'एका मुलीची' गंमत
छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून पाठी दप्तर टाकून, उड्या मारत किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांचीदेखील शाळा सुटली आहे.त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यांतील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे.