शोनार बांगला...! समाप्ती – ढाका बांगलादेश

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
1 Oct 2024 - 9:56 pm

Sansad
जातीय (राष्ट्रीय) संसद, ढाका

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश

ढाका हे सर्वार्थाने बांगलादेशचे हृदय! ढक्का या संस्कृत शब्दाचा अर्थ एक चर्मवाद्य. काही ठिकाणी डमरूला ढक्का म्हंटलेले आहे तर काही ठिकाणी रणवाद्यांमध्ये त्याची गणती केलेली आहे. माहेश्वरसूत्रांच्या निर्मितीशी निगडित "नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम् । उद्धर्तुकामः सनकादिसिद्धानेतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ॥" या प्रसिद्ध पंक्तीमध्ये चौदा वेळा ढक्कानादातून स्वरव्यंजनांच्या उत्पत्तीची कथा आहे. याच शब्दाच्या व्युत्पत्तीतून महानगराचे नाव. ढाका विभाग हा प्राचीन वंग देशाचा प्रमुख भूभाग. त्या काळातील म्हणजे साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीच्या एका नगराचे अवशेष वारी-बटेश्वर पुरातत्व स्थान म्हणून प्रसिद्ध आहेत. हे बंगालमध्ये सापडलेले सर्वात प्राचीन नागरी अवशेष. ढाका शहरापेक्षाही सोनारगांव या आताच्या उपनगराचे इतिहासात अधिक महत्व होते. गौड-पंडुआ-तांडा इत्यादी मध्ययुगीन राजधान्यांच्या उतरणीनंतर बंगालचे सत्ताकेंद्र अधिक अंतर्गत भागात हलविण्यात आले ते सोनारगाव येथे. मराठ्यांनी बोटे छाटून पुण्यातून पिटाळून लावलेला शाहिस्त्या ढुंगणाला पाय लावून पळाला तो थेट देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बंगालमध्येच. त्याच्या काळात सोनारगाव बरोबरच ढाक्याचे महत्व वाढीस लागले.

पुढे १८९७ च्या भूकंपात ब्रह्मपुत्राने मार्ग बदलून ढाक्याच्या पश्चिमेऐवजी ढाक्याच्या पूर्वेकडून वाहत पद्मेसोबत पाण्याचे बारमाही ओघ या प्रदेशास देता झाला त्यामुळे एक अंतर्गत सुरक्षित असे व्यापारी बंदर म्हणूनही ढाक्याचा वेगाने विकास झाला. ताग, सुती व रेशमी कापड, साखर, बांबू, तांदूळ व नीळ यांच्या व्यापाराचे पूर्वेकडील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून ढाक्याचे महत्व वाढले. याच काळात १९०५ च्या बंगालच्या फाळणीत ढाक्याचा राजधानी म्हणून भाग्योदय झाला. युरोपीय व्यापारी लोक फरसगंज (फ्रेंच), आरमानितोला (आर्मेनियन), पोस्तोगोला (पोर्तुगीज) तसेच ज्यू डच लोक आपापल्या वसाहती वसवत ढाक्याच्या भरभराटीला हातभार लावते झाले. पुढे हि फाळणी रद्द झाली तरी बंगालमध्ये ढाक्याचे महत्व प्रस्थापित झाले. १९०६ ची अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना हि ढाक्यातील ठळक घटना संपूर्ण बंगालवर तसेच देशावर दूरगामी परिणाम करणारी ठरली. मुसलमानी सत्ता येथे उत्तरोत्तर कलुषित होत गेली. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानची उपराजधानी म्हणून ढाक्याने वर्चस्वासाठी दावा बळकट केला.

