भाग १ - कलकाता, भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ - चितगाव, बांगलादेश , भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
कलकत्ता निवासी बंगालची तोंडओळख झाली. शहर ओळखीचे झाले तसेच जेटलॅग सुद्धा गेला. पुढला टप्पा आता निमशहरी व ग्रामीण भागाकडे. पश्चिमेकडे मेदिनीपूर जिल्ह्यात तमलूक. हावडा स्टेशनवरून एक्सप्रेस ने साधारण दोन अडीच तासावर हे शहर आहे.
प्राचीन काली तमलूक ताम्रलिप्ती नावाने ओळखले जाई. महाभारत तसेच अन्य ग्रंथात या नगराचा उल्लेख आढळतो. पूर्व किनाऱ्यावरील हे सर्वात संपन्न बंदर. पुराणात या क्षेत्राचा उल्लेख विभासक्षेत्र असाही आहे. पश्चिम किनाऱ्यावर प्रभास - सोमनाथ, तर पूर्व किनाऱ्यावर विभास. टॉलेमी, ह्युएन-त्संग इत्यादी परदेशी प्रवाशांच्याही वर्णनात गंगेच्या मुखावरचे महत्वाचे बंदर असे हे शहर आढळते. या विभासक्षेत्रीची अधिष्ठात्री देवता कपालिनी. देवीचे स्थान आता वर्गभीमा नावाने ओळखले जाते. ५० शक्तिपीठांमधील वाम-गुल्फ पीठ (डावा-घोटा). मंदिर हे कूर्मपीठावर म्हणजे लहानशा उंचवट्यावर आहे. लहानसेच. बलीवेदीका, नृत्यमंडप, दर्शन मंडप व गर्भगृह अशी रचना. देवी शस्त्रधारिणी व उग्ररूपा आहे. नैवेद्यास मरळ वर्गातील मत्स्य व इतर पदार्थ असतात. बलिप्रथा देखील पाळली जाते. क्रांतिकारी खुदिराम बोस यांचे स्फूर्तिस्थान. गाव रुपनारायण नदीच्या किनारी असून जुने राजबाडी चे अवशेष इत्यादी ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. खरेतर इथे पद्धतशीर शास्त्रीय उत्खननाची गरज आहे, पण सरकारच्या ध्यानी येईल असे वाटत नाही. शहरात फिरताना या भागात भाजप चांगलाच रुजला आहे असे जाणवले. पुढे या लोकसभेत पहिल्यांदाच भाजपने हि जागा जिंकलीदेखील.
तमलूक कपालिनी/वर्गभीमा मंदिर, मुख्य मंदिर 'देऊळ' प्रकारातले, पुढील पूजामंडप 'चारचाला' प्रकारचे स्थापत्य. त्यापुढे साधा सभामंडप.
बलिवेदिका - ताम्रलिप्ती
वर्गभीमा कपालिनी
पुढील गंतव्य हुगळी जिल्ह्यात असलेले खानाकुल. राज्य शासनाची बस, डुक्कर रिक्षा असे मिळेल तशा वाहनाने स्थानिक जीवनाचे अवलोकन करीत बंगाल अनुभवत प्रवास चाललेला होता. वाटेत मोठाल्या नद्या व त्यावर बांधलेले अगदीच कुचकामी लाकडी पूल एकंदर पायाभूत व्यवस्थांचा बोजवारा दर्शवित होते. खानाकुल गाव अगदीच छोटेखानी. इथे राजा राममोहन रॉय यांचा जन्म झाला, त्यांचे एक स्मारकही येथे आहे. परंतु माझे हे ठिकाण निवडण्याचे कारण म्हणजे येथे असलेले रत्नावली देवीचे स्थान. बंगालमधील अनेक मंदिरे आक्रमणकाळात नष्ट होऊन विस्मृतीतही गेली, परंतु ऐतिहासिक उल्लेखांवरून त्यातील बऱ्याच क्षेत्रांचे पुनरुत्थान झाले त्यापैकी हे एक. ५० शक्तिपीठांमधील हे दक्षिण-स्कंध पीठ (उजवा-खांदा). गावात बंगाली बांधणीची जुनी अजून दोन वैष्णव मंदिरेही आहेत. त्यातील एका ठिकाणी जो भोजन प्रसाद होता, त्यामुळे विशुद्ध बंगाली भोजनाची हौस पूर्ण झाली. अविस्मरणीय रुची!
या अशा पुलावरून लोकं, सायकली, रिक्षा, चारचाकी वाहने व म्हशी सुद्धा रोज ये जा करतात
रत्नावली चे लहानसे मंदिर
या काही फोटोच्या निमित्ताने बंगाली वास्तुकलेविषयी काही... बंगाल हा सपाट, नद्यांच्या गाळानी बनलेला प्रदेश, इथे कातळ दुर्मिळ, त्यामुळे येथील मंदिरे हि भाजक्या विटांनी बांधलेली असत. अधिक पावसाचाही प्रदेश असल्याने उतरत्या छपराची. वरील वर्गभीमा मंदिर हे 'देऊळ' प्रकारातले. त्यानंतर दोन बाजूस उतार असणारे दोचाला तर चारी बाजूस उतार असलेले चारचाला, दुमजली असेल तर आठचाला असे वर्गीकरण. काही मंदिरांना एक मोठा मध्यवर्ती कळस, ते एकरत्न. त्याभोवती कधी लहाने चार असतील तर पंचरत्न, त्याहीभोवती अजून चार असतील तर नवरत्न व अशा वाढत्या क्रमाने अजून एक वर्गीकरण. याहीपलीकडे काही प्रकार आहेत परंतु फोटो आहेतच अनायासे तर थोडी माहिती त्या अनुषंगाने.
