शिवजयंतीच्या निमित्ताने... लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
19 Feb 2020 - 12:08 pm

शिवजयंतीच्या निमित्ताने...

लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

शिवजयंती उत्सवाच्या पर्वणीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा लष्करी अधिकार्‍यांच्या नजरेतून सादर करण्यात विलक्षण आनंद होतो आहे. महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फत्ते केलेल्या अनेक कारवायातून जगातील लष्करी इतिहासात त्यांचे उत्तुंग व विराट व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यात शायिस्ताखानाला खतम करायची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अग्रणी आहे.
म्यानमार (ब्रह्मदेशातील) घनदाट जंगलातून लपलेल्या उपद्रवी सशस्त्र टोळ्या नागालँड, मणिपूर, मिझोराम प्रदेशात घुसून त्रास देत. त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला १४ जून२०१५ मधे पहिला सर्जिकल स्ट्राईक झाला. त्यात २१ पॅरा, स्पेशल फोर्सच्या ७० कमांडोंनी १५ किलो मीटर आत जाऊन १५८ जणांना मारून त्यांची ठाणी नष्ट केली. नंतर २९ सप्टेंबर २०१६ रात्री पाकिस्तानात घुसून ७ ठिकाणच्या आतंकवादी तळांना नष्ट करायची कारवाई सर्व ज्ञात आहे. यामुळे बरोब्बर हव्या त्या ठिकाणी जाऊन नेमकेपणाने शत्रूचा खातमा करणे याला 'सर्जिकल स्ट्राईक' हे नामाभिधान सर्वज्ञात आहे.

शिवाजी महाराजांची लालमहालावरील बेडर धाडसी धाड ही जागतिक सैनिकी इतिहासातील उत्तमोत्तम कमांडो रेड मध्ये अग्रगण्य आहे.
या सर्जिकल कमांडो स्ट्राईकचा लष्कराच्या दृष्टीने विचार सादर आहे.

अशा धूर्त मोहिमेत तीन भाग महत्त्वाचे असतात.
१. हव्या त्या ठिकाणी, हवे तितक्या संख्येने, ठरवलेल्या वेळेस पोहोचवायची योजना करणे.
२. विवक्षित जागेची नासधूस, व्यक्तींचा खातमा करायचाच.
३. कामगिरी संपवून आपल्या सर्व सैनिकांनी सुरक्षित परत येणे.

महाराजांच्या लालमहालावरील सर्जिकल स्ट्राईकचा या अनुषंगाने आराखडा मांडताना बखरीतील नोंदी, इंग्रजांच्या पत्रातील संदर्भ, आणि लष्करी सेवेतील अनुभव यावरून ह्या अद्भूत स्ट्राईकचा शोध सादर आहे.

पार्श्वभूमी

मुगलसेना अनेक सरदारांच्या छावण्यांमध्ये वाटून राहात असे. त्यात मराठा सेनेचे डेरे ही असत. त्यांना मुख्य मुघल सेनेच्या महत्त्वाच्या सरदारांपासून, खजिना, शस्त्रागारापासून दूर ठेवले जात असे. शायिस्ताखान (इराणी वंशाचा - मूळ नाव अबु तालिब)औरंगजेबाचा (ताजमहाल फेम मुमताज महलचा - कदाचित सावत्र - धाकटा भाऊ) मामा म्हणून, मुगल दरबारात वरिष्ठतेत अग्रणी होता. खुशालचेंडू, रंगेल, सढळ हाताने हव्या त्या गोष्टी विकत घेणारा म्हणून विदेशी व्यापाऱ्यांचा आवडता ग्राहक होता. शक्यतो मोहिमा लोकांच्या अंगावर टाकून मस्त मजेत राहायला सवकलेला होता. नुकताच त्याने स्वतःच्या मुलीचा निकाह दिल्लीतील वजनदार सरदाराच्या मुलाशी पुण्यात अत्यंत थाटामाटात करून दिला होता. तो एक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. ३ वर्षे पुण्यात ठाण मांडून बसलेला दक्षिण विभागाचा सुभेदार परत उत्तरेत जायचे विसरला होता. त्याच्या तिथे राहण्याने महाराजांच्या वसुलीवर प्रचंड ताण पडत होता. पुण्याच्या परिसरात विशाल मुगल सेना अस्ताव्यस्तपणे तंबू, डेरे, काही हिसकावून घेतलेल्या घरात तर खुद्द खान लालमहालात आपले नातलग, नोकर चाकरांच्या गराड्यातून दरबार चालवत होता. वेळोवेळी दिल्लीला सर्व काही आलबेल आहे असे खलिते पाठवून स्वस्थ होता. या पार्श्‍वभूमीवर महाराजांना जबरदस्त अ‍ॅक्शन घ्यायलाच हवी होती. डोंगराच्या, गड किल्ल्याच्या कुशीत त्याला, विशाल सेनेला गाठून हुसकावून लावणे शक्य नाही हे महाराजांच्या लक्षात आले होते.