पुढे सुहरावर्दीने १९५० मध्ये आवामी लीग ची स्थापना करत बंगाली मुस्लिम मते एकवटून ठेवली, तीच शक्ती पुढे १९७० च्या पाकिस्तानच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत निर्णायक ठरत सत्तेची सूत्रे स्पष्ट बहुमतासहित आवामी लीगच्या रूपात पूर्व पाकिस्तानात हस्तांतरित होण्याची शक्यता निर्माण करती झाली. तत्पूर्वीच्या कुप्रसिद्ध भोला वादळात ५ लाखाहून अधिक बंगाली मृत्युमुखी पडतील याचीच व्यवस्था पाकिस्तानने केली तरीही लगेचच झालेल्या निवडणुकात ३०० पैकी १६०+ जागा मिळवत अवामी लीग ने सत्ता खेचून आणली. हीच ७१ च्या युद्धाची नांदी. सत्ता हस्तांतरणास नकार देत उलट यादवी युद्ध पुकारून याह्या खानने निकृष्ठ वंशाच्या बंगल्याचे 'शुद्धीकरण' करण्यासाठी 'ऑपेरेशन सर्चलाईट' सुरु केले. वंशशुद्धीकरण म्हणजे 'अश्राफ' तुर्क-अरबांचे रक्त असल्याचा दावा करणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील पुरुषांकरवी बंगाली बायकांच्या पोटी शुद्ध वंशाची संतती उत्पन्न करणे तसेच तरुण बंगाली पुरुषांची कत्तल करणे. अर्थात यात सामायिक शत्रू बंगाली हिंदूंचा बळी गेला हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाहीच. यात पूर्व पाकिस्तानातील स्वतःला अरबांचे वंशज म्हणवणाऱ्या चितगाव सारख्या ठिकाणच्या मुसलमानांनीही भाग घेतला. या पार्श्वभूमीवर बनलेला 'चिल्ड्रेन ऑफ वॉर' हा हृदयद्रावक चित्रपट युट्युब वर जरूर पहा. पाहवणार नाही, तरी पहा. वास्तव त्यापेक्षा कित्येक पटीने भयानक होते. इंदिरा गांधींनी अर्धवट हस्तक्षेप केला, बांगलादेश स्वतंत्र केला परंतु, शास्त्री हत्येचा बदला, तुटक सीमाप्रश्नाचा निकाल (२०१५ मध्ये लागला), चितगावच्या बौद्धबहुल टेकड्यांचे विलीनीकरण, रंगपूरच्या 'चिकन नेक' चा विस्तार, काश्मीर प्रकरणात वरचष्मा, शारदा पीठ-कर्तारपूर विलीनीकरण अशा अनेक गोष्टी राष्ट्रहितार्थ व हिंदुहितार्थ घडू शकल्या असत्या त्यापैकी एकही न करता केवळ आत्मप्रौढीसाठी त्याचा वापर करण्यात संधी वाया दवडल्या. पुन्हा अंदाजे ३ कोटी बंगाली घुसखोर/आश्रितांचा बोजा मानगुटावर कायमचा बसला तो वेगळाच. असो.

स्वातंत्र्यानंतर ढाक्याचे राजधानी म्हणून महत्व अधिकच वाढले व शून्यातून उभ्या राहणाऱ्या गरीब देशात ग्रामीण लोकांचे लोंढेच्या लोंढे ढाक्याकडे येत गेले. स्वतंत्र बांगलादेशमध्ये प्रथम शेख मुजिबूर रहमान पर्व नंतर त्याची हत्या, मग झियाउर रहमान पर्व व त्याची हत्या, व त्यानंतर बरीच विस्मरणीय नामावली वगळता खलिदा झिया व शेख हसीना या त्या दोघांच्याच कुटुंबातील बायकांनी ढाक्याचे राज्यशकट अलीकडेपर्यंत हाकले. आता त्यातील हसीना काही परत बंगभूमीवर पाय ठेवेल अशी शक्यता दिसत नाही. ढाका सत्तेचे भवितव्य ‘जमाती’ वळणाने हळूहळू अतिरेक्यांच्या हातात जाणार असे चित्र दिसते आहे. या सर्वांमध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्याच्या आधी व नंतर तसेच पाकिस्तानपासूनही स्वातंत्र्याच्या आधी व नंतर बंगाली हिंदूंवर होणारे हल्ले-अत्याचार यात कधीच कसर राहिलेली नव्हती व आजही राहिलेली नाही.

