भारतात जे पाच प्रमुख हिंदू उपासना पंथ आहेत त्यापैकी शाक्त हे प्राचीन तसेच सर्वदूर प्रभाव असलेले होत. त्यांच्या प्रमुख तीर्थ क्षेत्रांचा उल्लेख शक्तीपीठ असा केला जातो. यातील कामाख्येसारखी काही अतिप्राचीन मूर्तिपूजेपेक्षाही प्राचीन देवस्थाने आहेत तर वैष्णोदेवीसारखी अलीकडच्या काळात नावारूपाला आलेली परंतु विख्यात असलेली अशी अनेक स्थाने आहेत. या लेखात काळाप्रमाणे या स्थानांत कसा बदल होत गेला काही विस्मृतीत गेली तर काही नव्याने निर्माण झाली, याचा आढावा घेतला आहे.
शक्तिपीठांची कथा : बहुतांश जनांस माहिती आहे, पण तरीही. प्राचीन काळी राजा दक्ष राज्य करीत होता. त्याची कन्या, सतीचा विवाह शंकराशी झाला. परंतु शंकराचे वर्तन हे समाजमान्य पद्धतीने नसल्याने दक्षाला त्यांच्याविषयी आदर वाटत नसे. कनखल क्षेत्री (हरिद्वार जवळ) एका विशेष यज्ञाच्या आयोजनाचे वेळी दक्षाने सर्व देवांना आमंत्रण तसेच हवि भाग दिले परंतु महादेवाला साधे आमंत्रणही न दिल्याने सतीचा क्रोध अनावर झाला व त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी तिने अग्निकुंडात उडी घेतली. तदनंतर पत्नीच्या देहत्यागाचे अपार दुःख महादेवास होऊन तिचे दग्ध कलेवर घेऊन ते पृथ्वीवर दाही दिशांना विलाप करत फिरू लागले, तेव्हा हा मायेचा पाश तोडण्यासाठी श्रीहरीने सुदर्शन चक्राने त्या कलेवराचे तुकडे केले व सर्व दिशांना पसरवून टाकले. ते जेथे जेथे पडले तेथे शक्तीचा अंश म्हणजे शक्तिपीठे निर्माण झाली व त्या त्या ठिकाणी शिवाने रक्षक भैरवाच्या रूपात राहणे केले.
या कथेच्या आधारे अनेक साहित्यकृतींमध्ये शक्तिपीठांचा निर्णय दिलेला आहे. कामरूप-आसाम मधील कामाख्या हे निर्विवाद सर्वोच्च महत्वाचे शक्तीपीठ असल्याचे सर्वच शाक्त साहित्याचे मत दिसते. तदनंतर कामरूप-पूर्णगिरी-ओड्याण-जालंधर अशी चार शक्तिपीठांची एक संकल्पना दिसते. कालिकापुराणात, शनैश्चरास दग्ध कलेवराचे छेदन करताना सांगितले असून केवळ सहा मुख्य पीठांचा उल्लेख करून 'अन्यत्रही अशीच शक्तिपीठे स्थापन झाली' एवढीच कथा आहे.
कालिका पुराण अध्याय १८:
प्रविश्याथ शवं देवाः खण्डशस्ते सतीशवम् ।
भूतले पातयामासुः स्थाने स्थाने विशेषतः ।।४० ।।
देवीकूटे पादयुग्मं प्रथमं न्यपतत् क्षितौ । >> देविकूट
उड्डीयाने चोरुयुग्मं हिताय जगतां ततः ।। ४१ ।। >> उड्डियान
कामरूपे कामगिरौ न्यपतत्योनिमण्डलम् । >> कामगिरी
तत्रैव न्यपतद्भूमौ पर्वते नाभिमण्डलम् ।।४२।। >> कामगिरी
जालन्धरे स्तनयुगं स्वर्णहारविभूषितम् । >> जालंधर
अंशग्रीवं पूर्णगिरौ कामरूपात्ततः शिरः ।। ४३ ।। >> पूर्णगिरी, कामरूप (शिर - पूर्वान्त कामरूपस्य देवी दिक्करवासिनी ।। ५०।।, सद्य अरुणाचल प्रदेश)
...