बतावणी योजना

लालमहालापर्यंत सध्याच्या लष्करी भाषेत २ कंपनीच्या संख्येचे कमीत कमी ४०० कसलेले खंदे धाडसी जवान होते. त्यांचे नेतृत्व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे आपापल्या कंपनीचे कमांडर म्हणून नेतृत्व करत होते. महाराजांच्या स्वतःच्या सुरक्षेतील दस्त्यातील, २ प्लाटूननी (साधारण ६०जण) अति सुरक्षाकडे तोडून लाल महालातील उंच सुरक्षा भिंती पार करायला दोरशिड्या लावून प्रवेश मिळवायला, काही ठिकाणी दरवाजे, भिंती तोडायला घण, पहारी, वगैरे तोडफोड साहित्य बरोबर आणले होते. तिसर्‍या प्लाटूनने ढोल, ताशे, तुताऱ्या अशा घोषवाद्ये काबीज करून मोठा आवाजाचा गलका करून आपल्याकडे झोपलेल्या सैन्यात गोंधळात टाकायचे होते. या दोन्ही प्लाटूननी आपापली दिलेली कामे पूर्ण केली की मुठा नदीपार करून पलिकडे भांबुर्ड्यात लपूनछपून आलेल्या दुसर्‍या कंपनीतील प्लाटूननी वरातीसाठी बरोबर आणलेल्या घोड्यावर महाराज व जितके जातील तितक्यांनी स्वार होऊन गणेश खिंडीतून चतुश्रुंगीचा डोंगर पार करून (सध्याच्या पाषाण, सूस कडील भागात) पसार व्हायचे. मोका पाहून सिंहगडावर परतायचे. तिसरी कंपनी मुठा नदी पलिकडे काठाकाठाने जमून वेळ आली तर नदी पार करून तिथे अडकलेल्या आपल्या सैनिकांना सोडवायला सज्ज होती. गरज पडली तर महाराजांना जादा घोड्याची सोय पैसे चारून करून द्यायची. मग हळू हळू सिंहगडाच्या पायथ्याशी जमायचे. काहींनी आपापल्या ओळखीच्या लोकांना भेटायला जायची टूम काढून रात्री घडलेल्या घटनेची बातमी काढायची.

हव्या त्या ठिकाणी, हवे तितक्या संख्येने, ठरवलेल्या वेळेस पोहोचवायची योजना करणे.

गेटपास - एका लग्नाचे गावकरी - ताशा, वाजंत्री घेतलेले - वर्‍हाडी म्हणून सोंग घेऊन बाह्य सुरक्षा रक्षकांशी भेटून मुगलांच्या डेऱ्यातून पलिकडे म्हणजे (सध्याच्या काळात कात्रजच्या नवऱ्या मुलाचे वऱ्हाड खडकीच्या नवऱ्या मुलीकडच्या लग्नाला) जायला बरोबरच्या बैलगाड्यातून अन्य जनावरांसह परवाने घेऊन आत शिरले. बरोबरचे लग्न साहित्य चाचपून पाहून त्यांना आतील सुरक्षा कड्याकडे न जाता बाहेरूनच जा म्हणून बजावले. मुगलांच्या हजारोंच्या संख्येने तंबू, राहुट्या, जनावरांचे तबेले, जागोजागी ज्या त्या सरदारांच्या सैनिकांसाठीचे भटारखाने वगैरे अस्ताव्यत्ततेतून वाट काढत जाता जाता कोणा सरदारांचे डेरे कुठे आहेत. याचा कानोसा घेतला जात होता. तीन वर्षे राहून राहून त्यांच्यात आलेली सुस्ती, सुरक्षेबद्दल ढिलाई याचा अंदाज घेत वर्‍हाडी पुढे
सरकत जात राहिले. कोणी विचारले तर परवाना दाखवून पुढे जाता जाता अति सुरक्षा कड्यापर्यंत पोहोचायला कंपनी कमांडरनी आपापले मार्ग बदलले. वळणांच्या आडोशाने ठराविक प्लाटून कमांडर आपापल्या दिशेने सुटले. यातच महाराजही होते.

