(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
5 Apr 2020 - 12:59 pm

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती.

सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो.

२००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा.
मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही. हे साहेब 92.7 मोठ्या एफ एम् वर ' यादों का इडियट बॉक्स ' हा कार्यक्रम पण करतात. हा माणूस अजून काय काय करतो ते tuneslow.com वर पाहता येईलच.

मुलाखत घेण्याची खूप अनवट, लोभसवाणी व आपल्याला सैल, संथ करणारी अशी अनोखी पद्धत हेच निलेशचं वैशिष्ट्य. त्याने घेतलेली माझी सर्वात आवडती मुलाखत संजय मिश्राची. धबधब्यासारखा हसवलं आणि अश्रूंनाही गालावर ओघळेपर्यंत कळलंही नाही की थोडे रडण्याचे पण आहेत. हा कलंदर आपल्या जीवनातील एक तास वीस मिनिटं आणि तेरा सेकंद एवढ्या वेळेवर अमिट छाप मारून जाईल.

https://youtu.be/8Jnb9xfjocA

इर्शाद कामील, मनोज वाजपेयी, सलीम खान यांच्याही मुलाखती रंगल्यात. मुलाखती नव्हेच ह्या तर गप्पा म्हणा ना. शेतात, गाडीत, जेवण बनवता बनवता , पक्षी बघता बघता...अस काय काय. एकदम यंव रे यंव मामला आहे सगळा. माणसांमागची माणसं, चेहऱ्यामागचे चेहरे, ओळींमागे दडलेले अर्थ आणि आयुष्यामगे लपलेलं लपवलेलं अस्सल आयुष्य समोर कसं येतं ते कळतच नाही.

'करण, कॉफी आणि काहीतरीच ', मी ह्यातला प्राणी नव्हे.
अनुपमा चोप्राने घेतलेल्या काही मुलाखतीही चांगल्या आहेत. माझी आवडती ह्रतिकची आहे. अनुपम खेरने घेतलेली विकास खन्ना याची प्रामाणिक मुलाखत भावून जाते. गुलजारजींच्या बऱ्याच मुलाखती आहेत. काही भाषणं आहेत. जगजित सिंग यांच्या एका कार्यक्रमातील त्यांचे भाषण एकदम वा रे वा !! जावेद अख्तर या वादग्रस्त कवीच्या भरगच्च मुलाखती आहेत. मी बऱ्याचश्या बघितल्यात. सहज जाता जाता हे कवी एखादी ओळ अशी बोलून जातात की आपले काळजाचे ठोके काही काळ इकडेतिकडे होतात.

घरबसल्या एखादी आळशी सकाळ, झोपिष्ट दुपार, एकटी संध्याकाळ, रातराणीचा सुगंध घेऊन येणारी चांदण्यांच्या छुमछुम आवाजातील एक रात्र, ह्यातलं काहीतरी एक निलेश मिश्राकडे सोपवून तर बघा. जाताजाता "एक तरी मुलाखत अनुभवावी", असंच सांगतो. आवडलं तर जरूर कळवा. कदाचित आपल्या अनुभवातून मलाही काही नवीन शिंगं येतील.

जीवनमानआस्वादअनुभवमतशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2020 - 5:50 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच भन्नाट मुलाखत आहे संजय मिश्रा यांची ! अतिशय मोकळी ढाकळी आणि मनस्वी !
इथं शेअर केल्या बद्दल धन्यवाद, ज-म साहेब!

इथं एम्बेड करतोय !

शशिकांत ओक's picture

11 Apr 2020 - 10:26 pm | शशिकांत ओक

यादों का इडियट्स बॉक्स...
कारमधून जाता जाता ऐकून मस्त मूड बनतो...