शोनार बांगला...! भाग ५ – चट्टग्राम/चितगांव

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
4 Sep 2024 - 10:26 am

Bridge

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

चट्टग्राम - चितगाव, बंगालचे सर्वात महत्वाचे व्यापारी बंदर. गंगा-त्रिस्रोता-ब्रह्मपुत्र-बर्बरीका किंवा आजच्या बंगाली नावांप्रमाणे पद्मा-तिस्ता-जमुना-बराक/मेघना या महानद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या पलीकडचा भाग हा "समतट" देश होय. त्यापलीकडे टेकड्यांचा प्रदेश, त्रिपुरा व त्याहीपलीकडे किरात राज्ये. दक्षिणेस धान्यवती म्हणजे आजचे 'सिटवे', आराकान, ब्रह्मदेश. समतटाची राजधानी आजचे कुमिल्ला शहर आहे तिथे होती व महत्वाचे व्यापारी नगरी "चट्टला", दक्षिणेस समुद्रकिनारी. त्यास चैत्यग्राम असेही नाव होते. दोन्हीचा अपभ्रंश, आजचे नाव चट्टग्राम, बंगाली उच्चार चॉत्तोग्राम. इथली भाषा देखील जरा वेगळी, चाटगाईया, बंगालीची एक बोली, पण स्वतंत्र भाषाही मानली जावी इतकी वेगळी. रोहिंग्या भाषेशी बरेच साधर्म्य.

चट्टग्राम विभागाचे (राज्याचे) प्रमुख चार भाग. उत्तरेस २, कुमिल्ला व नोआखाली, त्रिपुरा राज्याचे शेजारी, ढाक्क्याच्या सान्निध्यामुळे मुख्य बंगाली संस्कृतीच्या प्रभावळीतले. दक्षिणेस २, चितगाव-किनारपट्टी व चितगाव-घाट, सांस्कृतिकदृष्ट्या बरेच भिन्न व परंपरांची सरमिसळ असलेले. यातील ३ स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येसही मुस्लिमबहुल होते. परंतु चितगाव हिल ट्रॅक्ट किंवा घाट, त्याकाळीही मुस्लिमबहुल नव्हते व आजही नाही. १९४७ मध्ये रांगामाटी येथे खुलन्याप्रमाणेच तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत करण्यात आले. परंतु रॅडक्लिफ ने अजून एक हलकट खेळी करत हा भाग पाकिस्तानला दिला. बंगालच्या विधिमंडळात तेव्हा या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नसल्याने त्यांच्या बाजूने कोणीही बोलू शकले नाही. नेहरूंची बोटचेपी धोरणं प्रसिद्धच आहेत त्यामुळे या नितांतसुंदर शांत प्रदेशावर अक्षरशः बलात्कार झाला, होत आहे, व इथून चकमा व इतर लोकांचे लोंढे आजतागायत भारतात येत राहिले आहेत. कालांतराने मिझोराम राज्यातही त्यामुळे कायमस्वरूपी चिघळणारा प्रश्न निर्माण झालेला आहे. ७१ मध्येही यावर काही भाष्य झाले नाही. बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या मूर्खपणाच्या वा हलकटपणाच्या फार मोठ्या किमती या देशातील जनतेने स्वतःच्या अब्रूनिशी प्रसंगी जीवानिशी चुकविलेल्या आहेत, अजूनही चुकवत आहेत.

map map
संदर्भ नकाशा

मागील भागात पाहिल्याप्रमाणे बरीषालहून ढाका-कुमिल्ला-नोआखाली भेटी देत चितगाव जिल्ह्यात दाखल झालो. प्रथम गंतव्य 'सीताकुंड', महामार्गावरच पण साधारण तासभर आधीच चितगाव च्या. पोहोचलो तोवर अंधार पडलेला होता, एक हरे कृष्ण परिवार संचालित भोजनालय प्रथम दिसले. हिंदू भोजनालय म्हंटल्यावर उत्तम ताव मारला, रेशमसुती मुलायम तांदळाच्या भाकऱ्या आणि अस्सल स्थानिक घेवडा, केळफूल अशा भाज्या सोबत वांग्याचे भजे असा उत्तम बेत. त्यांच्याच ओळखीत एक ढाक्याचा हिंदू तरुण चालवत होता त्या निवासस्थानी राहायची व्यवस्था झाली. दुसऱ्या दिवशी एक वेगळेच साहस योजलेले होते...