सूर्य मावळला. *५ एप्रिल १६६३, शोभन नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी तर रमझान महिन्यातील सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी तो एक दिवस होता.
रमझान महिन्यात रोजे करून दिवसभराचे भुकेलेले शिपाई आपापल्या चौक्या, तंबूतून खाना आणणाऱ्यांवर भराभर तुटून पडताना दिसत होते. अंधारातून महाराज शस्त्र सज्ज होऊन आपल्या बरोबरच्या मावळ्यांची मोजणी करून अति सुरक्षा कडे तोडायला सज्ज झाले. त्या काळातील (सध्याच्या क्वार्टर गेट, स्वार गेट, पुल गेट नावाच्या) चौक्या, वेशीला चुकवून, अंबिल आणि अन्य नाले, ओढ्यांच्या पात्रात उतरून तर कधी घरांच्या आडोशानी पुढे सरकत कसब्यात येत राहिले. याभागात पूर्वी जात-येत असलेल्या मावळ्यांनी इतरांना बरोबर घेत लालमहालाची तटाची मागची बाजू पकडली. साधारणतः कुठल्याही इमारतीची, वाड्याची, कचेरीची मागची बाजू ही त्या इमारतीत, हवेलीत काम करणाऱ्या नोकर-चाकरांच्या वहिवाटेची असते. त्यामुळे त्याबाजूकडे सुरक्षा कडे नेहमीच गलथान असते. याबाजूने तटाकडून नदीच्या पात्रात जाऊन पाणी पुरवठा, कपडे धुणे, भोजनाची भांडीकुंडी सफाई कामगारांना जायची यायची वर्दळ असते. नोकर लोक माहिती झाले असल्याने तिथे ढिलाईचा कारभार चालतो. तसेच त्या दिवशी ही झाले. सूर्यास्तानंतरच्या चमचमीत भोजनाची घाई त्यांना होती. रात्री अपरात्री लघुशंका करायला आत राहणाऱ्या लोकांना, स्त्रियांना अडचण, अडकाठी नको म्हणून दरवाजे उघडे ठेवून दुर्लक्ष केले जात होते.

विवक्षित जागेची नासधूस, व्यक्तींचा खातमा करायचाच.

