एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा."
यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे. अर्थात, संपूर्ण गावाला, समाजाला, देशाला एकाच वेळी कंटाळा आलाय असं कधी होत नाही. कारण कंटाळा ही एक वैयक्तिक गोष्ट आहे..! आणि तरीही समजा..."
परंतु हे ऐकत असतानाच रावसाहेबांनी खुर्चीत कोंबलेलं स्वतःचं शरीर फैलावून मागं रेललं..! मग हात वगैरे हवेत ताणून जबड्याचे सांधे मोडेपर्यंत तोंड उघडून छातीभर श्वास आत घेतला.. आणि मग श्वास बाहेर सोडत असताना शेवटच्या बिंदूला त्यांनी 'आssयाssयाssआईगंss' असा मोठ्ठा ध्वनी उत्पन्न केला...!
हे सगळं तटस्थपणे पाहून मी त्यांस बोललो की,
"तुम्ही आत्ता ज्या प्रक्रियेतून गेला आहात, त्यास मराठी भाषेमध्ये जांभई असे म्हणतात, रावसाहेब. जांभई ही कंटाळ्याची बहिण असते.
आपल्या कार्यालयात समजा दुपारच्या जेवणानंतर वगैरे जांभयांचा मुबलक प्रादुर्भाव होत असला तरी, सरकारी कार्यालयांमध्ये मात्र ह्याबाबतीत 'सकाळ दुपार संध्याकाळ' असे क्षुद्र फरक करणं व्यर्थ मानलं जातं..!
तिथे दिवसाच्या कोणत्याही वेळेस अशा संसर्गजन्य जांभयांची जुगलबंदी सादर करण्यात कुणाला काहीच अडचण नसते."
ह्यावर रावसाहेबांनी आणखी एक जबडातोड जांभई पेश केली. ही जांभई संपुष्टात येत असतानाच शेवटी शिट्टी वाजवल्यासारखा ध्वनी निर्माण करण्याचेही कौशल्य त्यांच्यापाशी असल्याचे दिसून आले.
मग पुढे रावसाहेब तक्रारीच्या सुरात म्हणाले की,"बरोबर है..! सरकारी लोकांची मजा असते साला..! इथं साला मॅनेजर लोक दोन मिनिटं शांत बसू देत नाईत आमाला"
आता एवढं झाल्यावर आम्हासही संवाद वाढवण्याची तलफ आवरता न आल्यामुळे बोललो की,
"खरंय..! अशा जांभई उत्पादक प्रदेशात मनसोक्त हिंडण्याचा तुमचा मूड असतानाच समजा मॅनेजर नामक दुष्ट मनुष्याने तुमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केली असता तुमच्या मनात क्षोभ उत्पन्न होणं साहजिकच आहे आणि ह्या निमित्ताने मी तुमच्याबद्दल सहानुभाव प्रकट करतो..!
परंतु ही गोष्ट काही फक्त कार्यालयापुरती मर्यादित नाही, रावसाहेब..!
घरी गेल्यावर बायकोसही अशाच पद्धतीने पिरपिर करण्याची सवय जडलेली आहे..! परवा मी घरी असाच जरा लवंडलेलो असतानाच, 'नाही गंss यंदाही नाही जमणार मला यायला. माझा नवरा सदानकदा डुकरासारखा लोळत पडलेला असतो..! कसला धोंडा गळ्यात पडलाय काय माहित..!' अशा पद्धतीचं मुद्दाम मोठ्या आवाजातलं फोनवरचं संभाषण माझ्या कानावर आलं..
अर्थात, मी आता बऱ्यापैकी निबर झालेलो असल्यामुळे अशा प्रसंगी मी काहीच त्रास करून घेत नाही. फक्त कूस बदलून दुर्लक्ष करतो. बरं पडतं हे धोरण.