map map
बंगाली निरामिष जेवण

बांगलादेशची हि किनारपट्टी साधारण कोकणासारखी. अरुंद सखल जमीन व नंतर लगेच किनाऱ्याला समांतर डोंगररांगा. फरक एवढाच कि सह्याद्रीच्या डोंगररांगा या ज्वालामुखीजन्य आहेत तर बंगालच्या वलीपर्वतरांगा आहेत. हिमालयाची झाली तशीच याही डोंगररांगांची निर्मिती हि भारतीय उपखंड आशिया खंडाला भिडल्याने उमटलेल्या सुरकुत्यांमुळे झालेली आहे. भारतीय उपखंडाच्या पूर्व सीमेची ही सुरुवात म्हणता येईल. पश्चिम-पूर्व विस्तारलेल्या हिमालयाच्या डोंगररांगा अरुणाचल प्रदेशात दक्षिणेकडे विस्तार पावतात व नागालँड मणिपूर त्रिपुरा मिझोराम चितगाव आराकान मार्गे गंगासागरापर्यंत, भारतवर्षाची हि पूर्वसीमा रेखाटतात. या वलीपर्वतांपैकी पहिली रांग, त्यातील सर्वात उंच शिखर म्हणजे चंद्रनाथ पर्वत. प्रथम गंतव्य स्थान. सीताकुंड गावातून सूर्योदयालाच पहाटे सायकल रिक्षाने डोंगराच्या पायथ्याशी आलो. सोबत जुजबीच सामान होते. अजिबात वेळ न दवडता चढाईस सुरुवात केली. सुंदर हिरवागार प्रदेश, एकंदर मृदा वनस्पती व पाषाण रचना पाहता सह्याद्रीच्या पश्चिम घाटापेक्षा तिरुपती-अहोबळ भागातील पूर्व घाटाशी अधिक साधर्म्य जाणवले. साधारण दोन तासांची चढाई माथ्यावर पोहोचण्यासाठी. तर प्रथम स्थानमाहात्म्य असे, ५० शक्तिपीठांमधील चट्टला भवानीचे हे क्षेत्र. त्याचा रक्षक भैरव चंद्रशेखर. हे शिवमंदिर या डोंगरमाथ्यावर आहे. पश्चिमेस चितगाव ची उपनगरे व दूरवर गंगासागर तर पूर्वेस चितगाव हिल ट्रॅक्ट च्या हिरव्यागार वळ्या. तशी जाताना बरीच गर्दी दिसत होती. तरुणाईमध्ये पिकनिक स्पॉट म्हणून एकंदर हि जागा लोकप्रिय दिसते. पण वर माथ्यावर मंदिरात हिंदूंनाच प्रवेश आहे. बाकीच्यांसाठी बाजूने जाण्यासाठी कठडे लावून उपद्रव टाळणारी वेगळी व्यवस्था केलेली आहे. एकदा गड सर झाल्यावर उतरताना मात्र सावकाश लोकांशी गप्पा मारत काकडी सरबत इत्यादीचा आस्वाद घेत उतरणीस लागलो. वाटेत चितगाव चे निवासी अनेक लोक भेटले. त्यात उल्लेखनीय म्हणजे सामवेदी शाखेचे वेदपाठी, जे आजकाल भारतातही दुर्मिळ झाले आहेत. परचक्राच्या वरवंट्याखाली काय काय हरपलं हे असे काही सामोरे आले कि समजते. आणि ते आहेत, अजूनही आहेत. ..., ४६, ७१, ९३, २४, ... सगळे घाव सोसत टिकले आहेत...!

map map map
चंद्रनाथ पर्वत

ccm
डोंगरचा खाऊ

डोंगरमाथ्यावरून उतरताना अर्ध्या वाटेत देवीचे स्थान आहे. चट्टला भवानी. ५० शक्तिपीठांपैकी दक्षिण बाहू पीठ. मंदिर अत्यंत साधे, अलीकडेच बांधलेले. देवीची उभी कालिका रूपातील मूर्ती. काही काळ तेथे व्यतीत केला. पुढे डोंगराच्या पायथ्याशी भैरव मंदिर व शेजारीच बांधीव घाट असलेला तलाव. सर्व पाहून जेवायच्या वेळेपर्यंत पुन्हा गावात आलो. आता पुढला टप्पा जरा खोल जंगलातील. आधी कालच्याच जागी जेवून घेतले. मग पुढे स्थानिक वाहनाने बारबकुंड येथे, तेथून सायकल रिक्षाने गावाच्या अगदी टोकाला जंगलाच्या उंबरठ्यावर व पुढे पायी चालत. चितगावचे जंगल, व्हिडीओ : https://youtube.com/shorts/fyejqdcSAU8

