हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
3 Jan 2022 - 9:53 am

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!

३१ ऑक्टोबरची सकाळ! गूंजीवरून परत आल्यावर सत्गडमधली थंडी किती सुखद वाटतेय! सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय! गूंजीचं गूंजन अजूनही मनात सुरू‌ आहे आणि ते इतक्यात थांबणार नाही! आज सलग दोन दिवसांच्या प्रवासानंतर सगळ्यांनाच आराम करायचा आहे. गूंजीचा प्रवास जीपने केला तरी खडतर होता व तोही एक प्रकारे ट्रेकसारखा थकवतो. त्यामुळे आरामाची गरज आहेच. तरीही इतका सुंदर निसर्ग आणि हिमालय म्हंटल्यावर फिरण्याचा मोह होणारच. आवरून फिरायला जायला निघालो. आणि सोबतचे मित्र व बाकीच्यांनी कनालीछीना ह्या जवळच्या गावात एका व्यक्तीला भेटायला जायचं ठरवलं. त्यानुसार मी माझा ट्रेकिंगचा प्लॅन बनवला. कनालीछीना गांव रस्त्याने इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे. पण इथून येताना ट्रेकची एक वाट आहे. अगदी गावा- गावांमधून येणारी पायवाट. योगायोगाने मला कनालीछीनामध्ये शाळेत जाणा-या एका मुलाची सोबतही मिळाली. ह्या पायवाटांमध्ये वाटाड्या असणं गरजेचं आहे. अन्यथा दिशा कळत नाहीत. असा आजचा ट्रेकिंगचा कार्यक्रम ठरला. फॅमिली व ग्रूपसोबत फिरत असल्यामुळे वेळेच्या मर्यादा आहेत. पण त्यामध्येही मस्त फिरणं होतंय.

सकाळी उठून सत्गडची वाट उतरून हायवेवर आलो. पिथौरागढ़- धारचुला महामार्ग! सत्गडच्या जवळ हा रस्ता अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे. काही वेळ रस्त्यावर फिरण्याचा आनंद घेतला. पुढे जाऊन परत एकदा हिमशिखरांचं दर्शन घेऊन आलो! आणि सोबतचे जीपने निघणार होते, त्यावेळेपर्यंत रोडवर त्यांना भेटलो. कालचे अनीलजीच जीपने कनालीछीनाला सोडणार आहेत. कनालीछीना हे इथलं तालुक्याचं ठिकाण आहे. सत्गडमधले अनेक मुलं- मुली कनालीछीनाच्या शाळांमध्येच जातात. ते रोडने जात नाहीत. मधून ट्रेकचा शॉर्ट कट आहे, त्यावरून जातात. सत्गड़मधला चेतन नावाचा शेजारीच राहणारा मुलगा आहे. त्याला कनालीछीनामध्ये काही काम असल्यामुळे तोही सोबत आहे. त्यामुळे येताना त्याच्यासोबत येऊ शकतो. आणि दोन- तीन दिवस त्याच्यासोबत क्रिकेट खेळत असल्यामुळे चांगली मैत्रीही झाली आहे. जीपने पंधरा मिनिटांमध्ये कनालीछीनाला पोहचलो. तिथे काही वेळ भेटी- गाठी झाल्या. कनालीछीना तालुक्याचं असलं तरी गावच आहे. पण काही दुकानं आहेत. काही शाळा, सरकारी कार्यालयं इ. आहेत. इथे पहाड़ी परिसरामध्ये सपाट जागेची कमतरता असल्यामुळे जिथे कुठे सपाट जागा असते, तिथे मावतील तितकी सरकारी कार्यालयं, दुकानं, मिलिटरीचे युनिटह इ. दिसतात. शिवाय तुलनेने छोट्या गावांमध्येही शहरामध्ये मिळणा-या ब-याच वस्तु मिळतात.

