गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.
फिरोज तसा खट्याळ होता पण बापाला बघितलं कि त्याची पँट ओली व्हायची. एरवी तो बरीच कामे करून आईला मदत करीत असे. बाप कर्दनकाळ असल्याने आईची ओढ जास्त होती.
मोतीलाल कोणत्याहीवेळी कुणालाही घरी घेऊन येई आणि दारू पित बसे. त्यांच्या जेवणाची सोय फिरोजच्या आईलाच करावी लागे. एकदा असाच तो त्याचा परममित्र रघू ला घेऊन घरी आला. वेळ संध्याकाळची. चार वाजलेले. फिरोज शाळेतून अजून आला नव्हता. दोघेही आधीच पिऊन टाईट झालेले. त्यात मोतीलालच्या हातातील प्लॅस्टिकची काळी पिशवी बघितली आणि फिरोजच्या आई समीना काय समजायचं ते मनोमन समजली. तिच्या हातात ती पिशवी देत मोतीलालनं सांगितलं, "आज मेरा दोस्त मेरे घर गोश्त खाने कु आया है। ये मेहमान है हमारा। इसके लिए अच्छे से खाना बना दे। "
तिनं काहीही न बोलता ती पिशवी घेतली आणि ती रसोईमधे गेली. हे दोघे दोस्त बाहेर अंगणातील झाडाखाली बाज टाकून तिच्यावर दारू ढोसत बसले. अधून मधून समीनाला आवाज देऊन मोतीलाल चखणा आणायला सांगे. मग ती पापड, वेफर्स नेऊन द्यायची.
"अरी ओ फिरोज कि अम्मा, अपना लाल किदर है रे?" मोतीलाल आता बऱ्यापैकी रंगात आलेला होता.
"जी वो स्कूल से आया नय अबीतक..! " समीनानं आतूनच उत्तर दिलं. बऱ्यापैकी दारू पोटात गेली कि मोतीलाल पोरावर माया करी. एकुलता एक मुलगा असल्याचा आणि तो शाळा शिकून बडा मुन्शी होणार असल्याचा त्याला साक्षात्कार होई.
"देख रघू, अब मेरा फिरोज इस्कुलमे पडता हय। बहोत हुशार हय। एक दिन बडा मुन्शी बनेगा और ढेर सारा पैसा लाएगा! फिर मे बनूंगा मुन्शी का बाप! उस दिन ये देसी छोड दूंगा और सिर्फ अंग्रेजी पीना चालू करूंगा! "
रघू काही बोलणार इतक्यात मोतीलालला आपण आजच 'मुन्शी का बाप'झालो आहोत असं वाटायला लागलं. हातातील देशी दारूची त्याला एकदमच शिसारी आली. ग्लास फेकून देत तो ताडदिशी उठला. "चल रघू, आपून आजच तेरेकू अंग्रेजी पिलाताय ! "
रघूला घेऊन दोघे दोस्त झुलत झुलत गुत्त्यावर परत निघाले. ते गेल्यावर समीनानं त्यांचे ग्लास आणि चखण्याच्या प्लेट्स आवरायला सुरूवात केली. इतक्यात शेजारच्या घरातील कुत्र्याने मटणाचा वास घेत रसोईमधे प्रवेश केला. एका भांड्यात स्वच्छ करून ठेवलेलं मांस बघून त्यानं त्यात तोंड घातलं. भांडं बारीक तोंडाचं असल्याने त्याला तोंड बाहेर काढता येत नव्हतं. इतक्यात फिरोजही शाळेतून घरी आला. त्यानं रसोईमधे कुत्रं आलेलं पाहिलं आणि त्याला हाकलायला तो आत गेला. त्याची आम्मीही एव्हाना रसोईमधे आली. तिनं समोरचं दृश्य पाहिलं आणि घाबरून मटकन खालीच बसली. कुत्र्याने मटण खाल्लं हे जर शौहरला समजलं तर तो धुलाई तर करणारंच पण तलाक दिला तर कुठं जायचं? तिला रडताना पाहून फिरोजही गळाठला. तो चुपचाप बाहेर येऊन बाजेवर बसून राहिला. कुत्र्याने अजूनही मान बाहेर काढण्याची धडपड सुरूच ठेवली होती. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून सामना उठली आणि तिनं सुरी घेतली. अर्ध्या तासानंतर छान असा स्वयंपाक तिनं बनवला होता. इकडे मोतीलालही रघूसोबत घरी आला होता. मटणाचा वास येताच त्याला भूक अनावर झाली. तो रघूला घेऊन जेवायला बसला. गरमागरम जेवण ताटात वाढलं गेलं. फिरोजला पाहताच पुत्रप्रेम उफाळून आलं.
"अरे, मेरा लाल! तू आ ना बेटे खाने को।आजा बैठ, आ तो बेटे..! "
मोतीलाल त्याला आग्रह करीत राहीला पण फिरोज जेवायला तयार नव्हता. मोतीलालला समजत नव्हतं एरव्ही त्याचा शब्द ओलांडण्याची कुणाची हिम्मत नव्हती आणि आज मुलगा जेवायला नकार देतोय, काय झालं असेल? "
त्यानं समजावून पाहिलं, रघूनंही आग्रह केला पण फिरोज जेवायला तयार नाही.
"अरे क्या हुआ बेटे, तेरेकू गोश्त पसंद हय इसलिए लाया हूँ। तू क्यूँ नही खा रहा?? "
फिरोजनं बराच वेळ विचार केला आणि कसाबसा म्हणाला, "क्या करू रघूचाचा, सच बोलू तो माँ मरती है और झूठ बोलू तो बाप कुत्ता खाता है!"
रघुला समजलं नाही. त्यानं फिरोजला जवळ घेऊन प्रेमानं विचारलं. शेवटी बाप तुला किंवा अम्मीला मारणार नाही हे ऐकल्यावर फिरोजनं घडलेली हकीकत सांगितली. तुम्हाला खायला आणलेलं मटण कुत्र्याने खाल्लं म्हणून अम्मीनं कुत्र्याला मारून त्याचं मांस तुम्हाला वाढलंय. ह्यात अम्मीची काय चूक? बापाच्या भीतीनं तिला हे करावं लागलं.
हे ऐकल्यावर मोतीलालला आपली चूक लक्षात आली. एकुलत्या एक पोराला आणि बायकोला उठसूठ मारहाण करणं बरं नव्हे असं त्याला वाटलं. इकडे रघूनंही त्याची बरीच कानउघाडणी केली. मग त्यानं अत्यंत प्रेमाने फिरोजला जवळ घेतलं आणि दुसरं मटण आणण्यासाठी त्याच्या हातावर पैसे ठेवले. समीनाकडे पहात तो म्हणाला, "अरे बेगम साहिबा, गोश्त कुत्ते ने खाया तो क्या हुआ? दुसरा बनाओ जी। अब तो हमारे अच्छे दिन आनेवाले है। बेटा मुन्शी जो बननेवाला है। "
त्याच्या बोलण्यावर अक्षरशः लाजून समीना परत रसोईकडे वळली.
प्रतिक्रिया
25 Aug 2020 - 11:45 am | आनन्दा
भारी!!
25 Aug 2020 - 1:18 pm | टर्मीनेटर
सच बोलु तो...
काय झालं असणार ह्याचा आगाऊ अंदाज येत असला तरी शेवट अनपेक्षीत असल्याने कथा आवडली.
पुढील लेखनास शुभेच्छा!