१ जानेवारी २००९
साली ही डायरी लिहायची म्हणजे कटकट आहे.. ही नवी भलीमोठी डायरी आणली त्यासाठी .. आता सहज म्हणून अनुदिनी लिहावी ( की दैनंदिनी.. जाउदे मरुदे ना..)म्हटलं तर इतकी मोठी डायरी केवळ नाईलाज म्हणून आणावी लागली... कारण काय तर छोटी डायरी जवळच्या स्टेशनरीवाल्याकडे नाही... लुटतात भ*वे...
...
घरी आलो तर पेन मिळेना... बरं... सकाळी शर्टाच्या खिशाला लावलेलं पेन ऑफिसात विसरलो... आता ते टेबलाच्या खणात राहिलं का कोणी पळवलं आठवत नाहीये... छ्या .. वैताग आहे साला...आता चक्क पेन्सिलने लिहितोय पहिल्या दिवशी काहीतरी लिहायचंच म्हणून,..
१७ जानेवारी २००९
रोज लिहायला नाही जमणार ते माहितच होतं... निदान अधून मधून तरी लिहावी, एवढाच हेतू..
आज समोरच्यांनी नवा जर्मन शेफर्ड कुत्रा आणला... अगदी बारका आहे... " खूप हुशार आहे हो" असे त्याचे कौतुक करून आलो... खोटं बोलताना स्वत:चाच जाम वैताग आला.
ऒफ़िसात तारीख घालताना सारखं वाटतंय की आज काहीतरी विशेष घडलं होतं.. आत्ता आठवलं.... कुत्रा चावल्याबद्दल पोटात इन्जेक्शनं घेऊन २५ वर्षं झाली....तिसरीत होतो, बेंबीभोवती बारा इन्जेक्शनांची नक्षी तयार झाली...आज नक्षीकामाच्या पहिल्या दिवसाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू... अजून त्या इन्जेक्शनचा वास आठवला की पोटात गलबलतं...
...समोरच्या कुत्र्याशी दोस्ती करण्यावाचून गत्यंतर नाही. ती डॊग बिस्किट्स कुठे मिळतात पाहिलं पाहिजे....( च्यायला, पुढला जन्म कुत्र्याचा मिळाला तरी चालेल...)
२२ फ़ेब्रुवारी २००९
ताज महाल... आजची आख्खी दुपार ताज पुराण ऐकण्यात गेली...नानिवडेकराचा भाचा ताजमहाल पाहून आला....त्याचे फोटो दाखवत होता नानिवडेकर. त्याचा भाचा फोटोग्राफर आहे म्हणे.... त्यात नवीनच ऐकल्यासारखं तो तेजोमहाल आणि शिवमन्दिर वगैरे वगैरे गोष्ट परत सांगायला लागला. त्याला म्हटलं," माहितीय रे , शाळेत असल्यापासून ऐकतोय मी.".. आणि या कॊमेन्ट्रीबरोबरच ते फोटो.. आता या ऎंगलमधून मग त्या ऎंगलमधून...वैताग नुसता...
तसाही ताजमहाल मला आवडलेलाच नाही. पूर्वीही इतके फोटो पाहिलेत त्याचे.. आणि एकदा प्रत्यक्षच पाहिलाय ... चांदणी रात्र वगैरे होती.... कॊलेजची ट्रिप होती आणि माझं पोट बिघडलेलं होतं... उलट्या आणि जुलाब होत होते.... च्यायला तो ताजमहाल पाहून सगळी पोरंपोरी एकदम हरखून की काय ती गेलेली.. मला आपली ती एक सुमार बिल्डिंग वाटली...बेढब...हो हो .. अगदी बेढब... त्यात तिथे आमच्या वर्गातली एक मुलगी गाणंच काय म्हणायला लागली," बादशहाच्या अमर प्रीतीचे ..." कायतरी कायतरी..."...यमुनाकाठी ताजमहाल".... सगळी पोरं माना डोलावून भारावून तिचं गाणं ऐकताय्त...गळा बरा होता तिचा पण माझं पोट बिघडलेलं होतं त्याचं काय? कधी एकदा लॉजवर परत जातो असं झालेलं... अस्ला तो चांदण्या रात्रीचा ताजमहाल.... वैताग नुसता...
१९ मार्च २००९.
आज सोसायटीतले मध्यमवयीन लोक सिंहगडावर गेले होते.. कारनं... निव्वळ फ़ालतुपणा... कारपार्क करून वर दोन टेकाडं चढून आले, मजबूत चिकनबिकन हादडलं आणि मोठा ट्रेक करून आल्यासारखे गमजा मारताहेत...
