सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच.
इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं. याचं कारण असं, की घोड्याच्या डोक्यावर लावलेला पिसाचा तुरा, घोडा पळायला लागला की मस्त हलायचा आणि नुकत्याच तेव्हा पाहिलेल्या मर्द सिनेमातल्या अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांची आठवण यायची. :) पण ही टांग्याची सोय होती फक्त एस टी स्टॅण्ड पर्यंतच. डेक्कन ते एस टी स्टॅण्ड!!! मग आमची शाळा होती राजवाडा चौकात. ते अंतर इतकं मोठं होतं की, बस शिवाय पर्याय नव्हता.. चौथी पर्यंत रिक्षाने शाळेत गेले. पाचवी नंतर तरी बस जाता येईल.. व्वा! असं वाटलं. कोरोची -शिरदवाड्-कोरोची अशी बस असायची. बसने घरी यायला १ तास लागायचा म्हणून आई-बाबांनी पुन्हा रिक्षा लावली आणि बस च्या मागे "हुईईईईईईईईईई!" करून आपण पळतो आहोत हे माझं स्वप्नं अपुरंच राहिलं.
शाळेत ६ वीत एकदा गणितात मार्क कमी पडले म्हणून आईने मला राजवाड्याजवळ असलेल्या एका गणिताच्या क्लास ला घातलं. तो क्लास सकाळी ९-०० ते १०-०० असायचा. तेव्हा रिक्षा १०.१५ ला यायची शाळेत नेण्यासाठी. त्यामुळे सकाळी क्लास ला जाण्यासाठी बस हा पर्याय निवडला. आणि संध्याकाळी एकदम शाळा सुटल्यावर येताना रिक्षा. हरकत नाही!! एक वेळेला तर एक वेळेला!!! झालं ..माझं बसचं पर्व सुरू झालं..!!! आणि इथूनच.... अगदी इथूनच आम्ही दोघी (मी आणि बस) समांतर रेषा आहोत कधीही एकत्र न येणार्या याचं प्रत्यंतर आलं. सकाळी ९ चा क्लास, मी ८.३० ची बस पकडायला बाहेर पडायची. पहिले दिवशी बहुतेक बाकीच्यांचे नशिब जोरावर होते म्हणून बस वेळेत आली.. मी अगदी गुणी मुलीसारखी क्लास ला वेळेत पोचले. क्लास झाल्यावर जवळच्याच मैत्रीणीकडे जाऊन सकाळच्या वेळेसाठी आईने दिलेली पोळी-भाजी खाल्ली.. मग शाळेत गेले. व्यवस्थित ८ तास बसून अभ्यास केला आणि संध्याकाळी रिक्षातून घरी आले. व्वा!!! काय थ्रील होतं!! पण हे थ्रील काही फार काळ नाही अनुभवता आलं. अगदी दुसर्याच दिवशी माशी शिंकली. झालं असं.. की मला निघायला ५ मिनिटं उशिर झाला आणि मी बस स्टॉपवर पोचले तेव्हा बस माझ्या समोर अशीऽऽऽ निघून जाताना मी पाहिली. घरी आले, आणि बाबांना इतक्या लांब सोडायला चला म्हणून हट्ट केला.. बाबांनी सोडलं ! तो दिवस पार पडला. तिसरे दिवशी घरातून मुद्दाम ५ मिनिटे लवकर बाहेर पडले, स्टॉप वरही बरीच लोकं दिसत होती. मात्र बराच वेळ झाला तरी बस आली नाही. शेवटी कुठून तरी समजलं बस कोरोची ला ब्रेक डाऊन झाली आहे. ब्रेक डाऊन होणं म्हणजे ब्रेक डान्सचाच वेगळा प्रकार असावा असं वाटलं तेव्हा. मात्र बस कशी असा डान्स करेल?? घरी परत आले आणि आईला विचारलं.. तर उत्तर मिळण्या ऐवजी आजोबांच्या सोबत क्लास ला पाठवण्यात आलं. चौथ्यादिवशी बस आली, मी चढले मात्र... एस टी स्टॅण्ड जवळ एक टांगा पलटी झाला होता.. घोडा खाली रस्त्यावर झोपला होता आणि इचल सारख्या छोट्या शहरात मेन रोड ब्लॉक झाला होता. त्यामुळे ९.