(गड गड गड)
पाऊस थांबायचे नाव घेईना
खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत
तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस
गूढ, अनाकलनीय भाषेत
(गड गड गड)
-----
धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट
कौलांवरची टीपटीप थेंबांची लय
चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ
आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात
(गड गड गड)
------
खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी
हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर
त्यात हसणारी तू
आणि तुला हसतांना बघून हसणारा मी
(गड गड गड)
------
रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये
चमचमणारे ते चिंचेचे ओघळ
डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु
स्स... चटका लावणारे
तो चंदेरी-पिवळा रंग मनात घर करून जाणारा
(गड गड गड)
------
पावसाचे तांडव वाढतच जातंय
पावसाने तावदानावर सर सर सर लिहिलेली
आत्ताचीच नीरओळ
चक्क माझ्या मनाच्या, पण तरीही गूढ भाषेत
.
.
आज तू हवी होतीस... स्स
.
.
गड गड गड
गड गड गड
|-मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१२/०८/२०१३)
प्रतिक्रिया
12 Aug 2013 - 5:53 pm | वेणू
सुंदर अभिव्यक्ती, कंसातील शब्द नसले असते तरी छानच पोहोचते आहे (वै म)
धन्यवाद
12 Aug 2013 - 8:35 pm | पैसा
बाकी रचना सुरेखच. पण मलाही ते गड गड गड वाचताना जरा अडखळायला होत होतं.
12 Aug 2013 - 11:39 pm | इनिगोय
नीरओळ! कसली खलास कल्पना!
19 Aug 2013 - 3:23 pm | बॅटमॅन
नीरओळ ही कल्पना अन विशेषतः शब्द लै आवडला.
14 Aug 2013 - 10:16 am | अनिदेश
वा.....!!!!
14 Aug 2013 - 10:44 am | सुहास..
मस्त कच्चा माल आहे ;)
15 Aug 2013 - 11:36 pm | सईसखी
सुरेख
15 Aug 2013 - 11:50 pm | कवितानागेश
छानच आहे कविता.
पण ते गड्गडगड वाचताना अडखळल्यासारखं होतय.
मात्र या कवितेचं वाचन बॅकग्राउंडला गडगडाट घेउन केले तर छान इफेक्ट येइल. :)
16 Aug 2013 - 2:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
म्हणूनच ते कंसात आहे. ते वाचण्यासाठी नाही, तो फक्त इमॅजीन करायचे शब्द आहेत.
19 Aug 2013 - 3:09 pm | फिझा
खूपच मस्त !! अगदी नेहमी सारखीच !!