल्याची बातमी दिलेली नाहीत (आता तो आला नसेल हा भाग अलहीदा) पण फुक्कटची अलंकारीक भाषा न वापरता वाचताना प्रभावित झालो . अजुन लेख येउन द्या ..

आम्ही सुद्धा पावसाळ्यात पाझर तलाव आणि विहीरी धुंडाळत फिरायचो .. गावाच्या आजुबाजुची एकही विहीर आम्ही सोडली नव्हती !! आम्ही मुटका आणि सुळ (सुर) स्पेषालिष्ट , मुटका मारताना (शब्द निट वाचावेत) आम्ही पाणि तर जास्त उडवायचोच पण आवाज ही एक णंबर निघे .
(मास्तरधार्जिण्या लोकांनी ह्या वाक्यात क्रिप्ट शोधत बसू नये)

आणि हो,

विहीरीतले मासे पाऊस लागु नये म्हणुन तळात जावुन बसलेले असायचे, त्यामुळं तुडुंब भरलेली विहीर सुद्धा रिकामी-रिकामी वाटायची.

हे वाक्य हृदयाला भिडले .

- टारझन (प-टा-आ)

अवलिया's picture

11 Jul 2009 - 11:12 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया
=================
सहजराव पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.

चतुरंग's picture

12 Jul 2009 - 5:43 am | चतुरंग

पावसाळ्याचे वर्नन, पोहोण्याची मजा सगळेच अगदी अगदी सुरेख. एकदम मनात जसे येत जाईल तसे लिहिले आहेस त्यामुळे अगदी गप्पा मारल्यासारखे वाटले.
पहिल्यांदाच लिहिलं आहेस. आता नेहेमी लिहीत जा. शुभेच्छा! :)

(सूरमारे)चतुरंग

रामदास's picture

12 Jul 2009 - 2:29 pm | रामदास

लेख सुंदर जमला आहे.विहीरीवर पोहणे म्हणजे अत्यानंदाची बाब.दरवर्षी नवशिकी मुलं यायची.त्यांना डुब्बा मारायला शिकवायचं.कपबशीचा फुटका चिपोरा पाण्यात टाकून तळ गाठायचा.विहीराच तळ काढणे हा थरारक आणि अट्टल पोहणार्‍यांसाठी राखीव असा अनुभव.आता गावतल्या गणपतीच्या दिवसांच्या आठवणी जरूर लिहा .आपल्या लेखाची वाट बघतो आहे.
अवांतर : श्रावण येता येता घुले पडायला सुरुवात व्हायची,नळेच्या कौलाची घरं असली की जास्त घुले जमायचे.आदल्या दिवशी काही नसायचं दुसर्‍या दिवशी छत घुल्यांनी भरून गेलेलं असायचं.शाळेत जाताना दांडीवरचे वाळलेले कपडे (जास्त करून युनीफॉर्मची प्यांट आणि लंगोट)तपासून घ्यावे लागायचे.तरी सुध्दा एखादं दिवशी घुला आत रहायचाच.पुढे काय काय व्हायचं हे कळायला घुला अंगाला लागायलाच हवा.

विमुक्त's picture

13 Jul 2009 - 11:59 am | विमुक्त

तुम्हाला आवडलं..... सहि... जाम आनंद झाला... प्रोस्ताहना बद्दल आभारी आहे... :-)

पाऊसवेडी's picture

13 Jul 2009 - 5:45 pm | पाऊसवेडी

सुंदर लिहिले आहे
माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे हा
अगदी लहानपणी माझं गावी आम्ही भिजायचो ते आठवले मला

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे ना मंजूर

विमुक्त's picture

13 Jul 2009 - 6:07 pm | विमुक्त

trekking च्या ध्यासा मुळं दर पावसाळ्यात मनसोक्त भिजतो..... पण विहीरित पोहायचा chance मात्र आता मिळत नाहि....

यशोधरा's picture

13 Jul 2009 - 5:52 pm | यशोधरा

खूप छान लिहिलं आहे. आवडलं.

दशानन's picture

13 Jul 2009 - 6:53 pm | दशानन

सुंदर अनुभव लेखन !
मला ही विहीरी मध्ये / नदी मध्ये पोहणे खुप आवडतं... पण ना दिल्ली ला विहीरी आहेत ना पोहण्यालायक नदी.. त्यामुळे वर्षातुन कधी घरी जातो तेव्हा मात्र पंचगंगेत मनसोक्त पोहून घेतो व गावी गेल्यावर विहीरीमध्ये :)

टुकुल's picture

14 Jul 2009 - 2:27 am | टुकुल

पावसाळ्याच्या आठवणीत भिजवलस...
लहानपणी (आणी आता सुध्दा) घरुन पोहायला खुप विरोध.. त्यामुळे अशा जागा शोधाव्या लागत जिथे विवस्त्र पोहता यायच.. :-) बर्‍याच वेळी पावसाळ्यात खोलगट भागात पाणी साचुन छोटी छोटी तळी बनत आणी ति जास्त खोल नसल्याने आम्हाला भरपुर आनंद..पण माहीत नाही कसे पण घरच्यांना खबर लागायची आणी मग आमची धुलाइ...
एकदा विहिरित पोहत असताना घरी कुणीतरी जावुन सांगितले, आई नि मोठ्या भावाला बघन्यासाठि पाठवले... आमची बंधुराज थोर..
"तु बाहेर ये लवकर".. मि: "थांब २ मि.".. पाच मिनिटांनंतर त्यानी वरतुन दगड धोंडे मारायला सुरुवात.. मग काय.. पाण्यात बराच वेळ खोलवर डुबक्या मारत होतो.. वर आलो कि परत एखादा दगड येताना दिसायचा.. नशीब बलवत्तर म्हणुन कुठे काही लागले नाही..
(आता तो म्हणतो कि तुझ्या बरोबर पोहायला शिकलो असतो तर बर झाल असत, बिचार्‍याला अजुन पोहता येत नाही :-) )

-- टुकुल.