(ही कुणाचीच कैफियत नाही. हा आहे फक्त एक प्रयत्न, अनेक वर्षे जे पाहिले आणि त्यातुन जे जाणवले, ते शब्दात मांडण्याचा. वाचा, वाटले तर विचार करा, वाटलेच तर नजरेआड करा. माझे असे काहीच म्हणणे नाही. अन्यत्र पुर्वप्रकाशित झालेल्या माझ्याच लेखावर आधारित असे हे लिखाण आहे.)
त्याचे नाव बहुधा राम असावे, किंवा रहमत, किंवा रफाएल! रामशरण असेल नाहीतर रणबीरसिंग. असो! आपल्याला काय त्याचे. तसे त्याच्या घरचे लोक आणि काही जिवलग सोडले तर कुणालाच त्याच्या नावाशी काहीच घेणेदेणे नाही. सहकारी अन वरिष्ठांच्या दृष्टीने त्याची ओळख म्हणजे केवळ एक संख्या, एक क्लास फोर एम्प्लॉई - दिवसाचे किमान बारा तास काम करणारा अन महिन्याला सरासरी पाच ते सहा हजार पगार मिळणारा.
तो आहे एक कॉन्स्टेबल, पोलिस शिपाई. इंग्रजांनी बांधलेल्या नोकरशाही व्यवस्थेचा पायाचा दगड, वरच्या सगळ्या चिरेबंदी बांधकामाचे ओझे कायम उरावर वाहुनपण कायम नजरेआड उपेक्षित रहाणारा. पांडु, सखाराम, मामा अश्या अनेक नावांनी समाजात ओळखला जाणारा. अनेकजणांच्या मते सरकारने पोसलेला वर्दीतला गुंड. गुन्हेगार, वेश्या, मटकावाले, दारुधंदेवाले हे सगळे समाजकंटक आणि लब्धप्रतिष्ठीत समाज यातला एकमेव दुवा. असा दुवा की जो स्वतःच समाजापासुन तुटत चाललाय, ज्याची स्वतःचीच ओळख हरवली आहे! असो!!
आपला कथानायक शिपाई बी कॉम झालाय. जसे ऐंशी टक्के शिपाई असतात तसाच, मराठी माध्यमातुन. तो रहातो एका सरकारी इमारतीत. तिला सगळे लाईन म्हणतात. ते आहे एक जीर्ण झालेले चाळवजा बांधकाम, बहुधा इंग्रजांनी भारतात पोलिस दल उभारले तेव्हाच तिची अखेरची डागडुजी झालेली असावी. तिथे अंधार्या, गळक्या दोन खोल्यात तो रहातो म्हातारे आई-वडील, बायको, दोन मुले, बेकार भाऊ अन बहिणीबरोबर. त्याच्या घराला तो क्वार्टर किंवा ब्लॉक म्हणतो पण त्याला अॅटॅच्ड संडास किंवा बाथरुम नाही. इमारतीतली चाळीस कुटंबे वापरतात प्रत्येक मजल्यावर दोन्-दोन असे बांधलेले आठ समाईक संडास अन बाथरुम. अर्थातच तिथे कायम लाईन असते. इमारतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत खरेतर समाईक बाग करता आली असती पण त्या जागेचा काही भाग लाईनमधे उभे रहाण्याएवढा धीर नसलेली मुले वापरतात तर एका कोपर्याचा वापर सार्वजनिक कचराकुंडीसारखा होतो. उरलेल्या जागेत मुले बॅट्-बॉल, पकडापकडीसारखे खेळ खेळतात, जर टीव्ही पहात नसतील किंवा ईतर कुठे उनाडक्या करीत नसतील तर.
पण घराबाबत तो नशीबवान आहे. त्याचे वडील भरती झाले तेव्हापासुन ते त्यांच्या ताब्यात आले. ते जमादार (सहाय्यक पोलिस फौजदार) म्हणुन रिटायर झाले तेव्हा तो भरती झाला होता. मग वडिलांनी कमीशनर ऑफिसातल्या प्रशासन विभागात काम करणार्या हेडक्लार्कच्या हातात पाच हजार ठेवले अन तीच क्वार्टर त्याच्या नावावर झाली. त्या क्वॉर्टरचे तो महिन्याला दीडशे रुपये भाडे भरतो पण क्वार्टर असल्याने त्याला पाचशे रुपये घरभाडे भत्ता मात्र मिळत नाही. तरीही त्याची अवस्था त्याच्या अनेक सहकार्यांपेक्षा बरीच म्हणायची. ते झोपडपट्टीत रहातात अन पाचशे रुपये घरभाडे भत्ता घेऊन झोपडीच्या भाड्यापोटी १३०० रुपये भरतात.
तो काम करतो ते पोलिस स्टेशन आहे त्याच्या लाईनपासुन सात किलोमीटरवर. हा प्रवास तो बसने करतो. एका वेळच्या प्रवासाला त्याला सुमारे पाऊण तास वेळ लागतो. रात्रपाळी असेल, बंदोबस्त असेल तेव्हा तो स्वतःच्या मोटारबाईकवरुन पण कामाला जातो.
***
आपला शिपाई सध्या दिवसपाळीवर आहे. म्हणजे त्याची ड्यूटी सकाळी नऊ ते रात्री नऊ आहे. पण काल त्याची ड्यूटी रात्री एक वाजता संपली, दिवसभर कुण्या मसण्या देशाचा एक राजकारणी आला होता म्हणुन बंदोबस्त होता. आपल्या शिपायाला त्याचे नाव माहिती नाही, कुणी सांगितलेच नाही. अन सांगितले असते तरी त्याला ते कुठे उच्चारता येणार होते. त्याला तो राजकारणी माहिती आहे त्याला पोलिस दलाने दिलेल्या टँगो या कोडनावाने. असो! तर आपला शिपाई दिवसभर रस्त्यावर उभा राहीला होता, व्हीव्हीआयपीच्या कॉन्व्हॉयच्या रस्त्यात कोणी आडवा येवू नये म्हणुन, रस्ता अडवल्याने वैतागलेल्या पब्लीकबरोबर वाद घालत. तो राजकारणी पाच वाजताच परत त्याच्या देशाला गेला पण बंदोबस्त संपल्याचे जाहीर करायचेच कोण अधिकारी विसरला त्यामुळे आपला शिपाई तिथे तसाच उभा राहीला रात्री साडेबारा वाजता वरिष्ठ अधिकार्याच्या धुंद्-तर्राट आवाजात "बंदोबस्त क्लोज. डिसमीस." असा हुकुम ऐकेपर्यंत. घरी पोचेपर्यंत सव्वा वाजला अन बायकोने झाकून ठेवलेले गारढोण अन्न गिळुन झोपायला दोन.
साहजीकच दिवसपाळी असताना सकाळी सहा वाजता उठून सात वाजता बाहेर पडणार्या अन आठ वाजता पोलिस स्टेशनात हजेरीला उभ्या रहाणार्या आपल्या शिपायाला आज उठायला उशीर झाला. मुले आधीच शाळेला गेलीत, नेहमी जातात तशीच. पोलिसांची मुले त्यांना कायम दिसतात ती झोपलेलीच. बापाकरता बहुधा ती झोपेतच वाढतात. रात्री पोलिस घरी जाईपर्यंत उशीर झालेला असतो त्यामुळे मुले झोपलेली असतात अन सकाळी बापाला उठून कामावर जायची गडबड असल्याने त्यांच्याकडे बघायलाच वेळ नसतो. मग कधीतरी पोलिस बघतो मोठया झालेल्या आपल्या मुलाला पोलिस स्टेशनमधे, टर्रेगिरी करुन पकडुन आणल्यावर अन वरिष्ठांच्या हातापाया पडुन सोडवतो. नंतर घरी आल्यावर मग निघते कांडात मुलाचे. हे ही नेहमीचेच... असो!!
