याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..२
हरणांच्या गावा..
'नारा'! नाराचं वर्णन जपानला यायच्या आधीपासूनच ऐकून,वाचून होते.त्यामुळे या शनिवारी नाराला जायचे आहे,असा फतवा निघाल्यावर आता हे नारा काय आहे ? असं तरी नांबाला जाताना वाटलं होतं तसं वाटलं नाही.इथे कुठेही फिरायला जायचं म्हटलं की शाळेच्या सहलीसारखा डबा आपला बरोबर! यावेळी सुध्दा पुलाव,शिरा,पराठे इ.शिदोरी बरोबर घेतली आणि ओसाका स्टेशनवर आलो.ओसाका हे जंक्शन स्टेशन आहे, दादर स्थानकासारखे!पण दादरला फक्त मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडली आहे,ओसाकाला अशा बर्याच लाइन्स जोडल्या आहेत.त्यातील एक ,लूप लाईन. तेथे जाऊन नाराकडे जाणारी गाडी पकडायची होती. इथे जपानमध्ये आल्यापासून आपली स्थिती तर पहिल्यांदाच गाव सोडून भाऊच्या धक्क्यावर उतरलेल्या,अक्षरओळख नसलेल्या माणसासारखी होते. एकही पाटी मुळी वाचताच येत नाही.त्यातल्या त्यात इंडिकेटर वरचे आकडे तरी थोडा वेळ जपानी आणि थोडा वेळ रोमन मध्ये दाखवतात.(२००२ च्या फुटबॉलची कृपा!)तर लूप लाईन वर आलो,आता नाराची गाडी पकडायची म्हणून इंडिकेटरवर रोमन आकडे येतात कधी आणि आपल्याला काही अर्थबोध होतो कधी, याची वाट पाहू लागलो.
तिथेच बाजूला सहलीला जाणारी शाळेची मुलं उभी होती,९वी /१०वी तली असावीत.तरूणांना इंग्रजी समजते,ते थोडेफार बोलू शकतात हा अनुभव असल्याने त्यांना नाराला जाणारी गाडी विचारली आणि फलाटाला लागतच असलेली गाडी नाराची ,असे कळल्यावर आम्ही लगेचच गाडीत बसलो.सामानसुमान लावतो न लावतो तोच मघाचची दोन मुले आणि त्यांचे शिक्षक लगबगीने आमच्या दिशेने आले आणि आम्हाला गाडीतून खाली उतरायला लावले. त्या मुलांच्या समजूतीत काही गोंधळ झाला होता,आणि आम्ही भलत्याच गाडीत बसलो होतो. त्या सरांना हे समजताच त्या मुलांना घेऊन ते आमच्या इथे आले आणि आम्हाला योग्य गाडीत बसवून दिले.
नारा अगदी लहानसं स्टेशन,अगदी वांगणी,शेलू,नेरळची आठवण येईल, असं!पण स्टेशनाच्या बाहेरच टूरिस्ट इन्फर्मेशन सर्विसचे काऊंटर आणि चक्क इंग्रजी बोलू शकणारे सहाय्यक!तोडायजी मंदिराकडे जाणारी बस २ मिनिटात सुटत असल्याचे सांगून हातात तिकिटे आणि नकाशा कोंबून त्यांनी आम्हाला बसकडे पिटाळले. बस खचाखच भरी हुई थी,चक्क उभं रहायला लागलं.बाहेरची हिरवाई न्याहाळत असतानाच दोन शिंगं दिसली,त्याच्या मागोमाग अनेक शिंगं!सोनेरी ठिपके असलेला हरणांचा कळपच्या कळप चक्क रस्त्यावर बागडत होता.रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा तापदायक कळप पाहण्याची सवय असलेल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्या डोळ्यांची हरणंच हरणं.. (सीतामाईला पण अशीच मायावी हरणं दिसली असतील का?आणि त्या गोजिर्या हरणाला मारून त्याचं वस्र करण्याची शक्कल ! काय पण कवीच्या कल्पनेची भरारी?)