Bangal
अखंड बंगालमधील बंगाली भाषेच्या विविध बोली. यातील उत्तरेकडच्या राजवंशी-सुरजापूरी-कामतापुरी या भाषा कामरूपी प्राकृतच्या प्रभावाखाली विकास पावल्या तसेच सिल्हेटी-चातगाईया-रोहिंग्या या काहींच्या मते वेगळ्या बोली नव्हे तर स्वतंत्र भाषाच मानल्या जातात.

ढाक्यात आल्यावर पहिल्यांदाच जरा चांगल्यापैकी हॉटेल वर राहिलो. धानमंडी हा महानगराचा मध्यवर्ती भाग. संसदेपासून पाच मिनिटांवर. त्यातल्या त्यात आधुनिक शहरी वातावरण, बऱ्याच दिवसांनी. अगदीच भारतीय शहर, संध्याकाळची लगबग, बरेच हातगाडी वाले, लहान सहान गोष्टी विकणारे इत्यादी लोक रस्त्याच्या दुतर्फा. प्रथम रेल्वे तिकीट घेण्यासाठी ज्याने मदत केलेली त्या रिद्वान ला रात्री भेटलो. त्याचे पैसे हि त्याला देऊन टाकले. त्याच्याबरोबर एक 'लाल चा' घेतला. नुकत्याच झालेल्या निवडणुका, अन्य राजकारण, समाजकारण व बाकी गप्पा गोष्टी झाल्या. मग गावात जरा फेरफटकाही मारला. आंतरराष्ट्रीय पत्रकार माणूस निघाला त्यामुळे विषयाला खोली आली. या वर्षी तो 'फोर्ब्स' च्या '३० अंडर ३०' मध्ये झळकला.

दुसऱ्या दिवशी प्रथम ढाकेश्वरीची भेट. शिवाच्या डमरूतून बीजमंत्र जन्माला आले त्यांची हि जननी. बंगालला साहित्यसेवेचा जो आशीर्वाद आहे तो काही उगीच नाही. देवीच्या मंदिराचा ज्ञात इतिहास सेन राजांच्या काळात म्हणजे हजार वर्षांपूर्वी जातो. पण स्थान त्याहून जुने असावे. इस्लामी राजवटीत असंख्य वेळा, अक्षरशः असंख्य वेळा हे मंदिर लुटले-जाळले गेले आहे. १९७१ च्या युद्धात तर गोदाम म्हणून त्याचा वापर झाला. काही भाविक मूळ विग्रह घेऊन कलकत्त्याला आले ते कायमचेच. आजही कलकत्त्याला कुमारटुलित ढाकेश्वरीचे मंदिर व तो मूळ विग्रह आहे. नंतर पुन्हा तेथे मूळ विग्रहाच्या प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली व पुढे ते 'राष्ट्रीय मंदिर' म्हणूनही घोषित करण्यात आले. त्याचा अर्थ एवढाच कि सरकारने ते संस्थान घशात घातले व तेथे बांगलादेशी राष्ट्रध्वजारोहणासारख्या प्रथा सुरु केल्या. अगदी अलीकडे २०२१ मध्येही हे लुटले गेले आहे व ऑगस्ट २०२४ मध्येही येथे हल्ले झालेले आहेत. अनेक वेळा ध्वस्त होऊन, जाळले जाऊन पुन्हा पुन्हा उभे राहिलेले हे मंदिर आता हिंदू प्रतिकाराचे स्मारक बनले आहे. मुख्य मंदिर तसे छोटेखानी आहे, परिसरात अन्य शिव मंदिरे, एक विष्णू मंदिर, व जलकुंड आहे. दुर्गापूजेला असतो तशा स्वरूपातील लक्ष्मी-दुर्गा-सरस्वती असा धातूचा विग्रह आहे. समोर नव्याने बांधलेला सभामंडप. पूर्वपंतप्रधान शेख हसीना यांनी अलीकडेच मंदिराच्या हिसकावून घेतलेल्या जमिनी परत करण्याची घोषणा केलेली होती त्यामुळे इस्लामी जनतेने त्यांचेच पद हिसकावून घेत त्यांना जमिन दाखवून दिली.

