शोनार बांगला...! भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
10 Sep 2024 - 9:50 pm

Sunrise

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश

बांगलादेश रेल्वेचा रात्रभराचा अनुभव तसा बरा होता. भारतीय रेल प्रमाणेच आरक्षण मिळायला मारामार, त्यातही परदेशातून अजिबातच शक्य नाही. त्यामुळे स्थानिक कोणीतरी ते खरेदी करून दिले तरच शक्य. एक जुना सहकर्मचारी शोधून काढला, त्याने ढाक्यातल्या त्याच्या मावस/चुलत भावाचा संपर्क दिला आणि काम झाले पण अर्धवट. कारण त्यालाही केवळ त्याच्याच नावाने तिकीट काढता येत होते, वय सारखे असल्याने चालून जाईल असे सांगत त्याने 'वातानुकूलित कुर्सीयान' किंवा बांगलादेश रेल्वेच्या 'स्निग्ध' दर्जाचे तिकीट काढून दिले. आणि खरेच ते चालूनही गेले. बसून प्रवास मला काही फारसा आवडत नाही पण एकच रात्र असल्याने चालून गेले. सूर्योदय दर्शन गाडीतूनच झाले. त्रिपुरा राज्याला वळसा घालून, सखल मैदानी प्रदेशातूनच परंतु फार धीम्या गतीने असल्याने साधारण १० तास प्रवासानंतर सिल्हेट.

Train
बांगलादेश रेल्वे

सिल्हेट जिल्हा ब्रिटिश काळात आसाम प्रांतात होता. येथील सिल्हेटी बोली बंगलीपेक्षा थोडी वेगळी आणि असामी पेक्षा त्याहून वेगळी. गोपीनाथ बोर्डोलोई यांनी असामी न बोलणारे आणि मुस्लिमबहुल असे 'सिल्हेट आम्हाला नको' असे जाहीर केले. त्यामुळे फाळणीच्या वेळी आसाम भारतात विलीन होणार असला तरी सिल्हेटच्या पाच उपजिल्ह्यांमध्ये सार्वमत घेण्यात आले. पैकी ब्रह्माचल म्हणजे आजचे मौलवीबाजार, भारतात विलीन होणार होते तर बाकी चार पाकिस्तानात, परंतु रॅडक्लिफ दुरुस्तीमध्ये करीमगंज, त्रिपुरा राज्य भारताला सोयीने जोडता यावे म्हणून भारताला देण्यात आले, तर ब्रह्माचल त्याबदल्यात पाकिस्तानात गेले. एकंदर फाळणी किती घिसडघाईत आणि मनाला वाटेल तशी केली होती व त्यामुळे कित्येक लोकांची कशी फरपट झाली असेल हे आता लक्षात आले असेल. आज कळते आपण भारतात आहोत उद्या समजते कि हे गाव पाकिस्तानला दिले. त्याहून वाईट, नेसत्या वस्त्रानिशी लोक रातोरात ब्रह्माचल मध्ये आले आणि नंतर समजले कि नेमके हेच पाकिस्तानला देण्यात आले आहे. पुन्हा काश्मीरच्या गाजावाजात गरीब बंगल्यांच्या ससेहोलपटीकडे लक्ष द्यायला ना कुणाला वेळ ना स्वारस्य!

