पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
- चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन..
मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे. इतकी, की अगदी श्रीमद्भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरांनी टीका केली आणि उपाध्यांनी त्याचेही विडंबन केले. मिपावर तर अनेक कवितांचे लेखन हे अट्टल विडंबनकरांना फुलटॉस चेंडूसारखे वाटते. विशेष म्हणजे मूळ 'प्रेरर्णा' असलेली कविता लिहिणारा सदस्यही ते विडंबन खिलाडू वृत्तीने घेतो. खरे तर, आपल्या लेखनावर, कवितेवर विडंबन करण्याची प्रेरणा मिळणे, ही बहुतेक लेखकांना कौतुकाची पावती वाटते.
म्हणूनच यंदाचा मराठी भाषा गौरव दिन मिपावर 'विडंबन' विशेष म्हणून साजरा करणार आहोत.
कसा?
मिपावर अनेक उत्तमोत्तम लेख, कविता आहेत. मराठीत अनेक थोर लेखकांचे लोकप्रिय लेखन आहे, उत्कृष्ट कवींच्या प्रसिद्ध कविता आहेत. 'लिजंड' म्हणून गाजलेले काही आंतरजालीय लेखन आहे (ब्रह्मे!). त्यावरून प्रेरणा घेऊन त्याला विनोदाची फोडणी द्या आणि येऊ द्या विडंबन.
तुमचे लेखन दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत साहित्य संपादकांना व्यनिने पाठवा.
नियम :
१. इतर मराठी संकेतस्थळांवरील (जर ते लेखन मिपावर नसेल तर) लेखनाची प्रेरणा नको.
२. आपल्या लेखनाचे विडंबन आल्यास, ते आपले कौतुक आहे, असे समजा.
तर, सरसावा बाह्या, उधळू द्या तुमच्या कल्पनांचे वारू, येऊ द्या वाचकांच्या चेहऱ्यावर हसू... लक्षात ठेवा,
तुमचे लेखन दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत साहित्य संपादकांना व्यनिने पाठवा.
प्रतिक्रिया
4 Feb 2023 - 4:12 pm | टर्मीनेटर
झकास उपक्रम 👍 एकदम हटके!
हि महिना अखेर हसत हसत जाणार ह्यात शंकाच नाही 😀
4 Feb 2023 - 4:20 pm | कुमार१
झकास उपक्रम !
एक सूचना :
एका वर्षात २ 'मराठी दिन' असतात पण
१ मे आणि २७ फेब्रुवारी या दोन मराठी दिनांचे प्रयोजन वेगळे आहे.
२७ फेब्रुवारीचा उल्लेख ‘म. भा. गौरव दिन’ असा करण्यात यावा.
..
( १ मे = मराठी भाषा दिन)
4 Feb 2023 - 7:24 pm | अथांग आकाश
झकास उपक्रम!
सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहे!!
5 Feb 2023 - 2:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
झकास बोले तो एकदम झक्कास, लिवणार म्हंजे लिवणारच
कवी लोक्स तयार रहा तुमच्या क्वितांची तोडफोड बघायला
(खुडसे बाता:- कौन्सी क्विता लेलू?)
धाग्याचे शिर्षक कंसात का लिहिले आहे?
पैजारबुवा,
5 Feb 2023 - 8:54 pm | साहित्य संपादक
लेटेश्ट संदर्भ :
(ढबोला...)
(सन्तूर)
(दळण नसलेल्या गिरणीवर)
;)
6 Feb 2023 - 3:55 pm | श्वेता व्यास
वा, पुन्हा एकदा वाचन मेजवानी मिळणार तर!
7 Feb 2023 - 5:29 pm | प्रसाद गोडबोले
म्हणजे नक्की कसें ? फक्त मिसळपाव वरील लेखन प्रेरणा म्हणुन चाले असे की काय ?
आता गीता काय मिसळपाव वर लिहिलेली नाहीये , मग चाल चलाऊ गीता हे विडंबन स्पर्धेसाठी चालेल की नाही ? की सुप्रसिध्द कविता गीते विडंनाला चालतील ?
19 Feb 2023 - 10:10 am | साहित्य संपादक
तसे केल्यास एकतर (जर ते लेखन मिपावर नसेल तर) त्याचा संदर्भ इकडे लागणार नाही. 'मोकलाया दाहि दिशा' मिपावर सुप्रसिद्ध आहे. पण त्याचा संदर्भ इतर मराठी संस्थळांवर दिल्यास त्याची गंमत ज्यांनी मिपावर ते वाचलेले नाही, त्या वाचकांना कळणार नाही.
आणि असेही इतरत्र आंतरजालावरील लेखनाचे विडंबन (जर ते खूप जास्त प्रसिद्ध नसेल, उदा. मुक्तपीठ वरील लाडू कावळा किंवा लुनावाले ब्रह्मे) मिपावर करणे उचित वाटत नाही.
आंतरजालीय नसलेले इतर लेखन, कविता, सिनेमातील गाणी जी प्रसिद्ध, सर्वश्रुत असतात, त्यांची विडंबने चालतील. ('प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'बोले चुडीया, बोले कंगना' यांची विडंबने मिपावर आहेतच.)