Dhaka
ढाकेश्वरी मंदिर

ढाकेश्वरी पासून काही अंतरावर रमना काली मंदिर. महानगरातील हे दुसरे महत्वाचे मंदिर. १६ व्या शतकातील हे मंदिर ७१ मध्ये हे पूर्ण जमीनदोस्त करण्यात आले होते ते अगदी अलीकडे नव्याने उभारले व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२१ मध्ये त्याचे उदघाटन करण्यात आले. याच्या बाजूलाच परमहंस योगानंदांच्या समकालीन माँ आनंदमयी यांचा आश्रमही होता. तो हि आता पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मोठ्या उद्यानात याचे स्थान असल्याने एक महत्वाचा लँडमार्क म्हणून कायमच प्रसिद्ध असे हे मंदिर. परंतु हेच मैदान हिंदूंच्या हत्याकांडाचे स्थान ठरले. ७१ व पुढेही हिंदू विरोधी आंदोलनाचे हे प्रमुख केंद्र.

Ramana Ramana Ramana
ढाकेश्वरी विग्रह, रमना काली मंदिर व विग्रह

नंतर जातीय (राष्ट्रीय) संसद वगैरे काही अन्य महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन जरा खरेदीसाठी बाजार गाठला. ढाक्याचे वस्त्र विख्यात! इथून जवळच असलेल्या सोनारगांव मध्ये बऱ्याच पूर्वीपासून तलम कापड विणण्याची कला विकास पावलेली होती. बंगाल मस्लिन नावाने सर्वदूर विख्यात असलेले हे वस्त्र आजही फॅशन च्या जगतात नाव टिकवून आहे. ढाकाई जामदानी या नावाने या वस्त्र प्रकारातील साड्याही प्रसिद्ध आहेत. आधी इस्लामी आक्रमणात व नंतर ब्रिटिश काळात या कलेची अपरिमित हानी झाली. परंतु आजही काही प्रमाणात का होईना जे काही शिल्लक आहे ते येथील कारागिरांनी टिकवून ठेवलेले आहे. गेल्या १०० वर्षात यातील बहुतांश कारागीर भारतात स्थलांतरित झाले व आता ढाक्यातही भारतात विणलेल्याच जामदानी प्रामुख्याने विकल्या जातात अशी परिस्थिती आहे. भारतातही नावाने ढाकाई साडी असली तरी ती भारतातच विणलेली असते. जमल्यास आपले कोणी कारागीर तथा विक्रेते आहेत का हे पाहण्यासाठी जरा बाजारात फेरफटका मारला. आधी लिहिल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जामदानी होत्या पण ढाकाई नव्हत्या. एखाद दोन ठिकाणी सापडल्या त्यात हिंदू कारागीर जिथे होते तिथून प्रियजनांसाठी बरीच खरेदी केली.

Jamdani

Jamdani
जामदानी तलम विणकाम

बाकी महानगरातील प्रवास करून झाल्यावर बंगालला आता रामराम करण्याची वेळ आली. ढाका विमानतळावरून इंडिगोची थेट मुंबई सेवा. विमानतळावर सर्व प्राथमिक औपचारिकता झाल्यावर सहज दुकानांमधून फेरफटका मारताना एक उच्च दर्जाच्या चहाच्या दुकानात विक्रेता टीव्ही वर अयोध्या मंदिराचा कार्यक्रम लावून बसलेला असल्याचे दिसले. ओळख काढायला निमित्तच मिळाले. रंगपूर मध्ये चहा लागवडीपासून ते घाऊक व किरकोळ वितरण अशा सर्व प्रकारच्या व्यापारात त्याचे घराणे कार्यरत असल्याचे कळले. बांगलादेशच्या रंगपूर या एकाच विभागात (राज्यात) तेवढे जाणे झाले नव्हते त्यामुळे रंगपूर मधील आपल्या लोकांचे हालहवाल या वार्तालापात समजले. रंगपूर आपल्या दार्जिलिंग चे शेजारी त्यामुळे येथेही चांगल्या दर्जाच्या चहाची लागवड होते. विमानतळावर तेथील चहा आवर्जून विकत घेतला. पुढे मुंबईकडे प्रयाण.

