आरंभशूर

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
2 Jan 2019 - 10:42 am

``तू...तूच जबाबदार आहेस ह्या त्रासाला! You are the culprit!`` `364` तावातावाने भांडत होते.
``मी काय केलंय?`` बिचारी `1` रडकुंडीला आली होती.
``तुलाच नको त्या गोष्टी सुचत असतात कायम. तुझेच लाड होतात. तुलाच सगळे गोंजारतात. आमची काही किंमतच नाही!`` `364` आज ऐकायला तयार नव्हते.
``अरे, पण काय झालंय ते सांगा तरी!``
``दरवर्षी तुझी हीच नाटकं. तू काहीतरी कमिट करून बसतेस आणि त्याचा त्रास आम्हाला भोगायला लागतो!``
``काय कमिट केलंय मी आता?``
``काय कमिट नाही केलंस, ते विचार!``
``बरं, काय कमिट नाही केलं?``
``हे बघ, फालतू विनोद करून विषय भरकटवू नकोस. सगळा दोष तुझा आहे. सगळं तू ठरवतोस आणि आम्हाला तो भार वाहावा लागतो.``
``अरे पण मी काय ठरवलंय, ते तरी सांगा?``
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!``
``मग?``
``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``
``पण लोक नवे संकल्प करायला माझीच निवड करतात त्याला मी काय करू?`` `1` ही आता वैतागली होती.
``तू सरळसरळ नकार देऊन टाकायचा!``
``तेवढं माझ्या हातात असतं, तर माझी अशी बदनामी होऊ दिली असती का मी?``
``तुझी कसली बदनामी? तुझी तर मजा असते. नवा उत्साह, नवी उमेद, नव्या शुभेच्छा, नवे संकल्प....``
``डोंबलाचा नवा उत्साह, नवी उमेद! अरे, तुमच्याकडे बघून, तुमच्या काळजीपोटी मी सगळं accept करते आणि तुमच्या अपयशाचं खापर शेवटी माझ्यावर फुटतं!``
``काय संबंध?`` `364` नी लगेच झिडकारून टाकलं.
``मग काय तर! मी ठरवलेलं तुम्ही निभावलं नाहीत, म्हणून मलाच दोष दिला जातो.``
``बरं, मग काय म्हणणं आहे तुझं?``
``बास झालं आता! यंदा मी ठरवलंय!``
``काय?``
``यंदा हे संकल्पांचं ओझं बाळगायचं नाही. तुमच्या स्वास्थ्याची, तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेणार नाही, विषय संपला!``
``बरं, बरं ठीकेय. चिडू नकोस. तुला नाही ना जबाबदारी घ्यायची? नको घेऊ.``
``That’s better!``
``बाय द वे, हे तू आज का सांगतेयंस?``
``म्हणजे?``
``आमचं राज्य सुरू झालंय आता. तुझा दिवस संपला! काल कुठे होतीस तू?``
``अरे देवा! 2 तारीख उजाडली का?`` `1`च्या पायाखालची जमीनच सरकली होती.
``आता भेटू पुढच्या वर्षी. आम्ही बघतो काय करायचं ते. तुझी बदनामी नको आणि ओझंही! `` `364`नी सुनावलं आणि पाठीवर हात ठेवून तिथून चालते झाले.

मांडणीकथामुक्तकलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

2 Jan 2019 - 10:50 am | अनिंद्य

:-) :-)
एकदम पटले, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'कोणताही संकल्प न करण्याचा संकल्प' केला आहे या वर्षी :-)

२०१९ सुखाचे जावो ह्या शुभेच्छा.

टर्मीनेटर's picture

3 Jan 2019 - 3:58 pm | टर्मीनेटर

छान लिहीलय....

मुक्त विहारि's picture

5 Jan 2019 - 2:55 pm | मुक्त विहारि

पटलं.

1 आणि 364 आमच्या आयुष्यात सुखाने नांदत आहेत.

कारण. ..न झेपणारे संकल्प करण्यात काही अर्थ नाही....

बबन ताम्बे's picture

5 Jan 2019 - 3:39 pm | बबन ताम्बे

छान !!