तर सांगायचा मुद्दा असा की आपला शिपाई आज उशीरा उठला. चहा घेताना बायकोची टकळी सुरु झाली , "आपल्या बाब्याच्या शाळेतुन निरोप आलाय बाईंचा भेटायला या म्हणुन. त्याने म्हणे शाळेत शेजारी बसणार्या मुलाला मारले, डोके फुटेपर्यंत अन त्याचा पेन हिसकावुन घेतला. चाचणी परिक्षेत नापास पण झालाय. अभ्यास कर म्हणते पण माझे ऐकत नाही. तुम्ही काही लक्ष घाला नाहीतर एखाद्या दिवशी तुमच्यावरच त्याला अटक करायची पाळी येईल. आपल्या मुलीची पण क्लासची फी भरायची राहीलीय तीन महिने. क्लासवाले नाव काढून टाकू म्हणताहेत. ती फी भरायला पैसे हवेत तेव्हडे बघा. पुढचे वर्ष दहावीचे आहे. आत्तापासुन काळजी घ्यायला हवी. सासुबाईंचा दमा पण खूप वाढलाय. औषध आणायला पैसे हवेत. तुमच्या वडिलांना जरा समजावून सांगा, दिवसभर पीऊन पडलेले असतात...." कान किटले तसा आपला शिपाई वैतागला अन, "ये! गप ए भवाने! का सकाळी सकाळी कार माडलाय. तिच्यायला तिच्या!" म्हणत आंघोळ आटोपुन पळाला ड्युटीवर हजर व्हायला.
शिपाई पोलिस स्टेशनला पोचला तर हजेरी आधीच संपलेली. मग डीओ (डीव्हीजनल ऑर्डर्ली) पुढे उभा राहीला तर त्याचा माज. डीओ खूप खडुस. आपल्या शिपायाने समोर जाताच दहाची पत्ती सरकवली तरी, "का रे फो*** माजला का रे? वेळेवर का आला नाही? चल आता साहेबांपुढे." म्हणत इन्पेक्टरपुढे उभे केले. रेड्यागत माजलेल्या इन्पेक्टरची रात्रीची उतरायची होती अजुन. जडावलेले लालबुंद डोळे शिपायाकडे फिरवुन तो गुरकावला, "मा****! तुला जादाच चरबी आली का रे? सारु का मेमो उशीरा आल्याबद्दल? तुझ्या*****, भ** एकतर मागल्या दोन महिन्यात मंथली कमी आणतोस, कामगिरी ** काय नाय अन वर ड्युटीवर उशीरा येतो काय? बघीन बघीन अन लावीन घोडा. लक्षात ठेव." होय साहेब म्हणत शिपाई सटकला तो सऱळ पोलिस स्टेशनबाहेर.
तसाच गेला तो दाम्या दारुवाल्याकडे. मळमळ काढायची होती ना? "या साहेब! बसा! ए बारक्या चहा सांग," म्हणत दाम्याने त्याचे स्वागत केले पण शिपाई घुश्श्यातच होता. "ए आ*** चहा जाऊ दे गा च्या गा त. आधी हफ्ता काढ. अन यावेळी सगळे पैसे हवेत साहेब लय शिव्या घालतोय," शिपाई. दाम्याने गयावया केल्या तर त्याला रेड करुन धंदा बंद करायचा दम भरला अन पाच हजार खिशात घालुन बाहेर.... मग मंग्या मटकेवाल्याकडुन सात हजाराची वसुली, पाच सात बारा सतरावाल्या (रस्त्यावर उभे राहून धंदा करणार्या वेश्या) सांभाळणार्या चंदीकडुन साडे अकरा हजार, रस्त्यावर गाड्या लावणार्या दहा बारा फेरीवाल्यांकडुन प्रत्येकी तीनशे असे पैसे गोळा करुन पोलिस स्टेशनला परत तर इन्पेक्टर कुणाशी तरी फोनवर बोलत होता. "तसे नाही साहेब. गेल्या महिन्यात चांगल्या पंधरा रेड केल्या त्याने धंदेवाले वैतागले होते म्हणुन वसुली कमी झाली. आज पाठवलेय स्टाफला वॉर्निंग देवुन की सगळी लोकं पाठवलीत वसुली करायला. संध्याकाळी देतो पाठवून पाकीट. तेव्हढे आपली बदली क्राईम ब्रँचला करायचे मात्र बघा...." इन्पेक्टरच्या रायटरने सगळे पैसे घेतले मोजुन अन शिपायाच्या हातावर टिकवले हजार रुपये. चला तेव्हडीच मुलीच्या फी ची सोय झाली.....