०० ला क्लास ला पोचणारी मी, ९.३० ला पोचले आणि "लवकर आलात महाराणी!!!" अशी त्या सरांची बोलणीही खाल्ली. घरी आल्यावर घडलेला वृत्तांत जसाच्या तसा अगदी त्या घोड्याच्या रंगापासून, तो ज्या पोज मध्ये रस्त्यावर झोपला होता त्याच्या सकट, त्याच्या तरीही छान दिसणार्या डोक्यावरच्या तुर्यापर्यंत यथासांग वर्णन करून झालं. पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मी स्टॉप वर जाऊन उभी राहीले.. पण बसच आली नाही. कारण काही समजले नाही. मात्र आली नाही हे खरं. ९.१५ पर्यंत वाट बघून पुन्हा ९.३० च्या ठोक्याला मी घरात हजर. तो पर्यंत बाबाही गेले होते आणि आजोबाही. आणि सकाळी बसने जाणार म्हणून रिक्षावाल्या मामांना सकाळी येऊ नका असं सांगितलेलं.. त्यामुळे मला शाळेत सोडायला आईलाच यावं लागलं ते ही स्पेशल रिक्षा करून. शनिवारी सकाळची शाळा.. त्यामुळे क्लास नव्हता. रविवारी आई-बाबांचं बोलणं काय झालं कोणास ठाऊक पण.. सोमवार पासून माझा तो गावातला क्लास मात्र बंद झाला. आणि बसशी होऊ घातलेलं नातं मध्येच तुटलं.
त्यानंतर बसचा तसा संबंध कधी आला नाही. कोल्हापूरला देवीच्या देवळात जाताना भवानी मंडप नावाची बस पकडायला लागायची. राजारामपुरीतून मंडपात जाणे बसने.. मस्त वाटायचं!! सोबत मैत्रीणी असल्या की, बस अगदी वेळेवर यायची आणि वन पीस मध्ये भवानी मंडपात पोचायची, कुठेही ब्रेक डाऊन न होता. (आता ब्रेक डाऊन चा अर्थ समजायला लागला होता). मैत्रीणींसोबत चकाट्या पिटत बस मध्ये मस्त वेळ जायचा. असंख्य प्रकारचे वास, भाजीच्या बुट्ट्या, कोल्हापूरी चपलांची कर्र कर्र.. पानाच्या पिंका, तोबर्यात (पानाच्या) बोलणारा कंडेक्टर, वाटेत कोणी आडवं आलं तर, "अरेऽऽए! **व्या... काय माझीच गाडी गावली का रं मराया?" अश्शी करकचून शिवी हाणणारा चालक... सगळा माहोल प्रचंड जिवंत. त्यातच.. कधीकधी इंजिनियरिंगच्या मुलांनी कंडेक्टरशी घातलेली हुज्जत, त्यांची चालणारी टवाळकी.. मजा यायची. पण हे सगळं अनुभवायला मिळायचं केव्हा.. तर माझ्या मैत्रीणी सोबत असतील तेव्हा आणि तेव्हाच. कारण मी एकटी स्टॉपवर उभी असले तर चुक्कुन सुद्धा बस यायची नाही वेळेत. उशिराच येणार, किंवा आधीच गेलेली असणार .. कमितकमी कॅन्सल तरी झालेली असणार. मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!!
क्रमशः
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Jun 2009 - 12:30 am | पिवळा डांबिस
लेख मस्त आहे...
आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!!
३११, ३१३ अगदी बालपणापासूनच्या मैत्रिणी...
मुलंडहून पार बोरोलीला घेऊन जाणारी ३९६....