खानकूल चे 'एकरत्न' राधा वल्लभ मंदिर
खानकूल चे 'नवरत्न' गोपीनाथ मंदिर
वाटेत कुठेतरी 'आठचाला' प्रकारची दोन मंदिरे व एक 'देऊळ'
तिसरा भाग पहिल्या दोहोंपेक्षा वेगळा, पूर्वेकडे सीमेवर बशीरहाट येथे. उत्तर २४ परगण्यात सीमेजवळ हा भाग येतो. अलीकडे वर्तमानपत्रात गाजलेले कुख्यात संदेशखाली याच भागात. कलकत्त्याहून लोकल ट्रेन इथवर अगदी सीमेपर्यंत येते त्यामुळे घुसखोरीच चित्र किती राजरोस व भयावह वास्तव आहे हे इथे जवळून बघायला मिळाले. असो, त्याचे या लेखात फार प्रयोजन नाही. कलकत्ता-ढाका वाहतूक हि मुख्यत्वाने `पेट्रापोल-बेनापोल’ या सीमेवरून होते परंतु अलीकडे कलकत्त्याहून अधिक थेट व जवळ असलेल्या भोमरा सीमेवरून वाहतूक वाढली आहे, हि सीमा बशीरहाट च्या अगदीच परसात. अत्यंत सुमार बेताच्या सोयी सुविधा, परंतु मुस्लिम बहुल पश्चिम बंगालचा जवळून अनुभव. सत्तर च्या काळात स्थलांतरित झालेल्या नामशूद्रादि मागास व अतिमागास वर्गातील लोकांचा कम्युनिस्ट-मुस्लिम दळभद्री युतीने केलेला अघोरी " मारीचझापी" नरसंहार याच भागातला. स्थलांतरित बंगाली हिंदूंच्या सीमेच्या दोन्ही बाजूस होणाऱ्या अत्याचाराच्या कथा अत्यंत हृदयद्रावक आहेत. आता (लेखन दिनांक २०२४), त्याची पुनरावृत्ती होत असताना पाहून अत्यंत खेदही वाटतो व क्रोधही येतो परंतु एकंदरच हिंदूंची परिस्थिती अत्यंत अगतिक आहे. तरी त्यातल्या त्यात यावेळेस बांगलादेशवर आंतरराष्ट्रीय दबाव बनवण्यात थोडेफार यश नक्कीच आले आहे.
संदर्भ नकाशा
दिवस-अंतर या गणितामध्ये हे लेखन/भाग बसवलेले नाहीत पण या तीन जिल्ह्यांमधील निमशहरी, ग्रामीण भागातून फिरताना बंगालची थोडी अधिक जवळून ओळख होत गेली, तशी तुम्हालाही झाली असावी. अर्थात हि तर केवळ सुरुवात, आता सीमेपलीकडे तर खऱ्या अज्ञाताची सफर... पूर्व बंगाल / बांगलादेश कडे प्रयाण!
घोजाडाङा सीमा
भाग १ - कलकाता, भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ - चितगाव, बांगलादेश , भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
प्रतिक्रिया
14 Aug 2024 - 10:14 pm | समर्पक
अलाइनमेंट HTML tags इत्यादी गोष्टी पूर्वीसारख्या काम करत नाहीयेत असे दिसत आहे... काही उपाय माहिती आहे का कोणाला? मझ्याच डोळ्याला खुपतेय हे विस्कळीत लेखन... कृपया व्यनि करा...
14 Aug 2024 - 11:04 pm | टर्मीनेटर
समर्पकजी हा भागही आवडला पण खुप लहान वाटला!
15 Aug 2024 - 7:41 am | कर्नलतपस्वी
हा भाग सुद्धा आवडला.
महाभारत काल ते 2024 च्या लोकसभा एव्हढा मोठा काळ छोटेखानी लेखात समाविष्ट केला आहे. हे साधे काम नाही.
काही नवीन माहिती मिळाली.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
15 Aug 2024 - 10:19 am | मुक्त विहारि
पुभाप्र...
15 Aug 2024 - 11:58 pm | शाम भागवत
वाचतोय.
आवडत पण आहे.
_/\_
16 Aug 2024 - 9:37 am | श्वेता२४
पहिले छायाचित्र बघून डोळे प्रसन्न झाले. बाकी ग्रामीण भागाचे विस्तृत विवेचन, स्थापत्यशैली , मंदिरांची माहिती हे खूप छान लिहिले आहे. बरीच वेगळी माहिती कळाली.