ईशान्य भारत : त्रिपुरा

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
17 Apr 2017 - 11:35 am

त्रिपुरा! एका फारशा माहित नसलेल्या राज्याची ओळख. खरं तर ईशान्य भारत एकल प्रवासावर विस्तृत वर्णनपर मालिका लिहायचा विचार होता, परंतु तेवढा वेळ मिळेल तेव्हा लिहू असे म्हणता राहूनच जाते, त्यामुळे थोडी पार्श्वभूमी देऊन प्रत्येक राज्याचा वेळ मिळेल त्याप्रमाणे वेगळा लेख करण्याचे ठरविले आहे.

अथांग पसरलेला सांस्कृतिक भारत एका जन्मी अनुभवणे हे शक्यकोटीतील काम नव्हे. परंतु जे जसे जमेल ते अनुभवावे अशा प्रेरणेने या वेळेस सुदूर ईशान्य प्रवास आखण्यास सुरुवात केली. मणिपूर व त्रिपुरा मुख्य आकर्षण व तेथे सर्वाधिक वेळ या खेपेस द्यायचा हे ठरले, परंतु भौगोलिक स्थान व प्रवासाच्या सुविधा हे सर्व लक्षात घेता प्रवास तसा इतर राज्यही समाविष्ट करत ठरल्यापेक्षा अजून थोडा वाढवून योजना पूर्ण झाली.

ईशान्य भारत : उत्तुंग हिमालय रांगा पामीरपासून पूर्वेकडे विस्तारत जात ब्रह्मपुत्राचे वळण घेत दक्षिणेकडे ब्रह्मदेश-आराकान प्रांतात गंगासागरापर्यंत येऊन मिळतात. त्यातील पूर्वेकडच्या पट्ट्यात सिक्कीम-अरुणाचल-भूतान हे पूर्व-पश्चिम हिमालय विस्ताराच्या कुशीतले प्रदेश तर नागालँड-मणिपूर-मिझोराम- दक्षिण आसाम व त्रिपुरा हे उत्तर-दक्षिण पर्वतरांगा असलेले प्रदेश. मेघालय नेमका या दोघांच्या कोनात असल्याने सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश. या पर्वतरांगांच्या पश्चिमेस आसामपासून सुरु होणारे बंगालचे मैदान. गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना यांच्या सुपीक पात्राचा व मुखाचा प्रदेश.
अशा या ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याविषयी या भागात. सध्याचे त्रिपुरा हे कमी उंचीच्या डोंगररांगात वसलेले असून तीन दिशांना बांगलादेश व पुर्वोत्तरेस आसाम व मिझोराम हि राज्ये आहेत. पूर्वेकडील दुर्गम भागास 'ढलाई' अशी संज्ञा असून तुलनेत कमी विकसित भाग. आगरतला, उदयपूर इत्यादी शहरे व विकसित भाग हा पश्चिमेकडे मैदानी इलाक्यात आहे. हे ईशान्य भारतातील एक प्राचीन राज्य. ब्रिटिश काळातही स्वातंत्र्य टिकवून ठेवलेले पुर्वोत्तरेतील मणिपूर व खासी (आजचे पूर्व मेघालय) हे दोन प्रदेश, व तिसरे म्हणजे त्रिपुरा. महाभारतादि साहित्यात याच नावाने उल्लेखित हा प्रदेश 'किरात राष्ट्र' म्हणवला आहे. पुढे प्राकृत अपभ्रंश त्विप्रा, ब्रिटिश अपभ्रंश तिप्पेरा इत्यादी झाले, परंतु मूळ नाव हजारो वर्षे टिकवून ठेवलेल्या काही मोजक्या प्रदेशांपैकी एक. पुरातन काळापासून स्वतंत्र ओळख जपणाऱ्या या प्रदेशावर बाराव्या शतकापासून "माणिक्य देव वर्मा" (अँग्लो-बांगला : देव बर्मन) घराण्याचे शासन आहे. (सुप्रसिद्ध संगीतकार आर डी व एस डी याच घराण्यातले.) कर्तृत्ववान राजांनी हा प्रदेश मुघल ते बंगालच्या मुसलमान नवाबांपासून मोठ्या पराक्रमाने अनेक शतके राखला. आजही राजघराणे नामधारी प्रमुख असून सध्याचे राजे 'प्रद्योत बिक्रम' उद्योजक व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. आधुनिक स्वातंत्र्योत्तर काळातही दोन वर्षे राज्याने आपले अस्तित्व राखले, परंतु ४९ साली केंद्रशासित 'क-वर्ग' राज्य म्हणून भारतात विलीन झाले. तसे मूळ त्रिपुरी लोक बंगाल्यांपेक्षा बरेच वेगळे, परंतु फाळणी व ७१ चे युद्ध या दोन मोठ्या पर्वांमध्ये हजारो बांगलादेशी हिंदू येथे आश्रयास आले व या प्रदेशाचे रूप बऱ्याच अंशी बंगाली रंगात रंगले. आजही काही प्रमाणात अल्पसंख्य भूमिपुत्र व बहुसंख्य बंगाली यातील तेढ कधीतरी उफाळून येते. डावी बाजू सत्तेत असलेले केरळनंतर दुसरे राज्य, व डाव्या परंपरेप्रमाणे गेली दोन दशके एकहाती सत्ता असलेले 'माणिक सरकार' हे सध्याचे मुख्यमंत्री. हि या प्रदेशाची थोडक्यात ऐतिहासिक, भौगोलिक व राजकीय ओळख.