इथे ज्यांना आम्ही भेटलो होतो, त्यांची मोठी बाग आहे. बागेमध्ये संत्र्यासारखं माल्टा नावाचं फळही दिसलं. त्यांनी इथे पॉली हाऊस बांधले आहेत. त्या हाऊसेसच्या आतमध्ये गेल्यावर एकदम ऊबदार वाटलं. तिथलं तपमान नियंत्रित केलेलं असतं. काही दिवसांपूर्वी जो मोठा पाऊस आला होता, तेव्हा इथल्या बागेचंही नुकसान झालं होतं, असं ते बोलले. इथल्या गाठी भेटी झाल्यावर सगळे जण परत जायला निघाले. चेतनचं कनालीछीनामधलं काम झाल्यावर चेतनशी गप्पा मारत मीसुद्धा निघालो. कनालीछीना गावात वरच्या बाजूनेच पायवाट निघाली. माझ्या शूजच्या बाबतीत गंमत झालीय. थोड्याच दिवसांपूर्वी बूंगाछीनामध्ये माझ्या शूजचं सोल फाटलं. त्यामुळे नवीन शूज घ्यावे लागले. इथे शूज कम चप्पल असे फ्लाईटचे शूज सगळे वापरतात. तसेच शूज घेतले. अगदी साधे. पण ग्रीप मस्त आहे. मातीमध्ये किंवा दगडावर अजिबात घसरत नाहीत. ह्या पायवाटेवर लोकांचं जाणं- येणं आहे. आणि वस्तीला तशी लागून लागूनच पाय वाट जाते आहे. मधून मधून झाडीमधून दूरवरचे शिखर दिसतात! इथे सगळीकडे इतका सुंदर निसर्ग आहे की, कुठेही फिरा, कधीही फिरा, लॉटरीच लॉटरी आहे. ह्या प्रसन्नतेचा आणि शांततेचा आनंद घेऊन तितका कमी. त्यामुळे इकडे असताना जेव्हा व जितकं जमेल तितकं फिरत राहणार आहे.

पुढे जाता जाता पाय वाट रस्त्याला मिळाली. थोडं अंतर रस्त्यावरून गेल्यावर परत पाय वाट डोंगरात चढली आणि मग सत्गडमधला चढ लागला. घरं आणि शेतंही लागली. असं करत रमत गमत फिरत तासाभरामध्ये सत्गडला पोहचलो. छोटा पण मस्त ट्रेक झाला. सत्गडच्या घरी गच्चीत मस्त समोरच्या नजा-याचा आणि ऊन्हाचा आनंद घेत थांबलो. नंतर मुलांसोबत क्रिकेट खेळलो. दुपारी दुकानात काही काम होतं म्हणून परत एकदा रोडवर जाऊन आलो, १० मिनिटांचा पण छानसा सत्गड ट्रेक झाला. रात्री काही वेळ थंडीमध्ये शक्य तितकं आकाश दर्शन केलं आणि मस्त लवकर झोपून गेलो. इथली प्रमाण वेळ खरं तर आपल्यापेक्षा दोन तास पुढे आहे! दिवस पहाटे ५ ला सुरू होतो व रात्री ८ ला संपून जातो! पुढच्या दिवसांमध्ये आता आणखी ब-याच ठिकाणी फिरणं आणि ट्रेकिंग होणार आहे.


आज केलेले दोन छोटे ट्रेक.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक

माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

प्रवासभूगोललेखअनुभव

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

3 Jan 2022 - 1:53 pm | कर्नलतपस्वी

लेख छान आहे, फोटो सुद्धा

सिरुसेरि's picture

7 Jan 2022 - 6:28 pm | सिरुसेरि

+१. छान लेख आणी फोटो .

निनाद's picture

10 Feb 2022 - 5:10 am | निनाद

किती सुरेख आहे खरोखर इथला निसर्ग! ती पायवाट तर अगदी स्वर्गिय आहे!