. .map
संदर्भ नकाशा

सिल्हेटला एका बाजूने बर्बरिका किंवा बराक नदीचे तर दुसऱ्या बाजूने मेघालायमधून वाहत येणाऱ्या नद्यांचे वरदान लाभले आहे. मणिपूर मध्ये उगम पावणारी बाराक नदी आसाम च्या सीमेवर सुरमा-कुशियारा अशी द्विभाजित होते व पुढे पुन्हा एकत्र येत मेघना नदीच्या रूपात गंगेत विलीन होते. यातल्या सुरमा नदीवर सिल्हेट वसलेले आहे. सिल्हेट चे मूळ नाव श्रीहट्ट. हट्ट किंवा हाट म्हणजे बाजारपेठ. श्री आपल्याला माहीतच आहे, संपत्ती किंवा लक्ष्मी. येथेच ५० शक्तिपीठांपैकी ग्रीवा पीठ (गळा). येथील अधिष्ठात्री देवता महालक्ष्मी. देवीचे मंदिर गावाच्या दक्षिण भागात आहे. रेल्वे पोहोचेपर्यंत सकाळचे आठ वाजले होते, सकाळी उघडलेल्या काही दुकानांमधून नारळ, तांदूळ, गूळ, चणे इ. जुजबी खरेदी करत थेट मंदिरात पोहोचलो. सकाळची झाडलोट सुरु होती. ठाकुरांचे घर आवारातच होते. अर्धवट पूर्ण झालेले लहानशा धर्मशाळेचे कामही आवारातच होते. ठाकुरांनी चौकशी केली. त्यांना म्हंटले आधी स्नानाची व्यवस्था हवी आहे. ते म्हणाले समोर जा नळावर. नदीशिवाय सूर्यसाक्षीने अशी आंघोळ बऱ्याच दिवसांनी. नंतर नित्य पूजापाठ उरकून ठाकुरांबरोबर पूजेला बसलो. मंदिर नव्या बांधणीचे. हवा उजेड उत्तम. येथे देवीची मूर्ती नाही, एक चार-सहा फुटी शिळा जमिनीवरच आडवी अशी आहे, त्याच ब्रह्मशीलेची देवी म्हणून पूजा करतात. मंदिराच्या कळसाकडे अगदी वरचा भाग अनाच्छादित ठेवला आहे. जणू सूर्य-चंद्र-वरुण इत्यादी देवीचे थेट दर्शन घेतात. मंदिराच्या मागल्या बाजूस एक विशाल बिल्व वृक्ष त्या कळसाकडच्या उघड्या जागेतून डोकावू पाहत आहे. त्यानेही बिल्वाभिषेकाची साधना अव्याहत चालू ठेवलेली आहे. आवारात कदंब, पारिजात असे सुंदर वृक्ष. अत्यंत प्रसन्न असे वातावरण. ठाकुरांनी ओटीचे-पूजेचे सर्व साहित्य घेतले व म्हणाले आज या सर्वाचा उत्तम नैवेद्य करू, भोजन ग्रहण करून मगच पुढल्या प्रवासाला जा. मी हो म्हणालो. पुढे साधारण दोनेक तासात त्यांनी एकहाती उत्तम सुग्रास स्वयंपाक केला. अन्य भाविकही तोवर प्रसादासाठी आले. त्या प्रासादिक भोजनाची रुची काही औरच! पुढील गंतव्य जरा अवघड ठिकाणी होते, साधारण साठ किलोमीटर वर असलेले लहानसे खेडेगाव. ठाकूर म्हणाले बस वगैरे करण्यापेक्षा थेट रिक्षा घेऊन जा, पैसे लागतील पण लवकर वेळेत आणि सुरक्षित पोहोचशील, लगेचच मंदिराच्या बाहेरच एक रिक्षा दिसली, ठाकुरांनी त्याला पत्ता समजावून सांगितला. प्रस्थान मेघालय सीमेकडे.

Temple Temple Temple
महालक्ष्मी मंदिर, मंदिर प्रसाद, देवी दर्शन - ब्रह्मशिला व वर बिल्ववृक्ष

