भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - चितगाव, बांगलादेश , भाग ६ – सिल्हेट बांगलादेश
बरीषाल विभाग हा गंगा-ब्रह्मपुत्रेच्या मुखाचा प्रदेश. बंगालीत "धान-नोदी-खाल, ए-तीने-बोरीषाल" असा वाक्प्रचार आहे, म्हणजे भातशेती, मोठाल्या नद्या आणि कालवे या तीन गोष्टी म्हणजे बरीषाल. खुलन्याहून संध्याकाळची थेट बस पकडली, साडेतीन तासाचा प्रवास. गंतव्य स्थान शिकारपूर, बरीषाल पासून साधारण २० किलोमीटर. पण शिकारपूर आधीच रस्त्यात येत असल्याने वाटेतच महामार्गावर फाट्यावर उतरलो. किर्र काळोख आणि उशिराची वेळ. आजूबाजूला वस्ती असावी असे जाणवत होते परंतु घनदाट झाडी व विजेची पुसटशीही खूण नाही. साधारण १५ मिनिटे महामार्गावरून पूर्वेस चालत गेल्यावर जरा उजेड दिसायला लागला. गंतव्य मंदिराचाच चौरस्ता. फार तर फार १५-२० घरं असलेला पाडा. समोर एक चहाची टपरी होती. तो मनुष्य दुकान बंदच करत होता, शेवटची झाक पाक चाललेली होती. त्याने विचारपूस केली. जवळपास राहण्याची काहीच व्यवस्था नाही, मंदिर आवार बंद. ग्रामीण भागातच राहण्याचा थोडा आग्रह असल्याने जरा अधिक चर्चा चालली आणि तोवर पारावर बसलेले अजून २-४ लोक गोळा झाले. भारत-मुंबई वगैरे ओळख झाल्यावर उत्पल दत्त, मिथुन चक्रवर्ती इथलेच मूळचे हे त्यांनी अगदी आवर्जून सांगितले. असो, राहायची सोय काही अजून समजत नव्हती. मग त्यांचा काहीतरी ठराव झाला, एकानी शेजारच्या सायकल रिक्षावाल्याला उठवून आणलं आणि मला नदीवर सोय होईल तर पहा असे सांगून रवाना केले. भारतात जसे महामार्गावर ट्रकवाल्यांना पाठ टेकता येईल इतपत सोय असलेले स्वस्त निवासी ढाबे असतात तसे इथे ते नदीवर असतात, कारण मालवाहतूक हि प्रामुख्याने जलमार्गानेच होते. तसे इथल्या स्थानिक धक्क्यावर तशाच प्रकारचे पण अतिशय सुमार दर्जाचे निवासस्थान होते. अफगाणिस्तान ची कुठलीशी मॅच चालू होती ते पाहत चार लोक तिथे बाहेरच गाद्या टाकून बसले होते. आतापर्यंतचा मोस्ट थ्रिलिंग क्षण, शक्यतो जाऊ त्या ठिकाणाचा साधारण अभ्यास असतो परंतु इतका उशीर अपेक्षित नव्हता व त्या चहावाल्याने पाठवले ते पूर्णच अनोळखी खेडेगाव. पत्र्याने उभारलेले, एक गादी व एक खुर्ची बसेल इतकीच जागा असलेले एक कक्ष, असे उजव्या बाजूला ३, डाव्या बाजूला ३ आणि समोर न्हाणीघर. सुपर मिनिमलिस्ट. असलेल्या लोकांशी मॅच संदर्भात संवाद साधत मैत्री केली तशातच १२ वाजले झोपायला.
शिकारपूर निवास
दुसऱ्या दिवशी पहाटे धुके चांगलेच दाटले होते. थंडीही साधारण १०-१२ अंशावरची. नळावर अंघोळ करून बाजूलाच असलेल्या नदीवरच्या धक्क्यावर गेलो. गंगेच्या सहस्र वितरिकांपैकी एक पण ती ही केवढी मोठी! साडेसात नंतर सूर्य जरा वर आला व धुके कमी होऊ लागले तसे मंदिराकडे प्रस्थान केले. वाटेत एक वृंदावन दिसले, हिंदू घर असावे असे वाटून वाडीत प्रवेश केला. मोठी नारळ सुपारीची झाडे आणि त्यात उतरत्या छपराची लाकडी पारंपरिक बंगाली घरे, समोरासमोर अशी, आणि मध्ये चौक. एक वृद्ध गृहस्थ व त्यांची पत्नी असे रॉय कुटुंब, बाजूला त्यांचेच परिवारातील बंधू. त्यांनी स्वागत केले, विचारपूस केली व घरात घेऊन गेले. आग्रहाने लाल-चा म्हणजे दूधविरहित चहा पाजला. आजतागायत प्यायलेल्यापैकी हा सर्वोत्तम काळा चहा. हलकेसे लिंबू व आले असावे. हालहवाल, गावाचा इतिहास, मंदिराची कथा अशा गप्पा झाल्या. अशा लोकांचा संपर्क संवाद सत्संग हाच तर खरा उद्देश इथे येण्याचा.