कारण बायकोचा, संसाराचा कंटाळा आला तरी तो काही कायमस्वरूपी टिकत नाही.. नंतर थोड्या वेळाने बरं वाटायला लागतं ते सगळं..! कायमस्वरूपी टिकणारा दैवी पवित्र कंटाळा फक्त एखाद्या सिद्धार्थ गौतमासारख्या भाग्यवंतांना प्राप्त होतो. आपली काही तेवढी झेप नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे रावसाहेब..!"
ह्यावर रावसाहेबांनी, "खरंय.. मलाही घरात काही स्पेसच मिळत नाही" अशा पद्धतीच्या आधुनिक शब्दरचनेद्वारे त्यांची त्रोटक भावना अभिव्यक्त केली.
आता हे रावसाहेब गृहस्थ सततच सहमत व्हायला लागल्यामुळे आम्हालाच ते प्रशस्त वाटेना म्हणून बोललो की,"तुम्ही माझ्याशी सहमत झाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. परंतु कंटाळा ही काही अलीकडची शहरी आधुनिक भावना नसावी, रावसाहेब..! आपले आदिमानव पूर्वजही ह्यातून गेले असणार..!
म्हणजे शिकार, मैथून, झोप वगैरे अतिमहत्त्वाची रूटीन कामं उरकल्यानंतर काही आदिमानवांना उरलेला वेळ खायला उठत असणार आणि त्यातूनच त्यांनी शेती वगैरे भानगड शोधून काढली असणार..!
शिवाय रोज उठून अन्नासाठी शिकार वगैरे करायची
म्हणजे भलताच धोकादायक प्रकार..! त्यामुळे वस्तीजवळच सुरक्षित अन्नधान्य उपलब्ध करून देणारा शेती हा प्रकार त्यांना सुरूवातीला तरी भन्नाट वाटला असणार..!
पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं असेल की शेती हे गळ्यापर्यंत बुडवणारं, चोवीस तासांची बांधिलकी मागणारं काम आहे. त्यात कंटाळा वगैरेसारख्या अगदीच क्षुद्र आणि हास्यास्पद गोष्टीस फुरसतच मिळत नाही..!
तरीही समजा आलाच कंटाळा तर तो घालविण्यासाठी अधूनमधून लढाया वगैरे करण्याचे ऑप्शन्स होते म्हणा त्यांच्याकडे मध्ययुगापर्यंत..!
परंतु लढाया वगैरेंमुळे समाजाचा कंटाळा जात असला तरीही व्यक्तीचा कंटाळा घालविण्यासाठी लढाईचा उपाय तसा बिनकामाचाच म्हणायला पाहिजे..!
कारण कंटाळा हा सृजनशीलही असू शकतो. स्वयंपूर्णही असू शकतो. आणि अशा कंटाळ्याची चव चाखण्याचं भाग्य ज्यांना मिळालेलं असेल, त्यांच्याच हातून कला क्रीडा साहित्य संगीत वगैरे निर्माण झालं असावं..!
आणि ह्या कला वगैरे गोष्टी मूलतः एका व्यक्तिच्या कंटाळ्यातूनच निर्माण झालेल्या असल्यामुळे, अनेकांचा कंटाळा घालविण्यासाठी त्या अतिउपयुक्त ठरल्या असतील, वगैरे वगैरे मला वाटतं बुवा.. पण तरीही समजाss ..."
हे सगळं माझं मौल्यवान प्रकट चिंतन मध्येच थांबवून रावसाहेब चुळबुळ करत पुटपुटले की,"खरंय.. खरंय.. कंटाळा काही वाईट नसतो. माणसंच वाईट असतेत."
ह्यावर आम्हास उच्च नैतिक सामाजिक पातळीवर जाऊन विवेचन करणं भाग पडलं की,
"तसं नाही रावसाहेब..! कंटाळ्याला नीट हाताळलं नाही तर त्याच्या येण्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि कंटाळ्याचे थर साचायला लागतात. मग माणूस प्रत्येक गोष्टीला नकार देत राहतो.. त्यामुळे हळूहळू साध्या कंटाळ्याचं विषारी कंटाळ्यात रूपांतर व्हायला लागतं. विषारी कंटाळा जगण्यात शिळेपणा आणतो. जगण्यातल्या इंटरेस्टला चूड लावतो..!
विशेषत: जगण्यासाठी काम, नोकरी वगैरे फालतू धंदे करण्याची काही गरजच नाही, एवढा महामूर पैसा जवळ असेल तर असा कंटाळा येणं अटळ आहे..!
परंतु अशा कंटाळ्याची चैन हरहमेश उपलब्ध असणे ही किती मौल्यवान गोष्ट आहे, हे कळण्याएवढी काही कोट्यधीशांची जाणीव विस्तारलेली नसते..!
त्यामुळे समोर अथांग काळ पसरलेला आहे आणि ड्रग्जचा आधार घेतल्याशिवाय त्या काळाला तोंडच देता येत नाही, अशी भयावह अवस्था त्यांना प्राप्त होऊ शकते, हे आपल्याला माहितीच असेल रावसाहेब..!"
एवढं बोलून अपेक्षेने रावसाहेबांकडे पाहतो तर काय हे दुर्दैव..! रावसाहेब चक्क पेंगत आहेत..! हनुवटीचे छातीपर्यंत झोके जातील अशा पद्धतीने पेंगत आहेत..!
ते पाहून मला अपमान झाल्यासारखे वाटले तरीही मी न थांबता बोललो की,"रावसाहेब, ऊठाss..! तुम्ही अशा पद्धतीने पेंगून माझा अपमान करू नका..! अशा पद्धतीने पेंगून तुम्ही संभाषणाचे नियम पायदळी तुडवत आहात..! आणि हे नीतीला धरून नाही, रावसाहेब..! यासंबंधी एक महत्त्वाचा मुद्दा अजून सांगायचा राहीला आहे तेवढा मला पूर्ण करू द्या मग तुम्ही खुशाल पेंगा.. माझी काहीच हरकत नाही!"
"अम्म्मss बोला ss बोलाss ऐकतोय मी"-- इति रावसाहेब.
"तर असं आहे रावसाहेब की व्यसनाधीनता ही काही फक्त श्रीमंतांमध्येच आढळते असं नाही..! मजूर लोकही देशी किंवा हातभट्टीची दारू सर्रासपणे झोकतात, परंतु त्यामागे कंटाळा हे कारण नसावे.
कारण कंटाळा येण्यासाठीही ऊर्जेची एक किमान पातळी शरीरात असावी लागते.
पण समजा दिवसभर त्यांचं पिळून चिपाड केलं जात असेल आणि त्यामुळे रात्री कुठंतरी जाऊन अंग टाकून देण्यापुरतीच ऊर्जा शिल्लक रहात असेल.. तर स्वतःच्या असल्या जगण्याविषयी वाटणारी शरम विसरण्याचा दारूशिवाय दुसरा सोपा उपायच त्यांच्यापाशी उपलब्ध नसेल."
-- एवढं बोलून मला माझं भाषण नाईलाजाने थांबवावं लागलं कारण रावसाहेब सहकारी यांचं शरीर जरी खुर्चीत दिसत होतं तरी त्यांचं मन मात्र चौथ्या-पाचव्या डामयेन्शनमध्ये गेलेलं दिसून आलं.
प्रतिक्रिया
17 Oct 2021 - 3:36 pm | रंगीला रतन
पाटील साहेब नेहमीची मजा नाही आली. पुढे वाचताना कंटाळा आला :(
17 Oct 2021 - 6:19 pm | आनन्दा
हम्म..
सुरुवात मस्त होती, पण शेवटी अगदीच कंटाळून केल्यासारखा वाटला.
18 Oct 2021 - 1:52 pm | सुखी
खिक