भटकंती :

पर्यटनाच्या दृष्टीने पश्चिमेकडील भागातच बहुतेक सर्व महत्वाची ठिकाणे एकवटलेली असल्याने प्रवासाचे योजन सोपे पडते. आगरतला हे सर्वात मोठे शहर. विमानाने प्रवास केल्यास गुवाहाटी वा कोलकत्ता मार्गे येथे पोहोचू शकतो. रेल्वेने किंवा महामार्गाने सिल्चरमार्गे असामातून येथे पोहोचू शकतो. विमानसेवा तुलनेत स्वस्त व वेळेच्या दृष्टीने अत्यंत सोयीची आहे. राज्यांतर्गत प्रवास सार्वजनिक वाहतुकीने स्वस्त व सोपा आहे. निवासासाठी महत्वाच्या पर्यटन स्थळी सरकारी व्यवस्था अतिशय उत्तम आहे व तशी फारशी गर्दी नसल्याने काही काळ आधी आरक्षित केल्यास सहज उपलब्ध होते.
माझ्या भटकंतीत, मणिपूरमध्ये योजना गडबडली व प्राप्त परिस्थितीत आसाममार्गे न येता इंफाळहून विमानाने यावे लागले. त्यास कारण 'मणिपूरचे संप' याविषयी मणिपूरच्या भागात अधिक... असो. तर, विमानप्रवास वर उल्लेखिल्याप्रमाणे या भागाची दुर्गमतेमुळे आवश्यकता असल्याने तुलनेत स्वस्त आहे. आगरतला विमानतळ अगदी बांगलादेश सीमेवरच आहे, तेथून शहर साधारण अर्ध्या तासावर आहे. तिथला एक मजेशीर अनुभव, विमानतळावर एक तरुण विद्यार्थी भेटला. इथे हिंदी फारशी समजली व बोलली जात नाही, बंगाली व मोडक्या इंग्रजीत तो मला 'लिफ्ट' देऊ इच्छित होता. ऐकीव माहितीवर आपल्याला ईशान्य भारत अतिशय अस्थिर व असुरक्षित वाटतो, काही अंशी ते खरेही आहे. त्यामुळे थोडे संशययुक्त बरेच विचार त्या क्षणात येऊन गेले. तोपर्यंत बोलत विमानतळाबाहेर पडलेलो होतो, त्याने बाईक तिथेच उभी केली होती. माणसाची परीक्षा करता येणे, स्वतःची धोक्याप्रती संवेदनक्षमता जागृत ठेवणे, व त्याहीपेक्षा महत्वाचे, विश्वास टाकता येणे व जिंकताही येणे हे धडे घेण्यासाठी खरे एकल प्रवासाचे महत्व. मी त्याला चालेल म्हंटले. भाषा-प्रदेश ओळखीचे नाही, आधुनिक फोन असल्याने नकाशात मार्ग दिसत आहे, दिशा योग्य असली तरी मुख्य रस्ता सोडलेला दिसत आहे, ग्रामीण भागातून मातीच्या रस्त्याने चाललेलो आहे... विश्वास टाकला तरी तो आंधळा नसल्याने चौफेर लक्ष होतेच, पण त्याचबरोबर प्रश्नोत्तरे चालू होती, काहीही कुणकुण लागली तर पुढची चाल असाही एक विचार समांतर चालू होता. आता लिहिताना गंमत वाटते पण त्या थ्रिलची अनुभूती काही वेगळीच. स्वतःची नको इतकी माहिती द्यायची नाही पण तरीही संवाद चालू ठेवायचा व समोरच्याची पारख करत पुढची आखणी करत राहायची. एकदा का खात्री पटली कि मग बिनधास्त! थोडे विस्ताराने लिहायचे कारण, इतर कोणी असे प्रवास करत असतील तर त्यांना याची मजा लगेच कळेल. असो, साधारण वीस एक मिनिटांनी परत पक्का रस्ता आला, तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने मित्र झालेलो होतो. प्रदेशाचा तसा अभ्यास असल्याने बोलायला बरेच विषय होते, त्याच्याकडून नवी माहितीही मिळत होती. अर्ध्या तासात शहरात पोहोचलो. आधी काही बोलला नसला तरी पैशाची अपेक्षा होती याचा अंदाज आलेला होता. वाचलेली गरिबी आजूबाजूला पाहत होतो. परंतु शेवटपर्यंत त्याने स्वतःहून सांगितले नाही. त्याचे देणे त्याला दिले आणि मी पुढे मार्गस्थ झालो. साधारण माझ्या अनुभवात नवीन ठिकाणी पहिला प्रहर चांगल्या लोकांबरोबर गेला कि पुढे ती जागा नवी राहत नाही... त्या जागेची लय, स्पंदन आत्मसात व्हायला हे सुरुवातीला भेटलेले लोक खूप महत्वाचे.
आगरतला शहर :
ईशान्य भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर. अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने फारसे विकसित नाही. मध्यवर्ती भागात त्रिपुरा राजघराण्याचा राजवाडा दिमाखात उभा आहे. शहर अगदी बांगलादेश सीमेला लागूनच आहे. काही महत्वाची ठिकाणे:
"उज्जयंत प्रासाद"
माणिक्य घराण्याचा एक राजवाडा. अलीकडेच, स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली अत्यंत सुंदर शुभ्र वास्तू. अनेक शैलींचा मिलाफ यात पाहावयास मिळतो. काही काळ हे त्रिपुराचे विधानभवन होते. सध्या संग्रहालय आहे. समोरच मोठा तलाव व सभोवती उद्यान असल्याने दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी अतिशय सुंदर दृश्य दिसते.