रात्री ड्युटी संपताना शिपायाच्या वर्गमित्र साठेचा फोन आला. तो कुठल्याश्या फॉरिन कंपनीत मॅनेजर आहे. रात्री तु, मी, तो आपल्या वर्गातला इस्टेट एजंट झालेला सगळगिळे सगळे दारु पीवु, ये म्हणुन. येतो म्हणुन गेला अन बसला क्वार्टर मारत. बिल सगळे साठे अन सगळगिळेने दिले. "साले आपल्याबरोबरच शिकले. पण आता खोर्याने पैसा ओढतात अन आपण बसलोय पीआयची वसुली करत," शिपाई दारु पीताना विचार करत होता.
***
शिपाई दुपारी कोपर्यावरच्या हातगाडीवर चहा पीत होता तर त्याला पिकपॉकेट सलिम रस्त्याने जाताना दिसला. शिपायाने त्याला हाक मारली अन जरबेत विचारले, "क्यों बे! बहोत मस्ती आ गयी क्या? कन्नी काटके जा रहा था? डालु क्या अंदर? चल कुछ माल निकाल." सलिमने दहा रुपये हातात ठेवले अन गयावया केली अम्मी आजारी आहे, डॉक्टरकडे न्यायचेय, जाऊ दे म्हणुन. जरा ताणल्यावर म्हणाला, "वो अपनी झोपडपट्टीमे रामखिलावन है ना? उसने किधर तो भी बडा हाथ मारेला है. बहोत खर्चा कर रहा है." शिपाई तसाच इन्पेक्टरकडे गेला अन त्याला सगळे सांगीतले. इन्स्पेक्टर म्हणाला, "हं! गेल्या महिन्यात ती सोसायटीत घरफोडी झाली ना? त्यात घेऊन टाकु त्याला." मग शिपायाने जावुन रामखिलावनला आणले बोलावुन अन इन्स्पेक्टरच्या रायटरने रंगवले कागद की गस्त घालताना इन्स्पेक्टरला रामखिलावन रस्त्यात दिसला, त्याने चाकु दाखवला पण इन्स्पेक्टरने त्याला शिताफीने पकडला. रामखिलावनने चोरी कबुल केली अन माल पण काढुन दिला म्हणुन. प्रेस नोट पण काढली. दुसर्या दिवशी पेपरात बातमी, "हत्यारबंद चोर इन्स्पेक्टर खोटे अन त्यांच्या पथकाने जिवावर उदार होऊन पकडला" अशी. इन्स्पेक्टर, त्याचा रायटर, त्याच्या घरी वरकाम करणारा ऑर्डरली सगळ्यांची नावे आली छापुन पेपरात शिपायाचे मात्र नव्हते त्यात. परत वर बायकोने पेपर दाखवला अन म्हणाली तुम्ही कधी अशी मोठी कामगिरी करणार देव जाणे! त्याच्यायला त्या खोट्याच्या *******
****
शिपाई आज रात्रपाळीवर. रात्री फोनजवळ बाकड्यावर झोपला होता. पलीकडे संशयावरुन पकडलेला एक भिकारी घोरत होता अन लॉकअप मधे पकडुन कोंडलेल्या वेश्या गिल्ला करत होत्या. मधुन मधुन वायरलेस खरखरत होता. तेव्ह्ड्यात फोन वाजला. शिपायाने घेतला तर दोन चौक पलीकडे अपघात झालेला अन जखमी दुचाकीस्वार रस्त्यात बेशुद्ध पडलेला. शिव्या घालत शिपाई उठला अन घटनास्थळी गेला. एका रिक्षावाल्याला दम भरला अन त्याच्या गाडीतुन सरकारी दवाखान्यात सोडला त्या जखमीला. दोन तास गेले त्यात अन रिक्षाभाडे अन सरकारी