हिंदू घर व लाल चा
आजूबाजूला काही दुकान वगैरे काहीच नसल्याने त्यांनी त्यांच्या वाडीतलाच एक मोठा असोला नारळ देवीसमोर ठेवण्यासाठी दिला. सुगंधा शक्तीपीठ, ५० शक्तिपीठांमधील नासिका पीठ, मंदिर परिसर तसा लहान, अलीकडे बांधलेले. देवीचा विग्रह काळ्या दगडात घडविलेला, संपूर्ण सगुण, शस्त्रधारिणी कालिकेच्या रूपातील. सुनंदा असेही नाव. ठाकूर आलेले होते त्यांच्याकरवी पूजा केली व शांत वातावरणात आनंदाचे क्षण वेचले.
तिथून मग गावातून पुन्हा महामार्गावर येऊन स्थानिक वाहनाने बरीषाल येथे. प्राचीन काळी या प्रदेशाला गंगाहृदय का म्हणत असावेत याची प्रचिती येते. सर्वत्र जलमय! येथील तरंगत्या बाजारपेठा व त्यातही खास उत्पादन पेरू फार प्रसिद्ध आहेत (वरील चित्र). आता पुढे गंगेचा मुख्य प्रवाह, पद्मा ओलांडून चितगाव/चट्टग्राम कडे प्रयाण. त्यासाठी बरीषालहुन सकाळची बस पकडली. म्हणजे पुढील दिवसभराच्या प्रवासात हिरवागार बंगाल, गंगा-ब्रह्मपुत्र-तिस्ता(त्रिस्रोता)-करतोया यांचा एकत्रित विशाल प्रवाह, ढाक्याच्या उपनगरातील ट्रॅफिक, आणि कोमिल्ला नोआखाली फेनी अशा शहरातून जातानाच्या इतिहासातील काही घटनांच्या आजही अंगावर काटा येईल अशा स्मृती अशा अनेक गोष्टी अनुभवत पूर्वेस चितगाव कडे झेप. वाटेतली एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पद्मा ब्रिज. बंगालच्या विकासगाथेतला महत्वाचा अध्याय. पद्मेच्या एकत्रित प्रवाहावरचा हा महत्वाकांक्षी पूल प्रकल्प. याआधी ढाक्याला येण्यासाठी पहिले पद्मा मग ब्रह्मपुत्र अशा वेगवेगळ्या पार करत मोठा फेरा मारून जावे लागे, तो आता वाचला व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने रेल्वे व रस्ते या दोन्हीसाठी हा पूल बंगालच्या प्रगतीत भरीव योगदान देणारा ठरेल यात शंका नाही.
संदर्भ नकाशा
पद्मा सेतू
नोआखाली जिल्ह्यात एका ठिकाणी भारत सीमा महामार्गापासून अगदी काही मिटरवर येते तो क्षण
काही व्हिडिओ:
https://youtube.com/shorts/YffkPDTiq74
https://youtube.com/shorts/F_0xBW_7e2w
https://youtube.com/shorts/fGTMxZQQG8U
नोआखाली दंगल : १९४६ कलकत्ता दंगलीचे सर्वात भयानक पडसाद उमटले ते पूर्व बंगाल मध्ये. १६ ऑगस्ट १९४६, 'डायरेक्ट ऍक्शन' नंतरच्या च्या ईद पासूनच भडकावू भाषणे, छुपे हल्ले सुरु झालेले होते. अश्विन महिन्यात कोजागिरीला बंगाली लोक लक्ष्मी पूजन करतात त्या दिवशी रामगंज चा जमीनदार मुसलमान मुलाचा बळी देणार आहे या खोट्या बतावणीतून मुसलमानांनी या नरसंहाराला सुरुवात केली. नोआखाली व फेनी जिल्ह्यात पूर्वनियोजित प्रकाराने हिंदू घरांना घेरण्यात आले. खेडेगावांना जोडणारे लहान रस्ते अनेक नदी कालव्यांना ओलांडत जात, त्यावर लाकडी 'सांको' पूल बांधलेले असत ते उध्वस्त करून शहरांशी संपर्क तोडण्यात आला. नावा चालवणारे सर्व मुसलमानच असल्याने त्यांनी या हिंदूंच्या कोंडीत सक्रिय सहभाग घेतला. एकूणएक बांधीव घरे जाळण्यात आली. एकेका खेडेगावात पद्धतशीर पणे बळजबरी गोमांस खायला घालणे, व बायकांवर बलात्कार करून त्यांना बटीक बनवून पळवून नेणे अशा प्रकारे धर्मांतर घडविण्यात आले. १० ऑक्टोबर, एकाच दिवशी सगळ्या खेड्यांमध्ये एकाच प्रकारचे हल्ले. पुरुष किमान मेले तरी, बायकांना आपल्या नवऱ्याचे मुलांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले, त्यांच्या अब्रूची धिंदवडी निघाली आणि काहींना तर मौलवींनी हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांच्याच दावणीला बांधले. याच दरम्यान १९ ऑक्टोबर १९४६, गांधींचे कुप्रसिद्ध विधान, "अब्रू वाचविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी विष पिऊन मरावे!" व न केलेले विधान "...पण मी मुसलमानांना शब्दानेही दोष देणार नाही!". कोणत्याही सजग हिंदूने कधीही विसरू नये असा हा काळा इतिहास आहे, कारण नोआखाली दंगल आता एक टेम्प्लेट/पॅटर्न म्हणून वापरला जातो. शंभर मारा, हजार बाटवा, बाकीचे लाख आपणहून त्यांची संपत्ती आपल्यासाठी सोडून पळून जातील... आणि दुर्दैव म्हणजे एखादा लेख इथे संदर्भासाठी द्यावा म्हणून पाहता मला मराठीत यावर कोणतेही संकलित लेखन सापडले नाही!!! कोणाला सापडल्यास जरूर खाली प्रतिसादात लिहा.
भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ५ - चितगाव, बांगलादेश , भाग ६ – सिल्हेट बांगलादेश
प्रतिक्रिया
23 Aug 2024 - 9:10 pm | श्वेता२४
फोटो सुंदर असले व नेहमीप्रमाणेच ओघवते वर्णन असले तरी शेवट वाचून मन विषण्ण झाले.
23 Aug 2024 - 9:55 pm | रात्रीचे चांदणे
एव्हढे होऊन जे काही उरले सुरले हिंदू १९७१ साली मारले गेले असतील नाहीतर भारतात निर्वासित झालेले असतील.
24 Aug 2024 - 6:32 am | जयंत कुलकर्णी
https://misalpav.com/node/48758
4 Sep 2024 - 10:45 am | समर्पक
बराच आवाका लेखात आला आहे. धन्यवाद
25 Aug 2024 - 3:09 pm | मुक्त विहारि
लेखन आवडले...
26 Aug 2024 - 11:51 am | सुधीर कांदळकर
फाळणीनंतर देखील दंगली थांबल्या नाहीत. गरीब श्रीमंत यांमधील आर्थिक आणि सांपत्तिक दरीमुळे इथे साम्यवादी चळवळ फोफावली आणि कांही हिंसक संघटनांनी याचा गैरफायदा घेऊन दंगली घडवून आणल्या. आतां फक्त हिंदूमुस्लिमच एकमेकांना मारत नव्हते तर हिंदू हिंदूंना वगैरे विविध गट एकमेकांना मारूं लागले होते. वंगचित्रे मध्ये पुल देखील हे सगळें पाहून विषण्ण झालेले आढळतात.
26 Aug 2024 - 2:24 pm | टर्मीनेटर
मालिका वाचतोय... बरीच नविन माहिती मिळत आहे!
ह्या लेखाच्या निमित्ताने प्रतिसादातुन लिंक मिळालेला जयंत कुलकर्णी साहेबांचा वाचनातुन निसटलेला माहितीपुर्ण लेखही वाचायला मिळाला 👍