जगन्नाथ मंदिर
राजप्रासादापासून जवळच जगन्नाथाचे मोठे मंदिर आहे. सुशोभित प्रवेशद्वार व भरपूर गर्दी असणारे देवस्थान.

आखोरा गेट (बांगलादेश सीमा)

बांगलादेश सीमेवरील चेकपोस्ट. काही वर्षांपासून वाघा-अटारी सीमेप्रमाणे येथेही ध्वजावतरण सोहळा होतो. पर्यटनाच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे, परंतु तुलनेत अगदीच प्राथमिक अवस्थेत. रोज संध्याकाळी ६ वाजता दोन्ही बाजूंचे जवान घोषवाद्यांसहित ध्वज उतरवून एकमेकांना अभिवादन करतात. दोन्ही बाजूंना बऱ्यापैकी गर्दी जमते. थोड्या प्रमाणात खुर्च्या वगैरे यांची सोय केली जाते. दोन्ही बाजू बंगाली असल्याने काही गोष्टी भाषा कळत नसेल तर समजत नाहीत. शेवटी दोन्हीकडचे नागरिक अंतरावरून संवादही साधू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे वस्तूंची देवाणघेवाण होणार नाही याची सक्त ताकीद दिली जाते. एकंदर फारच सौहार्दपूर्ण सोहळा.



उदयपूर:

साधारण बस ने आगरतल्याहून दोन तासांवर गोमती नदीच्या काठी हे छोटेसे गाव, त्रिपुरसुंदरी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच आणखी काही मंदिरेही या परिसरात आहेत. त्रिपुराच्या राजांनी येथे बरेच तलाव बांधले. नवीन प्रस्तावित रेल्वे चे बांधकाम बऱ्यापैकी पूर्णत्वास आले आहे.

त्रिपुरसुंदरी मंदिर:

तीर्थस्थानांच्या संकल्पनेतून भारतभूमीचे कल्पनाचित्र आपल्या प्राचीन वाङ्मयातून सहज दिसते. जरी लहान लहान राज्ये या भूमीत अस्तित्वात असली तरी धार्मिक श्रद्धेच्या द्वारे हि सर्व एकमेकांशी नेहमीच जोडलेली आहेत. परिव्राजकास या भूमीचे दर्शन घडविण्यास हि स्थाने कारणमुख्य तसेच दिशा दर्शक आहेत. १२ ज्योतिर्लिंगे म्हणा किंवा १०८ वैष्णव दिव्यदेश म्हणा, त्यांची स्थाने पाहता, सर्व भारतवर्षाच्या यात्रेची ती व्यवस्था वाटते. पण यापेक्षा ५१ शक्तिपीठांची संकल्पना त्यांच्या भौगोलिक स्थानांमुळे अधिक व्यापक व खऱ्या अर्थाने भारत'मातेचे' दर्शन घडविणारी वाटते. सर्वात उत्तरेकडील काश्मीर मधील 'शारदा पीठ' (गुगल नकाशावर पहा "34.79 74.19") सर्वात पश्चिमेकडे बलोचिस्तानात 'हिंगुला पीठ' (गुगल 25.513 65.513) दक्षिणेस श्रीलंकेत 'शृंखला पीठ' (8.575 81.234) व पूर्वेस त्रिपुरसुंदरी (23.508 91.50). त्यातील पूर्वेकडचे हे शक्तीस्थान. अक्षांश पाहून लक्षात आलेच असेल, स्थान कर्कवृत्तावर आहे.

महाराजा धन्य माणिक्य यांनी १६व्या शतकात सध्याचे मंदिर बांधून चतुर्भुजा मूर्तीची स्थापना केली. देवी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा मूर्तीद्वय स्वरूपात आहे. मुख्य मूर्ती हि कसाच्या दगडाची आहे. मंदिर तसे लहान असून भोवती नव्याने बांधून काढलेला सभामंडप व बलीमंडप आहे. मंदिर हे लहानशा उंचवट्यावर असून त्याला 'कूर्मपीठ' अशी संज्ञा आहे. पाठीमागेच 'कल्याण सागर' बांधीव तलाव आहे.

