आज 'तो' राहिला नाही
यायचे कुठुनसे तेव्हा
ढग दाटुन एकाएकी
स्पर्शून जायची मजला
प्रीतीची लाट अनोखी
उधळीत पेटता श्वास
'तो' कवेत मजला घेई
परि आर्त क्षणांना तैशा
कधि मेघ बरसला नाही..!
अन् आज दाटले मेघ
ही सांज कोंडली आहे ..
अन् आज अधिर श्वासात
ही प्रीत मांडली आहे
अन् अवचित आज खुळासा
नभि मेघहि बरसुन जाई...
पण कवेत मजसी घेण्या,
आज 'तो' राहिला नाही!
© अदिती जोशी
11.6.2013
http://unaadpaus.blogspot.com