यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे? भाग १
यंदा कर्तव्य आहे ? भाग २
यंदा कर्तव्य आहे? भाग ३
यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८
यंदा कर्तव्य आहे? भाग ९
यंदा कर्तव्य आहे भाग १०
दिवंगत ज्योतिषचिकित्सक व टीकाकार श्री. माधव रिसबूड यांचा लेख
कै. माधव रिसबूड यांच्या विषयी अधिक माहिती साठी इथे टिचकी मारा. इथे ही टिचकी मारलीत तरी पहाता येईल.
पत्रिका पहाण्याचा आग्रह समंजसपणाचा आहे का ?
माझ्या नात्यातली ही मुलगी. एका प्रख्यात कंपनीत २५ हजार रुपये पगार मिळवणारी. दिसायला देखणी, स्मार्ट. पण गेली दोन वर्षं तिचं लग्न जुळत नव्हतं, याला कारण तिची पत्रिका ! कडक मंगळ आणि मूळ नक्षत्र. मोजून चाळीस ठिकाणी पत्रिका जुळत नाही म्हणून तिला नकार आले. वडिलांनी तिची पत्रिका अनेक ज्योतिष्यांना दाखवली. सगळयांनी ठामपणे सांगितलं की डिसेंबर २००२ च्या आधी तिचा विवाहयोग नाही. पण काय आश्चर्य, याच डिसेंबर महिन्यात तिचं लग्न होऊनसुद्धा गेलं!
ज्योतिषशास्त्र खरं की खोटं यावर आपली नक्की मतं ज्यांनी बनवलेली नाहीत अशा वाचक-भगिनी पुष्कळ असतील. हा लेख वाचून त्यांना आपलं मत बनवणं सोपं जाईल. ज्यांचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे त्यांचे मत-परिवर्तन झाले नाही तरी हा लेख त्यांना विचार करायला प्रवृत्त करील. या लेखातले प्रतिपादन तज्ज्ञ ज्योतिष्यांनाही खोडून काढता आलेले नाही.
या शास्त्रातली गृहितके काल्पनिक व सामान्य विवेकबुद्धीला न पटणारी आहेत. ऎबसर्ड हे विशेषण त्यांच्यासाठी योग्य होईल. त्यांपैकी काहींची माहिती मी इथे देणार आहे. सोबतच्या आकृतीमुळे माझे म्हणणे समजायला सोपे जाईल.
खुलासा:- आकृतीतील स्थिती दररोज एकदा, दिवसा किंवा रात्री केव्हाही येऊ शकते. राहू एकाच वेळी चार स्थानात उपस्थित आहे. राहूचे प्रभाव पृथ्वीतून आरपार पलीकडे जातात असे मानावेच लागते.
ग्रहांची फले जन्मकुंडलीतल्या ग्रहांच्या स्थानानुरूप मिळतात हा सिद्धांत :- एकाच वेळी चार ठिकाणी जन्मलेल्या चार मुलांच्या संक्षिप्त कुंडल्या इथे दाखवल्या आहेत. राहू बर्लिनला ९ व्या घरात, मुंबईला ७ व्या घरात, टोकियोला ५ व्या घरात व लॉस एंजेलिसला १ ल्या घरात पडला आहे. या मुलांना चार प्रकारची फले राहू देतो असा या शास्त्राचा सिद्धांत आहे. ९ वे घर धार्मिक बाबी व प्रवास यासंबंधी, ७ वे घर वैवाहिक बाबींचे, ५ वे घर संततीबाबतचे आणि पहिले घर पिंड-प्रकृतीबाबतचे. अशा प्रकारची फले राहू देतो असे हे शास्त्र मानते. तसे करण्यासाठी राहूला कोणकोणत्या गोष्टी करायला पहिजेत ते पाहू. प्रथम आपल्या प्रभावाचे पृथक्करण करून त्यातले १२ घटक अलग करायला पाहिजेत. प्रत्येक घटक एकेका स्थानाचे फल देणारा असतो. हे १२ घटक पृथ्वीवर योजनाबद्ध रितीने वितरित करायला पाहिजेत, ( उदाहरणार्थ, ७ व्या प्रदेशावर ७ व्याच स्थानाची फले देणारा घटक व ५ व्या प्रदेशावर ५ व्याच स्थानाची फले देणारा घटक वितरित व्हायला पाहिजे.) तरच स्थानानुरूप फले राहू त्या मुलांना देऊ शकेल. ही पृथक्करणाची व वितरणाची क्रिया एकतर राहू स्वत:च्या बुद्धीने करीत असेल नाही तर काही अज्ञात भौतिक कारणामुळे त्या क्रिया आपोआप घडत असतील असे म्हटले पाहिजे. परंतु, मुळात राहू हा एक काल्पनिक बिंदू असल्यामुळे त्याचा ज्योतिषीय प्रभाव भौतिक स्वरूपाचा असणे शक्य नाही, म्हणून त्या प्रभावाचे पृथक्करण व वितरण भौतिक कारणामुळे होते हे म्हणणे ऎबसर्ड ठरते. बरे, राहूला दैवी सामर्थ्य असते असे म्हणावे तर तेही ऎबसर्ड दिसते. म्हणून शेवटी, स्थानानुरूप ग्रहांची फले मिळतात हा सिद्धांतच ऎबसर्ड आहे असे म्हणावे लागते.
