आमचा Valentine वीक - तेरी बिंदिया रे!
"Touchdown confirmed! Perseverance is safely on the surface of Mars, ready to begin seeking the signs of past life!"
जगातली अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था NASA च्या इतिहासातला एक अत्यंत महत्वपूर्ण पण इतर अनेक विशेष दिवसांतला एक दिवस. NASA नी मानवतेला असे अनेक क्षण दिले आहेत त्यातला अजून एक. Perseverance हे rover मंगळावर यशस्वीरित्या उतरणारं दहावं मानवनिर्मित यान ठरलं. NASA आणि Perseverance च्या पूर्ण टीम साठी ही खूप मोठी उपलब्धी होती.
नासा ही म्हणायला अमेरिकन संस्था असली तरी अक्षरशः जगभरातून आलेल्या सर्वोत्तम अवकाश संशोधकांची टीम ही त्यांची खासियत. त्यात भारतीय नावं देखील असतातच. अमेरिका हीच एका अर्थी Salad Bowl. जगभरातून लोकं एकत्र येतात आणि तरी Salad मधल्या पदार्थांप्रमाणे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतात. त्यामुळे खरंतर ना Perseverance च्या लॅन्डिंगचं अप्रूप होतं ना त्या टीममध्ये असलेल्या भारतीय नावांचं. पण तरी १९ फेब्रुवारीला जो एक फोटो व्ह्यायरल झाला तो पार crush करून गेला.
तो होता Perseverance च्या Guidance and Control Operations Head - डॉ. स्वाती मोहन यांचा. जगातल्या डझनावारी देशांमधून आलेल्या शेकडो निष्णात संशोधकांच्या टीमचा चेहरा बनण्याची संघी त्यांना मिळाली. आणि त्यांचं माहीत नाही - पण आमच्यासाठी त्यांनी ह्या संधीचं सोनं केलं.
असं म्हणतात की a picture is worth a thousand words. इथे तर एक फोटोपेक्षा सुद्धा त्या फोटोतले काहीच पिक्सेल्स व्यापलेली एका छोट्याशी गोल वस्तू हजारो शब्द काय, हजारो कहाण्या सांगून गेली. डॉ. स्वातींच्या कपाळावरची टिकली! अहो आपली साधी बिंदी!!
भारताची, आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची जी काही प्रतीकं आहेत त्यातलं एक अविभाज्य आणि अद्वितीय लेणं - स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू - बिंदी. वयाच्या दुसर्या वर्षीपासून अमेरिकेत वाढलेल्या डॉ. स्वातींनी कदाचित फक्त एक फॅशन म्हणून ती बिंदी लावली असेल. पण त्यांच्या कपाळावरच्या एका ठिपक्यानं कदाचित शेकडो हजारो आयुष्य बदलू शकतील.
Cornell University मधून Mechanical & Aerospace Engineering ची पदवी घेतलेल्या, आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मॅसेच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (MIT) Aeronautics/Astronautics मध्ये M.S. and Ph.D केलेल्या डॉ. स्वाती अश्या लाखो भारतीय वंशाच्या अमेरिकन्सपैकी आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. Brain drain, परदेशस्थ भारतीयांनी भारताच्या प्रगतीसाठी काय केलं वगैरे विषय थोडे बाजूला ठेवूया आणि जरा त्यांच्या फोटोकडे बघूया.
एक तर त्यांच्या डोळ्यांतली चमक आणि एकाग्रता बघा! अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या ह्या प्रोजेक्टच्या ऐन निर्णायक क्षणांमध्येसुद्धा त्यांच्या डोळ्यांत तणाव नाही तर उत्सुकता दिसते. अपयशाच्या भीतीपेक्षा "पुढे काय" ह्याचं कुतुहल दिसतं. एका हाडाच्या शास्त्रज्ञाचं लक्षण.
मग त्यांच्या चेहर्यावरचा तो मास्क. आताच्या जागतिक आणि अगतिक अवस्थेचं अक्षरशः प्रत्येकाच्या तोंडी असलेलं प्रतीक! मग ते साक्षात NASA चे वैज्ञानिक का असेनात. सध्याच्या अवस्थेत काळा-गोरा, गरीब-श्रीमंत, ख्रिश्चन - मुस्लिम - ज्यू - हिंदू - बौद्ध - माणसानी निर्माण केलेले सगळे भेद खुंटीवर टांगायला लावून, आफ्रिकेतल्या खाणकामगारापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत सगळ्यांना एका लाइनीत उभं करून लायकी दाखवणारा मास्क म्हणजे human असण्याचं प्रतीक. NASA च्या अत्यंत हुशार, कर्तबगार वैज्ञानिक असल्या तरी त्या "आपल्यातल्याच" आहेत ह्याची खात्री पटवणारा.
आणि मग त्या फोटोमधली सगळ्यात कमी जागा व्यापलेली पण सगळ्यात मोठी गोष्ट. स्वातींची बिंदी!
माझ्या देशात स्त्रीत्वाचं ह्या होऊन मोठं प्रतीक नाही. त्या एका ठिपक्यात माझ्या देशाची संस्कृती, परंपरा, मूल्य सामावली जातात. अर्थात सगळ्या स्त्रिया पावित्र्य, मांगल्य वगैरे भावनांनीच कुंकू लावतात असा दावा आपण करू शकत नाही. "सेक्सी" दिसतं म्हणून बिंदी लावणार्या कमी मिळतील का? कित्येकांसाठी कुंकू, टिकली, बिंदी म्हणजे परंपरेचं जोखड, जुनाट विचारांचं प्रतीक देखील असू शकतं. आणि त्यालाही आपली बिलकुल हरकत नाही. माझ्या लहानपणी देखील शाळेत कुंकू लावणार्या मुलींची "काकूबाई" कॅटॅगरी मध्ये नोंद व्हायची आणि आता तर कदाचित चित्र अजून वाईटअसेल.
पण स्वातींनी नुसती बिंदी लावली नाही - त्यांनी ती "मिरवली." She didn't wear the bindi - she ROCKED it!
आणि हे बॉलिवुडच्या नट्यांच खोल गळ्याचा ब्लाऊज घालून ३ वाराची साडी लपेटून बिंदी लावणं नव्हतं. बुद्धिमत्तेचा swag काही और असतो. प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं! डॉ. स्वाती मोहन - तुम्ही काय भावनेनी ती बिंदी लावली ते तुम्हालाच ठाऊक. पण तुमच्या ह्या एका क्रियेने माझ्या देशातल्या कित्येक मुलींच्या मनातला न्यूनगंड दूर केला असेल. काकूबाई म्हणून हिणवलेल्या गेलेल्या कित्येकींना ह्या एका फोटोनी नवी उभारी दिली असेल. माझ्या देशातल्या खेड्या - पाड्यात राहणारी माझी माय-बहिण आता फक्त तुमच्या विद्वत्तेने अचंबित होण्यापलिकडे जाऊन तुमच्यासारखं "असण्याची" जाणीव ठेऊन तुमच्यासारखं "बनण्याचं" स्वप्न बघेल! कदाचित... कदाचित माझ्या देशातल्या लोकांना खरी heroine कशी असते ह्याची ओळख पटायला लागेल.
धन्यवाद डॉ. स्वाती मोहन. आम्हाला विद्वत्तेतलं "ग्लॅमर" दाखवल्याबद्दल! धन्यवाद - आमच्या देशाची संस्कृती अभिमानाने मिरवल्याबद्दल आणि धन्यवाद - कदाचित आमच्या crush ची परिमाणं बदलल्याबद्दल!
© - जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
22 Feb 2021 - 4:45 pm | Bhakti
प्रामाणिकतेची style मारणं सोपं नसतं आणि साधेपणाची fashion statement करायला स्वतः खूप खूप मोठं असावं लागतं!
छानच लिहीलय.
मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली..इतकीच साधी आहे ती..इतकीच कर्तृत्ववान शास्त्रज्ञ!
22 Feb 2021 - 5:26 pm | मुक्त विहारि
छान लिहिले आहे
22 Feb 2021 - 5:30 pm | तुषार काळभोर
अगदी!
फोटो पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा असंच काहीसं मनात येऊन गेलं!
>>बुद्धिमत्तेचा swag काही और असतो.
सही पकडे है..
22 Feb 2021 - 8:57 pm | सौंदाळा
लेख नेहमीप्रमाणे छानच
पण स्वाती यांची ओळख / माहिती त्रोटक वाटली.