भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
31 May 2009 - 4:13 pm

या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे...
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ...
http://www.misalpav.com/node/1425
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...
http://www.misalpav.com/node/1451
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा...
http://www.misalpav.com/node/1560

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

आजकाल लोक सतत कोणाला ना कोणाला काहीतरी विकताहेत.... फ़्रीमध्ये, स्कीममध्ये, लोनवर, हप्त्यांवर कसेही घ्या पण आमचीच वस्तू घ्या.... टॆक्स कागदपत्रे नको, तारण नको, पगाराची स्लिप नको पण आमचेच लोन घ्या. कर्ज इतकं सोपं झालंय, या सर्व प्रकारांमुळे लोक ऋण काढून सण साजरे करायला लागले आहेत... आयुष्याची अमेरिका व्हायला लागलेली आहे... (वाचा सबप्राईम क्रायसिसवरचा अप्रतिम धागा). मग एखाद्या महिन्यात चेक बाउन्स होऊ लागतात...आर्थिक नियोजन बिघडते ..
अंदाजपत्रक कोलमडते.... आणि मग एंट्री होते वसुली एजंटाची ... आजच्या या परिस्थितीमुळे वसुली एजंट या करीअरला पुढे मोठा वाव मिळणार आहे.

पूर्वी काही प्रतिगामी लोक याला बदनाम व्यवसाय मानत असत.काही तर चक्क गुंडगिरी म्हणत... पण आज एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला अत्यंत नावारूपाला आलेला हा व्यवसाय आहे हे कोणालाही मान्यच करावं लागेल,. त्यामुळे आज पुष्कळ पालक आपल्या मुलासाठी या व्यवसायासाठी करिअर ऒप्शन म्हणून पाहायला लागले आहेत.

वसुली एजंट म्हणजे काय?
दुसर्याने गमावलेल्या त्याच्या न्याय्य हक्कासाठी योग्य किंमत घेऊन लढणार्या तडफ़दार कार्यकर्त्याला वसुली एजंट असे म्हणतात.
कोर्सला या लोकांना घेण्यासाठी काही विशिष्ट कल चाचण्या घ्याव्या लागतात. काही गुण लहानपणापासून असावे लागतात.
१.लहानपणापासून बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा हात चालवण्यावर यांचा भर असतो.
२.कोणत्याही प्रकरणाचा फ़ारसा विचार करायच्या भानगडीत ते पडत नाहीत.
३.एखाद्या प्राथमिक शाळेत समजा असे शब्द तुम्हाला ऐकू आले ," ..बर्या बोलानं याचं पेन तू याला परत दे नाहीतर एका फ़ाईटीत तुला आडवा करेन.." तर हे शब्द उच्चारणारा हाच तो आपला भविष्यातला वसुली एजंट समजावा.
अशा तडफ़दार मुलांची ऊर्जा चॆनलाईझ करणं, त्याला योग्य दिशा देणं आपल्याच हातात आहे.

सुरुवात करणार्यांसाठी टिप्स.
१.कोणत्याही कामगिरीत असो, प्रकरण खोलात शिरून माहिती करून घ्यायचे नाही.
२.काहीही असो, धन्यावर विश्वास ठेवून कामाला लागणे महत्त्वाचे.
३.ग्रूमिंग : वसुली एजंटाचा एक विशिष्ट लूक आम्ही डेव्हलप करून देतो.या व्यवसायात कस्टमर्सवरती जरब सर्वात महत्त्वाची. आणि त्यासाठी हे ग्रूमिंग आवश्यक... काही पालकांना ग्रूमिंग जरा महाग वाटतं पण दर्जा टिकवायचा असेल तर सखोल ज्ञानाला पर्याय नाही...असो.

कमावलेलं शरीर, दणकट बाहू, कबड्डी, कुस्ती किंवा कराटे वगैरे स्पर्श-खेळांची गोडी... त्यासाठी नियमित व्यायामशाळा / जिममध्ये जायची सवय.

