हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Jan 2022 - 12:20 pm

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक

१ नोव्हेंबरचा दिवस. सत्गडमधली थंड सकाळ! परवाच्या प्रवासानंतर आता थोडा त्रास होतोय. पोटाला त्रास झाला. तीव्र थंडी, प्रवासाची दगदग आणि हॉटेलचं खाणं ह्यामुळे अखेर त्रास झालाच. त्यामुळे थोडा आराम करावासा वाटला. पण इतकाही त्रास नाहीय की, रोजचा इथलं फिरणं चुकवावं लागेल. त्यामुळे आवरून सत्गड हा गड- उतार होऊन खाली रोडवर आलो आणि फिरण्याचा आनंद घेतला. फास्ट वॉक करताना हळु हळु हुडहुडी कमी झाली आणि ताजं वाटलं. काही अंतर फिरल्यावर परत निघालो. वाटेमध्ये आमच्या एका नातेवाईकांचं हॉटेल आहे. त्यांच्याकडे गरम चहा घेतला. घरी नेण्यासाठी आलू पराठे पार्सल घेतले. तोपर्यंत त्यांच्यासोबत छान गप्पाही झाल्या.

ह्या भागातले अनेक जण शहरांमध्ये स्थायिक आहेत. दिल्ली, मुंबई- महाराष्ट्र अशा जागी ते मुख्यत: गेलेले आहेत. खूप जण हॉटेल लाईनमध्येही काम करतात. घरामधून एक जण तरी बाहेर शहरामध्ये असतो. पण कोरोनाच्या काळामध्ये आलेल्या विपरित परिस्थितीमुळे त्यातले बरेच जण गावी परतले. ह्या नातेवाईकांनी पुण्यातून इकडे परत येऊन आधीचं छोटं हॉटेल परत सुरू केलं. आता ते त्यांना वाढवायचं आहे. पण कोरोनाचा कहर सुरू असताना ते शक्य होत नाहीय. इतरही ठिकाणचे लोक असेच बाहेरगावी गेलेले कोरोनामुळे परत आले आणि आता ते गावातच नवीन उद्योग सुरू करत आहेत. इकडच्या गावांमध्ये उद्योग-धंदे तसे कमीच आहेत. मोठे धंदे तर मोजकेच- शेती, मिलिटरी, पर्यटन किंवा हॉटेल- ड्रायव्हिंग. त्याबरोबर आता जिथे शहर आहेत, थोडी दाट वस्ती आहे, तिथे इतरही व्यवसाय सुरू होत आहेत जसे- जिम, ब्युटी पार्लर, मोबाईल शॉप व इतर. शहरामध्ये काही वर्षं काम करून तरीही गावात स्थायिक होणा-या ह्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. पहाड़ी भागात निसर्गाच्या सान्निध्याचे सर्व लाभ त्यांना मिळतात. पहाडी समज, शहाणपणा, नैसर्गिक साधेपणा हे गुण आहेत व त्याबरोबर शहरामध्ये अनेक वर्षं काम केल्यामुळे बाहेरच्या जगातल्या गोष्टी, नवीन कौशल्ये, बुद्धीमत्तेला पडलेले पैलू अशाही जमेच्या बाजू त्यांना मिळाल्या आहेत! आणि आता ते त्यांच्या गावालाही आणखी समृद्ध करत आहेत. असो.

पराठा पार्सल घेऊन सत्गडला परत आलो. मस्त फिरणं झालं. त्याशिवाय दुपारीही एकदा परत खाली येऊन गेलो. ट्रेकिंगची अशी मस्त चंगळ सुरू आहे. सत्गडसारखं गाव आणि हिमालयाच्या शब्दश: कुशीत राहणारे लोक जवळून बघायला मिळत आहेत. हिमालय, हिमालय म्हणून आपण बाहेरच्या लोकांना खूप कौतुक असतं. खूप ओढ असते. हिमालयात गेल्यावर सर्व शांती मिळेल असं वाटत असतं. पण जे लोक प्रत्यक्ष हिमालयातच राहतात, त्यांच्या बाबतीत कशी स्थिती‌ असेल? इथे त्याचं उत्तर मिळत आहे. इकडच्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्याचे अनेक लाभ आहेतच. पण त्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व आनंदी आनंद व शांती- समाधान आहे का? तर तसं नाही. इकडेही तणाव आहेत. अनेक समस्या आहेत. अंधश्रद्धा, मागासलेपण आहे. त्याबरोबर आरोग्याच्या सुविधांच्या समस्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं शोषण आहे. व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात आहे. अक्षरश: उडता पंजाबसोबत कुठे कुठे तुलना करता येईल इतकी. त्यामुळे इथला सर्व युवा वर्ग तितका सक्रिय आणि चांगल्या कामांमध्ये गुंतलेला आहे, असं म्हणता येत नाही. शिवाय निसर्ग- मानव संघर्ष आहे. नैसर्गिक आपत्तीमधली अनिश्चितता आहे आणि वन्य श्वापदांच्या हल्ल्यांचं सावटही आहे. हे सगळं बघताना वाटतंय की, केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही.