कॉलेजात असतांना प्रेयसीकडे नेणारी १३७....
आणखी, आणखी, अशा आणखी कितीतरी....
थॅन्क्स प्राजु, आठवणी जागवून दिल्याबद्दल....
नॉस्टाल्जिक,
डांबिसकाका
16 Jun 2009 - 12:44 am | विसोबा खेचर
आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!!
अगदी...!
लोकलट्रेन आणि बेस्ट या आमच्या मुंबापुरीच्या रक्तवाहिन्याच आहेत. बेस्टने तर जे जाळं पसरलं आहे आणि तिची इतकी उत्तम सेवा आहे की तिला तोड नाही! लोकलट्रेनमध्ये सकाळी ८.३२, ८.५२ च्या कसारा डबलफास्ट, ९.१५, १०.४७ च्या ठाणा, संध्याकाळच्या ५.१०, ६.११ च्या अंबरनाथ, ५.२४ ची टिटवाळा या माझ्या विशेष लाडक्या ट्रेन्स् आणि ३९६, ३९८. ६५. ६६, १२६, १६९, १७१, १७२ या माझ्या लाडक्या बशी! :)
लेख मस्त आहे...
हेच बोल्तो! प्राजू, जियो..!
आपला,
(यातायाती मुंबैकर) तात्या.
16 Jun 2009 - 10:46 am | पर्नल नेने मराठे
तात्या ६५, ६६ माझ्या दारावरुन जाते :-? ठाकुद्वार, कधी उतरा गोर्या रामापाशी.
चुचु
16 Jun 2009 - 6:28 pm | निखिल देशपांडे
आम्हा मुंबयकरांची लोकलट्रेन ही जर माय तर बीएस्टीची बस ही मावशीच की!!!!

रोज आम्ही ४९६,३०,३९९ ने जातोच त्या मुळे त्या विशेष आवडीच्या. बेस्ट ची निळ्या रंगाची ए सी बस तर फार छान आहे.
पण सगळ्यात डेंजरस प्रवास तो टी एम टी चा.... खुप घाबरतो मी टि एम टी मधे चढायला.
==निखिल
16 Jun 2009 - 12:43 am | श्रावण मोडक
पुढे? केएमटीचे अजून अनुभव आहेत गाठीशी. केएमटी आणि ब्रेक डाऊन हा अगदी जवळचा संबंध. लिहा...
16 Jun 2009 - 8:58 am | अमोल केळकर
केएमटी आणि ब्रेक डाऊन हा अगदी जवळचा संबंध.
एन एम एम टी ( नवी मुंबई ) बाबतही असेच म्हणतो.
बाकी लेख मस्तच
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
16 Jun 2009 - 2:57 am | चित्रा
करणारा विषय. छान आहे लेख.
आता मागे वळून पाहताना खूप छान वाटते. आपण कसे बस चालू होता होता चढत होतो, आणि प्रचंड गर्दीतही आनंदात प्रवास करू शकत होतो असे सगळे आठवते.
मुंबईला १, ३१४, ३१५, ८५, ६६, ९० अशा अनेक बशींमधून प्रवास करायला लागला आहे. त्यातही कमी गर्दीच्या वेळी ३१४ नंबरच्या बसमधून प्रवास बसून करायला मिळाला की छान रमतगमत यायला मिळायचे.
http://bestundertaking.com/transport/index.htm
हल्ली ३१४, आणि ९० लिमिटेड असतात का नाही? वरच्या दुव्यात दोन्ही मिळाल्या नाहीत.
16 Jun 2009 - 3:26 am | रेवती
मस्त वर्णन!
प्रत्येकाला आपापल्या बशींची आठवण नक्की होणार आणि सगळे आकडे प्रतिसादांमध्ये दिसणार. ह्या धाग्यावरचे प्रतिसाद शब्दांऐवजी आकड्यांत बोलतील.:)
माझे बस नं. शाळेत असताना १५४, १५८, १८१, ४, ११६
कॉलेजात असतानाचे मात्र आठवत नाहीत.:(
रेवती
16 Jun 2009 - 5:55 am | अनिता
असेच...
