पावणेदोन पायांचा माणूस

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
11 Sep 2019 - 3:21 pm

राजकारणात पीए नावाची जमात म्हणजे जरा अवघड जागेचं दुखणं असतं. कारण त्यांना नेत्याच्या सगळ्या भानगडी माहीत असतात. त्याचा पैसा कुठून येतो, कधीपर्यंत टिकणार आहे ते कोणाच्या कोण सोबत त्याची सेटिंग आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा अर्धा कारभार हे पीए लोकंच निभावून नेतात. लोकसत्तेतलं दोन फुल एक हाफ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधलं दिड दमडी मध्ये तंबी दुराई ने राजकारणावर केलेलं खुसखुशीत भाष्य तुम्ही कधी ना कधीतरी वाचलंच असेल, त्याच तंबी दुराई म्हणजे श्रीकांत बोजेवार यांची पावणेदोन पायांचा माणूस हि कादंबरी सुद्धा तशीच चिमटे काढणारी आहे. तसं पाहिलं तर धनावडे गावात राहणाऱ्या पितांबर उर्फ लंगड्या हा एक सामन्य वकुबाचा मुलगा, त्याच्या सोबतचे मित्र मॅट्रिकला गेलेले तरी हा अजून त्याच इयत्तेत होता. जन्मतः एका पायाने अधू असल्याने सारं गावच काय तर खुद्द त्याचे आई बाप म्हणजे अजाबराव आणि सगुणा पण त्याला लंगड्याच म्हणतात. लंगड्या अभ्यासात जरी कच्चा लिंबू असला तरी आजवर त्याला समोर आलेला वेळप्रसंग कसा निभावून न्यायचा याच ज्ञान उपजत आहे, त्यामुळे याच जोरावर कित्येक वेळा बापाच्या हातचा मार त्याने चुकवला. अभ्यासात तो जरी कच्चा असला तरी भिरभिरत्या नजरेच्या जोरावर गावातल्या सगळ्या भानगडी त्याला माहीत आहेत. कधी काय असतं आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही नाजूक बाबी असतात, ज्या समोर येऊ नयेत असं प्रत्येकाला कायम वाटत असतं. आता नशिबाने शाळेतल्या एका मास्तरांच असच एक गुपित कळतं आणि या गुपिताच्या जोरावर तो स्वतःचा उत्कर्ष कसा करतो याची कहाणी म्हणजे पावणेदोन पायांचा माणूस.

आपल्याकडे चित्रपटात ब्लॅक कॉमेडी भरपूर दिसते, पण हल्लीच्या साहित्यात 'निशाणी डावा अंगठा' सारखे काही अपवाद सोडले हा प्रकार दुर्मिळच. तसंही आजच वातावरणही त्याला तितकंसं पोषक नाही म्हणा असो. या पार्श्वभूमीवर पावणेदोन पायांचा माणूस अजूनच ठळकपणे उठून दिसते. राजकारण आणि त्याच्या आजूबाजूची व्यवस्था यांना व्यवस्थित बोचकारे मारत मनमुराद हसवते सुद्धा. अजून एक भारी गोष्ट म्हणजे याचं मुखपृष्ठ, कादंबरीची गोष्ट ठळकपणे दाखवणारं मुखपृष्ठात कादंबरीचं मेन सिक्रेट लपलंय. गावातले माणसं, राजकारण आणि जगण्याची वेगळीच गोष्ट सांगणारी पावणेदोन पायांचा माणूस नक्की वाचायलाच हवी.

abc

मांडणीवावरवाङ्मयकथाआस्वादमत

प्रतिक्रिया

अरे वा, रोचक वाटतंय. वाचायला हवं.

महासंग्राम's picture

11 Sep 2019 - 3:36 pm | महासंग्राम

नक्की वाचा, एका बैठकीत वाचून पूर्ण होते.

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 4:15 pm | जॉनविक्क

सवडीने अवश्य वाचल्या जाईल.

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2019 - 12:00 am | स्वाती दिनेश

पुस्तक परिचय आवडला.
नक्की वाचेन.
स्वाती