शोनार बांगला... भाग ३ - खुलना, बांगलादेश

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
16 Aug 2024 - 12:44 pm

road

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

पूर्वी त्रिपुरा मधून वेगवेगळ्या भागातून बांगलादेश चे अवलोकन केले होते. सीमेवर एखाद दोन वैध-अवैध भेटीही झाल्या परंतु अनेक वर्षांनी ती सीमा आता अधिकृतरीत्या ओलांडली. बांगलादेश चा व्हिसा अनिवार्य असला तरी विनामूल्य असतो. 'प्रोसेसिंग फी' च्या नावाखाली थोडेफार पैसे घेतातच तरी. पण असो, प्राथमिक सोपस्कार पार पाडले आणि व्हिसा तयार ठेवला. सहा महिन्याचाच मिळाला पण पुरेसा होता. अफगाणिस्तान प्रमाणेच पायी प्रवेशाचा संकल्प, तो घोजाडाङा-भोमरा सीमेवर पासपोर्ट वर ठप्पा मारत साधला. दोन्ही बाजूचे कस्टम अधिकारी निर्लज्ज पणे पैसे मागत होते, परंतु फार त्रास देण्यासारखे काही नव्हतेच माझ्याकडे. बेनापोल ची सीमा सामान व रेल्वे इत्यादी वाहतुकीसाठी सर्वात महत्वाची आहे व इथून फार लांब नाही, त्यामुळे इथे या सीमेवर फार सेवा सुविधा विकसित झालेल्या नाहीत. सीमेपलीकडे काही चलन बदली करून अजिबात वेळ न दवडता जणू काही आधीच ठरलेले असल्याप्रमाणे बाईक वर डबल सीट लिफ्ट, तीही दीड तास प्रवासासाठी, थेट पहिला थांबा जिथे होता त्या ईश्वरीपूर या गावात.

pond

बांगलादेशचे एकूण आठ विभाग, आपल्याकडील राज्यांप्रमाणे. त्यातील खुलना विभागामध्ये मी प्रवेश केला. आजचा खुलना विभाग प्राचीन वंग/बंग जनपदाचा मध्यवर्ती भाग तसेच मध्ययुगीन यशोहर/यशोर किंवा जशोर राज्याचा भाग. येथील अधिष्ठात्री देवता, यशोहरेश्वरी, बंगालीमध्ये जशोरेश्वरी काली. १२०४ मध्ये येथे इस्लामी परचक्र येऊन थडकले त्यानंतर काही अपवाद वगळता येथे इस्लामची सत्ता राहिली. त्यात एक गौरवपूर्ण पर्वाचा अपवाद म्हणजे यशोहर राज्य. शहाजी राजांच्या समकाळात, तेथे प्रतापादित्य राजाचे राज्य होते. त्याच्या वडिलांनी स्थानिक सुल्तानाविरुद्ध बंड करून राज्य स्थापिले. ईश्वरीपूर हि त्याची राजधानी आधी यशोर नावानेच ओळखली जात असे. परंतु नंतर कसबा येथे राजधानी हलविण्यात आली व त्याचे नाव बदलून यशोहर/जेसोर करण्यात आले व जुने राजधानीचे ठिकाण कालांतराने खेडेगाव म्हणूनच शिल्लक राहिले. पुढे मुघलांनी हिंदू मिर्झा राजा मानसिंगाकरवी (मराठ्यांविरुद्ध पाठविलेल्या जयसिंगाचा पूर्वज) हिंदू यशोहर राज्य बुडविले व वंग जनपद पुन्हा अंधकारात बुडाले. याच दरम्यानची एक दंतकथा आहे कि येथील देवीने एका दिवशी पश्चिमेकडे आपले तोंड फिरविले व तेव्हा प्रतापादित्यचा पाडाव तर झालाच पण शतकांनंतर भारताची फाळणी झाल्यावरही हिंदू बहुल असून देखील खुलना पूर्व पाकिस्तानात गेले व भारताची सीमा मंदिराच्या पश्चिमेसच राहिली. १९४७ मध्ये खुलना शहरात देखील तिरंगा फडकवण्यात आलेला होता परंतु पुढील तीन दिवसात फासे पलटले. मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद पाकिस्तानात गेल्याचा आनंद साजरे करत असताना गंगेचे (हुगळीचे) विभाजन टाळण्यासाठी ते रॅडक्लीफ करेक्शन नुसार भारतास हस्तांतरित करण्यात आले व बदल्यात खुलना, अर्ध्याहून अधिक हिंदू जनतेसहित व सुंदरबनासहित पाकिस्तानात समाविष्ट झाले.

