मैत्र - ६
आजचा दिवस धावपळीचा गेला होता तरी सगळे आनंदी होतो. कॉलेजमध्ये वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, उपक्रम या सगळ्या भानगडींपासून दुर रहाणाऱ्या शकीलने आज ‘वक्तृत्व स्पर्धेचा’ करंडक अनपेक्षितपणे खेचून आणला होता. हा करंडक गेला असता तर जोशीसरांचे आठवडाभर शिकवण्यात लक्ष लागले नसते. थकवा जाणवत होता तरी आम्ही नेहमीप्रमाणे शाम्याच्या ओट्यावर जमलो होतो. शाम आणि दत्ता माझी स्कुटर घेऊन सगळ्यांना कप दाखवायला गेले होते. त्यांना बराच वेळ झाला होता जाऊन, एव्हाना यायला पाहिजे होते. मी, ठोब्बा, राम, शकील सगळेच ओट्यावर बसलो होतो. आज कुणीही ओटाकट्याला दांडी मारणार नव्हताच.