... मी शाळेत असताना नेहमी धावत जात असे... आता सध्या होत नाही, पण कारने नाही बुवा जात आपण...
३१ मार्च २००९
"आज समोरच्या नाट्यगृहात शास्त्रीय गायनाची मैफ़ल आहे, तिकिटं घ्या" असं सांगायला हिची एक मैत्रिण आलेली होती. ती सोशल वर्क करते असं तिला वाटतं..मग कसली कसली मदतनिधीची तिकिटं गळ्यात मारते... मी तिला घाबरूनच असतो...मैफ़ल म्हणे पं.अमुकबुवा तमुककर यांची आहे... मी मनात म्हटलं," हा माणूस? हा साला पंडित कधीपासून झाला? एक नंबरचा बेवडा... रियाज दारू पिऊन मैफ़ल दारू पिऊन, मैफ़लीत गातानासुद्धा तांब्याभांड्यात दारू, मैफ़लीनंतर शहाळ्यात भरून दारू... हा माणूस मैफ़लीतच अति नशा करून गाणं म्हणताम्हणता आडवा पडला तेव्हा मी ठरवून टाकलं," असल्या लोकांच्या कोणत्याही मैफ़लीला जाणार नाही"
...... असले क्लास काढलेले स्वयंघोषित पंडित गल्लोगल्ली पडलेले आहेत... अस्ल्यांच्या मैफ़लीला जाऊन कोण घेणार विकतचा वैताग?
१२ एप्रिल २००९
आज सारेगमप चा रिपीट एपिसोड पाहिला... जोशीबाई पुन्हापुन्हा जोरदार टाळ्या वाजवायला सांगून जाम पिडतात...(हल्ली फ़क्त गाणं ऐकतो..पुढची फ़ाल्तु बडबड कोण ऐकणार??) वाडकर साहेब पुन्हापुन्हा सरस्वती सरस्वती म्हणून वैताग आणतात... आपल्याला माणसाला देवत्त्व द्यायची हौसच फ़ार.... व्यक्तिपूजेत आपला हातखंडा... तरी बरं महाराष्ट्रात असली देवळं बान्धायची फ़ॆशन नाही निघालीय अजून.... निघेलही... लाईनी लावून लोक दर्शनं घेतील...
यानिमित्तानं आठवलं... आमचा मित्र कसबेकर म्हणतो, " मॅच हरली तरी चालेल, पण सचिनची सेन्चुरी झाली पाहिजे"..... असली ही व्यक्तिपूजा. यांच्यामते खेळ मोठा नाहीच, व्यक्ती मोठी.. आता काय बोलायचं यांना?
२० एप्रिल २००९
मला आंबे अजिबात आवडत नाहीत. पण तसं कुठे बोलायची सोय नाही... जरा जरी असं म्हणालो की लोक मनोरुग्ण समजून कौन्सेलिंगच सुरू करतात.. घरी दारी सगळे आपण कशी अमुकशेला पेटी आणली आणि तमुक रुपये डझन आणले किंवा आमचा कोकणातला भाऊ पाठवतो आम्हाला पेट्या.. अशा बढाया मारायला लागले की मला वैतागच येतो..आता आंब्यांचा सीझन आला म्हणून बायको जीव काढणार... आता कुठून तरी आंबे मिळवावे लागणार.. ते कसे स्वस्त मिळाले ते सांगावे लागणार.... बायकोदेखत कौतुक करून ते खावे लागणार... वैताग आहे अगदी..
सोसायटीत एकांकडे लाल गुलाब फ़ुलले आहेत.... कौतुक करत बसतो स्वत:च्या गुलाबांचे... सारखं पाणी काय खतं काय... ते खुरपं घेऊन वाफ़े तयार करणं काय.. सारखे त्याचे फोटो काढणं काय....वैताग आहे एक..