पोषाख : कुर्ता, जीन्स, करकर वाजणार्या वहाणा, गळ्यात जाड सोनेरी चेन्स,चारपाच अंगठ्या, मनगटावर जाड कडे..दोन तीन गंडे आणि ताईत.
बोलण्यात अधूनमधून अमुकबाबा / तमुकमहाराजांच्या कृपेनं / सब उनकी दया है असले शब्दसमूह पेरायचे.
तोंडात सतत माणिकचंद आणि जोडीला कोणाचीही पर्वा न करता पिचकार्या.

४.ऎटिट्यूड फ़ार महत्त्वाचा...
मी जगाला फ़ाट्यावर मारतो किंवा माझं कोणी काहीही नुक्सान करू शकत नाही, हा आत्मविश्वास आम्ही मिळवून देतो
आपला कंपू जमवून कट्ट्यावर बसून सतत ऐश करत राहायचे.

व्यवसायाची प्रत्यक्ष सुरुवात...
१.उधारीवर नेलेल्या वस्तू परत मिळवून देणे,उसने घेतलेले फ़ुटकळ पैसे परत मिळवणे,किराणा किंवा स्टेशनरी दुकानदारांची वसुली असली छोटीछोटी कामगिरी सुरवातीला पार पाडावी.
उदा. एखाद्या पापभीरू माणसाकडून एखादा चेक बाउन्स झाला असेल तर तो माणूस रजाबिजा घेऊन ऒफ़िसवर येऊन दंडासकट पैसे भरून टाकतो.. पण या असल्या अत्यंत प्राथमिक वसुलीत काही स्किलचं काम नाही.... महत्त्वाची कामगिरी तर पुढेच आहे.
२. फोनचा वापर.... अर्थात दबावतंत्र...
फोन हे वसुली एजंटाचं अत्यंत ताकदवान शस्त्र आहे. त्याचा योग्य , नेमका चपखल वापर केला तर काम फ़ार फ़ार सोपे होते असा अनुभव आहे.

मात्र त्यासाठी आवाजावर अत्यंत कमांड हवी. गोड आवाजाबरोबरच धमकीसाठी भयानक आवाजही काढता यायला हवा....त्यासाठी खर्जाचा रियाज हवा.हे सारे तंत्र आमच्या क्लासमध्ये घोटवून घेतले जाईल.

गोड आवाजातल्या फोनने काम होत नसेल आणि माणूस नडू शकेल असं वाटलं तर पुढची स्टेप...सरळ अरे तुरेवर यावं आणि त्याची निर्भर्त्सना करावी.आणि अधून मधून कळतनकळत शिवी चढवावी.यापुढची पायरी म्हणजे फोन करून फ़क्त शिव्या द्याव्यात आणि फोन ठेवावा.

नाठाळ कस्टमरसाठी यात अजून एक व्हेरिएशन आहे. त्या माणसाच्या ऑफ़िसमध्ये बॉसला फोन लावावा किंवा बायकोला फोन लावावा... या फोनसाठी काही वाक्यांची उदाहरणे....
कर्ज काढून एल्सीडी टीव्ही घ्यायचा तर भxx खिशात पैशे नको होय रे? किंवा हप्ते भरायला परवडत नाहीत तर कार कशाला घेतो रे भाxxx....
आणि मग लगेच म्हणावं, " सॊरी हं, मला वाटलं मिस्टर धांदरफ़ळे बोलताय्त... पण माझा तेवढा निरोप पोचवा बरंका त्यांना."
७.ज्याची वसुली करायची आहे, तो छोटा दुकानदार असेल तर धंद्याच्या पीक टायमाला त्याच्या दुकानाबाहेर आपली अमुकअमुक सहकारी पतसंस्थेचे वसुलीपथक असे लिहिलेली जीपगाडी रोज उभी करावी, आत जाऊन त्याच्याशी गप्पा करून त्याच्याच पैशाने चार जणांनी चहा प्यावा.....
गर्दी असताना, त्याच्या दुकानातला माल आम्हाला उधार का देत नाहीस असा त्याच्याशी वाद घालावा.
त्याच्या दुकानातल्या फ़ुटकळ वस्तू सुरुवातीला उचलून न्यायला लागावे....

बरेच व्यावसायिक कर्जबुडवे असल्या साध्या उपाययोजनेला बधत नाहीत.
अशा वेळी आपल्याकडे उत्तम टीम हवी. राडा करायची तयारी हवी.. शस्त्रे हाताळण्याचे कौशल्य हवे.
जीवाला जीव देणारे योग्य वेळी उत्तम ऎक्शन घेणारे अणि प्रसंगी हत्याराचा वापर करून धमकावणारे तगडे शिपाई हवेत...

ऎडव्हान्स्ड कोर्समध्ये खालील स्किल्स शिकवली जातील.
१.कारचे लॉक उघडणे, किंवा किल्लीशिवाय कार सुरू करणे ,स्कूटर/ बाईकच्या लॊकची डुप्लिकेट चावी करणे ही महत्त्वाची स्किल्स शिकवली जातील. कस्टमरच्या सोसायटीतून वाहन सरळ उचलून नेणे या ऎक्शनसाठी ही स्किल्स अत्यंत आवश्यक असतात.

२.. सर्व प्राथमिक उपाय थकल्यानंतर घरकर्ज बुडवणार्या माणसाच्या घरी जाऊन बाहेरून बोंबलावे. ठणाणा करावा. दारातूनच शिव्या घालाव्यात....
शेजार्यापाजार्यांना अपरात्री उठवावे,...सोसायटीच्या वॊचमनला दम द्यावा...
त्याची कर्जाऊ नसलेली वाहने उचलून न्यावीत.
कर्जाऊ नसलेले टीव्ही , म्यूझिक सिस्टीम वगैरे उचलून न्यावेत.
व्याजासहित सगळं पेमेन्ट झाल्यावर या वस्तू मिळतील म्हणावे.
आणि तीन दिवसांत पेमेन्ट झाले पाहिजे अशी धमकी देऊन बाहेर पडावे.

३. स्थानिक नेते,
नगरसेवक, आमदारतिकिटेच्छुक, फ़ुटकळ वृत्तपत्रांचे बातमीदार, पत्रकार यांच्या सतत संपर्कात राहावे....
माहिती अपडेट करत राहावी...
४. फ़रार वगैरे झालेल्या कस्टमर्सचा माग काढण्यासाठी खबरी लोकांचे जाळे विणावे.... त्यांना वेळोवेळी पैसे द्यावे....
५.पोलीसांमध्ये माफ़क प्रमाणात ओळख असावी....

आपल्या व्यवसायात बदनामी लवकर होते..ही एक व्यावसायिक जोखीमच म्हणा ना, ती उचलावीच लागते. पण बदनामी मर्यादेत ठेवता येते...... बातमीदार, पत्रकार वगैरे मंडळी बदनामीच्या बातम्या येऊ देत नाहीत किंवा नियंत्रणात ठेवतात...
६.अटकपूर्व जामीन मिळवून देणारे वकील आणि पोलीस यांच्यात उठबस हवी... न जाणो कधी वेळ येऊ शकते. कायदेविषयक मार्गदर्शनासाठी आमच्या क्लासचा खास लीगल सेल आमच्या सर्व वसुली एजंटांसाठी उपलब्ध आहे.

तर ही झाली या एका नाविन्यपूर्ण व्यावसायाची एक ओळख..
मला खात्री आहे की एकविसाव्या शतकात या व्यावसायाला लागलेला बदनामीचा बट्टा धुऊन निघेल आणि हा एक मानाचा आणि अभिमानाचा व्यवसाय बनेल.
अधिक माहितीसाठी एकदा जरूर भेट द्या,
bhadkamkar's_careermanagementsystems.org/vasuliagent

धोरणसंस्कृतीवावरमौजमजाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

31 May 2009 - 4:27 pm | श्रावण मोडक

मास्तर आले पुन्हा. आता या लेखासरशीच आधीचे काही अपूर्ण आहे तेही पूर्ण करून टाका.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 May 2009 - 4:27 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, पैसा वस्सूल हो गया!!!