महाराजांच्या बरोबरचे प्लाटून दोरशिड्या लावून कसे काय वर चढायचे, यावर विचार करून होते. जसजशी रात्र वाढली तसे काही जण लपत छपत फाटकातून आत डोकावत जाऊन पाहून आले. नव्याने बांधलेल्या भटारखान्यातून पुढे गेले की थेट मुख्य हवेलीच्या चौकात जाता येते असे त्यांच्या लक्षात आले. जेवणाची धांदल संपल्यावर तिथे खालच्या मजल्यावर सरदारांच्या बेगमांच्या आया, खोजे झोपले होते. वरच्या मजल्यावर खानाची नाते मंडळी व चिल्लीपिल्ली मुले झोपेची मजा घेत होते. वारा घालणारे नोकर झोपाझोप झाल्यावर तिथेच मुरकटून आडवे झाले होते. रात्री १२ नंतर चंद्र डोक्यावरून कलून चौसोप्यात अंधार वाढला. आणखी बराच वेळ गेल्यावर भटारखान्यात सकाळची न्याहरी सूर्योदयाच्या आधी नाश्ता तयार करायला चुलाणे पेटवायला खानसामे कामाला लागले.
एकदम वरच्या मजल्यावर बाहेरून चढून जाऊन तिथून हल्ला करायला दोर शिड्यांच्या खुंट्या मारायला हव्या होत्या. पण त्या ठोकाठोकीतून जाग येऊन बेत बारगळायला नको म्हणून महाराजांनी भटारखान्यातून आणखी मावळ्यांसह जायचे दबक्या आवाजात चर्चा करून ठरवले. चौकीतून जिने कुठल्या बाजूला आहेत, मुख्य महाल, शेजारच्या झोपायच्या कोठ्या कुठे आहेत ते खुद्द महाराजांच्या वर्दळीत असल्याने माहिती होते.
चुलाण्यांचा जाळ भडकला, मेंढ्या, बकरे कापले जाऊन शाही कबाब बनवायची तयारी सुरू झाली. आपल्या अंगरक्षकांना पुढे घालून महाराज नंगी तलवार तळपत सरसावले. चौकीत येईपर्यंत वाटेत आलेले काही खानसामे मान मुरडून गारद झाले.
मधल्या चौकीत आपापल्या पथाऱ्या पसरून काही नोकर मुरकटून झोपले होते. त्यांना ओलांडताना काही नाही जागे झाले. गांगरुन जाऊन ‘कोण आहे? काय झालं?’ असे विचारतो तोवर मानेला हिसका बसून त्यांनी जहन्नमचा रास्ता सुधारला. महाराज पहिल्या मजल्यावर जिना चढून दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यात खान कुठे असेल याचा अंदाज घेत अंधारात पुढे जात राहिले. तोवर अंग रक्षकांची चाहूल लागून काही नोकर जागे झाले. पण हातात काही शस्त्र नसल्याने ते पटापट लपून बसले. महाराजांच्या मते खान दुसऱ्या मजल्यावर असायला हवा होता. अंगरक्षक महाराजांच्या मागोमाग वर चढून येत असताना जो दिसेल त्याला भोसकून जखमी करत करत सरकत होते. 'या खुदा, रहम कर' असे आवाज, किंकाळ्या आता बारिक आवाजात ऐकायला येऊ लागल्या. महाराज एक एक खोलीत जाऊन जनानखान्यात गदर माजवत सरकत होते. तेवढ्यात खानाचा मुलगा अब्दुल फतेह सावध होऊन ओरडून ओरडून सांगत सुटला, 'गनीम आया है! भागो’!