ग्रहांच्या दृष्टीचा सिद्धांत:- काही ग्रहांना प्रत्येकी एक दृष्टी व काही ग्रहांना अनेक दृष्टी असतात, त्या दृष्टी म्हणजे एक प्रकारचे ज्योतिषीय प्रभावच असतात, या दृष्टी ठराविक स्थानावरच पडतात व त्यानुसार फले जातकाला मिळतात असा या शास्त्राचा सिद्धांत आहे. मला दोन कारणासाठी तो ऎबसर्ड वाटतो. एक कारण असे की, या दृष्टी ज्या स्थानावर पडतात ती स्थाने आकाशाच्या पोकळीत असतात असे हे शास्त्र मानते. पण तसे मानले तर त्या दृष्टींचा परिणात जातकावर होतो हे म्हणणे ऎबसर्ड वाटते. बरे, त्या दृष्टी कागदावरच्या कुंडलीतल्या स्थानावर पडतात व परिणाम करतात असे म्हणावे तर तेही ऎबसर्ड दिसते. दुसरे कारण असे की, राहूला ज्या आठ दृष्टी असतात ( असे हे शास्त्र मानते ) त्या ठराविक स्थानावर पाडण्यासाठी एक तर राहूला बुद्धी असली पाहिजे किंवा काही गूढ भौतिक कारणामुळे तसे घडत असले पाहिजे. पण हे दोन्ही पर्याय मला अॅबसर्ड वाटतात. म्हणून, हा दृष्टीचा सिद्धांतही ऎबसर्ड आहे असे मला वाटते.
या शास्त्राच्या मूलभूत तत्वाशी विरोधी असलेला महादशा-सिद्धांत :- आकाशातली राशीगत ग्रह-स्थिती विशिष्ट वेळी जी काय असेल तिच्यामुळे पृथ्वीवरील घटना त्यावेळी घडते अशी या शास्त्राची मूलभूत संकल्पना आहे. तिच्याशी सर्वस्वी विसंगत असा महादशा-पद्धत नावाचा सिद्धांत या शास्त्रात आहे. या सिद्धांतातील ग्रहांचा अनुक्रम आणि त्या ग्रहांचे दशाकाल यांचे काहीही नाते आकाशातील ग्रह-स्थितीशी जोडून दाखवता येत नाही. तरीही ती पद्धत भाकिते वर्त्रवण्यासाठी वापरली जाते. यावरून या शास्त्राला कसलीही शास्त्रीय बैठक नाही हे उघड दिसते.
ज्यांना वस्तुमान नाही, ज्यांना केवळ कल्पना-गम्य किंवा अमूर्त अस्तित्व आहे अशा घटकांना काही विशिष्ट गुणधर्म आणि प्रभाव असतात असे म्हणणे ऎबसर्ड असले तरी हे शास्त्र अशा काही घटकांना गुणधर्म व प्रभाव आहेत असे मानते. ते घटक असे आहेत :- स्थाने किंवा घरे, राशी व नक्षत्रे, आणि राहू व केतू हे काल्पनिक बिंदू.
स्थाने म्हणजे आकाशाच्या पोकळीचे काल्पनिक १२ विभाग असे मानतात. यांना गुणधर्म असतात असे मानणे ऎबसर्ड आहे. राशी व नक्षत्रे म्हणजेही एका कल्पनिक वर्तुळाचे अनुक्रमे १२ व २७ कंस किंवा आर्क्स्. रास म्हणजे ३० अंश मापाचा कंस व नक्षत्र म्हणजे १३ अंश व २० कला मापाचा कंस. आपण आकाशात पहातो ती राशी-नक्षत्रे वेगळी व हे शास्त्र विचारात घेते ती राशी-नक्षत्रे वेगळी. सर्वसामान्य लोकांना हे ठाऊक नसते. ज्योतिष्यांना ठाऊक असले तरी तसे उघडपणे सांगणे त्यांना गैरसोयीचे असते. सायन राशी व निरयन राशी हे शब्द अनेकांनी ऐकले असतील. त्या राशींची आकाशातील ठिकाणे वेगळी असतात, पण त्यांचे गुणधर्म व प्रभाव यांच्यामध्ये काहीही फरक नाही असे ज्योतिषीलोक मानतात! हे ऎबसर्ड नव्हे तर काय ? राहू-केतूमुळे ग्रहणे होतात अशी गैरसमजूत ज्योतिषीलोकांनी हेतूपूर्वक फैलावली आहे. तिचा उपयोग ते राहू-केतूंच्या काल्पनिक प्रभावांचे समर्थन करण्यासाठी करतात. वास्तविक पहाता ग्रहण होते त्यावेळी हे बिंदू कित्येकदा १०-१२ अंशसुद्धा दूर असू शकतात. चंद्र व पृथ्वी यांच्या कक्षा जर एकाच पातळीत असत्या तर हे बिंदू उद्भवलेच नसते, आणि त्या परिस्थितीत दर पौर्णिमेला एक खग्रास चंद्रग्रहण आणि दर अमावास्येला एक खग्रास किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळाले असते. मग ग्रहणांशी या राहू-केतूंचा संबंधच कुठे येतो ? ज्योतिषीलोक या शास्त्राच्या समर्थनासाठी काय वाटेल ते युक्तिवाद करीत असतात.