अवांतर: एक तारखेची परंपरा थोडी वेगळी पण राखली म्हणायची.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

31 May 2009 - 4:39 pm | श्रावण मोडक

विसरलोच की... काय आहे रे ही नेमकी परंपरा?

टारझन's picture

31 May 2009 - 5:14 pm | टारझन

वा !! छाणच !! मास्तर्स .. साऊथच्या मुव्हीचा प्रभाव दिसतो हं तुमच्या क्लासेस वर !!
अजुन (दमादमानं) येउन द्या !!

प्रो.प्रा. टारझन
कुबड्या खविस विमा एजन्सी.

सहज's picture

31 May 2009 - 5:19 pm | सहज

पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा उक्तीवर विश्वास असणार्‍या पालकांनी आपल्या क्लासेसकडे धाव न घेतली तर नवलच!

बाकी लेखात छायाचित्रांचा योग्य, नेमका चपखल वापर करावा तर मास्तरांनीच!

रेवती's picture

31 May 2009 - 5:47 pm | रेवती

वा! मास्तर मानलं तुम्हाला!
किती वेगळं करियर आहे हे!
माझ्याकडच्या डायरीत अश्या वैविध्यपूर्ण कोर्सेसबद्दल टिपणं हमखास असतात.
अहो, आमचा मुलगा अजून लहान असला म्हणून काय झालं?
दुसर्‍यांना वेळीच मदत करता आली म्हणजे झालं.
बाकी वसूली चाचणीमध्येच आमचे दिव्य चिरंजीव नापास...... काय करणार आता?
बघते आता दुसरा कोणतातरी कोर्स!
आपला सचित्र लेख मनापासून आवडला असे सांगावेसे वाटते.

रेवती

विनायक प्रभू's picture

31 May 2009 - 6:18 pm | विनायक प्रभू

ग्रेट

अवलिया's picture

31 May 2009 - 6:45 pm | अवलिया

जियो मास्तर जियो !

--अवलिया

खर्जाचा रियाज आवडला! ;)

(पंटर)चतुरंग

अनंता's picture

31 May 2009 - 7:14 pm | अनंता

आयला! आधी सांगितलं असंतत तर नक्की प्रवेश घेतला असता.
असो. दिवट्या चिरंजिवासाठी छान करीअर ऑप्शन.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

पाषाणभेद's picture

31 May 2009 - 7:42 pm | पाषाणभेद

मास्तर,

म्या पन आपल्या कोर्स ला ऍडमिशन घेवु म्हनतो. ल्हानपनी शाळेतून कोनाचे पेन, रबर, पेन्सीली आनत होतो तर माझे फादर माला लय चापटायचे. मोठेपनी कॉपी करून पन काय उपेग झाला नाय. आता मी पन कायतरी करू म्हनतो. नायतर आयूश्यबर रिक्षा आपन चालवनार नाय म्हना. आपल्या कोर्सला हे क्वालिपीकेसन चालल ना?

माझ्या दोस्तान वर देल्येली साईट शोधायचा लय ट्राय केला पन काय सापडली नाय. आता माला लवकर तुमचा फोन नंबर द्या. मी आन माझ्या कट्यावर्ले ४-५ पडीक येवू. (फी मदे कायतरी करा राव.)