आवाजाच्या दिशेने एका अंगरक्षकाला जखमी करून त्याने बापाला जागे करून पळून जायला महाराजांना आडवे घेतले. अंधारात मिणमिणत्या अर्धवट दिवट्यांच्या प्रकाशात महाराजांच्या तलवारीचे हात समोरच्याला घायाळ करून जात होते. महाराजांना तुंदिलतनूचा खान सापडत नव्हता. तिकडे खान काहीतरी ‘गदर’ चालू आहे असे वाटून कमरेला काचा मारून तलवार, खंजीर, अंधारात अंदाजाने शोधत होता. मुलगा त्याच्या खोलीपाशी ओरडून सांगत होता, 'पपाजांन, आप नीचे भागो! दुश्मन उप्पर तक आया है!' तोच महाराजांच्या तलवारीने त्याचा अंत झाला. 'आता खान सापडला', म्हणे तोवर मिणमिणता प्रकाश कोणी तरी फुंकून बंद केला. त्या मोठ्या कमऱ्याला असलेल्या दुसर्‍या दरवाजातून खान खाली सटकला. महाराजांनी अंदाजाने केलेले वार ज्यांना लागत होते त्यांच्या किंकाळ्या काही बायकी आवाजात होत्या. ज्यांना शक्य झाले ते चिंचोळ्या जिन्यातून 'भागो भागो' म्हणत पळत सुटले. महाराज खानाला शोधत फिरत होते. समोर आलेल्याला अंधारात मारताना काही आवाज पुरुषांचे होते. त्यात एखादा जखमी झाल्याचा आवाज खानाचा नक्की असावा असे महाराजांना वाटत होते.
वरच्या मजल्यावर फारसे कोणी उरले नाहीत असे वाटून महाराज खालच्या मजल्यावर अंदाजाने जिन्यातून तोल सावरत खाली आले. तिथे प्रत्येकजण जिन्यातून खाली तळमजल्यावरील चौकीत उतरायच्या धडपडत होता. खानाला बहुमान देऊन आधी सटकून जायला द्यायला अंधारात शक्य नव्हते. शिवाय खाली उतरलेले महाराजांच्या अंगरक्षकांच्या समोर येताच भोसकून गारद होत होते.
खानाने सगळी धांदल पाहून तातडीने एका बाजूच्या लहान खिडकीतून खाली लटकून राहावे असा विचार करून पटकन शेजारच्या एका खिडकीतून आपले जाडजूड अंग दाबून त्यातून जायला सुरवात केली. नेमक्या त्याच वेळी महाराजांनी अंधारात खिडकीपाशी हालचाल पाहिली. एकाला लटकलेला पाहिला. तो खान होता. पण महाराजांना खात्री व्हायला पाहिजे होती. खिडकीच्या कठड्याला दोन्ही हातांनी धरून तो लटकून होता. त्याची छाती धडधडत होती. घामाच्या धारा लागल्या, हातापायांना मुंग्या आल्या होत्या.
'अचानक झालेल्या हल्ल्यात कोण सामिल झालेत? इब्लिस सिवा, तो नहीं?' विचार करे पर्यंत मनगटावर वार पडला. पुन्हा एकदा तलवार खिडकीच्या बाजूच्या भिंतीवर खरडून तो वार उजव्या हाताच्या बोटांवर पडला. करंगळी अन अंगठा सोडून बाकी तीन बोटांनी घाव सोसून तुकडे करून घेतले. रक्ताच्या चिळकांड्या उडताच हात झटकत खानाने दोन्ही हात सोडले. त्याचे बोजड शरीर खाली पडलेल्या शवांवर लुडकले. खान न मरता जखमी झाला. त्याने स्वतःला सावरले आणि गुसलखान्यात लपून तिथले पाणी जखमांवर टाकून तो विव्हळत राहिला. नोकर लोकांची पांगापांग झाली. महाराजांनी आपले अंगरक्षक पुन्हा वरच्या मजल्यावर पाठवून कोणी उरले असतील तर मारायला आज्ञा केली. ज्याला जिवे मारण्यासाठी मोहीम हाती घेतली तो सुटून चालणार नव्हता. काही बायका, पुरुष वरच्या मजल्यावर मारले होते पण त्यात खानही असेल असे खात्री करायला मावळे गेले. खानाला प्रत्यक्ष कोणी पाहिले नव्हते.

कामगिरी संपवून आपल्या सर्व सैनिकांनी सुरक्षित परत येणे

आता आतल्या बाजूला होणाऱ्या आवाजाची चाहूल बाहेरच्या सैन्य दस्त्यांना लागली तर आपले मरण इथेच आहे. असे महाराजांच्या बरोबर आलेल्या मावळ्यांना वाटत असतानाच एकाएकी कर्णे, ढोल, ताशाचे आवाज बाहेरून मोठमोठ्याने येऊ लागले. 'काय गळाठा आहे' ? म्हणून डोळे चोळत जो तो एकमेकांना विचारत राहिला. 'ये आवाज़ तो नमाज की बांग है नही? फिर क्या हो सकता है?' गोंधळ वाढला. लालमहालाचा बाहेरचे गस्ती सैनिक डोळ्यावरची झापड सोडून आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत आणखी कुठून कुठून ढोल ताशे वाजायला लागले. एकच गहजब झाला. नक्की काय झाले आहे? कुठल्या बाजूने आवाज येत आहेत याचा विचार सोडून काहींनी आपापले पांघरूण सरसावून कुशी बदलली!
आधी ठरल्याप्रमाणे जोवर आवाज होत आहे तेवढ्यात नदीच्या पात्रात उतरून भांबुर्ड्यातून पाताळेश्वराकडे धावत सुटायचे. त्यामुळे आता कोण मेले, कोण जखमी याचा विचार सोडून जो तो भटारखान्यातून मागच्या दाराने नदीकडे धावला. काही वेळाने ते भेसूर आवाज कमी होत बंद झाले. महाराज समजून गेले कि ते गेले!
दुसर्‍या कंपनीने तीन घोडे तयार ठेवले होते. त्यावर दोन अंगरक्षकांच्या समावेत महाराज चतुश्रुंगीच्या डोंगराला वळसा घालून पाषाण गावाकडे सटकले. नदी पार करून आलेल्या उरलेल्या अंगरक्षकांना जादाच्या आणलेल्या घोड्यावर स्वार करून पाठवून दिले जात राहिले. तिकडे महाराज बावधन पर्यंत येता येता उजाडला लागले. शायिस्ताखानाच्या पसार्‍यातील काही सरदारांच्या राहुट्या पार धायरीपर्यंत लागलेल्या होत्या. त्यांना चुकवत, डोणजे, वरून सिंहगडाच्या पायथ्याशी अटकरवाडीत महाराजांनी तासभर विश्रांती घेतली. आता खानाचे सैन्य इथवर यायची शक्यता नव्हती. त्यांचे बाकीचे साथीदार हळूहळू जमा होत राहिले. खान या मारकाटीत नक्की मेला किंवा जबर जखमी झाला असावा, असे ते एकमेकांत चर्चा करत राहिले.
मागे राहिलेल्यांपाशी परवाना होता. ते तो दाखवत आतल्या आत फिरत राहून 'कालंच्या रातीचा' हालहवाल काढत होते. ते परतले तेंव्हा खानाचा जीव वाचला आहे, हाताला जबर फटका बसला आहे, काही बोटे तुटली आहेत. त्या रात्री ५१ जण मेले. त्यात मुलगा, जावई, १२ खानाच्या बेगमा, अन्य घरचे नातलग होते. लालमहालातील जनानखान्यात वावरणाऱ्या बायका, नोकरचाकर १०० च्या वर जबर जखमी झाले, अशा बातम्या घेऊन आले. (खान त्या रात्रीच मरायचा. पण नंतर ३१ वर्षे जगून वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लाहला प्यारा झाला! रोज तुटक्या बोटांनी खाता पिताना लालमहालातील ती रात्र मात्र त्याला विसरता आली नाही!)

सार्थकता

सर्जिकल स्ट्राईकची यशस्विता त्या नंतरच्या घटनांतून ठरते. ३ वर्षे ऐसपैस तळ ठोकून राहिलेल्या शायिस्ताखानाने ३ दिवसात पुण्यातून पळ काढला. पुण्याला लागलेला गळफास ढिला पडला. संपूर्ण तळाला तेथून उठून जायची वेळ आली. खानाचे तडकाफडकी निलंबित होऊन तिथे औरंगजेबाने आपला २० वर्षाचा कोवळा शहजादा मुअज्जम खानला नेमला.
या घटनाचक्राचा निष्कर्ष असा निघतो की महाराजांनी आखलेली कमांडो रेड अतिशय उत्तम पार पडली. त्यातील त्यांचा स्वतःचा सहभाग, त्यांची दिलेरी, आत्मविश्वास, साहसी निर्णय तडीस नेणारी निश्चयी वृत्ती, यातून त्यांची गणना जागतिक स्तरावरील एक क्रमांकाचे रणसेनानी म्हणून होते.

चित्र दुवा

सध्याच्या लालमहालातील तळमजल्यावरील चौकी

अशाच एका खिडकीतून खान लटकून बोटे तुटून खाली पडला!

महाराज लालमहालातील सर्जिकल स्ट्राईक आटपून कदाचित या भागातून आले होते.

लालमहालाचा सुरक्षा घेरा

माहितीसाठी खुलासा - साधारण सर्व ऐतिहासिक लेखनातून ५ एप्रिल १६६३ तारीख देण्याचा प्रघात आहे. पण वस्तुतः ५ एप्रिल १६६३चे पंचांग गूगलवरून शोधले तर भारतीय तिथीनुसार शके १५८४, शुभकृत संवत्सर, फाल्गुन मास द्वादशी, गुरुवार असे भलतेच दिनमान लिहून येते.

१५ एप्रिल १६६३ तारीखेला शक, संवत्सर, वार, तिथी बरोबर जुळून येते.

काळाच्या ओघात जुलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर मानावे असा ठराव इंग्रजांच्या संसदेने मंजूर केला म्हणून सन १७५२ पर्यंत तारखेचे संदर्भ जुन्या जुलियन गणनेने दर्शवले जातात. तर १७५२ पासून तारखांचे संदर्भ नव्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे दर्शवले जातात. म्हणून साधारण १० तारखांचा फरक पडतो. गूगल असा भेदभाव न करता ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे दिन दर्शन करवतो.

लेखकः विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे. 9881901049.

मांडणीइतिहासभूगोलविचारशुभेच्छासमीक्षा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

19 Feb 2020 - 12:25 pm | दुर्गविहारी

अतिशय अप्रतिम आणि अभ्यासपुर्ण लिखाण ! मी आपणाला पुन्हा एक्दा विनंती करतो, हे सर्व लिखाण एखाद्या व्हिडीओ किंवा पॉवर पॉईंट्स्वरुपात ठेउन प्रत्येक शाळेमध्ये दाखवायची सोय करायला हवी. या मार्गाने चटकन घटना डोळ्यासमोर येत असल्याने अधिक प्रभाव पडतो. अश्याच अभ्यासपुर्ण लिखाणासाठी शुभेच्छा ! _/\_

शशिकांत ओक's picture

19 Feb 2020 - 2:57 pm | शशिकांत ओक

हे सर्व लिखाण एखाद्या व्हिडीओ किंवा पॉवर पॉईंट्स्वरुपात ठेउन प्रत्येक शाळेमध्ये दाखवायची सोय करायला हवी. या मार्गाने चटकन घटना डोळ्यासमोर येत असल्याने अधिक प्रभाव पडतो.

यासाठी मदत करायला कोणी आपणहून तयार असेल तर त्यावर विचार करून क्लिप्स बनवता येतील.
शाळा संचालक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला तर काही होऊ शकते.

शशिकांत ओक's picture

19 Feb 2020 - 8:20 pm | शशिकांत ओक

नमस्कार मित्रांनो,
दुर्गविहारींच्या प्रतिसादाने उत्साह दुणावला.
माहितीसाठी...
काही दिवसापूर्वी दै पुढारीतील संपादकांचा फोन आला. शिवजयंतीच्या निमित्ताने पुरवणीत महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित लेख पाठवा म्हणून विनंती केली होती. त्यांनी वेळ कमी असल्याने त्वरित कारवाई करावी म्हणून विनंती केली.
मी रात्रीचा दिवस करून तो लेख तयार केला. मेहेंदळे सरांना ५ एप्रिल १६६३ कि १५ एप्रिल यावर त्यांचा अभिप्राय मिळवला. लेख पाठवला.
पण काही काही कारणाने तो ईमेलवरून त्यांना मिळायला जड गेले म्हणून व्हॉट्सअॅप वरून पाठवला तो त्यांनी वापरला.
आज दैनिकात तो कसा काय प्रस्तूत केला आहे हे पहायला उत्सुकता होती. ई पेपरवर तो वाचून झाल्यावर वाटले फुलवलेल्या मोराचा पिसारा संपादकीय संस्कारात इतका कापला गेला... असो.
त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे करावे लागते ते त्यांनी केले असेल. असो.

http://newspaper.pudhari.co.in/fullview.php?edn=Mumbai&artid=PUDHARI_MUM...

नरेश माने's picture

20 Feb 2020 - 1:27 pm | नरेश माने

खुप छान लेख! दुर्गविहारींचा सल्ला सुध्दा चांगला आहे. खरंच अश्या उपक्रमामुळे शाळेतील मुलांना इतिहासाचे आकलन सोपे होईल.

मुलगा त्याच्या खोलीपाशी ओरडून सांगत होता, 'पपाजांन, आप नीचे भागो! दुश्मन उप्पर तक आया है!>>>> इथे पपाजांन मात्र खटकत. अब्बाजान असायला हवं ना?

शशिकांत ओक's picture

20 Feb 2020 - 2:51 pm | शशिकांत ओक

खरेच आहे आपले म्हणणे. ती करून दुरुस्ती करत आहे.

खिलजि's picture

20 Feb 2020 - 5:21 pm | खिलजि

काय सांगू ,, हे वाचून हात शिवशिवायला लागले बघा .. मला अजूनही आठवतंय , मी खरंच खूप नशीबवान आहे , कारण मला लहानपणापासूनच या ऐतिहासिक गोष्टींचं बाळकडू मिळलेलं आहे .. माझ्या दोन्ही आज्या मला या शौर्यकथा लहानपणापासूनच ऐकवायच्या .. खरंच आताच्या मुलांच्या नशिबात हे सर्व नाही याची खंत वाटते ..

शशिकांत ओक's picture

20 Feb 2020 - 7:05 pm | शशिकांत ओक

आताच्या मुलांच्या नशिबात हे सर्व नाही याची खंत वाटते

तरुणाईला ती खंत वाटू नये म्हणून स्फूर्ती दायक लढाईच्या बाबत लष्करातील लोक कसे नियोजन करतात हे समजून देण्यासाठी असे सादरीकरण केले जाते.
आपल्यासारख्या वाचकांच्या बालपणातील आठवणी जाग्या झाल्या हे ही चांगले झाले.

शेखरमोघे's picture

21 Feb 2020 - 3:07 am | शेखरमोघे

नेहेमीसारखेच माहितीपूर्ण लिखाण!! नकाशे असल्यामुळेच आणखीनच छान!! अभिनन्दन!

चांदणे संदीप's picture

24 Feb 2020 - 10:54 am | चांदणे संदीप

प्रत्यक्ष मोहिमेत सामील असल्यासारखे वाटले.

सं - दी - प

शशिकांत ओक's picture

24 Feb 2020 - 12:39 pm | शशिकांत ओक

असेल तर रटाळ वाटतो. राजे, महाराजे, सम्राट वगैरे नावे वाचून त्यांचा दबदबा वाटतो. लढाईच्या घटनातून एकमेकांना मारून, जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करून पुढील घटनांना कलाटणी मिळताना दिसते.
सैन्याचे संचलन, त्यांची पेरणी, भौगोलिक प्रदेश वगैरे विचारात घेऊन लढायांकडे पहायची सवय करायची गरज वाटली म्हणून लेखन सादर...

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

छान लेख ! नकाशे दिल्यामुळे आणखी रोचक झाला !
सन-सनवळ्यांपेक्षा अश्या घटना ऐकुन वाचूनच प्रेरित होतात लोक हे नक्की !

खटपट्या's picture

24 Feb 2020 - 10:30 pm | खटपट्या

फोटो दिसत नाहीत...

मदनबाण's picture

1 Mar 2020 - 10:32 am | मदनबाण

लयं भारी !
नापाकिस्तान सध्या अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतुन जात आहे, त्यांची सगळ्याच स्तरावर कोंडी होताना दिसत असुन खाण्या पिण्याच्या वस्तुंचे भाव देखील गगनाला भिडलेले आहेत. अशी स्थिती असुन सुद्धा तिथल्या हिंदु मुलींना पळवुन त्यांच्यावर सक्तीने इस्लाम कबुल करायला लावुन तसेच सक्तीनेच निकाह देखील लावुन देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, अश्या कॄत्यांनी पाकिस्तान एका प्रकारे हिंदुस्थानाला विंचु दंश करत आहे.
शत्रु दुर्बळ असताना त्याच्यावर योग्य वेळी चढाई करुन त्याचा कायमचा निप्पात केल्यास भविष्यात त्याचा उपद्रव होत नाही ! हिंदुस्थानाकडे आता अशी दुर्मिळ संधी चालुन आलेली आहे आणि ती वाया घालवता कामा नये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2020 - 8:47 am | सुधीर कांदळकर

खिडकीतून पळतांना बोटे कशी तुटली असतील. हे वाचतांना ते कोडे सुटले. अत्यंत चित्रदर्शी वर्णन. चित्रपटच उभा केलात डोळ्यांसमोर. अनेक, अनेक धन्यवाद.