बांगलादेशात राज्य म्हणजे विभाग, प्रत्येक विभागात जिल्हे व त्यात उपजिल्हे अशी रचना. भारताच्या सीमेलगत सातखिरा हा जिल्हा, त्यात सर्वात दक्षिणेकडे श्यामनगर उपजिल्ह्यात ईश्वरीपूर हे लहानसे खेडे. सुंदरबनचे हे प्रवेशद्वार. अतिशय दुर्लक्षित व मागास असा प्रदेश.

govari
गावात गोवऱ्यांऐवजी शेणाचे इंधन करण्याची वेगळी पद्धत दिसली

pond
अशा प्रकारची शेवाळलेली तळी बंगालमध्ये प्रत्येक घराबाहेर पाहायला मिळतात. त्यातच अंघोळ-धुणी-भांडी-मासे सगळंच...

जशोरेश्वरी काली - ५० शक्तिपीठांमधील हस्तकमल पीठ (हाताचे तळवे). मंदिर अलीकडेच नव्याने उजळले आहे, कारण ठरले ते मोदींच्या भेटीचे. मागील बांगलादेश भेटीत त्यांनी या जागेला भेट देण्याचे जाहीर करताच रातोरात मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी करून उत्तम करण्यात आले. गावात साडी-ओटीचे सामान घेताना गावकऱ्यांनीही मोदींच्या प्रवासाच्या हकीकती सांगितल्या. हिंदू धार्जिणा नेता म्हणून त्यांचा तिरस्कार असला तरी भक्कम नेतृत्वाचा त्यांना हेवा वाटतो हे एका शेंदरी दाढीवाल्याने आवर्जून सांगितले.
temple
ईश्वरी काली मंदिर - पंचरत्न प्रकारातले. पत्र्याचा मंडप अलीकडचा, मोदी भेटीनंतर आलेला.

मंदिराचा आवार स्वच्छ व मोठमोठ्या वृक्षांनी सुशोभित आहे. जुन्या ऐतिहासिक मंदिराच्या बांधकामाचे अवशेष एका बाजूला अजूनही तशाच जीर्ण अवस्थेत दुःखद कथा सांगायला उभे आहेत. पत्र्याचा मंडप आता नव्याने परिसराच्या नशिबी आला आहे. देवी घोररुपा आहे. मंदिर अगदी सुंदरबनाच्या काठीच असल्याने प्राचीन काळी दाट जंगलातच असले पाहिजे. अगदी अलीकडेपर्यंत मंदिरात भगवतीच्या सान्निध्याला वाघ येत असत असे ऐकले. मंदिरात शांत एकांत जो इथे मिळाला तो पश्चिम बंगाल मध्ये अगदीच दुर्मिळ होता. पठण-ध्यान-उपचारादि आनंद करत उत्तम समय व्यतीत केला.
ishvari
ईश्वरी काली विकराल विग्रह.

इथे व्हिडीओ डकवता येत नसल्याने या लिंक वर पहा: https://youtube.com/shorts/ioqZPN4zMIk?feature=shared

बाकी गावात काही सुविधा नाही. पुढे बस वा मिळेल त्या साधनाने उपजिल्ह्याचे ठिकाण श्यामनगर, तेथून सातखिरा व मग खुलना. प्रत्येक ठिकाणी काही काळ व्यतीत करत, स्थानिकांना भेटत खुलना मुक्कामी, परंतु अन्य भारतीय शहरासारखेच शहर ते. परंतु या लेखासाठी उल्लेखनीय असे तेथे फार काही नाही. तिथून पुढे शेजारील राज्य बरीषाल विभागाकडे पुढील भागात.

pond
संदर्भ नकाशा

sundarban
सुंदरबन खारफुटी

भाग १ - कलकाता भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

16 Aug 2024 - 6:04 pm | शाम भागवत

वाचताना व फोटो पाहताना एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो.
सगळंच नवीन असतं.

सौंदाळा's picture

16 Aug 2024 - 6:53 pm | सौंदाळा

तिन्ही भाग एकदमच वाचले आणि आवडले.
गोड बंगाली भाषा आणि गोड बंगाली मिठाई इतकीच बंगालची ओळख आहे.
पुर्वी एका मिपासदस्याने (अनिंद्य ) यांनी पण बंगाल / दुर्गापूजा यावर मस्त लिखाण केले होते.
पण बंगालबद्दल पुर्वी संपन्न असलेले पण आता लयाला गेलेले अशी एक प्रतिमा मनात तयार झाली आहे. बंगालचा विकासपण म्हणावा तसा झाला नाही असे वाटते.
पण गंगा, हुगळी सुंदरबन त्रिभुज प्रदेश, बंगाली वाघ, बंगाली साहित्य, शक्तीची उपासना याबद्दल कायमच आकर्षण वाटत राहिले आहे.
तुमचे कोणतेही प्रवासवर्णन वाचले की अगदी अस्सेच फिरायचे अशी इच्छा होते पण जमत मात्र नाही.
असो पुभाप्र