देवी त्रिपुरसुंदरी
गुणवती मंदिरसमूह :

राणी गुणवतीने बांधलेली हि जुनी मंदिरे त्यांच्या वास्तुकलाविशेषसाठी महत्वाची आहेत व संरक्षित आहेत. खास बंगाली पद्धतीची विटांच्या बांधकामाची हि मंदिरे पाहण्यासारखी आहेत. जवळच भुवनेश्वरी देवीचे प्राचीन व दुर्मिळ स्थान आहे.


मेलाघर :
हे छोटेखानी गाव कधी काळी येथील राजघराण्याचे ग्रीष्मकालीन निवासस्थान असे. त्यासाठी येथे एक भव्य तलाव निर्माण करून त्यात सुंदरसा महाल बांधून काढण्यात आला. 'नीरमहल' नावाने प्रसिद्ध असलेला हा महाल निश्चितपणे भारतातील सर्वात सुंदर जलमहालांपैकी एक आहे. परंतु डागडुजीचे काम चालू असल्याने केवळ दुरूनच पाहता आला. पलीकडच्या तीरावर सरकारी विश्रामगृह आहे. जवळच्या मनोऱ्यातून महाल व तलावाचे दृश्य फार सुंदर दिसते.


राजवाड्याचे दिवसा व रात्रीचे मनोहर दृश्य

तळ्यावरची काही ओळखीची मंडळी



कसबा
कमला सागर : हे कालीमातेचे मंदिर अगदी सीमेवर आहे. मंदिराच्या समोरील तलावाच्या तीनही बाजूंनी आंतरराष्ट्रीय सीमेचे उंच कुंपण आहे. मंदिर आधुनिक काळात जीर्णोद्धार केलेले असले तरी पौर्वात्य बंगाली पद्धतीचा मूळ साचा जपला आहे. मंदिराच्या सभोवती जुने विशाल वृक्ष आहेत. जवळच दोन्ही देशांच्या सीमेवर तस्करी रोखण्यासाठी तसेच सीमावर्ती भागात रोजगार व आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 'बॉर्डर हाट' हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बांगलादेश सीमेवर एकूण १०-१२ ठिकाणी अशा प्रकारचा 'ट्रेड झोन' तयार करण्यात आला आहे. इथे दोन्ही बाजूंचे स्थानिक आपापला माल विकू शकतात. व आपल्यासारखे ग्राहक, व्हिसा शिवाय पलीकडल्या देशातील वस्तू विकत घेऊ शकतात. जामदानी कलाकुसर असलेली वस्त्रे बांगलादेशातील विशेष.

पांढऱ्या रेषेच्या डावीकडे बांगलादेश, उजवीकडे भारत.
कमलासागर काली मंदिर

सिपाहीजला अभयारण्य :

कधीही न ऐकलेले परंतु नितांत सुंदर असे हे ठिकाण. पाणथळ जागी पूर्वीच्या काळी असलेल्या सैनिकी छावण्यांवरून जागेला हे नाव पडले. वनविभागाची राहण्याची व्यवस्था आत जंगलात आहे हे तिथे गेल्यावर समजले व नंतर तिथेच मुक्काम ठोकला. बसने आगरतल्याहून तासाभरात इथे पोहोचता येते. मूळ जंगल अतिशय घनदाट आहे, त्याभोवती रबराची लागवड व त्याबाहे चहाच्या बागा त्यामुळे आगरतला सोडले कि दूरवर हिरवाईच दिसते. मुख्य रस्त्यापासून बरीच रपेट करत आतपर्यंत जावे लागते. सध्या प्राणिसंग्रहालय व प्राण्यांचे अनाथालय येथे चालवले जाते. प्रामुख्याने पर्यटक तेच पाहायला येतात, कारण तेथे प्राणी खात्रीने आणि आरामात पाहता येतात. आजतागायत भारतात पाहिलेल्या प्राणिसंग्रहालयातील सर्वोत्तम असे नक्कीच म्हणेन. परंतु मुख्य समृद्ध वनराई त्यापलीकडे बरीच पसरलेली आहे. येथील अधिकारी/अभ्यासकांबरोबर परवानगीने त्या भागास भेट देता येते.

अतिशय दुर्मिळ अशा अनेक प्रजातींचे प्रदेशात आश्रय स्थान आहे. त्रिपुरा राज्यात भारतातील मर्कट कुळातील सर्वाधिक प्रजाती आढळून येतात. काही मोजके शिल्लक सुवर्णवानर, चष्मेबंदर, व भारतातील एकमेव कपि (एप) हुलॉक गिबन हे सर्व या भागात नांदतात. हुलॉक दिसले नाहीत तरी त्यांचे जंगलातील अस्तित्व अगदी मैलोन्मैल जाणवते.

सकाळचे 'मंकी बिझनेस'
सकाळचे 'मंकी बिझनेस'
सकाळचे 'मंकी बिझनेस'
दुर्मिळ चष्मेबन्दर Spectacled Monkey
दुर्मिळ चष्मेबन्दर Spectacled Monkey
सुवर्णवानर Golden Languor
हुलॉक कपिसंगीत:

इथले सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्रांकित बिबळ्या. बिडाल वर्गातील हे जनावर भारतात फक्त दुर्गम ईशान्य राज्यातच आढळून येते आणि वन्य परिसरात केवळ २ आकडी संख्या आता शिल्लक आहे.