दुपारी थोडा आराम केला. सोबत आलेले मित्र आज परतीच्या प्रवासाला निघाले. आणि अदूचे मामा- मामी दिल्लीवरून पोहचले. आम्ही लवकरच बुंगाछीना गावामध्ये एका पूजेसाठी जाऊ. मामा- मामी दिल्लीवरून बसने थकवणारा प्रवास करून आले तरी थकले नव्हते. मामाने मुलांसोबत क्रिकेट खेळून त्यांना तुफान दमवलं. मुलांना त्याला आउटच करता येत नव्हतं. आणि मामी तर पहिल्यांदाच हिमालयात येत होत्या, प्रवासाचा त्यांना तसा त्रास झाला नाही आणि त्यांनी तर चक्क पिथौरागढ़ ते सत्गड ह्यामध्ये काही अंतर जीपसुद्धा चालवली. अशी गंमत. माझ्या तब्येतीचा मात्र थोडा खेळ झाला. दुपारचं जेवण जेवल्यावर घशाखाली उतरलंच नाही. दिवसभर पोट गच्च राहिलं आणि अखेरीस रात्री उलटी केल्यावर हलकं वाटलं. उद्या बुंगाछीनाला जाऊ आणि तिथे परत एकदा मस्त फिरायला मिळेल. इथे असतानाचा एक एक दिवस पुरेपूर फिरायचं आहे.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

जीवनमानभूगोललेखअनुभव

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

19 Jan 2022 - 12:01 pm | सुबोध खरे

केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते.

१००% सत्य.

लष्करात असतानाचे माझे अनेक सहकारी पहाडी ( गढवाल कुमाऊँ हिमाचल प्रदेश) भागातील आता तेथे स्थायिक झाले आहेत.

ते निवृत्त झाले, त्यांना निवृत्ती वेतन आहे आणि निवृत्त होताना मिळणारे पैसे होते म्हणून तेथे त्यांची आयुष्य त्यामानाने सुलभ आहे.

अन्यथा तेथील गावांमध्ये आयुष्य अतिशय खडतर आहे. साध्या साध्या गोष्टी मिळायला त्रास होतो. मैलोगणती चालायला लागते. निवृत्त झालेल्या बहुसंख्य लोकांच्या घरी वरिष्ठ नागरिकच राहतात तरुण मुले नाहीत( शिक्षण/ नोकरीसाठी बाहेर गावी आहेत)

पावसाळ्यात खांब पडला तर ८-१० दिवस वीज नसते.

मुलांच्या शिक्षणाची सोय नसते. शिक्षण घेतल्यावर सुद्धा नोकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा अभावानेच असतात.

जे गावात पर्यटन संलग्न काही उद्योग करतात अशा मुलाना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.

जितके गाव दुर्गम तितक्या विवंचना आणि अडचणी जास्त असतात.

चांगल्या ऋतू मध्ये तेथे आठ पंधरा दिवस राहणे आणि १२ महिने राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

आपली लेखमाला अतिशय सुंदर आहे. तेथे न जाताही प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव यावा इतकी जिवंत आहे.

सौंदाळा's picture

19 Jan 2022 - 12:22 pm | सौंदाळा

मस्त लिहिताय.
प्रवास वर्णन आणि ललित दोन्ही एकत्र वाचतोय असं वाटतय.
पुभाप्र

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2022 - 1:24 pm | चौथा कोनाडा

सुंदर !
+१

सिरुसेरि's picture

20 Jan 2022 - 11:00 am | सिरुसेरि

प्रवाही वर्णन . फोटोही माहितीपुर्ण . +१

मार्गी's picture

20 Jan 2022 - 2:02 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! @ सुबोध खरे सर, हो, खरं आहे. आपली प्रतिक्रिया मिळाल्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jan 2022 - 2:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त चालली आहे लेखमाला,
आवडते आहे
पैजारबुवा,

निनाद's picture

10 Feb 2022 - 5:18 am | निनाद

पहाडी समज ही एक वेगळीच समज असते. यातल्या (काही) लोकांना प्रत्येक गोष्ट थिंक थ्रू - पूर्ण विचार करून मग कृती - करायची सवय असते. मागे वळून विचार केला असता, हिमालयातले खडतर जीवन ही समज आणि हुषारी देत असावा असे वाटते.

हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही. वाह वा! काय अप्रतिम लिहून गेलात!
आणि हा शोधलेला हिमालय ही कधी कधी भावनेत वाहून जातो तर कधी चिंतेच्या धुक्यात दिसेनासा होतो. तो परत परत शोधावा लागतो हेच खरे!

सुक्या's picture

11 Feb 2022 - 12:54 am | सुक्या

पहिल्या पासुन ही लेखमाला वाचतो आहे. सुंदर आहे. साधे प्रवासवर्णन न होता एक सुंदर मनोगत असल्यासारखी होते आहे ...
हिमालयात ट्रेकिंग साठी जवळ्पास ३ अठवडे राहीलो आहे. तेव्हा ग्रामीण भागात मनसोक्त भटकंती झाली होती. तुम्ही म्हणता तसे तिथले जीवन अगदेच गुडी गुडी नहिये. तेथील गावांमध्ये जीवन खडतर आहे. साध्या गोष्टी ज्या आपण नाक्यावर जाउन घेउन येतो त्यासाठी त्यांना मैलो पायपीट करावी लागते.

पण जीवन कितीही खडतर असले तरी तिथल्या लोकांच्या चेहेर्‍यावर मात्र हसु नेहेमी असते हे मात्र खरे ..

कंजूस's picture

11 Feb 2022 - 3:20 am | कंजूस

पर्यटक थोडे दिवस जातात डोंगरभागात. सुसज्ज हॉटेलांत राहतात. पण तिथे गावांत राहणाऱ्यांना राहाणे कठीण असते. उत्पन्नाची साधने कमी आणि शहरी सोयी पाहिल्या की त्या गावात मिळणे कठीण. कल्पना करू शकतो. कुठे शहराकडे जायचे तर वाहन आणि घाटांचे चढ उतार. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना एवढे पैसे कुठे मिळणार.

कुमाऊं गढवाल म्हणजे उत्तराखंड. किन्नोर हिमाचलमध्ये आहे आणि तिथेही अशीच परिस्थिती असणार. ती काय आहे हे 'mountain fairy' youtube channelवरून कळते.