श्वेता२४'s picture

16 Aug 2024 - 7:07 pm | श्वेता२४

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

धर्मराजमुटके's picture

16 Aug 2024 - 7:49 pm | धर्मराजमुटके

साधारण १२-१५ वर्षांपुर्वी कोलकत्यास भेट देण्याचा योग आला होता.
एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता किंवा शोनार बांगला ह्या फक्त भुतकाळातील आठवणी. आठवणींना भुतकाळ असतो पण वर्तमानकाळ / भविष्यकाळ नसतो.
मराठी / बंगाली समाजाने देशाला समाजसुधारक बरेच दिले. बंगाली भाषा ऐकण्यास गोड, मात्र बंगाली बोली जितकी गोड तितकीच त्यांची डोकी देखील गरम.

कोलकाता विमानतळाजवळ अगदी मोठमोठाल्या गगनचुंबी इमारती बनल्या होत्या मात्र तिथे राहणार्‍यांची संख्या अल्प होती.
माझ्या जन्माअगोदर मुंबईत ट्राम चालायच्या असे ऐकले पण याचदेही ट्राममधे बसण्याची संधी कोलकात्याने दिली.

अशा प्रकारची शेवाळलेली तळी बंगालमध्ये प्रत्येक घराबाहेर पाहायला मिळतात. त्यातच अंघोळ-धुणी-भांडी-मासे सगळंच...
मी कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडजवळील एका मंदिरात निवांत बसलो असताना तेथील संतांशी बोलणे सुरु होते. बहुसंख्य ग्रामीण भागात गरीब शेतकरी आढळतात. शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे. एखादी व्यावसायिक आस्थापना उघडली कि तिथे लगेच युनियन करायची या उचापतींमुळे बरेच उद्योगधंदे बंगालबाहेर पडले. मात्र महाराष्ट्र असो, दिल्ली असो की बंगाल, व्यवसायात गुजराती मारवाडी जनतेचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. बंगालमधे देखील याचा अनुभव पदोपदी आला.
एकदा आम्ही कामानिमित्त आरा (पटना, बिहार) मधे होतो आणि अचानक काही सामान कमी पडले. शनिवार रविवार असल्यामुळे मुंबईवरुन, दिल्लीवरुन त्वरीत सामान मिळण्यासारखे नव्हते. त्या वेळेस कलकत्याच्या एका व्यावसायिकाने खाजगी बसने रात्री सामान आणि त्याबरोबर एक माणूस पाठवून सकाळी ८.०० वाजता आम्हाला पटनामधे केवळ १२०० रुपये ज्यादा घेऊन सामान पोहोचते केले होते. साधारण सहाशे किलोमीटर (एका बाजूने) प्रवास करुन तो माणूस आमच्यासाठी आला होता. त्याला चहापाणी करुन वर ३०० रुपये जास्तीचे दिल्यावर त्या माणसाच्या चेहर्‍यावर उमटलेले समाधान आजही मला लख्ख आठवते.

उत्तर प्रदेश व बिहार यांना पुर्वापार कोलकाता जवळचा त्यामुळे तिथली प्रजा नशीब काढण्यास कोलकात्यास जात असे. पुर्वीच्या काळी एखाद्या भैय्याचे वास्तव्य कोलकात्यास असणे ही युपी/बिहारमधे मानाची घटना होती. आता त्याच जनतेने मुंबई / दिल्ली जवळ करण्यास सुरुवात केली आहे.

बिहारी लोक सगळ्यात गरीब असतात असा माझा कैक वर्षांपासूनचा समज होता. मात्र मुंबईतील बांधकाम क्षेत्राचा अनुभव घेतला तेव्हा बंगाली सगळ्यात गरीब आहेत असे जाणवले. भय्यांना मराठी शिकण्यात रस नसतो त्यामुळे कित्येकदा त्यांचा राग यायचा मात्र बांधकाम क्षेत्रात काम करण्यार्‍याप बंगालींना हिंदीदेखील येत नाही. त्यांच्यासाठी मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डरांनी बंगालीत सुचना फलक लावलेले देखील पाहण्यात आले तेव्हा गरीबाला दोन घास मिळविण्याची भ्रांत,तर भाषा शिकण्यात कुठला रस ? असे म्हणून स्वतःचे सांत्वन करुन घेतले. मात्र कागदोपत्रांच्या नोंदणीत हाच अशिक्षित वर्ग पुढे आहे. झाडून सार्‍यांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्डे सापडतात.
आर. आर. आबांनी डान्स बार बंद केल्यावर बर्‍याच बंगाली बारबालांवर उपासमार ओढवली होती हे ही अचानक आठवून गेले. बंगबालांच्या (काळ्या ? ) जादूच्या नादाने देशोधडीला लागलेले इसम पाहण्यात आहेत.

बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे. (आता मराठी समाजात अभीरुची कमी होऊन धांगडधींग्याचा सोस वाढला आहे असे एक निरिक्षण). मुंबईत अनेक बंगाली मंडळे अस्तित्वात आहेत आणि ते नित्यनियमाने सार्बोजनीन दुर्गापुजा मंडळांद्वारे (मराठीत सार्वजनिक) विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करत असतात.

आपली लेखमाला उत्सुकतेने वाचतो आहे. वाचायला मजा येत आहे. थोडे मोठे भाग टाकता आले तर पहा.

मुक्त विहारि's picture

16 Aug 2024 - 7:55 pm | मुक्त विहारि

एक नंबर....

चौकस२१२'s picture

19 Aug 2024 - 6:05 am | चौकस२१२

बंगाली आणि मराठीत काही साम्यस्थळे आढळतात. सामाजिक मंडळे स्थापणे, विचारांचे अभिसरण करणे, संगीत, नाटक, साहित्य क्षेत्रात दोन्ही समाजाला अभीरुची आहे.
हे खरे आहे , एकदा एक चित्रपट उत्सवात सलग ७ बंगाली चित्रपट बघितले आणि बरे से सहज कळले ( कदाचित चित्रपट बसलाय मुले असेल) नुसते वाचले असते तर कळले नसते ( समाज देवनागरीत बंगाली लिहिलेलं असेल)

पण दोन काहीसे विरोधाभास दर्शवणारे / जाणवणारे प्रश्न आहेत
१) महाराष्ट्रात जसे उद्योग वाढले त्यामानाने बंगाल मध्ये का नाही ?सहकार + उद्योग
२) बंगालात कम्युनिस्ट बरेच दिवस सत्तेत होत तरी बंगाली हिंदू दुर्गा पूजा अगदी उत्सहाने करतात पण तिथे हिंदुत्ववादी संघटना रुजल्या नाहीत जश्या महाराष्ट्रात रुजल्या !

नठ्यारा's picture

19 Aug 2024 - 9:47 pm | नठ्यारा

चौकस,

दोन्ही प्रश्न रास्त व नेमके आहेत. खरंतर दुसरा प्रश्न एक वेदना आहे. बंगालला शिवाजी का लाभला नाही, असा प्रश्न कुणीतरी विचारवंताने केलाय. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे.

आ.न.,
-ना.न.

बंगालला शिवाजी का लाभला नाही

अगदी मनात हाच प्रश्न चमकून गेला.पण आता कुठेच शिवाजी येणार नाही? हेही ध्यानात आलं.

चौकस२१२'s picture

19 Aug 2024 - 6:07 am | चौकस२१२

शेताच्या एका भागात तांदूळ पिकवायचा आणि उरलेल्या अर्ध्या भागात शेततळे करुन तेथे मासे पिकवायचे आणि या दोन वस्तूंच्या साहायाने उदर भरण करायचे त्यामुळे तेथील प्रजेच्या अंगी अल्पसंतुष्टता हा गुण (की अवगुण) खोलवर रुजलेला आहे

गोव्यात "सुशेगात" म्हणतात ते हेच का ?

मुक्त विहारि's picture

16 Aug 2024 - 7:56 pm | मुक्त विहारि

पुभाप्र ....

राघवेंद्र's picture

17 Aug 2024 - 1:46 am | राघवेंद्र

समर्पक भाऊ मस्त चालू आहे सहल.
पु. भा. प्र .

नूतन's picture

17 Aug 2024 - 1:34 pm | नूतन

लेखमाला आवडली.हा भाग विशेष आवडला. नवीन माहिती मिळाली.

Bhakti's picture

20 Aug 2024 - 7:04 am | Bhakti

छान लेखमाला.

गोरगावलेकर's picture

20 Aug 2024 - 1:12 pm | गोरगावलेकर

फोटो आणि समर्पक माहिती दोन्हीही छानच

प्रचेतस's picture

20 Aug 2024 - 3:25 pm | प्रचेतस

अनवट सफर.