जंगलात हे जनावर पाहायचे म्हणजे सरावलेले लोकच बरोबर हवेत. वाघरांमध्ये हि जात झाडावर चढण्यात सर्वात तरबेज. आणि निशाचर असल्याने दिवसा कुठेतरी उंच झाडात स्वारी ढाराढूर असते. जेव्हा पहिल्यांदा बिबळ्या दिसला तेव्हा तर गाईड चक्क फेकतोय असेच वाटत होते, तो झाडाकडे दाखवतोय आणि मला काही ढिम्म दिसत नव्हते.

दूर झाडावर झोपलेला बिबळ्या. झाड-पाल्यात अगदी बेमालूम मिसळून जाणारे पट्टे.
दुसऱ्या वेळी मात्र एक व्यवस्थित झोपलेला बिबळ्या पाहायला मिळाला.

चाहूल लागल्यावर आमच्या दिशेने टाकलेला एक कटाक्ष, क्षणभरातच पुन्हा निद्राधीन झाला

अभयारण्यात पक्षी असंख्य आहेत. संपूर्ण दिवस वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती अक्खा प्रदेश चिवचिवाटाने जिवंत ठेवतात. पहिल्या दिवशी तर झोप येईना इतके चित्र विचित्र आवाज सतत येत होते. खोकल्यासारखा आवाज करणारे भुंकणारे हरीण, डुकरे, घुबडे, रातकिडे व एक दोन पक्षी हे रात्रीचे संगीतवादक तर पहाटे जंगली कोंबडे, माकडे, कावळे हे पथक व टिटव्या, खंड्या हे दिवसभर कामावर. काही चित्रे व वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केलेले आवाज इथे देत आहे.

जंगली कोंबड्या Red junglefowl

Indian Eagle Owl
Bronzed Drongo
Blue-bearded bee-eater

Blue-bearded bee-eater

Greater racket-tailed drongo
Asian barred owlet
black hooded oriole
Spotted woodpecker

साळींदराचा काटा
वन्य ध्वनी
वन्य ध्वनी १ - पहाटेचे आवाज
वन्य ध्वनी २ - सकाळच्या वेळचे जंगल
वन्य ध्वनी ३ - संध्याकाळ, ०:२५ जवळ एक खास आवाज
वन्य ध्वनी ४ - सूर्यास्तानंतरचे आवाज, १:०० नंतर एक विचित्र आवाजाचा पक्षी व त्याच बरोबर १:०८ ला दोनदा खोकणारे हरीण

अन्य माहिती:

अन्न : साधारण बंगाली पद्धतीचे जेवण. भाताचे महत्व. प्रामुख्याने मांसाहार. "आवान बांगवी" नावाचा तिखट किंवा गोड पदार्थ, तांदळाचे पीठ वापरून केळीच्या पानात मेंदीच्या कोनासारखे साचे बांधून उकडून बनवला जातो. रसगुल्ल्याप्रमाणे "खीर तोवा" दुधापासून बनविले जाते.
खीर तोवा

राहणीमान : त्रिपुरा अतिशय गरीब राज्य आहे याची जाणीव सर्वत्र होत राहते. ग्रामीण भागात आधुनिक गरजांचा स्पर्शच नसल्याने लोक समृद्ध नसले तरी समाधानी आहेत. मैदानी भागात मुख्यत्वे भाताची शेती चालते. डोंगराळ भागात रबर व चहाची लागवड सध्या वाढत आहे. बंगाली व स्थानिक कोकबोरोक भाषा येथे प्रामुख्याने बोलल्या जातात. हिंदी नगण्य, असामी थोडी समजली जाते. एक खेदयुक्त उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या पिढीतला अशिक्षित तरुण बघितला. अभयारण्यात रक्षक म्हणून कामाला असलेला हा तरुण एवढी वर्षे व्यवस्थेला दुर्लक्षित करत राहिला व व्यवस्थेकडूनही दुर्लक्षित कसा राहिला याचे फार आश्चर्य व दुःख वाटले.
आधुनिक घर
चहाचा मळा
भात शेती

कला :
वस्त्र : ईशान्य भारतात वस्त्रकला फार समृद्ध आहेत. कापूस, सावर इत्यादी सुती व मुगा, टसर आणि इरी या रेशमी धाग्यांपासून विणलेली वस्त्रे व त्यावरील कलाकुसर अत्यंत सुंदर. त्रिपुरा मध्ये प्रामुख्याने सुती हातमाग व त्यावरील साधी व जामदानी पद्धतीची कलाकुसर केली जाते. कलकत्ता कॉटन व ढाका जामदानी नावाने या प्रकारातील साड्या अन्यत्र अधिक परिचित आहेत. साधारण सर्वच भागात साडीची पद्धत केवळ बंगाली लोकात आहे. बाकी सर्व समाजात स्त्रिया मेखला-चादोर सारखे पांघरायचा पदर वेगळा असणारे वस्त्र वापरतात.
त्रिपुरी सुती साडी
नवविवाहित बंगाली जोडपे, रेशमी कुडता व सुती साडी

अलंकार : त्रिपुरी लोकांना चांदीचे फार आकर्षण व महत्व आहे. अनेक जमातीच्या स्त्रिया, प्रामुख्याने रियांग जमातीचे लोक (नृत्य विषयात चित्रातील लोक) चांदीचे दागिने भरभरून वापरतात. बांबूचे बनविलेले अलंकारही येथील खासियत आहे. अतिशय नाजूक काम असलेले, कोणत्याही धातूचा वापर नसलेले सुबक दागिने बांबू पासून बनवतात.