Brick
प्राचीन बंगाली मंदिरांमधील विटांवरील कोरीवकाम

मुंबईत येईपर्यंत प्रवासाची उजळणी केली. देशाची फाळणी आता एक नुसतीच इतिहासाच्या पुस्तकातील एक घटना वाटू लागली आहे असे जाणवले. भारत देश हा आता आपल्याला माहिती आहे तसाच कायम होता असाच समज सर्वत्र असल्याचे दिसून आले. विशेषतः माझ्यासारख्या लोकांचे आई वडील देखील स्वतंत्र भारतातच जन्मलेले असल्याने आमचे वास्तव-रिऍलिटी हे याच प्रकारे घडलेले आहे. ज्याला सिव्हिलायझशनल मेमरी आपण म्हणतो त्या सामाजिक स्मृतीतून आता राजकीय दृष्ट्या भारतात नसलेले भूभाग व तेथील लोक विस्मृतीत जाऊ लागले आहेत कि काय असे वाटू लागले. राष्ट्र म्हणजे भौगोलिक सीमा कि तेथे राहणारे लोक हा प्रश्न महत्वाचा वाटू लागला. मला समजलेले उत्तर असे, कि दोन्ही, देह व आत्मा या द्वयीसारखे, परंतु आत्म्याविना देह मृत असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. वैदिक काळातील 'पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति' हे ज्या सप्तसिंधूंच्या सान्निध्यात उद्घोषले गेले ते भूभाग आज कदाचित भारतात नाहीत, परंतु तो भारतच आहे हे आपल्या सामायिक स्मृतीमध्ये पक्के कोरलेले असले पाहिजे. हेच बंगालच्याही बाबतीत. माझ्यापुरते मी काय करू शकतो तर एकात्म ‘आसिंधु’ भारताची जवळून जाणीव वा अनुभव वा अभ्यास करण्यासाठी परिक्रमा नक्की करू शकतो. यात जाणीव हा भाग कदाचित कमी अधिक प्रमाणात आपल्या सर्वांकडे नक्कीच आहे, त्याचाच जरा खुंटा हलवून अजून बळकट करणे. अनुभव हा व्यक्ती तथा स्थळ-काळ सापेक्ष परंतु त्यामुळे काही त्याचे महत्व कमी होत नाही, बाकीचांसाठी त्याचे निरूपण नक्कीच करू शकतो आणि त्यासाठीच हे लेखन. डझनावारी देश भटकून झाले, आधी काहींवर इथे लिहिलेही होते, परंतु अलीकडच्या काळात एकंदरच ट्रॅव्हलॉग रील-शॉर्ट्स च्या महापुरात त्याची विशेष अशी आवश्यकता आता उरली नाही असे वाटू लागले व लिखाण खूपच कमी केले परंतु हा प्रवास असा वाटला कि ज्यावर काही लिखाण कुठेतरी सोडून जावे. मागे अशी एक कमेंट आलीये कि "हि काही नुसतीच भटकंती नाही तर तीर्थयात्रा आहे", अगदी खरे! हेतूही तोच ठेवला होता. आणि त्याचे कारण म्हणजे 'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥' अशा, राजकीय भारताबाहेरील भारती जनांची भेट घ्यायची असेल तर ते लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यासाठी तग धरून आहेत त्या स्फुर्तीस्थानांना भेट दिली पाहिजे. “धर्मो रक्षति रक्षितः” या उक्तीप्रमाणे या स्थानांच्या रक्षेसाठी हिंदूंनी अजूनही भूमी धरून ठेवली आहे आणि ती स्थाने व परिसर आज हिंदूंची आश्रय स्थाने बनली आहेत. मध्ययुगीन आक्रमण काळात का तीर्थस्थानांचे, यात्रेचे महत्व वाढले असावे, हे आज समजते आहे. शैव-वैष्णव-सौर-शाक्त कोणत्याही संप्रदायाची पूज्य स्थाने भारतभर असा प्रकारे स्थापित आहेत कि जी सामायिक सामाजिक जाणीव ज्याला आपण म्हणतो त्यात आपली मातृभूमी कुठवर आहे हे सतत अधोरेखित व्हावे. येथे अनेक जनपदे, गणराज्ये, स्वायत्त साम्राज्ये नांदली आणि नष्ट झाली, पण त्या पलीकडे शाश्वत ओळख जी आहे ती विसरता कामा नये. त्यासाठी या तीर्थयात्रा, तेव्हाही फलदायी होत्या व आजही आहेत. ज्याला या तीर्थयात्रा शक्य त्याने नक्की कराव्यात व आपल्या सामायिक सामाजिक स्मृतीमध्ये आपले योगदान देत राहावे. ज्यांना नाही शक्य झाल्या त्यांनी किमान आपापली सिस्टिम या अनुभवलेखरूपी 'स्मृती पॅच' ने नक्की अपडेट करून घ्यावी व "बंगालला विसरू नका" व "...'यासाठी' विसरू नका' हा संदेश आपापल्या वर्तुळात पुढेही नक्की पाठवावा.