bhavani bhavani
चट्टला भवानी

bhavani
भैरव तलाव

हे स्थान एका ब्लॉग मध्ये वाचनात आले होते. त्यातील वर्णनावरून आता हुडकून काढणे. ओहोळाच्या वाटेने चालत जंगलात साधारण पाऊण एक तासावर जुन्या बांधकामाच्या पायऱ्या दिसल्यावर योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली. दोन स्थानिक नसलेले बांगलादेशी तरुणही वाटेत भेटले, त्याव्यतिरिक्त मात्र सर्वत्र शुकशुकाट. नैसर्गिक रित्या वाढलेले मोठाले बिल्ववृक्ष पाहून खूपच आश्चर्य वाटले. वातावरणात एक गूढ चैतन्य भरून होते. पायऱ्या चढून गेल्यावर भग्न मंदिरांचे अवशेष सर्वत्र विखुरलेले होते. त्यात एका कमानीसारख्या द्वारातून आत पाहता दुमजली इमारत असावी असे बांधकाम दिसले. एक मजला आत उतरून मध्यावर एक लहानसे ४X४ फुटाचे कुंड होते. त्या पाण्यातून सतत बुडबुडे येत असलेले दिसले. कुंडाचा अर्धा भाग विटांनी बांधून काढलेला आच्छादित होता व वरून डोकावून पाहता येईल अशी मोकळीक ठेवलेली होती. त्यात पाहता, आतमध्ये प्रज्वलित अग्नी! स्थानाचे नाव "सतीकुंड". खरेतर सीताकुंडचेही नाव सतीकुंड च असावे, कारण ज्ञात रामायणात सीता या भागात आल्याचे काही उल्लेखात नाही व सतीच्या कथेशी निगडित क्षेत्र असल्याने हेच नाव संयुक्तिकही वाटते. तसेच हे 'ज्वालामुखी काली' चे स्थानच मूळ शक्तीपीठ असण्याचीही शक्यता आहे, पुढे हे मंदिर ध्वस्त झाल्यावर अन्यत्र भवानीची स्थापना करण्यात आलेली असू शकते. किती शतके सहस्रके हे कुंड प्रज्वलित आहे कोण जाणे! पण हिमाचलच्या ज्वालादेवी व अझरबैजान-बाकूच्या ज्वालाजी प्रमाणे हे नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर पाण्यावरील ज्योतिमुळे बाकी दोहोंपेक्षा विशेष वेगळे आहे. भूमीगत जलकुंड त्यावर प्राणमय प्रज्वलित अग्नी व यावर छत आकाशाचे, असे पंचतत्वांचे साकार स्थान! आणि हे सापडण्यास काही कष्ट न पडावेत याचे माझे मलाच अत्यंत आश्चर्य वाटले. हा दिवस खासच होता, निसर्गसान्निध्याचा पुरेपूर आनंद. आता पुढे चितगाव शहराकडे. सतीकुंड व्हिडीओ : https://www.youtube.com/shorts/mzQbmOYFo48

sati sati sati
सतीकुंड भग्न मंदिर

sati
सतीकुंड ज्वाला

चितगाव चे नाव पहिल्यांदा लहानपणी वाचले ते इतिहासाच्या पुस्तकात, सूर्य सेन, कल्पना दत्त (कम्युनिस्ट) आणि प्रीतिलता ओयाद्देदार (पाठ्यपुस्तकात वड्डेदार असे होते) या क्रांतिकारक हुतात्म्यांच्या कथेत. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविण्याचा पराक्रम या वीरांनी केला. पुढे पकडले न जाण्यासाठी प्रीतिलता यांनी आत्महत्या केली, कल्पना दत्त आजीवन कारावासात राहिल्या तर सूर्य सेन यांना फाशी झाली. चितगावचा भारतीय स्वातंत्र्यसमरातील सहभाग हा एक गौरवपूर्ण अध्याय आहे. दुर्दैवाने सगळे मुसळ केरात गेले. असो.