हस्तकला : बांबू व भाजक्या मातीची कलाकुसर सर्वत्र पाहावयास मिळते.

नृत्य : वनवासी लोकांची लोककलेची परंपरा प्रत्येक जमातीत वेगळी आहे. रियांग या प्रमुख जमातीचे होजगिरी नृत्य विशेष उल्लेखनीय. घरातील ताट, कळशी इत्यादींचा कलात्मक वापर असलेले हे नृत्य साधे दिसले तरी बरेच अवघड आहे हे या आंतरजालावरील व्हिडीओ मध्ये जरूर पहा.

संकीर्ण:
माझ्या एकल प्रवासादरम्यान माझ्या अनुभवाचा व अभ्यासाचा काही भाग थोडा अधिक आकर्षक बनवून फेसबुक वर पोस्ट करण्याची मला एक सवय आहे. त्यामुळे एक औत्सुक्य निर्माण होतेच, तसेच त्यानिमित्ताने त्या प्रदेशाविषयी इतरांनाही माहिती होते. त्रिपुराविषयक हे पोस्ट इथेही समाविष्ट करून या लेखाची सांगता...

: समाप्त :

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

17 Apr 2017 - 11:56 am | कपिलमुनी

लेख , वर्णन आवडले

सतिश गावडे's picture

17 Apr 2017 - 12:04 pm | सतिश गावडे

छान ओळख. आवडले लेखन.

परिपूर्ण लेख! अतिशय आवडला. क्लाऊडेड लेपर्डचे दर्शन घडले, धन्य वाटलं. फारच छान!

अनुप ढेरे's picture

17 Apr 2017 - 12:27 pm | अनुप ढेरे

मस्तं! खूप आवडला लेख.

क्लाऊडेड लेपर्ड पाहिलात! महान :)
ह्या सर्व भागात भटकंती करायचे माझे स्वप्न आहे. कधी ना कधीतरी..

विस्तृत त्रिपुरा ती ओळख आवडली!

लेखातली पहिली गोष्ट नजरेत भरली म्हणजे परफेक्ट सेटिंग. अगदी पहिले अक्षर मोठे बोल्ड करण्यापासून ते फोटोंची सेम साईज मेंटेन करण्यापर्यंत. व्हाईस क्लिप्स परफेक्ट अपलोड केलेले आहेत. टायटल्स बरोब्बर बसवले आहेत. अगदी परिपूर्ण टाईपसेटिंग आहे हे. साहित्य मात्र निवांत वाचून प्रतिसाद देईन.

पद्मावति's picture

17 Apr 2017 - 1:37 pm | पद्मावति

अप्रतिम!
ह्या सर्व भागात भटकंती करायचे माझे स्वप्न आहे. कधी ना कधीतरी.. +१

पैसा's picture

17 Apr 2017 - 1:40 pm | पैसा

समर्पक आयडीचा लेख म्हणून आता एका अपेक्षेनेच उघडला जातो! अप्रतिम आहे सगळंच!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2017 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाह, भारताच्या सप्तभगिनी राज्यांपैकी काहींची माहिती आणि प्रकाशचित्रांचा उत्तम खजिना उघडला जाणार आहे, याची या लेखाने पुरेपूर खात्री पटवून दिली !!!

हा प्रदेश पहायचे अनेक दिवसांपासून मनात आहे. या लेखांचा त्यावेळीही नक्कीच खास उपयोग होईल.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

सपे-पुणे-३०'s picture

17 Apr 2017 - 5:24 pm | सपे-पुणे-३०

ईशान्य भारताचं तेथील संस्कृती आणि निसर्गसौंदर्यामुळे नेहमीच आकर्षण वाटत आलंय. हा भाग अतिशय आवडला. फोटो आणि साऊंड क्लिप्स तर उत्कृष्ट!
सप्तभगिनींमधील इतर राज्यांबद्दल सुद्धा वाचायला आवडेल. जरूर लिहा.
वाईट इतकंच वाटतं की इतकी मुबलक साधन संपत्ती असून हा भाग उपेक्षित राहिलाय.

विचित्रा's picture

17 Apr 2017 - 7:45 pm | विचित्रा

ईशान्य भारत विशलिस्टवर अग्रस्थानी असल्यामुळे पुढील विस्तृत भागांच्या प्रतिक्षेत...