तोडायजी बुध्दमंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षराजी ,हिरवळ ,कुरणं आणि त्या कुरणात चरणारी असंख्य हरणं!माणसांचे थवे मंदिराच्या बाजूला येतानाची चाहूल लागली की हरणांचे कळपच्या कळप कुरणं सोडून जणू स्वागतालाच आल्यासारखी सामोरी येत,आपल्या हातातली बिस्कीटे घेऊन जात.त्यातल्याच एकाने बिस्किटाबरोबरच माझ्या हातातला नकाशाचा कागदही पळवला.काशी विश्वेश्वराच्या आवारात माकडं जशी वावरतात आणि हातातल्या वस्तू पळवतात ना,त्याची आठवण झाली.
तीस मीटर उंच,२५० टनांपेक्षाही जास्त वजन असलेली दाईबुत्सुची अर्थात बुध्दाची मूर्ती असलेले 'तोडायजी बुध्दमंदिर' हे जपान्यांचं श्रध्दास्थान! तिथे अनेकजण आपल्या इच्छा देवाला सांगतात म्हणजेच नवस बोलतात.तालीबानांनी जगातील सर्वात मोठी बुध्दमूर्ती उद्ध्वस्त केल्यानंतर आता तोडायजी मंदिराची मूर्ती सर्वात मोठी मूर्ती आहे.इस.७५२ मध्ये बांधलेले हे मंदिर म्हणजे लाकूडकामाचा जपानमधील,कदाचित जगातील अतिभव्य नमुना आहे.बुध्दमंदिरांचे मुख्यालय असलेले हे मंदिर असल्याने प्राचीन काळी नारा ही राजधानी होती. परंतु नाराचा आणि बुध्दीझमचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ती इस. ७८४ मध्ये नागाओका येथे हलवण्यात आली.
भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं.मुख्य बुध्दमूर्ती आणि अनेक भावावस्था असलेल्या मूर्तींची प्रभावळ इथे आहे. अत्यंत शांत शांत होत,निर्विचार असे आपण तिथे आपोआपच स्तब्ध उभे राहतो.या मंदिरात एक खांब आहे.हिअरिंग पिलर असे त्याचे नाव!त्या खांबाला एक मोठे भोक आहे आणि त्या भोकातून पलिकडे जाणारी व्यक्ति पुण्यवान असा एक जपानी समज आहे.त्या खांबातून पलिकडे जाणारी मंडळी ,त्यांचे ते प्रयत्न चित्रबध्द केले.(प्रत्यक्ष कृती शक्य नव्हतीच त्यामुळे जे आणि जेवढं शक्य होते ते केले.)नंतर 'कासुगा तायशा' म्हणजे'कासुगा श्राईन'ला आम्ही भेट दिली. जपानमधील हे प्रसिध्द शिंतो श्राईन. इस.७६८ मध्ये बांधलेले,अतिभव्य आवार असलेले,दाट वनराईने वेढलेले हे श्राईन पाहताना 'आहे मनोहर तरी गमते उदास..'अशी भावावस्था होते.
राष्ट्रीय खजिना असलेलं 'शिन याकुशिजी मंदिर'इस.७४७ मध्ये बांधलेले आहे आणि इस.७१० मध्ये बांधलेले कोफोकुजी मंदिर म्हणजे पाच मजली पॅगोडा आहे.आजूबाजूला असलेल्या जवळजवळ पाऊणशे इमारती १३०० वर्षात आता नाहीशा झाल्या आहेत,परंतु पॅगोडाची मुख्य इमारत मात्र अजूनही रमलखुणा जपत उभी आहे.आपल्या गोव्याकडच्या मंदिरांसमोरील दीपमाळेची आठवण करून देणारे 'कहान' मंदिरासमोर आहे.तेथील 'वाकासुकायामा' ही तीन थरांची टेकडी ही प्रसिध्द आहे.लांबून पाहिलं तर हिरवाईच्या वेगवेगळ्या छटांचे तीन थर दिसतात. दरवर्षी जानेवारीच्या दुसर्या रविवारी रात्री ह्या टेकडीवरचे गवत जाळण्याचा रिवाज आहे त्याला 'थामासुकी' म्हणतात.थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले गवत जाळण्याचा विधी.त्याचं प्रयोजन काय ते आमच्या मोडक्या तोडक्या जपानी ज्ञानामुळे कळले नाही.