दवाखान्यातल्या वॉर्डबॉयची लवकर अॅडमिट करुन घेण्याची चिरिमिरी म्हणुन शंभर रुपये खर्च झाले. "तिच्यायला ही नाईट शिफ्ट परवडत नाही," शिपाई तळतळला अन परत पोलिस स्टेशनला आला तर तिथे एकजण आलेला माझे पाकीट मारले बसस्टँडवर म्हणुन. एकतर शिपायाला झोप अनावर झालेली अन त्यात तो जंटलमंटल माणुस खरखर करायला लागला लवकर फिर्याद घ्या म्हणुन. सटकला शिपाई अन घातल्या त्याला आई माई वरुन शिव्या. त्याची फिर्याद उतरतो तर एकजण आला त्या नेहरुनगर झोपडपट्टीत एकजण दारु पिऊन दंगा करतोय म्हणुन. शिपायाने दिले त्याला दोन दणके अन दिला हाकलुन.
***
शिपाई आज ट्रॅफिक ड्युटीवर. दिवसभर खातोय धूर गाड्यांमधुन भकाभका निघणारा. हॉर्न ऐकुन ऐकुन डोके उठले. पण रोजच्यापेक्षा ही ड्युटी बरी म्हणायची. तीन जणांना सिग्नल तोडताना पकडले तर पाचशे रुपयांची कमाई दोन तासात झाली.
***
शिपायाला भरती होऊन सात वर्षे झालीत पण अजुन प्रमोशन नाही झालेले. पुढच्या वर्षी पहिले प्रमोशन होईल म्हणे. मग तो होईल नाईक. त्यानंतर पाच्-सहा वर्षांनी अजुन एक प्रमोशन हवालदाराचे. नंतर सात्-आठ वर्षांनी पुढचे शेवटचे प्रमोशन - जमादार म्हणुन. ते शेवटचे. जमादार म्हणुनच रिटायर व्हायचे, शेवटचा पगार पंधरा-सतरा हजार घेऊन अन पुढे पाच एक हजाराची पेंशन खायची. त्याआधी मुलीचे लग्न करायचेच, मुलाचे शिक्षण पुर्ण करुन त्याला नोकरी लागायला हवी. घर पण बांधायला हवे. तसा मुलगा पोलिसात लागला तर क्वार्टर त्याच्या नावावर करुन घेता येईल पण शिपायाला त्याचा मुलगा पोलिस व्हावा वाटत नाही. आपली जिंदगी वाया गेली तशी त्याची नको असा विचार करतोय तो. पण मुलाचा हुच्चपणा वाढतच चाललाय. नापास झालाय तो यंदा. मुलाचा रिझल्ट बघुन शिपाई सटकतो अन बडव बडव बडवतो मुलाला. बायको मधे पडते, "आधी लक्ष दिले नाही त्याच्याकडे मी म्हणत होते तरी. आता काय मारुन टाकता काय त्याला," असे करवादत. शिपाई वैतागलेला. बाहेर जातो अन दोन क्वार्टर ढकलुन येतो परत. बायको शिव्या देते तर तिला पण देतो दोन दणके. लायनीतल्या पब्लीकला फुल्ल एंटरटेनमेंट!
***
शिपाई रिटायर झालाय. त्याचा शेवटचा पगार होता सोळा हजार तीनशे रुपये. मुलीचे लग्न केले तर महिन्यातच ती परत आली सासरचे हुंड्याकरता छळतात म्हणुन. मुलाच्या नोकरीचे पण अजुन काही झालेले नाही. पोलिसात भरती करायला पाच लाख रुपये मागतायत. वर पेंशनपण अडकलीय, दोन डिपार्ट्मेटल इन्क्वायरी पेंडिंग आहेत म्हणुन. क्वार्टर एक महिन्यात रिकामी करायचीय. सध्या शिपाई रहायला जागा शोधतोय.