माझी बसः पुणे, (वनाज कॉर्नर ते नळ स्टॉप यातायात :) )
८६ (शास्त्रीनगर ते डेक्कन. बस कायम जुनी असायची, पण आपुलकी वाटायची.)
८१ ( हि नटवी. नेहेमी नवे मॉडेल)
16 Jun 2009 - 12:44 pm | धमाल मुलगा
>>८१ ( हि नटवी. नेहेमी नवे मॉडेल)
:O काय सांगता? कोणत्या काळात? मला तरी सन २००१ ते २००३ ह्या काळात सहजानंद ते पुणे स्टे. बस क्र.८१ (८१च काय, च्यामारी, २८३ तरी कुठं धड होती?) ए-क-दा-ही धडपणे असलेली दिसली नाही हो! सुटण्यापुर्वी अर्धाअर्धा तास गाडी तशीच चालु ठेवायचे, का तर म्हणे बंद केली तर चालु होत नाही....त्यातल्या त्यात २८३ जऽऽऽरा बरी असायची.. पण ८१ नं मला इतक्यांदा दगा दिलाय की सांगता सोय नाही :(
असो,
प्राजुतै, बसपुराण लय भारी :) तुझा आणखी कशाकशाशी ३६चा आकडा आहे? बसचा एक झाला, मागे एकदा तू आणखी एक काहीतरी सांगितलेलंस, आता आठवेना :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
16 Jun 2009 - 6:28 am | अवलिया
वा! मस्तच लेख !!
आवडला :)
अवांतर - तुम्हालाही क्रमशःची लागण झालीच तर ... :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
16 Jun 2009 - 8:44 am | विनायक प्रभू
असेच बोल्तो
16 Jun 2009 - 6:38 am | सहज
बशीचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. आधी सायकल मग दुचाकी असल्याने बसमधे बसायची वेळ आलीच नव्हती. पण ज्या दिवशी बसलो त्या दिवशी आख्खे जग त्या बसमधे भरले गेले होते. त्या दिवशी आपली आई रोज संध्याकाळी अश्या गर्दीतुन येते व आल्याआल्या घरकामात बुडते ह्याचा बोध झाला. म्हणजे कळत होते पण वळले नव्हते त्या दिवसापासुन आईला जाणिवपुर्वक शक्य तेवढी मदत करणे, मुख्य बसस्टॉपपर्यंत सोडणे, आणणे असे काहीतरी करु शकलो.
16 Jun 2009 - 8:05 am | क्रान्ति
कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. महिन्याचा पास काढायचा, पण निम्मे दिवस ११ नं.ची दोन पायांची बस चालवायची! शाळेत मात्र बसचा संबंध आला नाही! छान लिहिलंस. अजून येऊ दे लवकर लवकर.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
16 Jun 2009 - 9:52 am | विशाल कुलकर्णी
झकास लेख. आमच्या लहानपणी बसचा संबंधच नाही आला. चार किमी चं अंतर मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करत पार करण्यात जी मजा होती ती बसच्या प्रवासात थोडीच असणार आहे. आणि त्यातुन वाचलेल्या पैशामध्ये कल्पनाला ब्रुसली, जॅकी चेन चे पिक्चर बघता यायचे, हा महत्वाचा फॅक्टर होता.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
16 Jun 2009 - 11:50 am | स्वाती दिनेश
प्राजु, लेख आवडला. प्रत्येकाला आपापल्या बशी आठवणार हे रेवतीचे म्हणणे अगदी पटलेच.
माझी बस कुर्ला ते कलिना ३११ किवा ३१८..
स्वाती
16 Jun 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
प्राजुतै लेख मस्तच ग.
बशीचा आणी आमचा कधी संबंधच आला नाही. शाळा घरापासुन ५ मिनिटाच्या अंतरावर आणी क्लास २ मिनिटाच्या अंतरावर.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
16 Jun 2009 - 12:58 pm | कपिल काळे
बसकथा छान!!