शाळेत कार्यानुभव( शेती) असा एक विषय होता दोन वर्षे .. त्याला भयंकर मारकुटे मास्तर होते त्याची आठवण होते... ( त्यांना एक छान दिसणारी मुलगी होती,... तिच्या वरच्या जबड्यातला एक सुळा मात्र आडवा बाहेर आला होता...हसली की दिसायचा... घेतली असेल का तिने त्या दातासाठी ट्रीटमेंट?? तिची आठवण का होतेय आत्ता? कुठे असेल बरं ती?.. असो)
२२एप्रिल २००९
बघाबघा, असे मागे लागून बायकोने " तारे जमीं पर" नावाचा पिक्चर आज बघायला लावला.... अगदीच सुमार वाटला... फ़ाल्तुच... गेलं दीड वर्षं अति कौतुक ऐकतोय... पण सामान्य सिनेमा... स्पेशल चाईल्डचे दु:ख जनतेला दाखवून डोळ्यांमधून अश्रूंचे पूर काढून स्वत:चा गल्ला भरायचा ही हिन्दी फ़िल्म इन्डस्ट्रीची जुनी खोड आहे.... ते मांचं गाणं अगदीच हास्यास्पद... अरे आम्ही काय कधी हॊस्टेलला राहिलो नाही काय? मी तर पहिलीपासून हॊस्टेलात राहिलो.. त्यात काय?. पण ही फ़िल्मी लोकं ना कशाचंही कौतुक करतात झालं... आणि अख्खं थिएटर रडतं म्हणे तेव्हा... ऐकावं ते विनोदीच...
त्यात त्या खानाने आमच्या मराठी माणसाला हाकललं आणि स्वत:च दिग्दर्शक झाला...असला हा प्रकार... पण हिच्याशी खोटं बोललो... आवडला म्हणालो... हल्ली फ़ार खोटं बोलावं लागतंय .. काय करावं?
२५ एप्रिल २००९
आज सकाळी सकाळी एका विचित्र आवाजाने जाग आली.शेजारच्या सोसायटीतल्या आंब्याच्या झाडावरती मला दोन कावळे दिसले.ते जरा वेगळेच क्यॊव क्यॊव असे ओरडत होते. बायकोला दाखवले म्हटले," बघ हे काय आहे ते"...तर ते म्हणाले, " तो कोकीळ पक्षी आहे. किती मधुर कूजन करत आहे नाही?" मला एकदम वैतागच आला.( ती सारखी निबंध लिहिल्यासारखंच बोलते.किंवा रविवारच्या पुरवण्यांमध्ये वेळ न जाणारी माणसं ललित या सदराखाली काहीतरी भयानक छापतात तसलं ..) मग ती सृष्टीचा हिरवा शालू,वसंत ऋतू आणि सहस्त्ररश्मींचे क्षितिजावर आगमन असलं काहीतरी थुकराट बोलायला लागली.... तो कोकीळ ते आंब्याचं झाड, आणि ललितश्रवणसुखदायिनी बायको यांनी सकाळीची पुरती वाट लावली.
१ मे २००९
शेजार्याच्या जिगिषाचा काल पाचवीचा रिझल्ट लागला.... ( मराठी माध्यमात घातलं आहे त्यांनी तिला.) तिचा वर्गात दुसरा नंबर आल म्हणे.... सारखे सांगत असतात, " आम्हाला कसे भाषेचे प्रेम आहे, आम्ही कसे मुलांच्या शिक्षणासाठी लंडनहून परत आलो भारतात... इ.इ.इ.)...त्याची नोकरी गेली तिकडे बहुतेक.. उगाच कशाला कोण परत येईल हो तिकडचं सोडून परत?
.. पोरीचे पेढे द्यायला आला तेव्हा त्याची कॆसेट परत वाजणार असे वाटले म्हणून " काय गं , पहिला नंबर का नाही आला तुझा? गणितात फ़क्त ९५? पाच कुठे गेले?" असे आधीच विचारले... ... तिचा आणि तिच्या बापाचा चेहरा पडला ... काय करणार मग?.... उगाच कोण डोकं पिकवून घेणार?
२० मे २००९
आला. मान्सूनचा पहिला पाऊस बदाबदा कोसळला.डोकंच फ़िरलं. त्या मातीच्या अत्यंत हलकट वासानं पुन्हा ऍलर्जी आली.नाक चोंदलं आणि अंगावर हलकी रॅश आली... डॉक्टर म्हणाला, " हे तर काहीच नाही... काहींना तर फ़ार त्रास होतो.." ..याला माझ्या त्रासाची काही किंमतच नाही की काय? .. वैताग आला अगदी.घरी आल्यावर बायको डीडी सह्याद्रीवरती पावसाच्या कवितांवर कार्यक्रम बघत होती. .. तिच्याबरोबर बसून बघावाच लागला टीव्ही. सूत्रसंचालक दवणे सर आणि गायिका भेलांडेबाई... लाडंलाडं स्क्रिप्ट आणि लाडंलाडं गाणं यांनी भयंकरच वैताग आला...