प्रतिक्रिया
7 Jul 2009 - 5:30 pm | प्रकाश घाटपांडे
वा पुनेरी भाउ आमाला हेडक्वारटरमदी पोचवल ब्वॉ.अचुक वर्णन
ह बाकी खास!
(स्वेच्छा?निवृत्त सहा.पो.उपनिरिक्षक बि.सं अभियांत्रिकि)
बिनतारीजगत मधे सफर केलेला
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Jul 2009 - 7:14 pm | श्रावण मोडक
आटोपशीरतेचा सोस सोडा राव थोडा. येऊ द्या सविस्तर. इथे तुम्ही फक्त प्रोफाईल रंगवलंय. छानच रंगवलंय, पण अजून बरंच काही बाकी आहे. ते लिहाच लिहा.
7 Jul 2009 - 7:15 pm | धमाल मुलगा
:( पोलीसांची ही बाजूही तितकीच खरी जितका त्यांचा माज, मग्रुरी!
किंबहुना, ह्याच परिस्थितीतून ती वागणूक घडते असं म्हणलं तर फारसं खोटं ठरु नये.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
7 Jul 2009 - 9:14 pm | प्रकाश घाटपांडे
यावर मटा मध्ये समीर कर्वे या पत्रकाराचा एक लेख पुर्वी कधीतरी वाचला होता. वर्दीचा माज आणि मिंधेपणाची सक्ती
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Jul 2009 - 9:24 pm | अनिल हटेला
सहमत !!
अवांतरःपोलीसांचे वाइट अनुभव अजुन ही न विसरलेला...:-(
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
7 Jul 2009 - 10:30 pm | Dhananjay Borgaonkar
पुणेरी भाऊ ..कथानक उत्तम जमल आहे.
राव पण तुम्ही डायरेक्ट रीटायर्ड केलात त्याला. अजुन लिवा की...
कथा वाचुन मुंबई मेरी जान मधला परेश रावल आठवला...
ऊत्तम्..येउदेत अजुन...
8 Jul 2009 - 11:22 am | घाशीराम कोतवाल १.२
धनंजयरावाशी सहमत
येउ द्या अजुन मधला काळ पण जस
पम्याची डायरी आली तशी पोलिसाची डायरी
येउ द्या पुनेरी शेट ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
8 Jul 2009 - 3:46 am | पाषाणभेद
मस्त कथा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
8 Jul 2009 - 10:31 am | आनंदयात्री
जबरदस्त रे पुनेरी. आवडला लेख.
9 Jul 2009 - 1:53 am | टुकुल
हेच म्हणतो..
--टुकुल
8 Jul 2009 - 12:31 pm | स्वाती दिनेश
गोष्ट आवडली , आवडली म्हणण्यापेक्षा भिडली थेट..गोष्टीतून एक विदारक सत्य डोकावते.
स्वाती
9 Jul 2009 - 2:22 pm | यशोधरा
स्वातीताईशी सहमत.
10 Jul 2009 - 7:49 am | सुबक ठेंगणी
स्वाती आणि यशोधरेशी सहमत. खरंच माजोर्ड्या, उद्धट शिपायाबद्दल आता असाही विचार येईल आता मनात...
10 Jul 2009 - 1:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उद्धट शिपायाची माणूस ही बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा एकदा जबरदस्त लेखन.
12 Jul 2009 - 6:40 pm | शक्तिमान
अतिशय सुरेख... खतरनाक .. हृदयस्पर्शी !
12 Jul 2009 - 6:52 pm | मदनबाण
पुनेरीभाऊ एकदम परफेक्ट वर्णन आणि दर्जेदार लेखन. :)
तुमची टंकनकला अशीच चालु राहु दे.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka