२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...
मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत. अगदी पर्यटक जरी परदेशातून आलेले असले तरी त्यांचे स्वागत आणि इतर आदरातिथ्य स्थानिक भाषेत केले जाते. जेथे जरूर असते तेथे भाषा अनुवादक उपस्थित असतो.
आपल्या मराठी प्रांतात असे होते का याचा विचार प्रत्येक मराठी भाषीकाने मराठी दिनानिमित्त करायला हवा. मी येथे "मराठी प्रांत" हा शब्द वापरला आहे तो अशासाठी की मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत राहू नये. मराठीसाठी महाराष्ट्र हा केवळ एक पेटीसारखा साचेबद्ध आकार नाही. त्याच्या बाहेरही मराठी गेली पाहिजे. तिचा विकास झाला पाहिजे.
लिखाणाच्या बाबतीतही मराठीचा संकोच होतो आहे असे लक्षात येते. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर भरपूर पुस्तके छापलेली दिसत आहेत. नव-नविन प्रकाशने पुस्तके छापत आहेत. वर्तमानपत्रे लाखो वाचक असल्याचा निर्वाळा देत आहेत आणि तुम्ही असे उलट का म्हणत आहात असाही प्रश्न विचाराल. एक लक्षात घ्या, की सर्वच ठिकाणी (म्हणजे सर्व भागात) लोकसंख्या वाढत आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला पुस्तकांचा, वाचकांचा खप वाढलेला दिसेल, पण हेच प्रमाण शेकडा किती टक्के असावे त्याचाही विचार करायला हरकत नाही. यात वाचकांचा आकडा सोडला तर मराठीत लिहीणार्यांची संख्या अतिशय रोडावलेली दिसेल. मला सांगा किंवा तुमच्या मनालाच सांगा की तुम्ही शेवटचे मराठीतले पत्र म्हणा, मराठीतली चिठ्ठी म्हणा किंवा नातेवाईकांना आताच्या जमानातले मराठीतले ईमेल कधी पाठवले? मला वाटते ते तुम्हाला आठवणारच नाही. गेल्या सहा महिन्यांत किती जणांनी वेबसाईटवर लिखाण केले? किंवा ब्लॉग लिहीला? किती जणांनी मराठीत आपले विचार शब्दबद्ध केलेत? किती जाणांनी कवितेचे पुस्तक विकत किंवा ग्रंथालयातून आणून मनापासून त्याचा आस्वाद घेतला? मला वाटते शेकडा प्रमाण चिंताजन असेल.
थोडक्यात मराठी वाचकांची आणि मराठी भाषेत लिहीणार्यांच्या आकड्यांबाबत अचूक संशोधन झाले पाहिजे. केवळ व्हाटसअॅप किंवा फेसबूकवर एक दोन प्रतिक्रीया लिहील्या किंवा मराठीतील दिवसाच्या शुभेच्छा असलेले निरोप दुसर्यांना पाठवले म्हणजे माझी मराठीप्रती असलेली जबाबदारी पूर्ण झाली असे नाही. मराठी बोलण्यासाठी, मराठी लिहीण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे. आणि ते प्रयत्न मनापासून झाले पाहिजे. केवळ आज मराठी दिन आहे, आज एक मे, महाराष्ट्र दिन आहे म्हणून मराठी एका दिवसापुरती मर्यादित ठेवू नये.
आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.
तर या लेखाच्या शिर्षकानुसार केवळ "२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...मी मराठी लिहीण्याचा प्रयत्न करेन" असे न होता "दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे", या समर्थांच्या ओवीनुसात मराठीच्या वृद्धीसाठी दररोज काहीतरी लिहायला आणि वाचायला हवे.
प्रतिक्रिया
25 Feb 2020 - 1:31 pm | चौथा कोनाडा
समयोचित लेख ! कळकळ जाणवली !
स्वागतार्ह आहे, सध्या हे सुरुच आहे, टिव्हीच्या बातम्या पाहिल्यातर कित्येक मथळे चुकीचे / अशुद्ध लिहिलेले आढळतात ! तेच फ्लेक्स अन हाताने लिहिलेल्या फलकांबाबतीतही ! इंग्लीश माध्यमातली मराठी युवापिढी अन नव-मराठी / स्वत:ला महाराष्ट्रीयन म्हणवणारे अ-मराठी लोक आधी पासुनच हे करताहेत !
शेवटी कायय, जो समुह धनशक्ती हरवून बसतो, त्याची भाषा र्हासमार्गाचीच वाटचाल करते !
25 Feb 2020 - 2:32 pm | चौकस२१२
दुर्दैवाने खालील विचारसरणी मुळे आपल्या भाषेचा ऱ्हास होत आहे
- महाराष्ट्रात चांगले मराठी ( १०० गुणांचे) सक्तीचे नाही ( १०० गुणांचे मराठी शिकलेलं सुद्धा जगात यशस्वी झाले आहेत )
- एवढेच काय मला वाटते कि काही शाळेत शिताफीने मराठी शिकणे टाळता येते ( हे कोडं मला कधी उलगडलं नाही, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमी स्थानिक भाषा हि कमी दर्जाचीच का? गोरा साहेब गेला पण राखाडी राहिला याचे हे प्रतीक आहे कि काय ?
या वरील गोष्टींमुळे मराठी वाचन नाही हि सर्वात मोठी खटकणारी गोष्ट
- इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे म्हणजे मराठी कडे दुर्लक्ष करणे हि एक अतिशय चुकीची समजूत
- अनेक भाषा शिकणे हे चांगलेच आहे पण त्याचा असा विपर्यास केला जातो कि "बघा माझा मुलगा फ्रेंच बोलतो = म्हणजे तो हुशार...प्रगत वैगरे.. अरे पण आज आफ्रिकेतील लाखो लोक अस्खलित फ्रेंच बोलतात याचा अर्थ ते सर्व हुशार आणि प्रगत आहेत का?
- मराठी प्रांत सोडला कि मराठी विसरायला होते!.. तद्दन खोटं आहे हे ... आज ४-५ पिढ्यातील ग्रीक , इटालियन आणि चिनी लोक त्यान्ची स्वतःची भाषा बोलतात ३०-४० वर्षे मराठी प्रांता बाहेर राहिलेले लोक चांगले मराठी बोलतात .
पिकत तिथे विकत नाही असे दिसतंय
26 Feb 2020 - 11:45 am | कुमार१
सहमत.
सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात.
सदराचे नाव :
गर्जा मराठीचा जयजयकार
एक दुवा:
https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-fou...
26 Feb 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा
मनोहर शेटे यांची सुंदर मुलाखत आहे !
विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हा चिवटपणा, या मुलांमध्ये का कमी पडत असावा? इंग्रजी माध्यमातील मुलं दोन जगात वावरत असल्यामुळे, त्या संघर्षांमुळे होतंय का?
हे विशेष आवडले.
धन्यू कुमार१जी !
27 Feb 2020 - 9:18 am | प्रचेतस
समयोचित धागा.
27 Feb 2020 - 9:19 am | प्रचेतस
मराठी भाषा दिनाच्या सर्व मिपाकरांस शुभेच्छा.
27 Feb 2020 - 1:31 pm | मुक्त विहारि
आपण कितीही बोंबललो तरी, मराठी भाषा टिकवायला राज्यकर्ते प्रयत्न करत नाहीत.
ज्या क्षेत्राला राज्यकर्ते आश्रय देत नाहीत, ते क्षेत्र हळूहळू रोडावते आणि मृत्यूमुखी पडते.
उदा. पाली, ब्राह्मी
अशावेळी सामान्य माणूस आपला आपला मार्ग निवडतो.
27 Feb 2020 - 6:56 pm | पाषाणभेद
गुरूत्वाकर्षण = जडओढ
पेट्रोल = पेटतेल
डिजेल = जळतेल
गाडीची कीक = पायधक्क्याचा खटका (खटका)
यासारखे शब्द मराठीत रुजवायला हवेत.
यासाठी इस्त्रायल अर्थात हिब्रू भाषेचे उदाहरण देता येईल.
हिब्रू भाषेत बरेचसे नवे शब्द कायदेशीरपणे रुजवले गेले आहे. तेथील व्यवस्थेने तेथल्या लोकांकरता हिब्रू भाषेत नवे शब्द तयार करायला प्रोत्साहन दिले.
उलट आपल्या येथील शासकिय शब्दकोष बघा. त्यातील मराठी शब्द संक्रूतोध्बव आहेतच पण क्लिष्ट देखील आहेत. त्यापेक्षा इंग्रजी शब्द सोपे वाटतात.
अर्थात मराठी फोफवायची असेल तर शुद्धलेखनाचे क्लिष्ट नियम नाकारले पाहिजे. तद्भव शब्दांऐवजी नवे शब्द स्विकारले पाहिजे.
28 Feb 2020 - 6:17 pm | प्रचेतस
हे नाही पटत,
भाषा जगवायची असेल तर ती क्लिष्ट करता कामा नये.
28 Feb 2020 - 5:48 pm | चौथा कोनाडा
+ १
या पातळी वरची चर्चा सुद्धा होत नाही, होतात त्या फक्त साहित्य संमेलनं, अनुदानं, उद्घाटन, अध्यक्षपदाचे वाद इ. इ.
हे दुर्दवी आहे.
29 Feb 2020 - 9:09 pm | हुप्प्या
इस्रायल हा एक अत्यंत छोटा देश आहे. एका धर्म त्या देशवासियांना घट्ट धरुन ठेवतो. हा देश अत्यंत हिंस्र अशा शत्रूंनी वेढलेला असल्यामुळे त्यांच्यातील एकी जास्त तीव्र आहे. आपण कुणीतरी वेगळे आहोत, आपल्यावर कायम अन्याय होत आला आहे म्हणून आपण एक नव्याने सुरवात केली पाहिजे. ह्या विचारांनी तो देश बनला. हिब्रू ह्या भाषेचे पुनरुज्जीवन हा त्याचाच भाग. ह्या ज्यू अस्मितेमुळे ती भाषा, त्यातील नवे नियम इस्रायली लोकांनी स्वीकारले.
मराठीचे असे नाही त्यामुळे तसे होणे दुरापास्त आहे.