अरे व्वा... लेख आवडला. वन्य प्राणीही भारी दिसत आहेत.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

उपेक्षित's picture

17 Apr 2017 - 8:41 pm | उपेक्षित

जबरा फोटो आणि लिखाण

दुर्गविहारी's picture

17 Apr 2017 - 8:59 pm | दुर्गविहारी

छान एका नवीन दुनियेची ओळख

अनिंद्य's picture

18 Apr 2017 - 4:00 am | अनिंद्य

बरेचदा फार जवळ जाऊनही त्रिपुरा भेट काही नशिबात नव्हती, तुमच्या ह्या सुंदर लेखामुळे भेटीचा प्रत्यय आला.

मेलाघरच्या राजवाड्याचे प्रतिबंब असलेला फोटो - अद्भुत !

क्लाऊडेड लेपर्ड ला अभ्रांकित बिबळ्या हा मराठी प्रतिशब्द - जिनियस !

इडली डोसा's picture

18 Apr 2017 - 10:48 am | इडली डोसा

निसर्ग, राहणीमान, उद्योग व्यवसाय अशी सर्व्समावेशक माहिती देणारा एक परिपुर्ण लेख आवडला.
पुलेप्र.

सुमीत भातखंडे's picture

18 Apr 2017 - 11:21 am | सुमीत भातखंडे

माहिती आणि छायाचित्र उत्तमच.
लेखाचं फॉर्मॅटींगही परफेक्ट आहे.

मनिमौ's picture

18 Apr 2017 - 11:34 am | मनिमौ

खूप आवडले

विअर्ड विक्स's picture

18 Apr 2017 - 1:25 pm | विअर्ड विक्स

प्रकाशचित्रे आणि वर्णन सुंदर. प्रवास वर्णन कसे लिहावे यासाठी उत्तम धडा म्हणून हा लेख पकडला जाऊ शकतो.

जव्हेरगंज's picture

18 Apr 2017 - 1:34 pm | जव्हेरगंज

वाह !!!

वरुण मोहिते's picture

18 Apr 2017 - 2:06 pm | वरुण मोहिते

पण इतक्या विस्तृतपणे सर्व भागांना स्पर्श केलेली माहिती आवडली .

नूतन सावंत's picture

18 Apr 2017 - 2:25 pm | नूतन सावंत

सुरेख माहितीपूर्ण लेख आणि लेखाची परिपूर्ती करणारी प्रकाशकचित्रे.खूप आवडला लेख.सुग्रास अन्नाच्या दर्शनाणे, लागलेली भूक अजून खवळले त्याप्रमाणे त्रिपुराला भेट देऊन यायचा विचार आहेच,तो आणखी बळावला. अजून वाचायला आवडेल.

शार्दुल/समर्पक, उत्तम भटकंती लेख. फोटो भारी. आवाज रेकॅार्ड केल्याबद्दल विशेष धन्यवाद. डाउनलोड केलेत.

(नवीन थीममध्ये ८५०पिक्सेलचे फोटो बसताहेत,पुर्वी ६४० च्या वरचे उजवीकडच्या रकान्यात घुसायचे.)

समर्पक's picture

19 Apr 2017 - 8:05 am | समर्पक

धन्यवाद,
नव्या आकारात चित्रे अधिक सुन्दरही दिसताहेत. पण आता जुने लेख पुन्हा दुरुस्त करणेही आले, कारण त्यांची मांडणी आता या नव्या आराखड्यात बिघडली आहे... :-)

अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण लेख !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia

अजया's picture

19 Apr 2017 - 11:27 am | अजया

वर्णन, फोटो ,माहितीने परिपूर्ण अप्रतिम लेख. प्रवासवर्णनाचा वास्तुपाठच आहे हा लेख म्हणजे!

शार्दुल/समर्पक आवाजाच्या क्लिप्स आवडल्या. डाउनलोड केल्या. सुरेखच.

माहितीपूर्ण लेख आणि सुंदर फोटो! फार छान!

पाटीलभाऊ's picture

20 Apr 2017 - 11:23 am | पाटीलभाऊ

सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो.
फार सुंदर आहे हा भाग.

अभिजीत अवलिया's picture

1 May 2017 - 2:47 pm | अभिजीत अवलिया

परिपूर्ण लेख ...

प्रभू-प्रसाद's picture

1 May 2017 - 8:07 pm | प्रभू-प्रसाद
प्रभू-प्रसाद's picture

1 May 2017 - 8:14 pm | प्रभू-प्रसाद
पिलीयन रायडर's picture

1 May 2017 - 8:27 pm | पिलीयन रायडर

इतका देखणा लेख! एक तर इतकं नेटकं कुणी मांडलं तर आपोआपच मनापासुन वाचलं जातंच. त्यातही आपण चपखल मराठी शब्द वापरता. ते विशेष आवडले.

जंगलातल्या आवाजांसाठी हजारवेळा धन्यवाद. काही क्षण आपण जंगलातच बसलोय असं वाटलं. परत आभार!