माझा कधीच बसशी संबंध नाही आला. तशी कंपनीची बस होती ने- आण करायला. पण ती रोज टायमात यायची. कधीच लेट नाही झाली.
16 Jun 2009 - 2:41 pm | प्रशु
मस्त लेख.
सध्या मी दिल्लीत आहे आणी त्यामुळे मुम्बई लोकल खुप आठवतेय. रोजची सकाळी ६:४५ ची अंधेरी लोकल, त्यातले मित्र, मिळुन केलेली धमाल सगळ आठवुन दिल्या बद्द्ल धन्यवाद.................
16 Jun 2009 - 7:16 pm | मराठमोळा
वा! नोस्टॅल्जिआ मस्त भारी!! आवडला.
पण
क्लास झाल्यावर जवळच्याच मैत्रीणीकडे जाऊन सकाळच्या वेळेसाठी आईने दिलेली पोळी-भाजी खाल्ली.. मग शाळेत गेले. व्यवस्थित ८ तास बसून अभ्यास केला आणि संध्याकाळी रिक्षातून घरी आले. व्वा!!! काय थ्रील होतं!
यातलं थ्रिल समजलं नाही बॉ. याऐवजी, "आईने दिलेली पोळी भाजी न खाता, कोपर्यावरच्या गाडीवर मिसळपाव, वडापाव खाल्ला.. मग शाळेत दोन चार मास्तरांची खेचली, ४ तास बंक केले आणी हुंदडत घरी आले."
यातलं थ्रिल कसं वाटलं ? असो, असाही हा मुलींचा प्रांत नाही. :)
इकडे पुण्यात पीएमपीएमएल बसचे हॉर्न सोडुन सर्व भाग वाजतात, बसमधे उभं रहायची जागा मिळाली तर, मुंबईच्या लोकलपेक्षा भयंकर अनुभव येतात. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
29 Oct 2010 - 9:03 pm | डावखुरा
बर्याच दिवसानी पण छान लिखाण...
मला तर पुण्यात कितीही लांबचं ठिकाण असेल तरी बसने गेल्याचं आठवत नाही...
या बशींची वाट बघण्यापेक्षा मला टांगा(दैवी देणगी..) सोयिस्कर वाटत.
अगदी अभिनव पासुन भांडारकर रोड...सिंबायोसिस..पर्यंत
हा ठाण्यात मात्र १२ नं ची बस फिक्स आणि जागा मिळेल तेव्हाच जाणार..त्यासाठी २ बशीही फोडु (सोडु) शकतो..
29 Oct 2010 - 9:41 pm | मस्तानी
लेख आवडला प्राजक्ता !
सकाळी ८.३१ ची ठाणा फास्ट लोकल पण विक्रोळी ला थांबणारी ... आणि माझ्या 'बशी' ... ३९९ - ४९६ - ए सी ४९६ - ८ नंबर शास्त्री नगर सगळ सगळ आठवलं :)
या वेळच्या ठाणे भेटीत आमच्या छोट्याला एका नवीन बशीत बसवलं ... १०९ शिवाई नगर ... टी एम टी च्या या नवीन गाड्या खूपच चांगल्या आहेत. अगदी बसच्या आतमध्ये 'टी एम टी सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत करते' असा electronic display बघून सुखद धक्का बसला ... (रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बसणाऱ्या धक्क्यांमध्ये आणखी एकाची भर ! )
29 Oct 2010 - 11:29 pm | पैसा
प्राजु, तुम्ही आणि बस समांतर आहात हे नशीब म्हणा!
मी हैराण करणार्या गोंयकार बसेसनी गेली १० वर्षं प्रवास करतेय. आणि सहनशक्ती संपेल तेव्हा नोकरी सोडून देईन म्हणतेय.
लेख मस्त झालाय हे वेगळे सांगायला नकोच!