काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती. 'वीषया' बद्दलचे कम्युनीकेशन करणे ही व्यावसायिक जबाबदारी समजून ते प्राध्यापक महोदय प्रत्येक लेक्चरला हमखास केवळ 'मराठी संत साहित्यातील शृंगारिकता' या एकाच विषयावर बोलत. त्यांच्यापेक्षा आपले मारवाजी बरे पुढच्या प्रतिसादात त्यांनी इतर काही काव्य रचनांचाही 'सर्वोत्कृष्ट वाक्ये' मध्ये समावेश केला.
एखादे काव्य आणि कवि जुनेच प्रस्थापित असतात, पण त्यांचा काव्य परिचय होण्याचा योग आलेला नसतो. अशा कविच्या कवितेची ओळख जेव्हा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट ? म्हणून कुणि करून देते तेव्हा क्वचितच आश्चर्याने या कविने या विषयावर आणखी काय लिहिले म्हणून आपण शोध घेऊ लागतो. तसा 'वोक' या शब्दाचा आमेरीकेत जन्मही होण्याच्या आधी महाराष्ट्रात जन्मलेल्या एका 'वोक' कवितेचा परिचय मारवाजींनी करून दिला ती कविता अशी
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.
मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित.
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याच्या..
मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा,
परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
कवि महोदय धामणस्करांच्या ईतर काही काव्य पंक्ती
.....
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाहीत
अशी काही पाने उरतीलच, ती सर्व
कुठल्याही झाडाच्या तळाशी बहर आहात, असे
मीच त्यांना कैकदा सांगितलेले आहे. ....
शेंडा न बुडखा र्हेटॉरीकल रडगाणे?
...….
उजडण्यापूर्वीच
या छोट्या बागेतील पिवळी पाने
मला झाडून टाकली पाहिजेत:
कालची शुष्क पाने पाहात झाडांनी
परत पाने गळू नयेत म्हणून!...
एक रहस्य सांगावे म्हणून
फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा
समस्त आस्तिक तिथेच पोहोचलेले असतात
फुलांच्या परड्या घेऊन.
२.
त्यांना एक फूलही
निर्मिता यायचे नाही तुझयासारखे
म्हणून तर ते तत्परतेने
उमललेली फुलेच नाहीशी करतात.
३.
फुलता येत नाही म्हणून
फुले तोडणारे लोकच
उडता येत नाही म्हणून
पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात . . . ()
“प्राक्तनाचे संदर्भ”,
आताशा प्रत्येक परंपरेला डोळे झाकून नाकारण्यार्या नव्याच अंधश्रद्धा जन्मू लागल्या आहेत. स्मशानभूमीवर प्रेताला खांदा देऊनही स्मशान भूमीतून बाहेर पडताना न हात पाय धुणे न घरी गेल्यावर स्नान करणे , गेल्या चारेक वर्षात मी तीन चार तरी अशा फुनरल्सचा साक्षी राहीलो आहे. उन्हाळ्याच्या एका सुट्टीत मी आणि माझे मावसभाऊ हैदराबादला आजोळी एकदा केवळ वेगवेगळ्या अलिशान कार बघण्यासाठी एका मंत्र्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीचा अभ्यासदौरा पूर्ण करून रात्री दिडच्या सुमारास वापस पोहोचलो तर अस्मादिकांच्या डॉक्टर मामांनी भरलेला आख्खा हौद रिकामा होईपर्यंत, भाच्चेमंडळींना न धुता येईल एवढा घाम निघेपर्यंत एकमेकांनवर बकेटी रिकाम्या करावयास लावल्या होत्या. असो आपण दत्तात्रेय भास्कर धामणस्करांच्या काव्याकडे परत येऊ.
त्यांचीच 'वस्तू' नावाची कविता शालेय अभ्यासक्रमाला आहे.
वस्तू कविता
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.
(भरून आलेले आकाश)
"आजोबा" "धामणस्कर"
सकाळी उठल्याबरोबर आजोबा
नातवाला घराबाहेर
कटाक्षानी झाडं फुलं पक्षी आकाश
इत्यादी उन्हाच्या संदर्भानिशी दाखवतात
तेव्हा तोही परिउत्सुक डोळ्यांनी सारं पहात रहातो
एखाद दिवशी आजोबा विसरले तर
आजोबा आपण खाऊ आणायला जाऊया ना
इतक्या लडिवाळपणे झाडे बघुयाना आजोबा अस म्हणतो.
....
आजोबांना बोट धरून नेत त्यांचच जग त्यांना दाखवतो
तेव्हा मिटत चाललेले आजोबा म्हणतात बरं का उन्हां!
आकाशां पक्षांनो, झाडांनो, फुलांनो उद्यापासून बहुधा
बिट्टू एकटाच तुमच्या चौकशीला येत जाईल. बदल्यात
वारसा हक्कानीच जणू त्याला कुठेच कधीच
एकटं वाटणार नाही एवढ मात्र बघा!
(बरेच काही उगवून आलेले)
धामणस्करांच्या 'वोक'तेला शतकांपासून असलेल्या झाडांची कत्तल होऊ नये म्हणून कळवळा आहे. शतकांपासून वाढलेल्या जंगलातही काटेरी वीषारी पानगळीचा कचरा असतोच तरी पण शतकांपासून समृद्धझालेल्या जंगलाच्या सरसकट कत्तलीचे समर्थन तुम्ही करणार नाहीना ?
मग, इतर निर्जीव वस्तूंना सन्मान देताना, आईच माझे विश्व आहे म्हणत, आईने दिलेल्या आज्ञेचे पालन करत सर्वस्वाचे बलीदान करणारा गणपती, समस्त कला आणि संस्कृतीला जागवणारा गणपती; हजारो शतकांपासून विकसीत होत गेलेल्या संस्कृतीने निर्मीत केलेल्या परंपरा आणि संस्कारांचे 'परंपरेच्या ओझ्याने वाकलेला जख्ख म्हातारा' ठरवत सरसकट नाकारणार? नव्या उमलत्या पिढ्यांचे पुरातन संस्कृतीतीतील मांगल्यावर वारसा हक्क नसतो का? घराच्या समोर घातलेली प्रसन्न रांगोळी आणि घराच्या दरवाजावर लावलेले तोरणही, देवापाशी वाहिलेली फुले, तुळशीपाशी दिवा लावून म्हटली जाणारी 'शुभम करोती' आमच्या 'वोक' काना-डोळ्यांना खुपू लागले आहेत का?
* https://marathikavitaa.wordpress.com/category/द-भा-धामणस्कर/
* बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर मिपा लेख
* https://en.wikipedia.org/wiki/Jiddu_Krishnamurti
* https://en.wikipedia.org/wiki/Choiceless_awareness
* दत्तात्रेय भास्कर धामणस्कर २६ ऑक्टोबर १९३० मराठी विकिपीडिया लेख
* अनुषंगिकापलिकडे अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
5 May 2025 - 8:23 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद.
6 May 2025 - 8:56 am | युयुत्सु
सर्व कविता आवडल्या