प्रतिक्रिया
23 May 2009 - 2:03 am | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, नेहमीप्रमाणे षटकार. बरीच वाक्यं हसवून गेली. पण वरवर दिसणार्या विनोदामागे कायम रडणार्या माणसांचे अगदी अचूक चित्रण केले आहेत. विशेषतः कोकिळा वगैरे तर जबरदस्त. असतात काही काही माणसं अशी की ज्यांना सगळंच "हॅ: त्यात काय एवढं?" असं वाटत असतं. सुंदरच चित्रण. तुमच्याकडून अजून एक चांगलं लेखन. अभिनंदन.
अवांतर: एक जून जवळ येतो आहे.
बिपिन कार्यकर्ते
23 May 2009 - 2:05 am | पिवळा डांबिस
ह्या व्यक्तीला मिपावर कुठेतरी भेटल्यासारखं वाट्तं आहे, कुठे बरं?
;)
23 May 2009 - 2:13 am | चतुरंग
त्या भडकमकर मास्तराला 'डायरिया' झालाय म्हणे! नुसतं लिहीत सुटलाय भडाभडा. सगळ्यांना नावं ठेवायची झालं, दुसरा काही उद्योग नाहिये त्याला. रात्रीचं बालिकेनं जागरण घडवलं की हा आमच्या बोकांडी बसणार वाटेल ते लिहून!! (हे स्वगत ह. घेणे.) :D
मास्तुरे, खल्लास लिवलंय! जागोजागी फिस्स्कन हसायला आलं! और भी आने दो.
चतुरंग
23 May 2009 - 3:36 am | धनंजय
काय पण बाउंडर्या मारणे चालू आहे.
पण :
या वाक्यावर विश्वास बसत नाही. जानेवारी २ तारखेला लक्षात आले की पेन पँटच्या खिशातून धुलाईला गेले, ती वैतागवाणी गोष्ट होती. मग ३ तारखेला सूर्य उजाडला ही वैतागवाणी गोष्ट...
23 May 2009 - 7:00 am | भडकमकर मास्तर
होय होय.. हे लक्षातच आले नाही.. ते साधे वाक्य होते...
... तुम्ही लिहिलेली खरी वैतागसम्राटाची वाक्ये आहेत...
मस्त.. :)
अवांतर : अगदी वैतागसम्राटाइतक्या नाही, पण या डायरीतल्या बर्याचशा गोष्टींचा मलाही किंचितकिंचित प्रमाणात वैताग येतो.... पण कुठे बोलायची सोय नाही......
म्हणून ही डायरी बरं... ;)
23 May 2009 - 3:47 am | बबलु
मास्तर.... डायरी खासंच जमलेय.
बर्याच "वैताग" वाक्यांवर हसू आलं. ऑफिसात एकटाच हसत बसलोय :)
....बबलु
23 May 2009 - 5:54 am | मुक्तसुनीत
नर्मविनोदी कोपरखळ्या ! :-)
पेंडशांच्या "लव्हाळी"ची , पुलंच्या "काही ग्रहयोगां"मधल्या "वैषम्ययोगाची" , गोविंदाग्रजांच्या "चिंतातुर जंतु"ची , गंगाधर गाडगीळांच्या "किडलेली माणसे"ची आठवण जागी झाली.
सुमारपणा , अरसिकता , काडेचिराईतीपणा आणि हेवेदावे, मत्सर या सर्व गोष्टी बर्याचदा हातात हात घालून चालतात. त्याचे उत्तम रसायन या डायरीमधे उतरले आहे.
23 May 2009 - 6:46 am | विनायक प्रभू
घरात सी.डी आणली होती. पीटर सेलर्स चा 'पार्टी'
सर्वजण खदाखदा हसत होते. मला जरा सुद्धा हसु आले नाही.
मास्तर 'पिडीत जंतु' लय भारी
23 May 2009 - 7:14 am | सहज
मस्तच!
23 May 2009 - 7:26 am | क्रान्ति
दिवसाची इतकी सही सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद. फर्मास वैताग! बरं झालं सकाळी सकाळी घरीच वाचली डायरी. ऑफिसमध्ये वाचली असती, तर लोकांना वाटलं असतं, हिला वेड लागलंय की काय! मस्त जाणार आजचा दिवस!