अन्ये शरीरावयवा लवश: खण्डिताः सुरैः ।
आकाशगङ्गामगमन् पवनेन समीरिताः ।। ४५ ।। >> अन्य पिठांचा उल्लेखमात्र
यत्र यत्रापतन् सत्यास्तदापादादयो द्विजाः ।
तत्र तत्र महादेव: स्वयं लिङ्गस्वरूपधृक् । >> प्रत्येक ठिकाणी भैरव स्थापना
-------
पुढे काही तंत्र साहित्यात १०८ पीठांचाही उल्लेख दिसतो, यात प्राणतोषिणी तंत्र, बृहन्नीलतंत्र इत्यादी ग्रंथ आहेत. पण सर्वात अधिक मान्य व प्रचलित असलेला आकडा हा ५० चा दिसतो. संस्कृत भाषेतील १६ वर्ण व ३४ व्यंजने अशा ५० मातृकांचाही संबंध आढळतो. ललितासहस्रनामामध्ये 'पंचाशत्-पीठरूपिणी' असे एक नाव आहे त्यातूनही ५० पीठांचा संकेत मिळतो. याचा साहित्यिक मागोवा घेता बऱ्याच प्राचीन उल्लेखांमध्येहि पन्नास शक्तिपीठे अशीच मान्यता दिसते. योगिनीहृदयं, रुद्रयामल तंत्र, ज्ञानार्णव तंत्र तसेच मार्कंडेयपुराण इ. यांमध्ये हा समान उल्लेख आढळतो. यापैकी एक प्रत पुढीलप्रमाणे, थोड्या फार पाठभेदाने बाकी ग्रंथातही अशीच सूची आहे.
पिठानि विन्यसेद्देवि मातृकास्थानके पुनः ।
तेषां नामानि वक्ष्यन्ते शृणुष्वावहिता प्रिये ॥३६॥
कामरूपं वाराणसी नेपालं पौण्ड्रवर्धनम् ।
चरस्थिरं कान्यकुब्जं पूर्णशैलं तथार्बुदम् ॥३७॥
आम्रातकेश्वरैकाम्रं त्रिस्रोतः कामकोटकम् ।
कैलासं भृगुनगरं केदारपूर्णचन्द्रके ॥३८॥
श्रीपीठमोङ्कारपीठं जालन्ध्रं मालवोत्कले ।
कुलान्तं देविकोटं च गोकर्णं मारुतेश्वरम् ॥३९॥
अट्टहासं च विरजं राजगेहं महापथम् ।
कोलापुरमेलापुरं कालेश्वर जयन्तिका ॥४०॥
उज्जयिन्यापि चित्रा च क्षीरकं हस्तिनापुरं ।
ओड्डीशं च प्रयागाख्यं षष्ठं मायापुरं तथा ॥४१॥
जलेशं मलयं शैलं मेरुं गिरिवरं तथा ।
महेन्द्रं वामनं चैव हिरण्यपुरमेव चा ॥४२॥
महालक्ष्मीपुरोड्याणं छायाछत्रमतः परम् ।
एते पीठाः समुद्दिष्टा मातृकारूपकाः स्थिताः ॥४३॥
१. कामरूप २.वाराणसी ३.नेपाल ४.पौण्ड्रवर्धन ५.चरस्थिर ६.कान्यकुब्ज ७.पूर्णशैल ८.अर्बुद
९.आम्रातकेश्वर १०.एकाम्र ११.त्रिस्रोत १२.कामकोटक १३.कैलास १४.भृगुनगर १५.केदार १६.पूर्णचन्द्रक
१७.श्रीपीठ १८.ओङ्कारपीठ १९.जालन्ध्र २०.मालव २१.कुलान्तक २२.देविकोट २३.गोकर्ण २४.मारुतेश्वर
२५.अट्टहास २६.विरज २७.राजगेह २८.महापथ (काही ग्रंथात पुरस्थिर) २९.कोलापुर ३०.एलापुर ३१.कालेश्वर ३२.जयन्तिका
३३.उज्जयिनी ३४.चित्रा (काही ग्रंथात काश्मीर) ३५.क्षीरक ३६.हस्तिनापुर ३७.ओड्डीश ३८.प्रयाग ३९.षष्ठ (काही ग्रंथात विंध्य) ४०.मायापुर
४१.जलेश ४२.मलय ४३.शैल ४४.मेरुगिरि ४५.महेन्द्र ४६.वामन ४७.हिरण्यपुर
४८.महालक्ष्मीपुर ४९.ओड्याण ५०.छायाछत्रपुर
यातील चरस्थिर, कुलान्तक सारखी बरीचशी स्थाने आज ओळखू येत नाहीत किंवा कान्यकुब्ज म्हणजे कन्नौज सारखी स्थाने ओळखता आली तरी आज तेथे कोणतेही प्रसिद्ध शक्ती स्थान असलेले दिसत नाही. कोणत्याही पूजेच्या आधी करन्यास किंवा हृदयादि न्यास असतात तसे तांत्रिक मार्गात 'पीठ न्यास' हि एक महत्वाची क्रिया याच पिठांवर आधारित दिसते, परंतु त्यात मात्र मेरुगिरी हे मेरू व गिरीपीठ असे विभागल्याने संख्या ५१ झाली.