Durga
.
.

आज महालय, भगवतीचा जागर! महालयाच्या योगावर या बंगालच्या नवदुर्गांचे, नऊ शक्तिपीठांचे स्मरण करीत भगवतीचे आवाहन करूया. कलकत्त्याची कालिका, ताम्रलिप्ती कपालिनी, रत्नेश्वरची रत्नावली जागराला ये! शिखरपूर सुनंदे, ईश्वरीपूर काली, चट्टला भवानी जगाराला ये. श्रीहट्ट महालक्ष्मी, भवानीपूर अपर्णे, जयंत पर्वतीच्या जयन्तिके जगाराला ये! म्लेंछक्षयाची दीक्षा तू एका महापुरुषाला दिलेली होतीस तेच कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी पुनश्च एकदा शस्त्र-आयुध घेऊन ये. जे तुझे भक्तगण अत्याचाराच्या सावटाखाली जगत आहेत त्यांच्यासाठी धैर्य वीर्य स्थैर्य ऐश्वर्याचा आशीर्वाद देण्यासाठी ये! जी काही उपचार पूजा आमच्याकडून होईल तिचा स्वीकार करण्यासाठी ये. जगताचे आई, रेणुके, अंबिके, भवानी, यल्लम्मे, योगेश्वरी, चतुःशृंगी, सप्तशृंगी, भद्रकाळी, गडावरची कड्यावरची सांडव्यावरची देवी सर्व रूपात ये. आम्हाला जागृतीत आणण्यासाठी ये, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ये, बळ देण्यासाठी ये. उदे गं अंबे उदे! जगदंब उदयोस्तु! जगदंब उदयोस्तु! जगदंब उदयोस्तु!

Durga
दुर्गापूजा, ढाकेश्वरी मंदिर, ढाका

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया , अखंड बंगाल

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Oct 2024 - 3:38 pm | मुक्त विहारि

हिंदूच हिंदुंचा घात करतात. हे परत एकदा जाणवले

एकदम ऑफ बीट आणि उत्तम मालिका झाली ही, ह्याआधी कधीही न पाहिलेली आणि ऐकलेली ठिकाणे बघायला मिळाली.
बंगालचा समृद्ध वारसा शेवटच्या घटका मोजत असलेला बघायला मिळतोय.

कर्नलतपस्वी's picture

3 Oct 2024 - 10:04 am | कर्नलतपस्वी

सुसंगत माहितीपूर्ण रोचक प्रवाही लेखन बांधून ठेवते.

अती सुंदर.

सौंदाळा's picture

7 Oct 2024 - 11:12 am | सौंदाळा

हेच म्हणतो

अगदी वर्तमान स्थळांच्या यात्रेतून बंगालचा समृद्ध भूतकाळ समजला.पण आता यापुढे अंधार होऊ लागलाय!
जगदंब जगदंब!