=)) =)) =))
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
23 May 2009 - 7:30 am | आनंद घारे
गाणे ऐकायला गेला नाही ते एक बरे झाले. त्याने तिथल्या पंख्यांची घरघर, तबलजीची ठोकाठोक, माईकचे केकाटणे, कोणाचे खोकणे, आणखी कोणाचे शिंकणे, रस्त्यावरच्या रहदारीचा गोंगाट वगैरे (गवयाचे गाणे सोडून) इतर अनेक नाद ऐकून आलेला वैताग शेजारच्याला ऐकवला असता आणि त्यालासुद्धा गवयाचे गाणे धड ऐकू दिले नसते.
लेख मस्तच आहे, वाचून मजा आली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
23 May 2009 - 7:43 am | सँडी
मस्तच!
नववर्षाची सुरुवात 'साली' ने झाली, अजुन काय? ;) (ह.घ्या.च)
23 May 2009 - 7:58 am | चन्द्रशेखर गोखले
आपली डायरी अफलातून ! प्रत्येक बॉलवर षटकार !! आपली डायरी हसत हसत आत्मनिरिक्षण करायला लावते.
आज सारेगमप चा रिपीट एपिसोड पाहिला... जोशीबाई पुन्हापुन्हा जोरदार टाळ्या वाजवायला सांगून जाम पिडतात...(हल्ली फ़क्त गाणं ऐकतो..पुढची फ़ाल्तु बडबड कोण ऐकणार??) वाडकर साहेब पुन्हापुन्हा सरस्वती सरस्वती म्हणून वैताग आणतात... आपल्याला माणसाला देवत्त्व द्यायची हौसच फ़ार.... व्यक्तिपूजेत आपला हातखंडा... तरी बरं महाराष्ट्रात असली देवळं बान्धायची फ़ॆशन नाही निघालीय अजून.... निघेलही... लाईनी लावून लोक दर्शनं घेतील...
यानिमित्तानं आठवलं... आमचा मित्र कसबेकर म्हणतो, " मॅच हरली तरी चालेल, पण सचिनची सेन्चुरी झाली पाहिजे"..... असली ही व्यक्तिपूजा. यांच्यामते खेळ मोठा नाहीच, व्यक्ती मोठी.. आता काय बोलायचं यांना?
.... हे फारच आवडलं !!!
23 May 2009 - 8:57 am | विसोबा खेचर
ए मास्तरा,
डायरी झकास रे! मौज आली.. :)
अजूनही काही पाने येऊ द्यात!
आपला,
पं अमूकबुवा तमूककर! :)
23 May 2009 - 9:46 am | अनंता
मस्तच हो :)
फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!
23 May 2009 - 10:08 am | योगी९००
मला आंतरजालीय काही स्थळे अजिबात आवडत नाहीत. सकाळी उठलो..एक फालतू लेख मि.पा. वर वाचनात आला. लोकं दैनंदिनी कशाला लिहितात कोण जाने..!!!
ही तर वाक्यावाक्याला हसत होती...मला जबरदस्ती (रात्री स्पेशल पिझ्झा बनवेन असे आमिष दाखवून) ती मास्तरांची दैनंदिनी वाचायला लावली. एकाही वाक्याला माझे ओठ हसण्यासाठी हलले नाहीत. हिच्या डोळ्यात मात्र पाणी (हसून हसून)..मास्तरांविषयी बरेच ऐकले होते. खुप विनोदी , लोकं त्यांचे लेख वाचून गडाबडा लोळतात वगैरे वगैरे. भ्रमनिरास झाला. लोकांच्या प्रतिक्रिया वाचून मात्र हसू आले (किती ही कंपूबाजी?) .
पण लेख आवडला अशी प्रतिक्रिया टाकावी लागणार. (आयला आता रात्री पिझ्झा खायला लागणार. छ्या.. दिवसच फुकट गेला. उद्या सकाळी लवकर उठून इंटरनेटच बंद पाडतो. निदान उद्याचा दिवस चांगला जावा.)
खादाडमाऊ
23 May 2009 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला काय वैताग आहे.
सकाळी सकाळी एक तर झोप पुर्ण झाली न्हवती, कसे तरी तयार होउन कॅफे उघडला तर समोर पहिलाच लेख भडकमकर मास्तरांचा आणी त्यावर बळच १५/२० प्रतिसाद वगैरे.