हरणांच्या कळपातून पाऊस अंगावर घेत हिरवळीतून चालताना किनेतेत्सु नारा स्टेशन कधी आले ते समजलेच नाही.
प्रतिक्रिया
6 Oct 2007 - 8:25 pm | सहज
मस्तच. खरोखर एक, वन डे ट्रीप केल्यासारखे वाटले बर का.
सुरेख सचित्र लेख. अगदी "मोगॅम्बो खूश हुआ!"* म्हणतो बघा.
----------------------------------------------------------------
* (संर्दभ :- मि. इंडीया सिनेमा - काही आवडले की असा रिमार्क टाकायची फॅशन होती.)
6 Oct 2007 - 8:31 pm | विकास
स्वाती,
लेख आवडला! छायाचित्रांमुळे अजून छान वाटले. पॅगोडाचे चित्र पाहून आठवले... माझ्या एका मित्राकडील छायाचित्रात एकदा पाहीले होते की त्यांच्या एका (तो जिथे गेला होता तिथल्या) पॅगोडात तिर्थ/पाणी पिण्यासाठी एक मोठा (हातभर लांब) लाकडी चमचा ठेवला होता.प्रत्येक जण त्यात ते तिर्थ घेऊन तोंडात घालायचा! पण नंतरच्या चित्रात "हायटेक" पणा कळला की तो चमचा नंतर अल्ट्रा व्हॉयलेट रेज मधे (कुठल्याशा खबदाडात) घालून निर्जंतूक करण्यात येयचा!
6 Oct 2007 - 8:43 pm | लिखाळ
म्हणजे तीर्थ स्वतः पवित्र असते तरी त्याला जंतूसंसर्ग होतो यावर विश्वास आहे वाटते. म्हणजे तीर्थ लाकडी चमच्याला शुद्ध करीत नसावे केवळ मानवालाच करीत असावे.
--(श्रद्धाळू) लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
6 Oct 2007 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले जापानचे दोन्हीही भाग वाचले आहेत. खरे तर जापान म्हटले की, आम्हाला फक्त सायोनारा या गाण्याची आठवण होते, बाय द वे, आपण उत्तम लिहीत आहात त्याचबरोबर जापानची ओळख नसतांना वाचकांना आपण जापानची ओळख सुंदर करुन देत आहात. आज टाकलेल्या सुंदर चित्रामुळे तर आजचा भाग सहीच झाला आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी हा भाग आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
6 Oct 2007 - 9:08 pm | प्रमोद देव
स्वातीजी हा भाग छायाचित्रांमुळे खूपच प्रेक्षणीय झालाय.
हाही भाग आवडला.
6 Oct 2007 - 9:36 pm | लिखाळ
>>भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं.<<
येथे कोसलातल्या त्या वक्यांची आठवण झाली. पापण्यांचे पंख करुन करुणा खाली उतरली आणी तीने अलगद उचलले अस्लए काहीसे होते. कोसला प्रेमींना आठवत असतील मूळ वाक्ये.
रमलखुणा म्हणजे काय?
>>थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले गवत जाळण्याचा विधी.<<
आपल्या कडे सुद्धा डोंगरांवरील गवत पुढच्या मोसमाचे गवत चांगले येते या विश्वासाने जाळताना दिसतात. खरेतर यामुळे तेथील सूक्ष्मजीवांची आणि गवताच्या गुणवत्तेची हानी होते. असो.
लेखामालेचा हा भागसुद्धा आवडला. पुढे वाचण्यास उत्सुक.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
7 Oct 2007 - 12:08 am | नंदन
सचित्र लेख आवडला.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
7 Oct 2007 - 2:25 am | प्रियाली
चित्रांनी लेखाची मजा वाढते.