-----
पुढील काही काळात स्थानिक मान्यता उदयाला आलेल्या दिसतात तसेच अनेक प्राचीन नावे विस्मृतीत जाऊन नवी नवे प्रचलित झाली किंवा काही शक्तीपिठेच आक्रमणकाळात नष्ट होऊन त्यांची जागा काही अन्य महत्वाच्या शाक्त पिठांनी घेतलेली असू शकते. "महापीठनिर्णय" हे नंतरच्या काळात रचलेले एक महत्वाचे काव्य. आज प्रचलित असलेल्या शक्तिपीठांच्या संकल्पनेचा हाच स्रोत होय. याच्या हस्तलिखित प्रती बऱ्याच पाठभेदांसहित उपलब्ध आहेत. पुढे बंगालमध्ये १७५० नंतर "अन्नदा मंगल" नावाने रचलेले काव्य, संस्कृत महापीठनिर्णय बंगाली प्राकृतात घेऊन आले व तदनंतर याच शक्तीपीठ संकल्पनेचा प्रचार व प्रसार पुढे मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. यातही सर्वच्या सर्व ५० पिठांची स्थान निश्चिती अतिशय कठीण असून अजूनही बरेच संदर्भ उकरून काढावे लागतील पण अभ्यासांती खालील यादी बरीच ग्राह्य मानता यावी अशी आहे.
-----
दाक्षिणात्य शाक्तांमध्ये अठरा किंवा अष्टादश शक्तिपीठांची आणखी वेगळी मान्यता आहे. याचा साहित्यिक मागोवा फारसा घेता येत नाही. एखाद दोन स्तोत्रांमधूनच हा उल्लेख आढळतो. यातील काही अतिशय लहान देवस्थाने आहेत व त्यांचा अन्यत्र कुठेही उल्लेख आढळत नाही.
लङ्कायां शाङ्करी देवी कामाक्षी काञ्चिकापुरे ।
प्रद्युम्ने शृङ्खलादेवी चामुण्डी क्रौञ्चपट्टणे ॥
अलम्पुरे जोगुलाम्बा श्रीशैले भ्रमराम्बिका ।
कोल्हापुरे महालक्ष्मी माहूर्ये एकवीरिका ॥
उज्जयिन्यां महाकाली पीठिक्यां पुरुहूतिका ।
ओढ्यायां गिरिजादेवी माणिक्या दक्षवाटके ॥
हरिक्षेत्रे कामरूपा प्रयागे माधवेश्वरी ।
ज्वालायां वैष्णवी देवी गया माङ्गल्यगौरिका ॥
वारणस्यां विशालाक्षी काश्मीरेषु सरस्वती ।
अष्टादश सुपीठानि योगिनामपि दुर्लभम् ॥
सायङ्काले पठेन्नित्यं सर्वशत्रुविनाशनम् ।
सर्वरोगहरं दिव्यं सर्वसम्पत्करं शुभम् ॥
इति अष्टादशशक्तिपीठस्तुतिः ।
स्थानपरत्वे यादी खालीलप्रमाणे.
ठिकाण - सतीचा शरीर भाग - देवता
१ त्रिंकोमाली (श्रीलंका) - कटि - शांकरी
२ कांचीपुरम् (तामिळनाडू) - पृष्ठभाग - कामाक्षी
३ प्रद्युम्न (पश्चिम बंगाल) - धड - शृङ्खला देवी
४ मैसूर (कर्नाटक) - केश - चामुण्डेश्वरी
५ आलमपुर (आन्ध्र प्रदेश) - ऊर्ध्वदन्त - जगुलाम्बा
६ श्रीशैलम (आन्ध्र प्रदेश) - कण्ठ - भ्रमराम्बा
७ कोल्हापुर (महाराष्ट्र) - नेत्र - महालक्ष्मी
८ माहूर (महाराष्ट्र) - दक्षिणहस्त - एकवीरा देवी
९ उज्जैन (मध्य प्रदेश) - उदर - हरसिद्धि
१० पीठपुरम् (आन्ध्र प्रदेश) - वामहस्त - पुरुहुतिका देवी
११ जाजपुर (ओडिशा) - नाभि - बिरजा देवी
१२ द्राक्षारामं (आन्ध्र प्रदेश) - वामगण्ड - माणिक्यम्बा
१३ गौहाटी (आसाम) - योनि - कामाख्या
१४ प्रयाग (उत्तर प्रदेश) - अङ्गुली - माधवेश्वरी
१५ कांग्रा (हिमाचल प्रदेश) - शिर भाग - ज्वाला
१६ गया (बिहार) - स्तनभाग - मंगलागौरी
१७ वाराणसी (उत्तर प्रदेश) - कटिबन्ध - विशालाक्षी
१८ शारदा पीठ (काश्मीर) - कर्ण - शारदा देवी
-----
महाराष्ट्रातील स्थानिक परंपरा हि साडेतीन शक्तिपीठांची असून देवीभागवत ग्रंथामधील साठएक शाक्त स्थानांच्या वर्णनातील यादीमधील पहिल्या दोन श्लोकांमुळे प्रचलित असलेली दिसते. आता यातील सप्तशृंगीच अर्ध पीठ का याचे समाधान मिळत नाही.
कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदा स्थिता ।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ॥ ५ ॥
तुलजापुरं तृतीयं स्यात्सप्तशृङ्गं तथैव च । - देवीभागवत महापुराण, सप्तमः स्कन्धः, अष्टत्रिंशोऽध्यायः
[अवांतर : या उल्लेखासहित अन्य शेकडो संदर्भातून कोल्हापूरची महालक्ष्मी का अंबाबाई हा अत्यंत मूर्खपणाचा वादही पूर्णतः निकाली निघतो. शक्तीची अनेक नावे एवढेच काय ते सत्य. काही वर्षांपूर्वी तिरुपतीहून शारदीय नवरात्रात वार्षिक नियमाने भेट म्हणून येणारा शालू देखील 'व्यंकटेश्वराची पत्नी (महालक्ष्मी) म्हणून पाठवणार असाल तर स्वीकारणार नाही' अशा प्रकारचा मंदिर व्यवस्थापनाचा पवित्रा असल्याचेही वाचल्याचे आठवते. असो.]
-----
असा हा एकंदर शाक्तपंथाच्या तीर्थ-क्षेत्रांचा साहित्यातून घेतलेला मागोवा. अनेक ठिकाणी मूळ कथेवर आधारित अनंत आख्यायिका जन्माला येऊन ‘हे हि शक्तीपीठ आहे’ अशा धारणा रुजलेल्या आहेत त्या तपासणे किंवा नाकारणे हा या लेखाचा उद्देश नाही. शक्तीपीठ कथेशी थेट निगडित असे अन्य काही साहित्य तुमच्याही वाचनात असेल तर जरूर कळवा, परंतु त्यात कथेचा संदर्भ असावा, केवळ तीर्थावळी नसावी.
-श्रीरस्तु-
प्रतिक्रिया
7 Mar 2024 - 7:08 am | कर्नलतपस्वी
पावागढ एक शक्तीपिठ आहे असे कळाले. सतीच्या उजव्या पायाचा आंगठी इथे पडला आशी मान्यता आहे. लकुलीश हा भैरव आणी त्याचे मंदिराचे अधिकांश भग्नावशेष बघीतले.
अन्य मान्यताये पण आहेत पण लेख संदर्भात असल्याने इथे डकवली आहे. अधीक प्रकाश टाकावा.
बाकी लेख माहितीपूर्ण आहे.
7 Mar 2024 - 10:52 pm | समर्पक
बृहन्नील तंत्रामध्ये एका हस्तलिखितात काश्मीर च्या जागी 'पावक्य' असा एक उल्लेख आढळतो. (पौंड्रवर्धनपीठश्च पावक्यम् कान्यकुब्जकम्।) अन्यथा बाकी कुठेही याचा संदर्भ सापडला नाही. एकाच प्रतीमध्ये हा फरक असल्याने पाठभेद समजून ग्राह्य धरला जात नाही. या स्थानाचे अन्य काही नाव असल्याचेही संदर्भ मिळाले नाहीत.
8 Mar 2024 - 1:33 am | राघवेंद्र
याच विषयावर झी ५ वर Sarvam Shakthi Mayam ही मालिका छान आहे
8 Mar 2024 - 7:07 am | सुखी
८ माहूर (महाराष्ट्र) - दक्षिणहस्त - एकवीरा देवी
एकविरा देवी की रेणुका माता?
12 Mar 2024 - 10:34 am | समर्पक
साहित्यात दोन्ही नावे आहेत. सद्य रेणुका माता नाव अधिक प्रचलित आहे.
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम्। - मातुःपुर = माहुर