आता हा मास्तर ओळखीचा (मध्ये एक दोन वेळा माझे बिल वगैरे भरले होते) माझ्या २/३ लेखांमागे १ अशी प्रतिक्रीया देणारा, म्हणजे आता ह्याचा तो डायरीवाला लेख वाचायला लागणार आणी वर प्रतिक्रीया पण द्यावी लागणार. वैताग आहे साला.
परा वैतागे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 May 2009 - 9:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता बळचकर काहीतरी लिहावं लागणार, आमच्या दातांची काळजी आहे ना! ;-)
हे लोकं मात्रं मलाही वैताग देतात.
अवांतर खवचट शंका: २० मेला मान्सूनचा पाऊस कसा काय हो येतो? वळीव म्हणायचंय का तुम्हाला??
23 May 2009 - 11:19 am | सुमीत
मास्तरांची वैताग डायरी आवडली,
23 May 2009 - 11:42 am | फारएन्ड
मस्त लिहीले आहे. तूफान हसलो :) बाकी दिवसांच्या वैतागवर्णनाची वाट पाहात आहे.
23 May 2009 - 11:56 am | डॉ.प्रसाद दाढे
काय वैताग आहे.. च्यायला, आमच्या लेखांना मरतुकडे प्रतिसाद आणि ह्यांच्या लेखांवर कविता आणखी आरत्या? वर श्रीफल आणि महावस्त्र? छ्या!
बासच बरं का..
23 May 2009 - 12:23 pm | टारझन
आहो दाढे साहेब... एक तर तुम्ही उगवता आमुशापोर्णिमेला ... आणि उगवल्यावर पण एक अभिणंदणाचं पिल्लू सोडून देता..... तो पण एक वैतागंच की =)) =)) =))
उद्या म्हणाल "आत्तरदे काकांचा रैवारी संडासच्या लायनीत पैला लंबर लागला, त्यांचे हार्दिक हाबिणंदण"
त्यावर मग पब्लिक "वा ! वा!! " ,"आत्तरदे काकांचं अभिणंदण", "आत्तरदे काका वेळेवर मोकळे झाल्याने बाकिच्यांच्या नाकातले केस वाचल्याबद्दल त्यांचेही अभिणंदण" वगैरे पुचाट प्रतिसाद येणार .... मजा येते का हो त्यात डागतर ?
(प्लिज ह.घेणे)
- (हाडांचे आणि दातांचे डॉक्टर) डॉ. प्रशांत दाभाडे
एम.बी.बी.एस.,बी.ए.,एल.एल.बी,एम.कॉम.,एम फार्म, एम.एस.(ऑर्थो), एम.ए.(लिटरेचर्स्),
सर्टिफिकेशन कोर्सेस :आंगणवाडी आणि पी.जी.एंट्रंस
23 May 2009 - 12:11 pm | निखिल देशपांडे
काय वैताग आहे.....
मरत मरत शनिवारी सुद्धा ऑफिसात पोहचलो पाहतो तर मास्तरांचा लेख्...वाचुन वैताग आला.
बाकी " मॅच हरली तरी चालेल, पण सचिनची सेन्चुरी झाली पाहिजे" ह्या तप्रकारचे If cricket is religin sachin is God पुस्तक रात्री ३ पर्यंत जागुन संपवले सकाळी हे वाक्य वाचुन नुसता वैताग आला.
बाकी काही ठीकाणी मस्त हसु आले.
==निखिल
23 May 2009 - 1:12 pm | अवलिया
वा! मस्त !!
(काय करणार कंटाळा आला होता प्रतिक्रिया द्यायचा, पण दिली एकदाची. )
--अवलिया
23 May 2009 - 4:05 pm | अमृतांजन
ट्टॉक्क!
23 May 2009 - 5:31 pm | श्रावण मोडक
अशी माणसं भेटण्यासाठी एक तपश्चर्या लागते. ती कुठं आणि कशी केलीत तेवढं सांगा (म्हणजे मला ती टाळायला बरी) ;) लेख फक्कड.
23 May 2009 - 6:10 pm | रेवती
छ्या! किती बुवा छान लिहिता आपण मास्तर....
अगदी वाइट्ट भन्नाट वाटलं वाचून.;)
मास्तरांच्या लेखाची सगळेजण च्यामारी वैताग येइपर्यंत वाट पाहतात.
आमच्या लेखाला सालं काळं कुत्रं पण विचारत नाही.
काय करणार...... साल्या कुत्र्याला वाचायला तरी कुठं येतय.
रेवती
23 May 2009 - 7:31 pm | टारझन
तरीच रंगाकाका परवा म्हणाले ... हल्ली फार बिज्जी आहे ..