फेसबुकवर शेअर करतेय! :)

चित्रगुप्त's picture

1 May 2017 - 9:07 pm | चित्रगुप्त

सर्वांगसुंदर लेख. अभिनंदन आणि आणखी लेखांच्या प्रतिक्षेत.
आगरतल्ल्यात सचिनदेव बर्मन यांचे जुने राहते घर होते, ते पाडून त्याजागी आधुनिक सभागृह त्यांच्याच नावाने बांधले गेलेले बघून फार व्यथित झालो होतो. (एका चित्रकलेच्या शिबिरात त्याच जागी काही दिवस राहिलो होतो)

अफगाण जलेबी's picture

2 May 2017 - 2:16 am | अफगाण जलेबी

सोनेरी तोंडाची माकडं आसाम - भूतान सीमेवरच्या मानस अभयारण्यातही दिसतात. पण इथली थोडी वेगळी वाटली. बाकी क्लाउडेड लेपर्ड आणि स्पेक्टॅकल्ड मंकी हे दोन खास मानकरी दाखवल्याबद्दल धन्यवाद! फोटो तर फारच सुंदर आहेत. तुमच्या आधीच्या आणि या आणि या पुढच्या फोटोंचं एक काॅफी टेबल बुक काढा असं सुचवतो!

समर्पक's picture

8 Jun 2017 - 1:40 am | समर्पक

धन्यवाद!

सोनेरी तोंडाची माकडं : मानस हेच खरे अभयारण्य शिल्लक आहे त्यांच्यासाठी, पण सामान हवामानामुळे काही कुटुंबे त्रिपुरा आणि गुवाहाटीजवळ एका बेटावर वसविण्यात आली आणि त्यांना नवी जागा चांगलीच मानवलेली आहे

कॉफी टेबल बुक चा सल्ला सुपरहिट आहे, लोकांना आवडले!

अफगाण जलेबी's picture

2 May 2017 - 2:19 am | अफगाण जलेबी

अाॅटो करेक्ट मुळे गोंधळ झाला.

योगेश आलेकरी's picture

12 May 2017 - 5:18 pm | योगेश आलेकरी

खूपच छान. विडिओ संगीत फोटोंचा उत्तम मिलाप.. लेखणीने फिरवून आणलात.. माझा एकल प्रवास आठवला त्या भागातील

समर्पक's picture

8 Jun 2017 - 1:42 am | समर्पक

तुमच्या लेखाची वाट पाहत होतो... भर पावसाळ्यात जामच धमाल असेल... वेळ काढून जरूर लिहा!

प्रियाजी's picture

6 Mar 2018 - 3:16 pm | प्रियाजी

आत्ता त्रिपुरावरचा तुमचा वरील लेख वाचला. गेले वर्ष्भर मी मिपावर जवळ्जवळ न आल्याने हा सर्वान्सुन्दर लेख वाचण्याचे राहुन गेले होते. परन्तु हा लेख वाचण्याआधी तुमचा मणिपुर वरील लेख वाच्ल्याने उत्सुकता वाटुन हा लेख वाचला गेला. लेखाबद्दल सर्वानीच कोउतिक केले आहे . त्यामुळे मी जास्त काही लिहित नाही. आम्ही ३० ते ३५ जण १ फेब्रु. ते १३ फेब्र. २०१८ या दिवसात वरील भागात गेलो होतो. त्यामुळे तुमच्या लिखाणाची सत्यता जास्त्च पटली. तुम्ही एकट्याने केलेल्या प्रवासाचे जास्तच नवल व कौतुक वाट्ले. आम्ही आगर्ताळाचा राजवाडा पाहू शकलो नाही परन्तु नीरमहाल, कामाख्या, त्रिपुरा सुन्दरी व कमल सुन्दरी मंदिर पाहू शकलो. नीर महालाच्या वरच्या भागात सर्व गच्ची सलग पुर्ण जोडलेली असुन वरून आजुबाजूचा परिसर अतिशय सुन्दर दिसतो. आम्ही बान्गला देशाची सह्हद्द आखुरा व अजून दोन ठिकाणीही पाहिली परन्तु मला मराठी टन्क्लेखनासाठी प्रच्न्ड वेळ लागत असल्याने जास्त काही लिहित नाही. मात्र सध्या दिमापुर पासून शिलौग, कोहिमा भागात रस्ते बान्ध्णीची कामे फार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने धूळ फार असून बसेस ही अतिशय सावकाश जात होत्या. तसेच १६ फेब्रु. च्या निवड्णुकीची थोडी झळ आम्हालाही लागलीच. असो. परत एकदा तुमचे दोन्ही लेखाबद्दल अभिनन्द्न. तुमचे या नन्तरचे या मालिकेतील लेख वाचायला उत्सुक आहेच.

नितांतसुंदर फोटो, आवडीने पाहिलेल्या स्वदेशी भूभागाचे सरस वर्णन आणि माहितीने ओतप्रोत असलेला आपला लेख बेहद्द आवडला. असेच लिहिते राहा. आम्ही तुमच्या नजरेतून आपला देश पाहू.

आर्या१२३'s picture

7 Mar 2018 - 2:19 pm | आर्या१२३

सुन्दर प्रचि आणि सर्वान्गसुन्दर ओळख!!