जयंतीपूर रस्ता अतिशय अविकसित अशा ग्रामीण भागातून जात होता. काही वेळाने गावेही लागेनाशी झाली. नुसती मोठाली शेते, कुरणे किंवा तळी. एके ठिकाणी रस्ताच संपला विचारायलाही कोणी नाही, पुन्हा परत येऊन वाटेवरच्या एका पाड्यावर चौकशी, कोणालाही त्या ठिकाणाविषयी काही माहिती नाही असेच चित्र. शेवटी ब्रिटिश गॅझेट मध्ये कानाईघाट चा संदर्भ वाचलेला त्याची वाट विचारली व त्या दिशेने गेलो. पुढे अजून एका गावात मग पुन्हा विचारणा केल्यावर जरा बरी दिशा सांगितली गेली. दूरवर डोंगररांगांची पुसट रेखा दिसू लागली, तो भारत! मेघालयच्या पर्वतश्रेणी. चेरापुंजी-मावसिंराम याच पहाडांवर. मेघालय भारतात असल्याने आपल्याला त्या भागाची अधिक माहिती आहे. गारो-खासी-जैंतिया अशा तीन डोंगररांगा आपल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचल्याचे आठवत असेल. त्यापैकी जैंतिया हे खरे तर जयंतिया असे हवे. भविष्यपुराण/देवीभागवत-अर्गला स्तोत्रामधील "जयंति मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा नमोऽस्तुते॥" मंत्रातील जयंति देवीचे उपासक. त्यांची प्राचीन नगरी जयंतीपूर मैदानी प्रदेशात आजच्या सिल्हेट प्रांतात आजही भग्नावस्थेत आहे. जयंतीपूरहून काही अंतरावर असलेले फालजोर काली बाडी येथील बामूर (वाम उरू - डावी मांडी) किंवा बामजंघा नावानेच ओळखले जाणारे ५० शक्तिपीठांमधील जयंतिकेचे स्थान. दोन तासांच्या वर होऊन गेलेले, रिक्षेचा निर्णय अगदीच योग्य होता हे समजले. ठाकूर दादांचे आभार. बस टमटम बदलता बदलता अजून वेळ गेला असता पण वेळ वाचूनही शहरात परतीला रात्र होणार हे नक्की. मग दूरवर एक कमान दिसली, गावाचे प्रवेशद्वार असावे अशी पण बाकी गावाचे काहीच चिन्ह नाही.

map
भारत बांगलादेश सीमा

Temple
मंदिर-ग्राम प्रवेशद्वार

काही अंतरावर एखाद दोन घरे दिसली, पुढे एक लहानसा पाडा. तिथून पुढे लाल कमळे उमललेलं एक सुंदर सरोवर. स्थानाची ओळख पटली. पलीकडच्या बाजूला एक लहानशी यज्ञशाळेसारखी परंतु विटा-पत्र्याने बांधलेली वास्तू. हेच ते जयंतिकेचे स्थान. यज्ञशाळा किंवा सभामंडप रिकामाच होता. त्यापलीकडे लहानशी घुमटी म्हणता येईल इतकेच मंदिर ते. मंदिराशेजारी ठाकुरांचे लहानसे घर. विशीतला तरुण बाहेर आला, त्याचेसोबत पूजाविधी संपन्न झाले. देवीची मूर्ती नसून केवळ 'ब्रह्मशीला' रूपातच येथे पूजा होते. अलौकिक शांती अनुभवत आराधन चिंतानादि. मग परिसरात एक फेरफटका मारला. जुन्या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या भव्यतेची कल्पना देत होते. बाजूलाच एक अश्वत्थाचा महावृक्ष. सरोवराभोवती एक प्रदक्षिणा. भारतसीमेपासून केवळ काही शे फुटांवर असलेले हे अद्भुत स्थान, आपल्याच कर्माने किती दुर्गम झाले... मावळत्या उन्हात सोनसळी शेतात ते अनुपम दर्शन डोळ्यात साठवत हळू हळू माघारी सिल्हेट कडे. जरी आधुनिक सीमा समोर दिसत असली तरी हीदेखील खरेच माझीच मातृभूमी हा भाव आता परिक्रमेने अनुभवसिद्ध झालेला होता.

Temple Temple Temple
प्राचीन मंदिराचे भग्नावशेष, सध्याचे जयंतिका मंदिर, ब्रह्मशिला स्वरूप देवी दर्शन

Temple
रक्तपुष्प सरोवर व मंदिर

पुढे सिल्हेटचे अनुल्लेखनीय नागरी भ्रमण व पश्चात अखंड बंगालच्या हृद्देशी प्रयाण. पुंड्रदेश, राजशाही!

Temple

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

12 Sep 2024 - 1:52 pm | गोरगावलेकर

माहितीपूर्ण लेख

किल्लेदार's picture

13 Sep 2024 - 12:55 am | किल्लेदार

इकडची एक भटकंती काढायला हवी. आता कठीण आहे एकंदरीत.

झकासराव's picture

18 Sep 2024 - 4:07 pm | झकासराव

छान माहिती मिळत आहे.
शक्तीपीठ आहेत आणि अजिबात गर्दी नाही हे दुर्मिळ दृश्य.
अर्थात हे तिथे आहेत म्हणूनच.