चोमडा) टारझन
( आता पळा .. .फटके खाण्याआधी )
24 May 2009 - 12:26 am | रेवती
वा रे टारू!
लेखात काहीही भाषा असली तरी प्रतिसाद मात्र सोवळा पाहिजे नाही का?
तू ये माझ्याकडे (तसं कबूलच केलयस तू) मग बघते.
खरच पळ आता नाहीतर काही खैर नाही तुझी.;)
रेवती
23 May 2009 - 6:43 pm | नितिन थत्ते
डायरी एकदम भारी.
खराटा
(रंग माझा वेगळा)
23 May 2009 - 6:46 pm | विकास
एकदम मस्त!
"काय कटकट आहे! वैताग आहे" ह्यांचे विविध प्रकारे / ठिकाणि वाक्यात प्रयोग एकदम आवडले :-)
23 May 2009 - 9:43 pm | स्वामि
आत्मपरीक्षण करायला लावणारी डायरी.अतिउत्तम.
24 May 2009 - 12:02 am | बट्ट्याबोळ
छान !! अशी एक शक्यता आहे की हा माणूस डायरी मधे एव्हढी भडास काढल्यावर
काही दिवस एक्दम खूष रहात असावा :)
24 May 2009 - 12:21 am | शिवापा
दोनतीन महिन्याने आपण मि.पा. वालेच आहोत आणि असे सोडून देणे बरे नाहि म्हणून येथे आलो तर हा कंटाळवाणा लेख. आता ती मि. पा. भक्त पोरगी पटली नाहि तरी चालेल पण येथे यायला नको. त्यात काहि प्रतिसादहि तसेच. नकोच बाबा इथे. त्यापेक्षा स्युडो अमेरिकन म्हणून जगणे सोपे.
24 May 2009 - 10:37 am | हेरंब
च्यायला, आधीच जाम उकडत होतं. त्यात त्या हॉलमधे गेल्यावर तर अंगाचं कारंजं झालं. मधून पुढे जायला रस्ताच नव्हता. पण बायको पुढे असल्यामुळे तो आपोआप तयार होत होता, फक्त प्रत्येक जागी ही थांबली की थांबून हॅ हॅ हॅ करावं लागत होतं. बसायला कुठे जागाच नव्हती. स्टेजवर मुलांचा लपंडाव, पकडापकडी रंगात आले होते. अनेक बायका माझ्याकडे बघून उगाचच ओळखीचं हंसत होत्या. (त्यांची ओळख मीच विसरलो होतो हे घरी गेल्यावर कळलं.) तेवढ्यात दाताची फणी संपूर्ण बाहेर असलेली एक बाई दिसलीच!
वेटर मला सोडून सगळ्यांना थंड पेय देत होते. शेवटी एकाच्या ट्रे मधून सरळ एक ग्लास उचलून घटाघटा प्यायलो. तेवढ्यात तो वेटर अदृश्य झाल्यामुले ग्लासाचे काय करायचे या विवंचनेत बावळटासारखा उभा राहिलो. ......................
बघा, मास्तरांमुळे येवढं लिहू शकलो.
2 Jan 2011 - 6:42 pm | मितभाषी
हा हा हा लै भारी.
२०१० ची डायरी येऊद्या.
11 Aug 2012 - 12:14 am | राजेश घासकडवी
च्यायला आज सकाळपासूनच वैतागलेलो होतो. ऑफिसला निघायच्या वेळीच नेमका पाऊस पडायला लागला. आता एवढा चांगला इस्त्रीचा शर्ट आणि पॅंट घातली होती ती भिजणार आणि चिखल उडणार तिच्यावर. स्कूटरलादेखील रस्त्यावर बंद पडायला सर्व पेट्रोल पंप, गॅरेजेसपासून बरोब्बर लांबची जागा सापडली. बरं, ऑफिसात येऊन पोचलो, आणि पाऊस संपला. काय उपयोग असल्या पावसाचा? साला हवा तिथे पडत नाही. नको तिथे पूर येतो.
इतर कटकटीही नेहमीप्रमाणेच झाल्या. त्या काही मी सांगत बसत नाही. आजकाल आपले त्रास लोकांना सांगितले की त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळवाणे भाव येतात. भ**ना कधी काही त्रास होतच नाही जणू. त्या मिसेस वाळिंबेंची तिसरी डिलिव्हरी झाली तेव्हा त्यांना कसे 'चौदा तास लागले!' याचं वर्णन लोकांनी चवीचवीने ऐकलं. आम्हीच काय घोडं मारलंय?