7 Oct 2007 - 3:25 am | धनंजय
छान चित्रमय लेख.
7 Oct 2007 - 5:00 am | चित्रा
जपानला जायची संधी मिळाली नाही. पण आता जपानबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
8 Oct 2007 - 6:16 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
10 Oct 2007 - 3:46 pm | धम्मकलाडू
सहमत होन्यावाचूण पर्व्याय नाही. मी पन सहमत. कारन आम्हास्नी म्हाईत हाये.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
7 Oct 2007 - 9:40 am | विसोबा खेचर
वरील सर्वांप्रमणेच म्हणतो!
स्वाती, लेख चांगला झाला आहे. चित्र पण मस्तच आहेत...
ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्या डोळ्यांची हरणंच हरणं..
रस्त्यावर सहजगत्या दिसणार्या हरणांचे वरील वर्णन वाचून मात्र मन खरंच सुखावले! ती मुलगी त्या हरणांना खायला देत आहे हे चित्र तर अतिशय लोभसवाणं चित्र आहे!
स्वाती, औरभी लिख्खो..
तात्या.
7 Oct 2007 - 11:12 am | राजे (not verified)
मस्तच.
तुमच्यामुळे आमची देखील जपान सफर चालू आहे असे वाटत आहे, अजून ही काही भाग लिहा व इतर शहरांची माहीती व छायाचित्रे येथे प्रकाशित करा.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
8 Oct 2007 - 1:06 pm | स्वाती दिनेश
मंडळी,
नारावरील लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्या बद्दल सर्वांना धन्यवाद.
स्वाती
9 Oct 2007 - 11:10 am | चित्तरंजन भट
स्वातीताई, हा तुकडाही आवडला. अजून येऊ द्या. छोटे छोटे तुकडे असले की पचायला वेळ लागत नाही.
9 Oct 2007 - 11:25 am | सर्किट (not verified)
स्वाती ताई,
जपानच्या टुरिझम मिनिस्ट्रीचे काही कॉण्ट्रॅक्ट मिळत असेल तर बघा...
एवढी चांगली जाहिरात त्यांना मिळायची नाही..
लेख आवडला हे सांनल.
- (शिंझो) सर्किट एबी
10 Oct 2007 - 8:01 pm | विश्वजीत
पुढील भागाची प्रतिक्षा.
विश्वजीत
1 Oct 2008 - 1:16 pm | सहज
स्वातीताई नाराला जाउन आलो. इथे जे वर्णन आहे अगदी मुर्तिमंत तसेच समोर होते. स्वातीताई तुस्सी ग्रेट हो!!
काही फोटो
तोडायजी कॉम्प्लेक्स प्रतिकृती
तोडायजी मंदीर
पॅगोडा
चीनी धाटणीचे अजुन एक मंदीर
हरणे. अशी मनसोक्त बागडत होती, न घाबरता जवळ येत होती. लोक मात्र घाबरत होती :-)
2 Oct 2008 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो मस्त !!! आणि हरणांबरोबर दिसत आहेत ते सहजराव का ?
पण तो जापानी वाटतोय ? कदाचित वातावरणामुळे चेहरा बदलू शकतो का रे सहजा ?
2 Oct 2008 - 7:44 pm | सचिन जाधव
जपान म्हणजे 'उगवत्या सुर्याचा देश'.
निप्पोन हे जपानच २ र नाव.
अतीपुर्वेला असलेला जपान आणि तेथिल सन्स्क्रुति,देशप्रेम्,सतत राबनारी मानस,प्रगत तत्रज्ञान याव्यतीरीक्त आपल्या माहितिची भर पडली.
धन्यवाद..............
1 Jun 2009 - 1:03 pm | मस्त कलंदर
जपानची घर बसल्या छान सफर झाली.. :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jun 2009 - 1:19 pm | मि माझी
निहोन्गोनो discription वा इइ देस..!