चावटमेला's picture

2 Oct 2024 - 8:39 pm | चावटमेला

सुंदर लेखमाला

श्वेता२४'s picture

2 Oct 2024 - 8:56 pm | श्वेता२४

'उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥' अशा, राजकीय भारताबाहेरील भारती जनांची भेट घ्यायची असेल तर ते लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यासाठी तग धरून आहेत त्या स्फुर्तीस्थानांना भेट दिली पाहिजे
प्रत्येक हिंदू बांधवांचे हे एक आवश्यक धार्मिक कर्तव्य असले तरी यासाठी मनाशी प्रचंड संकल्प व दृढ निश्चय हवा. आपली यात्रा सोपी नव्हती. आपण ती संकल्प पूर्वक केलीत म्हणूनच ती संपन्न झाली. अन्यथा हे सामान्य माणसाचे काम वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत जे मिळेल ते वाहन, जे मिळेल ते अन्नग्रहण करून राहायचे, यासाठी मनोनिश्चय महत्त्वाचा!!! बंगालचे आजचे स्वरूप व त्याचा भूतकाळ याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या या लेखमालेतून मिळाली. सदर लेखमाले करता मनःपूर्वक धन्यवाद!

झकासराव's picture

3 Oct 2024 - 1:49 pm | झकासराव

सुंदर।लेखमाला.
एक अतिशय महत्वाचा दस्तावेज तयार झालाय
आता इथून पुढे तिथे सामान्य भारतिय मनुष्याला acess असणार का किंवा कसे हे ही गुलदस्त्यात आहे।

किल्लेदार's picture

5 Oct 2024 - 3:55 am | किल्लेदार

छान. भगवतीचे आवाहन विशेषकरून आवडले.

सौंदाळा's picture

7 Oct 2024 - 11:15 am | सौंदाळा

नवरात्रीच्या शुभपर्वात या मालिकेद्वारे एक से एक सुंदर लेख वाचायला मिळाले.
आजपर्यंत फक्त देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे माहिती होती. एकूण किती शक्तीपीठे आहेत (याच लेखमालेत ५१ वाचल्यासारखे वाटत आहे) आणि कुठे आहेत?

समर्पक's picture

8 Oct 2024 - 10:56 am | समर्पक

त्यांची महिती इथे आहे: https://misalpav.com/node/51990

सौंदाळा's picture

11 Oct 2024 - 12:45 pm | सौंदाळा

धन्यवाद, लेख वाचला.
भरपूर नविन माहीती मिळाली. देवीची बरीच शक्तीपीठे बंगाल (पश्चिम बंगाल, बांग्लादेश) मधे असल्याने इकडे देवीची उपासना पुरातन काळापासून होते हे पण समजले.
आणि बरीच शक्तीपीठे लुप्त / नष्ट झाली हे कळल्यावर वाईट वाटले.

टर्मीनेटर's picture

14 Oct 2024 - 1:35 pm | टर्मीनेटर

समर्पक भाऊ... मस्तच झाली मालिका 👍
कित्येक अनवट ठिकाणांचा समावेश असलेल्या ह्या अनोख्या भटकंतीतुन खुप छान माहिती मिळाली!
धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Oct 2024 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्व लेख वाचले नी खूप आवडले. बांग्लादेश आणी पाकिस्तान ह्याबदल नेहमी एक आकर्षण वाटतं. बांग्लादेश त्यामानाने बराच सौम्य वाटतो. कदाचित पूर्व बंगाल हा मुस्लिमबहुल नसता आणी आपलाच असता तर किती आनंद असता?? बंगाल आणी पंजाब हे भारतातील शक्तिशाली राज्ये फाळणीमध्ये दुभंगून आक्रसली, त्यांचे अश्रू आपल्याला कळणार नाहीत.

अशाप्रकारे कोणी सिंध प्रांत सध्या पाकिस्तानात आहे याची भटकंती भारतीय हिंदूच्या नजरेतून केली असेल ना,ते पण वाचायला पाहिजे.ती सिंधू नदी, शंकराचार्यांच्या काळातील शारदा पीठ ....