तरी एक बरं, आपल्यासारखंच दुःख असणारा दुसरा कोणीतरी सापडला. हे भडकमकर मास्तर का कोण आहेत त्यांचा पत्ता कुठे मिळेल हो?
(मास्तर, लेख खंग्री आहे. कितीही वेळा वाचून समाधान होत नाही.)
10 Aug 2012 - 10:41 pm | आनंदी गोपाळ
अशा रशियन शब्दानेच केवळ गौरवता येईल असा लेख.
सग्ळ्यात जास्त आवडले, अन दिसले ते हे: या लेखात फक्त २-३ प्रतिसादांना उपप्रतिसाद आहेत. बाकी प्रत्येक प्रतिसाद इन्डिव्हिज्युअल होऊन थांबलाय.
हीच परंपरा पुढे चालवत घासुगुर्जींना लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद वेगळ्या (या) प्रतिसादात. तसेच, २०१२ सालीही 'स्कूटर' चालवत आहात, श्रीमंत दिसतां?? (१२चं अॅवरेज बरं परवडतं?)
ही कमेंट..
-आनंदाने ओक्साबोक्षीरड्लास्की (गोपाळ)
11 Aug 2012 - 4:02 pm | KHADADBHAU
छान !
11 Aug 2012 - 5:09 pm | श्रीरंग
क्लास
12 Aug 2012 - 6:55 am | वीणा३
एकदम मस्त :). वाचताना मजा आली पण अश्या कुढ्या माणसांबरोबर राहायला लागला कि खरच वैताग येतो. त्यांना सतत कसला ना कसला त्रास होतो कसला ना कसला कंटाळा येतो.
13 Aug 2012 - 5:26 pm | सूड
एकदा बाहेर पाऊस पडत होता. रुममेटला म्हटलं मस्त पाऊस पडतोय अशा थंड वातावरणात आईस्क्रीम खायला मजा येते. त्यावर रुममेट सुरु झाला.
"काय रे तुम्हा लोकांना थंडीत आईस्क्रीम खायची अवदसा आठवते?" मी चेहर्यावर प्रश्नचिन्ह ठेवून पाहत बसलो, रुममेट सुरुच " हनीमूनला रोहतांगला गेलो, काय बायको साली!! त्या बर्फात तिला आईस्क्रीम खावंसं वाटलं. त्यात सोबतच्या एका कपलने तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. च्यायला, येवढी थंडी. इकडे माझं पोट बिघडलंय आणि हिला नि त्या सोबतच्या कपलला पण आईस्क्रीम खावंसं वाटतंय. मी सरळ म्हणालो, 'ए बये काय कळतंय का तुला, माझं पोट बिघडलंय. माझं काय कमीजास्त तर तू ठणठणीत नको का? आईस्क्रीम वैगरे काही नाही सरळ रुमवर चलायचं'"
"मग पुढे?" मी किल्ली दिली. तो पुन्हा सुरु.
"मग काय मुकाट रुमवर आली. दुसर्या दिवशी सकाळी परत म्हणे शॉपिंगला जाऊ. बाहेर येवढी थंडी आणि म्हणे शॉपिंग. माझं पोटंही बिघडलेलंच होतं. तिला म्हणालो मला काही जमणार नाही. तर म्हणे, 'मग आपल्यासोबत काल जे कपल होतं त्यांच्यासोबत मी जाते शॉपिंगला. तुम्ही आराम करा आणि परत आली ती आईस्क्रीम खाऊनच !!" :D
22 Aug 2012 - 10:27 am | विजुभाऊ
मुंजीच्या कारेक्रमाला गेलो होतो.
कशाला करतात मुंज कोण जाणॅ. उगाच लोकाना आहेराचा ताप.
शिवाय ते अळवाचं फदफदं, पुरणपोळी , आमटी खावं लागतं ते वेगळंच
पोट बीघडतं ना हे अस्लं खावून. दुपारपासून गॅसेसचे त्रासेस सुरू होतात.
22 Aug 2012 - 1:12 pm | बॅटमॅन
"अळवाचं फदफदं" वाचूनच पोट बिघडल्यासारखं वाटतं खरंतर.
2 Nov 2019 - 7:39 pm | नावातकायआहे
मास्तर......
11 Apr 2020 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
पुन्हा एकदा डायरी वाचली.