अन्य गजबजलेल्या भारतीय शहरांप्रमाणेच चितगाव हेही एक. येथे नौकाभंगाचा (Ship breaking) विशेष व्यवसाय चालतो परंतु त्यामुळे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात आहे. शहर कर्णफुली नदीच्या मुखी वसलेले आहे व नैसर्गिक खोल बंदर आहे. सुफी धर्मगुरू समुद्रावाटेच येथे पहिल्यांदा दाखल झाले व हिंदू-बौद्ध-किरात अशा मिश्र संस्कृतीच्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेत उत्तरोत्तर माजले. तरीही त्यातल्यात्यात बांगलादेशात अजूनही हिंदूंची कुठे ऐपत असेल तर ती या नगरात आहे. मला इथे मर्मा जमातीच्या लांबच्या ओळखीतल्या एका विद्यार्थ्याला भेटायचे होते. मर्मा लोक म्हणजे या भागातले ब्राह्मी वंशाचे वनवासी. प्रामुख्याने बौद्ध धर्मीय. त्याच्याबरोबर पुढे चितगाव ची भटकंती झाली. बंदरावर नदीपात्रात मोठमोठ्या माल व प्रवासीवाहू नौका सर्वत्र नांगर टाकून विसावलेल्या दिसत होत्या. पश्चिमेचा समुद्रावरील सूर्यास्त अगदीच मुंबईची आठवण देत होता. बंगालची प्रसिद्ध पाणीपुरी 'पुचका' इथे चाखली. आतापर्यंत तास ग्रामीण व निमशहरी भागातच प्रवास चालू होता, प्रसंगी जंगलातही. त्यामुळे बऱ्याच काळानंतर शहराची भटकंतीची झाली आणि जरा आरामही. आता इथून पुढे प्रवासाचे वेगळे साधन, 'बांगलादेश रेल शेबा', देशाच्या नैऋत्य कोपऱ्याकडे, पुढील स्थानक, सिल्हेट!

चितगाव गजबज व्हिडीओ : https://www.youtube.com/shorts/FqW3diV8bRE

chittagong
कर्णफुली नदीवरचा पर्यटक सज्जा

chittagong
पुचका पाणीपुरी

chittagong
चट्टग्राम कर्णफुली मुख सूर्यास्त

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

प्रतिक्रिया

झकासराव's picture

4 Sep 2024 - 11:59 am | झकासराव

अनवट प्रदेशाची सुरेख सफर.
ह्या विषयी माझ्या वाचनात कधीच आले नाहीये ह्याच्या आधी

श्वेता२४'s picture

5 Sep 2024 - 11:13 am | श्वेता२४

पाण्यामध्ये अग्नी कसा काय प्रज्वलित आहे. फारच आश्चर्य वाटले. निसर्गचित्रे व वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर

नैसर्गिक वायूचा साठा असल्याने...

पण हिमाचलच्या ज्वालादेवी व अझरबैजान-बाकूच्या ज्वालाजी प्रमाणे हे नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर पाण्यावरील ज्योतिमुळे बाकी दोहोंपेक्षा विशेष वेगळे आहे.
अझरबैजान -बाकू विषयी कालच समजले होते.म्हणजे सीताकुंड सह जगात अशी तीनच स्थान आहेत का?
खुप छान माहिती आहे. खुपच सुंदर भटकंतीचा अनुभव आहे...कमाल!

समर्पक's picture

6 Sep 2024 - 1:41 pm | समर्पक

"नैसर्गिक अग्नीचे स्थान असलेले मंदिर" अशी स्थाने माझ्या महितीत तरी ही तीनच आहेत. अन्यथा अशा ज्योती/ज्वाला अन्य अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.

नठ्यारा's picture

6 Sep 2024 - 3:00 pm | नठ्यारा

ज्वालापूर, नेपाळ, बाकू, वगैरे धरून तेराचौदा स्थाने सापडली आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.msn.com/en-gb/news/world/map-reveals-the-world-s-mysterious-...

-नाठाळ नठ्या

समर्पक's picture

6 Sep 2024 - 8:28 pm | समर्पक

माझा प्रतिसाद मुख्यतो जिथे मन्दिरे आहेत त्या अनुशंगाने होता. वरील यादी मधील दरवाजे-तुर्कमेनिस्तान तर खासच आहे, नरकाचे द्वार म्हणून दरवाजे, परंतु ते एका फसलेल्या शोधकार्याचे फलित आहे. अन्य ज्योति-ज्वाला आहेत परंतु मन्दिरे नाहीत.
मुक्तिनाथ मात्र या यादीत आहे. कालच टर्मिनेटर यांना व्यनी केलेला, की त्यांच्या नेपाळ भटकंतीचे वर्णन उत्तम चालू आहे, त्यात मुक्तिनाथ आहे का, नसल्यास एक पुरवणी लेख त्याविषयी लिहीन. ती ज्योत फारच लहान आहे मात्र...

Bhakti's picture

7 Sep 2024 - 7:06 pm | Bhakti

कुदरती ज्वाला' अशा थीमबेस्ड भटकंतीत ही सगळी ठिकाणं पाहायची ;)
ते नरकाचं दार खुपचं छान आहे.पण यातले बरेचसे कोळसा खाणीला आग लागून वर्षोनुवर्षे धगधगणारे अग्नी स्थाने आहेत.नैसर्गिक वायूचे ती मंदिर सोडून अजून दोन -तीनच दिसत आहेत.परत नीट वाचाव लागेल.
धन्यवाद नाठाळ.