कलावे.
आपला,
श्यामू तेलगा

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति's picture

31 May 2009 - 11:32 pm | क्रान्ति

जबरदस्त! अफलातून!
@) >:) X(
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

स्वामि's picture

1 Jun 2009 - 12:17 am | स्वामि

फावल्या वेळात आपला कोर्स करावा म्हणतो.गुरुदक्षिणा मिळेलच. ;)

नाहीतर तुमच्याच बॅचच्चे चार पंटर वसुली एजंट म्हणून येतील! :D >:)
:D
चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

क्या बात है मास्तर ;) एकदम भन्नाट मार्गदर्शन बर का.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 11:44 am | निखिल देशपांडे

मास्तर तुमच्या क्लासच्या तिन चार विद्यार्थ्यांना आमच्या अखिल भैताडवाडी सहाकारी पतसंस्थेत नौकरी द्यायला आम्ही तायर आहोत.
आपला कोर्स आम्हाला खुपच आवडला

==निखिल

अभिज्ञ's picture

1 Jun 2009 - 12:08 pm | अभिज्ञ

मास्तर ह्यात एक मुख्य भाग राहिला तो म्हणजे
वसुली एजंट मुख्यतः क्रेडिट कार्ड चे पैशे वसुली करता येतात ते.
हि जनता डायरेक्ट घरीच येते. दारात उभे राहून मोठ्याने शिवीगाळ करणे,संपुर्ण बिल्डींगला
ऐकु जाइल ह्या आवाजात पैशाकरीता तगादा लावणे,वगैरे बरेच प्रकार असतात.
थोडक्यात संपुर्ण कॉलनीत तुमची बदनामी कशी होईल हे पाहिले जाते व त्याला घाबरून बरेचजण
हि ब्याद टाळण्याकरिता दुसरीकडून कर्ज काढून ह्यांचे पैशे चुकवतात.
असो.

बाकि लेख उत्तम.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:36 pm | स्वाती दिनेश

वसुली एजंट जोरदार.. १जुलै ला कोण अवतरणार याची उत्सुकता आत्ताच लागून राहिली आहे.
स्वाती

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 1:50 pm | धमाल मुलगा

च्यायला....क्लाससाठी नविन जागा फर्निचर करताना लोन घ्यायला मजा वाटली का? !@#!३,%#%#^,^$%^$^ हप्ते कोन भरनार? (पच्च्याक्क! {भिंतीवर गुटख्याचा लालभडक सडा!}) चऽऽल स्कुटरची किल्ली आन हिकडं....मिणिमम पेम्येंट केल्याव माज्याकडनं घिऊन जा स्कूटर! च्यायला, &*^*,%&^&*,*(&*&&$,*&^&^&%%

----
काय हो मास्तर,

पोषाख : कुर्ता, जीन्स, करकर वाजणार्या वहाणा, गळ्यात जाड सोनेरी चेन्स,चारपाच अंगठ्या, मनगटावर जाड कडे..दोन तीन गंडे आणि ताईत.
बोलण्यात अधूनमधून अमुकबाबा / तमुकमहाराजांच्या कृपेनं / सब उनकी दया है असले शब्दसमूह पेरायचे

.
हे फारच ओळखीओळखीचं वाटतंय बुवा. असं का बरं :? ;)

बाकी, ह्या असल्या धाकधपटशाच्या धंद्यासाठी दाक्षिणात्यांचे मानबिंदू असलेल्या नट(देव हो देव!)लोकांच्या चित्रांचा असा वापर केल्लात हे बरं नाही केलं...तुमचा निषेध!!!

(अवांतरः फोटु टाकण्यापुर्वी त्यांची पर्वांगी घ्येतली होती का हो? ;) )

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

धनंजय's picture

1 Jun 2009 - 9:29 pm | धनंजय

खोखो हसण्यासारखे लिहिले आहे.

पण आशय मला खूपच गंभीर वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलींना काही स्कोप नाही का हो मास्तर??

=)) =)) =))

मुक्तसुनीत's picture

2 Jun 2009 - 8:30 am | मुक्तसुनीत

लईच्च भारी की हो लेख ! ;-)

सँडी's picture

2 Jun 2009 - 8:53 am | सँडी

भारीच! :D