सारांश, फलज्योतिष म्हणजे केवळ काल्पनिक गृहितकृत्यावर उभे केलेले एक अगडबंब शास्त्र आहे. त्याच्या आधारे वर्तवलेली भाकिते योगायोगाने जशी खरी ठरतात तशीच खोटीही ठरतात. अशा शास्त्राचा आधार घेऊन मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाहीत एवढया एकाच कारणासाठी चांगली अनुरूप स्थळे नाकारणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे.
-------------------------------------समाप्त--------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
1 Apr 2009 - 2:29 pm | प्रकाश घाटपांडे
सदर लेखात तांत्रिकता अधिक आहे त्यामुळे वाचकांच्या नजरेखालून जावा एवढाच उद्देश आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
1 Apr 2009 - 3:46 pm | मि माझी
तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..
5 Apr 2009 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तूमचे सगळे लेख वाचले.. खुप सखोल अभ्यासपूर्ण लेखन केल आहे.. भरपूर चांगली माहीती मिळाली.. धन्यवाद..
5 Apr 2009 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे
यंदा कर्तव्य आहे? हे पुस्तक स्वरुपात साधना मिडिया सेंटर ४३१ शनिवार पेठ पोलीस चौकीसमोर पुणे ४११०३० फोन नं २४४५९६३५ येथे उपलब्ध आहे. हे आपल्याला येथे समजले असेलच. (खर म्हणजे समजले नसण्याची जास्त शक्यता आहे म्हणुन इथे क्लिक मारा असे सुचित करायचे असते. पण तसं म्हटले कि तो आगाउपणा ठरतो. )
पुस्तकाची जाहिरात आहे असे म्हणावे तर इथे ते संपुर्णपणे विनामुल्यच वाचायला मिळते. नाही म्हणावे तर मग कशाला इथे खरडले?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Apr 2009 - 12:55 pm | आनंद घारे
अशा शास्त्राचा आधार घेऊन मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाहीत एवढया एकाच कारणासाठी चांगली अनुरूप स्थळे नाकारणे हे असमंजसपणाचे लक्षण आहे.
या निष्कर्षाशी मी १०० टक्के सहमत आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
5 Apr 2009 - 4:52 pm | धनंजय
अधूनमधून थोडेसे तांत्रिक तपशील अटळ आहेत.
उपयुक्त लेखमाला. (ही लवकरात लवकर कालबाह्य होवो, केवळ एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून राहो, ही सदिच्छा.)
8 Jan 2012 - 4:02 pm | प्रकाश घाटपांडे
पुण्यात 'यंदा कर्तव्य आहे' अशा नावाचे एक वधुवर सुचक मंडळ पण आहे. त्यांच्या वाचनात हे पुस्तक आल्याने त्यांनी मला फोन केला.मी त्यांच्याशी चर्चाही केली . विवाह जुळवण्यासाठी जो समाज पुर्वी पत्रिकेचा आधार घेत नव्हता तो ही आता याचा आधार प्रतिष्ठेसाठी / सोयी साठी घेउ लागला आहे हे माझे मत त्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या मागणीवरुन त्यांनाही एक ज्योतिषी ठेवावा लागला.
अवांतर- नवीन मिपाकरांना या पुस्तकाची लेखमाला एका नजरेत राहावी यासाठी धागा उत्खननाचा क्षीण प्रयत्न.
8 Jan 2012 - 5:41 pm | अप्रतिम
सध्या बर्याच ठिकाणी स्थळ पसंत नसेल तर "पत्रिका जुळत नाही" असे कारण पुढे करण्यात येते.अथवा पसंत असेल तर पत्रिका "जुळवण्यात" येतात.वास्तविक पत्रिकेचा एवढाच उपयोग राहिला आहे.
बाकी लेख डोक्यावरुन गेला.
15 Mar 2012 - 1:08 pm | बॅटमॅन
सर्व लेख वाचले. प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देण्याऐवजी शेवटच्या लेखावर देतो आहे.
मस्त चिरफाड केलीत ज्योतिषशास्त्राची. आता आमच्या अन्धश्रद्ध परिचितांशी मस्त वाद घालायला लै लै मजा येणार.
अवांतरः
वेणीसंहाराचा उल्लेख आवडला. जुन्या काळातील तर्कशुद्ध विचारांचे काही अवशेष या लेखी तो महत्वाचा आहे.